( शिवजयंतीनिमित्त ) छत्रपतीचा जयजयकार

 

मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा

निबिड वनें, बेलाग गडांचा

जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार  ।।

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

चपळ, वायुसम घोडदळांचा

शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा

गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा  गर्जा जयजयकार ।।

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

अतूट बुरुजांच्या रांगांचा

लखलख पात्यांच्या खड्गांचा

ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।।

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

पावन ईप्सित, जीनवनिष्ठा

ध्येयपूर्तता हीच प्रतिष्ठा

स्वराज्यअमृतघटप्राप्तीचा गर्जा जयजयकार ।।

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

शक्ति-युक्ति-नीतीचा  संगम

प्रजासुखा कायम अग्रक्रम

श्रीरामासम शिवनृपतीचा जर्जा जयजयकार ।।

मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

 

– – –

 

– सुभाष स. नाईक

मुंबई

M- 9869002126.

eMail :  vistainfin@yahoo.co.in.

Website  :   www.subhashsnaik.com

www.snehalatanaik.com

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*