(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते.

अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. चेंबर ऑफ कॉमर्समधील काही ट्रेनिंग प्रोग्रामस् मध्येही त्यांचा सहभाग होता. त्याव्यतिरिक्त त्यांनी अशा कंपनीसाठी कस्टमर-सॅटिस्फॅक्शनवर सर्व्हे कंडक्ट केला होता.

सोशल सायन्सेसशी निगडित विषयांत त्यांनी ट्रेनिंग-प्रोग्राम व वर्कशॉपस् तर केलीच, जसें, कम्युनिकेशन, रिलेशनशिप्स, लीडरशिप, टीमस्, वगैरे ; पण त्याशिवाय, वर्क-इथिक्स्, स्ट्रेस-मॅनेंजमेंट इत्यादी विषयांमधील ट्रेनिंग प्रोग्राम आणि वर्कशॉपस् मध्येही त्यांचा सहभाग असे.

स्नेहलता नाईक यांना आंतरिक सामाजिक जाण होती. पोथीनिष्ठ व पारंपारिक विचार त्यांनी, त्यावर खोल विचार केल्याशिवाय व पटल्याशिवाय कधीच स्वीकारले नाहीत. प्रोग्रेसिव्ह विचारांना त्यांचे समर्थन असे. ‘विमेन्स लिब्’ या विचारधारेला, व खास करून समाजातील स्त्री-पुरुष समानतेला त्यांची एंपॅथी, व भावनिक सपोर्ट असे.

निसर्गावर त्यांचे निरतिशय प्रेम होते, विशेष करून कोंकणातील निसर्गावर. त्यामुळे त्या वारंवार कोंकणला भेट देत असत, तिथें बागायती शेतीतही त्यांनी या प्रेमापोटीच भाग घेतला होता.

स्नेहलता नाईक यांचे नुसते वाचनच प्रगल्भ होते असे नव्हे, तर त्या वाचनाचा व स्वत:च्या सखोल आणि वाइड-रेंजिंग ज्ञानाचा उपयोग त्यांनी विविध लेख लिहून केला, व त्यापैकी कांहीं लेखन, नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. समर्थ रामदासांच्या दासबोधातील काही भागाचे त्यांनी इंग्रजी भाषांतर केले होते.

परंतु, त्यांनी कधीही स्वत:च्या ज्ञानाचा बडेजाव दाखवला नाहीं, किंवा उपदेशकाचा आव आणला नाहीं. अनेक खर्‍या थोर जनांच्या तुलनेत आपण स्वत: फारच लहान आहोत, अशीच त्याची जेन्युइन मनोभूमिका होती. प्रसिद्धीपराङ्मुखता हा त्यांचा स्थायीभाव होता.

हंसतमुख व मिस्किल स्वभावाच्या म्हणून स्नेहलता नाईक परिचितांमध्ये लोकप्रिय होत्या. भावी मृत्यूची पूर्ण कल्पना असूनही, त्यांच्या मिस्किल कॉमेंटस् मरणाच्या दिवशीही सहजपणें चालू होत्या, यावरून त्यांच्या धीरोदात्त, निर्भय व प्रॅक्टिकल स्वभावाची कल्पना यावी. त्या काळात त्यांच्याशी संपर्कात असलेल्या माणसांना, या व्यक्तीला दुर्धर व्याधी झालेली आहे, याची कल्पना त्यांतून दिसत नसे. कुठल्याही प्रकारें अपसेट् न होता, विचलित न होता, भावी मृत्यूला सहज स्वीकारणें, ही साधी गोष्ट नव्हे.

स्नेहलता नाईक यांचे प्रकाशित-अप्रकाशित लेखन तसेच ट्रेनिंग प्रोग्रामस् चे उपयुक्त मटीरियल, त्यांचे कुटुंबीय आतां, स्टेप-बाय्-स्टेप, वेब् वर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.