(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा


गोपी :

                  तेजस नीलमण्यांचा मळा

राजस वनमाळी सांवळा ।।

 

नयनमनोहर रूप सांवळें

मनीं उतरलें कैसें, न कळे

न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।।

 

नील कमलदल, भ्रमरपुंजही

श्यामल यमुना, श्यामला मही

नीलमेघ जलभरले, तैसा हा घनश्याम निळा ।।

 

मोरपीस शोभतें शिरावर

श्यामल तनुस खुलवी पीतांबर

कटीं बासरी, करीं घोंगडी, तुलसीमाळ गळा ।।

 

किति सांगूं श्रीहरिचें कौतुक

शब्दशब्द मज बनवी भावुक

जन्मजन्मिंचें पुण्य म्हणुन, हरि बघते नजडोळां ।।

 

खचितच आहे मंदबुद्धि मी

साती लोकीं मोद शोधि मी

आनंदाचा कंद पुढे , मग जगिं कां धांडोळा ?

 

– – –

– सुभाष स. नाईक

 

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*