मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक : एक पुनर्भेट

एक पुनर्भेट   : 

मराठे आणि दिल्‍ली १८वे शतक   

(( टीप   (2019) – येऊं घातलेल्या निवडणुकांच्या निमित्तानें,  हल्ली, सर्वश्री नितीन गडकरी व शरद पवार यांच्या नांवांचा प्रधानपत्री पदाच्या संदर्भात उल्लेख होतो आहे.

संदर्भ – वृत्तपत्रांमधील लेख.

-आणखी एक संदर्भ म्हणजे ‘मराठी सृष्टी’ या सेब पोर्टल वरील श्री. चितामणी कारखानीस यांचा लेख.

या व अशा लेखांमध्ये १८व्या शतकातील मराठ्यांचा उल्लेख येतो, व तें अपरिहार्य आहे, कारण १८ व्या शतकातील भारतात मराठ्यांचें स्थान महत्वपूर्ण होतें, खास करून दिल्लीच्या संदर्भात.

पंचवीसएक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स् मध्ये,  ( माझ्या आठवणीप्रमाणें, श्री. कुलकर्णी यांचा ), या विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्याचा रोखही अप्रत्यक्षपणें शरद पवारांवरच होता, व त्यातही १८व्या शतकाचा उल्लेख होता.

त्यावेळी मी लिहिलेल्या लेखाची ही पुनर्भेट . यात १८व्या शतकातील मराठ्यांचें विश्लेष केलेलें आहे ; सध्याच्या , शरद पवार प्रभृती महाराष्ट्रीयांचें नाहीं, हें कृपया ध्यानांत ठेवावें. अर्थात्, त्याचा संबंध ‘आज’शीही जोडतां येतोच. ))

**

अठराव्‍या शतकात मराठी सत्तेने प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या भारताचा बराच भूभाग आपल्‍या अधिपत्‍याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्‍येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्‍लीला धडक दिली वा दिल्‍ली काबीजही केली पण ते दिल्‍लीपती झाले नाहीत. याचे कारण म्‍हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्‍याचा मराठी भाषा, संस्‍कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्‍या स्‍वाभिमानामुळे आणि आपल्‍या आत्‍मसंतुष्‍ट किंवा अल्‍पसंतुष्‍ट वृत्तीमुळेच मराठे दिल्‍लीच्‍या उंबरठ्यावरच राहिले, दिल्‍लीपती झाले नाहीत.

मराठी माणसाला मराठी भाषा व संस्‍कृतीचा अभिमान असतोच. म्‍हणूनच, दिल्‍लीच्‍या अनुषंगाने, हा संतुष्‍टपणाचा आक्षेप कितपत योग्‍य आहे, याचे इतिहासानुसार विश्र्लेषण करणे आवश्‍यक आहे.

‘मराठे’ किंवा ‘मराठी माणूस’ हा उल्‍लेख जेव्‍हा जेव्‍हा येतो, तेव्‍हा एक विशिष्‍ट भाषा (मराठी) , व ‘ती भाषा जिथें बोलली जाते अशा भूभागातील संस्‍कृती असलेला लोकसमूह’ हाच अर्थ तेथे अभिप्रेत असतो. (म्हणजे, आज ज्यांचा उल्लेख ‘महाराष्ट्रीय’ असा केला जातो, ते लोक). आपणही त्‍या प्रचलित अर्थानेच हे शब्‍द येथे वापरीत आहोत.

 

स्‍वसंस्‍कृतीचा अभिमान असणे यात गैर ते काय? –

स्वभाषा, स्‍वसंस्‍कृती यांचा अभिमान सर्वांनाच असतो. भारतात व भारताबाहेर पसरलेल्‍या गुजराती, मारवाडी, शीख, तमिळ इत्‍यादींना स्‍वभाषा व स्वसंस्‍कृतीचा अभिमान नसतो, असे कोणी म्‍हणून शकेल का? स्‍वभाषा व स्‍वसंस्‍कृतीच्‍या अभिमानातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली. जगभर विखुरलेल्‍या ज्‍यू लोकांना स्‍वसंस्‍कृतीचा अभिमान नसता तर दोन हजार वर्षांनंतर इस्राएलची पुनर्निर्मिती झालीच नसती. जगावर सत्ता गाजवणार्‍या  युरोपीय राष्‍ट्रांतील नागरिकांना आपली भाषा, संस्‍कृती व मुलुख (देश) यांचा अभिमान नव्‍हता का? स्‍वसंस्‍कृती, स्‍वभाषा व आपला मुलुख याचा अभिमान बाळगणे यात गैर काहीच नाही.

 

सुरूवात शिवाजीपासून  –

जिला ‘मराठे’ म्‍हणून संबोधावे अशी राजकीय शक्‍ती शिवाजीपूर्वी अस्तित्‍वातच नव्‍हती. शून्‍यातून सृष्टि निर्माण करावी तसे त्‍याने परकीय सत्तांच्‍या अधिपत्‍याखाली असलेल्‍या मुलुखातून स्‍वराज्‍य निर्माण केले. ३०० वर्षे परकीय सत्तेखाली दडपल्‍या गेलेल्‍या मराठ्यांची अस्मिता त्‍यानेच जागृत केली. १८व्‍या शतकात भारतभर गाजलेल्‍या ‘मराठे’ नामक सत्तेचा निर्माता होता शिवाजी.

शिवाजीच्‍या बाबतीत एक विद्वान म्‍हणतात, ‘आपण दक्षिणेतच राहू, मुघलांस इकडे येऊ द्यायचे नाही. हा विचार सतराव्‍या शतकात प्रबळ दिसतो. आपण दिल्‍ली ताब्‍यात घेऊ अशी विचारसरणी नाही’, (पाहा महाराष्‍ट्र टाइम्‍स, मैफल, २६.६.१९९४); म्‍हणून आपण शिवाजीसंबंधी विश्र्लेषण करून मगच १८व्‍या शतकात प्रवेश करू.

 

शिवाजीच्या ज्‍या काळाचा आपण विचार करतो आहोत त्‍यावेळी इमादशाही व विजयनगर नामशेष होऊन एक शतक लोटलेले होते. निजामशाही व बेरीदशाहीचाही मुघलांनी अंत केलेला होता. ( १६३७ ते १६५६ ). आदिलशाही व कुतुबशाही यांनाही उतरती कळा लागलेली होती ( आणि पुढे १६८६ व १६८७ मध्‍ये मुघलांनी त्‍यांचाही अंत केलाच ). त्‍याकाळी भारतात मुघल ही एकच महासत्ता होती. दक्षिणेत उतरलेल्‍या महासागरासारख्‍या मुघल सैन्‍यापुढे निभाव न लागल्‍यामुळे १६६५ मध्‍ये शिवाजीला मुघलांशी तह करावा लागला व बादशहाची चाकरी कबूल करून आग्र्याला जावे लागले होते. ( नंतरही अशीच विस्‍तीर्ण सेना घेऊन औरंगजेब स्‍वतः मराठ्यांचा काटा काढायला २५ वर्षांहून अधिक काळ दक्षिणेत तळ ठोकून बसला होता ).

ह्या पार्श्वभूमीवर, ‘आपण दिल्‍ली ताब्‍यात घेऊ’ असा आत्‍मघातकी अविचार शिवाजीसारखा व्‍यवहारी व मुत्‍सद्दी पुरुष करेल का? शिवाजीने जरूर लागेल त्‍याप्रमाणे चतुरपणे कधी मुघल तर कधी विजापूरकरांशी सख्‍य केले व आपले स्‍वराज्‍याचे राजकारण सफल केले. दिल्‍ली काबीज करणे त्‍या काळी दक्षिणी सत्तेला अशक्‍य होते. मुघलांना दक्षिणेत शह देणे, हाच व्‍यावहारिक वास्‍तववाद होता. शिवाजी हा युगपुरुष होता, निर्माता होता, अल्‍पसंतुष्‍ट तर तो नव्‍हताच नव्‍हता.

 

१८व्‍या शतकाचा मागोवा

मराठी सत्ता भारतव्‍यापी झाली ती १८व्‍या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्‍लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्‍या दिल्‍लीविषयक कामगिरीचे विश्र्लेषण करण्‍यापूर्वी आपण १८व्‍या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.

 

८ मे १७०७ रोजी शाहू मुघलांच्‍या कैदेतून पळाला, किंबहुना मुघलांनी त्‍याला तशी संधी दिली. तेव्‍हापासून ते १५ डिसेंबर १७४९ रोजी त्‍याच्‍या मृत्‍यूपर्यंत ४३॥ वर्षे मराठ्यांच्‍या राजकारणावर शाहूचा प्रभाव होता. वस्‍तुतः औरंगजेबाने शाहूला जिवंत ठेवले ते राजकारणातले एक प्‍यादे म्‍हणूनच. तो हेतू पुढे सफल झाला. औरंगजेबाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याचा मुलगा आज्‍जम याच्‍या ताब्‍यात शाहू होता. शाहूला सोडावे असा सल्‍ला आज्‍जमला झुल्फिकार खान व राजपूत सरदारांनी दिला होता. शाहू मुघलांशी मित्रत्‍वाने वागेल आणि त्‍याचबरोबर राज्‍याच्‍या अधिकारासाठी मराठ्यांमध्‍ये यादवी माजेल याची त्‍यांना खात्री होती. आणि झालेली तसेच. खरोखरच शाहू आयुष्‍यभर मुघलांच्‍या सरंजामदाराप्रमाणेच वागला. ( त्‍यामुळे अशी शंका येते की तसे वचन कैदेतून सुटण्‍यापूर्वी बेलभंडारा उचलून त्‍याने मुघलांना दिले असावे. )  मुघल सत्ता राखावी, बुडवू नये असा आदेश शाहूने पेशव्‍यांना दिला होता.

 

शाहू स्‍वतः मुघलांच्‍या कैदेतून सुटला तरी १७१९ पर्यंत पुरी १२ वर्षे शाहूची आई व कुटुंबीय दिल्‍लीला मुघलांच्‍या ताब्‍यात होते. त्‍याहून महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे लहानपणापासून १८ वर्षे शाहू मुघलांसमवेत राहात होता. ह्या संस्‍कारक्षम वयात त्‍याचे स्‍नेहसंबंध निर्माण झाले ते मुघलांशी, त्‍याला विलास-उपभोगांची आवड निर्माण झाली तीही मुघलांच्‍या सहवासामुळेच.

 

ज्‍या शाहूला मराठ्यांनी आपला छत्रपती म्‍हणून, आपला स्‍वामी म्‍हणून मान्‍यता दिली तो शाहू स्‍वतःला मुघलांचा सरंजामदारच मानत होता; ज्‍या मराठ्यांनी  १८वे शतक गाजवले ते शाहूचे अथवा पेशव्‍यांचे सरदार होते आणि पेशवे स्‍वतःच छत्रपतींचे मंत्री होते, ही गोष्‍ट नजरेआड करून चालणार नाही. १८व्‍या शतकाचे विवेचन करतांना ध्‍यानात ठेवायला हवे की त्‍या काळातील मराठ्यांचे राजकारण व त्‍यांची मर्दुमकी ही सेवकांची होती, स्‍वामींची नव्‍हे.

 

बाजीराव

२९ मार्च १७३८ रोजी बाजीरावाने दिल्‍लीला धडक दिली, त्‍यावेळची सैनिकी परिस्थिती काय होती? बाजीराव बुंदेलखंडातून उत्तरेस आग्र्याजवळ आला, तेव्‍हा मुघलांनी त्‍याचा सामना करण्‍यासाठी वझीर कमरउद्दीन व मीरबक्षी खाने दौरान यांच्‍या अधिपत्‍याखाली दोन सेना तयार केल्‍या. दिल्‍ली आग्र्यादरम्‍यान सैनिकी जमाव झालेला होता. ह्या सैन्‍याला इतरत्र वळवण्‍याच्‍या हेतूने बाजीरावाने मल्‍हारराव होळकराला यमुनापार दोआबात धाडले. परंतु अवधचा नबाब सादतखान याने त्‍याला परतून लावले. अशा प्रकारे बाजीरावाचा एक डाव फुकट गेला म्‍हणून त्‍याने एक युक्‍ती केली ( आणि इथे आपल्‍याला बाजीरावाचा शिवाजीसारखा चतुरपणा युद्धाच्‍या डावपेचांच्‍या बाबतीत दिसून येतो ). आग्र्यापासून थोडे मागे हटून त्‍याने आपल्‍या सैन्‍याबरोबरचे बरेचसे सामान बुंदेलखंडाकडे रवाना केले. त्‍यामुळे बाजीराव दक्षिणेस परत जात आहे असा मुघलांचा समज झाला. परंतु बाजीराव पश्चिमेकडून जाट व मेवाती मुलुखातून मुघल सैन्‍याला बगल देऊन दिल्‍लीवर जाऊन धडकला. आपण हे विसरता कामा नये की ह्या वेळी मुघलांच्‍या दोन सेना दिल्‍लीच्‍या जवळच होत्‍या. बाजीरावाचे सैन्‍य होते ५० हजार तर मुघली सेना होती १ लाख. दिल्‍लीत अधिक काळ राहणे सैनिकी दृष्‍ट्या धोक्‍याचे होते, आणि बाजीरावासारख कुशल सेनानी असा धोका कसा पत्‍करेल?

 

‘अमर्यादा केल्‍यास राजकारणाचा दोरा तुटतो’ असे दिल्‍लीबाबत बाजीरावाने चिमाजीला लिहिले आहे. ते शाहूने आखून दिलेल्‍या धोरणामुळे म्‍हटले आहे, हे उघड आहे. ‘दिल्‍लीचा पातशहा होण्‍याची शाहूची इच्‍छा नाही’ असे शब्‍द आपल्‍या मे १७३९ च्‍या पत्रात बाजीरावाने वापरलेले आहेतच. ज्‍या शाहूने इतर सरदारांचा विरोध असतांनाही बाजीरावाला पेशवा बनवले, त्‍या आपल्‍या स्‍वामीच्‍या इच्‍छेचा अनादर करणे बाजीरावाला शक्‍यच नव्‍हते.

 

पुढे जाण्‍याआधी मी आणखी एक मुद्दा सुचवून ठेवतो. आपण ज्‍या पत्रांच्‍या आधारे आपली मते बनवतो, ती पत्रे राजकारणी पुरुषांची होती, हे लक्षात घ्‍यायला हवे. ती पत्रे साधारणतः लेखनिकांकरवी लिहून घेतलेली असत म्‍हणजे १००% गुप्‍ततेची अपेक्षा धरता येत नाही. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे त्‍या धामधुमीच्‍या काळात जेव्‍हा दळणवळण फारच कठीण होते, जासुदाद्वारे पाठविलेला खलिता शत्रूच्‍या हातात पडण्‍याची शक्‍यताही ध्‍यानात घ्‍यावी लागे. ( पनिपतावर असे मराठ्यांचे खलिते अब्दालीच्या हातीं सापडलेच की). अशा परिस्थितीत समजा एखाद्या सरदाराचे मत आपल्‍या स्‍वामीच्‍या एखाद्या धोरणाविरुद्ध असलेच तरी त्‍याचा लेखी उल्‍लेख करण्‍याचा धोका तो कितपत स्‍वीकारेल? आजही कुणाला अगदी खाजगी, गुप्‍त असे काही दुसर्‍याला कळवायचे असले, तर तो शक्‍यतो पत्रात लिहून कळवतोच असे नाही, प्रत्‍यक्ष भेटून बोलतो. बाजीरावाला या विषयावर आपले शाहूच्‍या-धोरणाहून-वेगळे असे काही मत व्‍यक्‍त करायचे असते, तर त्‍याने चिमाजी आप्‍पाला खलबतखान्‍यात नेऊन त्‍याबद्दल गुप्‍त चर्चा केली असती. युद्धभूमीवरून पाठवलेल्‍या पत्रात खचितच हा उल्‍लेख केला नसता.

 

बाजीरावाने दिल्‍लीतील सत्ता न काबीज करण्‍याचे कारण ‘मराठी परंपरा’ असे नक्‍कीच नव्‍हते. दिल्‍लीला धडक देण्‍याची परंपराच मुळी बाजीरावापासून सुरू झाली. दिल्‍ली त्‍याने काबीज न करण्‍याचे कारण सैनिकी होते व दुसरे राजकीय होते. बाजीरावाच्‍या कर्तृत्‍वाला मर्यादा पडली होती ती मराठी संस्‍कृतीची नव्‍हे तर त्‍याच्‍या स्‍वामीने आखून दिलेल्‍या लक्ष्‍मणरेषेची होती.

 

खरे तर, आपल्‍याला मुख्‍यत्वे १७५० ते १७६० या दशकाचाच विचार करायला हवा. मराठ्यांच्‍या दृष्‍टीने आणि तत्‍कालीन भारताच्‍या दृष्‍टीनेही, त्‍या शतकातील सर्वाधिक महत्त्वाचे दशक हेच होय. प्लासाची लढाई याच दशकात झाली (१७५७ च्या मध्यावर ) आणि पानिपतची लढाईही हे दशक संपल्‍यावर केवळ १४ दिवसांनी झाली.

 

१७४९च्‍या डिसेंबरमध्‍ये शाहूचा मृत्‍यू झालेला होता. १७५०च्‍या सांगोल्‍याच्‍या करारानंतर छत्रपती नाममात्र उरला होता व नानासाहेब पेशव्‍याकडे मराठेशाहीचा सर्वाधिकार आलेला होता. मराठ्यांचा डंका भारतभर गाजत होता. ऑगस्‍ट १७५० मध्‍ये भाऊने दिल्‍ली काबीजही केली होती. अशा परिस्थितीत दिल्‍लीपती व्‍हायला मराठ्यांना काय हरकत होती? असा प्रश्न कोणालाही पडेल. त्‍याचे उत्तर शोधण्‍यासाठी आपल्‍याला मागील काही वर्षांची पार्श्वभूमी पाहायला हवी तरच आपण सदाशिवराव भाऊच्‍या ऑगस्‍ट १७६० मधील दिल्‍लीभेटीचे विश्र्लेषण करू शकू. घटनांचा क्रम समजून घेतल्‍याशिवाय व त्‍यांचे विविध अंगांनी विश्र्लेषण केल्‍याशिवाय, इतिहासाचा अन्‍वयार्थ लावता येत नाही.

 

थोडी पार्श्वभूमी –      

         १७१९ मध्‍ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्‍तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्‍यानात घेऊनच. शाहूला स्‍वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्‍यातील हिस्‍सा त्‍याला दिला की तो खुष होता. राजारामाच्‍या वेळेपासूनच वतनांच्‍या प्रथेचे पुनरुज्‍जीवन झालेले होते. ताराबाईला शह देण्‍यासाठी शाहूलाही तेच धोरण चालू ठेवावे लागले. उत्तरेत स्थिरावण्‍यासाठी बाजीरावालाही आपल्‍या सरदारांना वतने द्यावी लागली. १७४० मध्‍ये नानासाहेब पेशवा झाला तेव्‍हा हे सर्व सरदार-वतनदार चांगलेच स्थिरावलेले होते. शाहूने नानासाहेबाला पेशवा म्‍हणून नेमले तेव्‍हा पेशव्‍यांची गादी वंशपरंपरेने भट घराण्‍याकडे राहण्‍याचा करार झालेला नव्‍हता. त्‍यामुळे जुन्‍या सरदारांना सांभाळून घेणे नानासाहेबाला आवश्‍यक वाटत होते. म्‍हणून, जानेवारी १७६० मधील दत्ताजीच्‍या मृत्‍यूनंतर नानासाहेब मल्‍हारराव होळकराबद्दल, ‘‘मल्‍हाररावांनी आधी काम कोणते करावे मग कोणते करावे . . . तो विचार त्‍यांनी न केला’’, असे नाराजीने जरी बोलतो, तरीही त्‍याला अब्‍दालाशी सामना करायला भाऊबरोबर धाडतो, अशी स्थिती आपल्याला दिसून येते.

 

नानासाहेबाला मराठ्यांच्‍या राज्‍यांतर्गत असलेला विरोध एकदम नाहीसा झाला असे नव्‍हते. १७५० मध्‍ये त्‍याने सातार्‍याच्‍या रामराजाशी करार केला खरा, पण त्‍यानंतरही काही वर्षे ताराबाई राजकारणी खेळी खेळण्‍याचे प्रयत्‍न करतांना आपल्‍याला दिसते. रघूजी भोसल्‍यासारखा शाहूचा जुना व मातबर सरदार १७५५ पर्यंत हयात होता. बडोद्याचे गायकवाडही १७५१ नंतरच नमले ( आणि त्‍यानंतरही १७६८ पर्यंत संपूर्णपणे झुकेले नव्‍हते ).   १७५६ पर्यंत तुळाजी आंग्रेही प्रबळ होता. ( इतका प्रबळ की मुंबईकर इंग्रजांची मदत घेऊनच नानासाहेबाला त्‍याचा पाडाव करता आला. ) थोडक्‍यात काय, तर १७५० ते १७६० या दशकातील निम्‍म्‍याहूनही अधिक काळ जाईतो मराठी सत्ता नानासाहेबाच्‍या हातात केंद्रित झालेली नव्‍हती.

 

मराठ्यांना बाहेरील शत्रूही अनेक होते. मराठे प्रबळ असले तरी त्‍यांची भारतावर निरंकुश सत्ता नव्‍हती. माळव्‍यात शिंदे-होळकर यांचे बस्‍तान बसले होते, परंतु मुघली सत्तेचा प्रभाव नाहीसा झाल्‍यामुळे राजपूत राज्‍ये स्‍वतंत्र झालेली होती. त्‍यांच्‍या वारंवार मराठ्यांशी लढाया चालतच असत. १७५१ मध्‍ये जयपूरजवळ राजपूतांनी मराठ्यांना कापून काढले होते. जयपूरचा राजा माधोसिंग मराठ्यांविरुद्ध अब्‍दालीशी संधान बांधून होता. १७१८ पासूनच चूडामण जाट प्रबळ झालेला होता. १७५२ मध्‍ये बरामसिंग व १७५६ पासून सूरजमल हे जाट राजे चांगलेच ताकदवर झालेले होते. जाटांचा कुंभेरीचा किल्‍ला सर करायचा नाद मराठ्यांना सोडून द्यावा लागला होता. १७२१ पासून रोहिले रोहिलखंडात स्थिरावले होते व १७४१ पासून चांगलेच शक्तिशाली झालेले होते. शेजारीच बंगश अफगाणही होते. १७२२ पासूनच अवधचा नबाब जवळजवळ स्‍वतंत्र झालेला होता. निजाम व इंग्रज या सत्ताही बलवान होत्‍या. १७५८ला बुसी निजामाची चाकरी सोडून फ्रान्‍सला परत जाईपर्यंत निजाम चांगलाच प्रबळ होता. १७५७ला प्‍लासीची लढाई इंग्रजांनी जिंकलेली होती. मुंबई व मद्रास इथून त्‍यांच्‍या कारवाया सुरूच होत्‍या. त्‍याशिवाय गोव्‍याला पोर्तुगीज होते. फ्रेंचांच्‍या कारवायाही थोड्याफार चालू होत्‍या.

 

ह्या स्‍वतंत्र सत्तांना नाममात्र मुघल बादशहा टिकून राहण्‍यात कोणतीच हरकत दिसत नव्‍हती. त्‍यांना मराठ्यांबद्दल कसलीच आपुलकी नव्‍हती. मराठे दिल्‍लीपती होऊन आपल्‍याला नामशेष करतील अशी त्‍यांना भीती होतीच. म्‍हणून ते मराठे सरदारांमध्‍ये फूट पाडायचा नेहमी प्रयत्‍न करत राहिले.

 

१७५० ते १७६० हा काळ अंतर्गत विरोध नष्‍ट करून मध्‍यवर्ती, एककेंद्रित अशी मराठ्यांची सत्ता स्‍थापण्‍याचा काळ होता. ते साधून त्‍याचवेळी मराठ्यांची सत्ता भारतात पसरवणे हा नानासाहेबाचा हेतू होता. त्‍यासाठी त्‍याला नामधारी बादशहाच्‍या सनदा व फर्मानांचा उपयोग करून घेता येत होता. बादशहाला दूर सारून मराठ्यांनी दिल्‍लीपती होण्‍यासारखी परिस्थिती १७६० पर्यंत आलेलीच नव्‍हती.

 

मराठ्यांचे अर्थकारण –

मराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही.

मराठ्यांचा चौथाईचा अधिकार मिळाला होता खरा, पण राजपूत व इतर राजे सुखासुखी चौथाई देत नसत. त्‍यासाठी लुटालूट, लढाई व जबरदस्‍ती करावी लागे. वेळ आलीच तर ते राजे थोडीफार खंडणी देत व पुढला वायदा करीत. त्‍याच्‍या पूर्तीसाठी पुन्‍हा लढाई. असा प्रकार चालू होता. सैन्‍याचा खर्च करावा लागे आणि वसुली न झाल्‍यास कर्ज होई. १७४० मध्‍ये बाजीरावाचा मृत्‍यू झाला तेव्‍हा त्‍याच्‍यावर १४ लाखांचे कर्ज होते. नानासाहेबाला कायम युद्धांमध्‍ये अडकून राहावे लागले व कर्जे तशीच राहिली. ( १७५७-५८ च्‍या अटकेपर्यंतच्‍या मोहिमेतही राघोबा ८० लाखांचे कर्जच करून आला होता. ) त्‍यामुळे नानासाहेबाचा हाच कल झाला की बादशहाकडून सनदा व फर्माने घेऊन नवनव्‍या मुलुखांतून चौथाई वसूल करावी व कर्ज मिटवावे. ( म्हणुनच, ‘पानिपत’ मिहिमेसाठी राघोबानें एक कोटीचा खजिना मागितला, तौ बाब नानासाहेब व सदाशिवराव भाऊ यांना मान्य नव्हती ). पहिली १७४० ते १७४९ अशी ९ वर्षे नानासाहेब शाहूच्‍या दबावाखाली होताच. नंतरही, अ‍र्थप्राप्‍तीच्‍या दृष्‍टीने त्‍याला आधीचेच धोरण पुढे चालवणे फायदेशीर वाटले. १७५० नंतरही अगदी १७६० पर्यंत नानासाहेब व अन्‍य मराठे सरदार नजराणे, चौथाई आणि चौथाईसाठी-नवनवा-मुलूख मागतांना दिसतात. १७५३ साली मराठे जाटांकडून एक कोटीची खंडणी मागतात, १७५७ मध्‍ये राघोबा पंजाबातील वसुलीचा अर्धा हिस्‍सा मिळण्‍याचा दिल्‍लीशी करार करतो, १७५८ साली दत्ताजी पूर्वेकडील  स्‍वारीत मराठ्यांसाठी रुपयात दहा आणे हिस्‍सा वजिरास मागतो, स्‍वतः नानासाहेब १७६० साली नागपूरकर भोसल्‍यांकडून पंचवीस लाख रुपये नजराणा मागतो; १७५७च्‍या अब्‍दालीच्‍या दिल्‍ली स्‍वारीच्‍या वेळी जे सावकार वगैरे दिल्‍लीहून पळून सुरक्षिततेसाठी मराठ्यांच्‍या बरोबर आले होत्‍या त्‍यांना नारो शंकर व समशेरबहाद्दर स्‍वतःच लुटतात, असे हे चित्र आहे. ( मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे ) .

 

असे असूनही परि‍स्थिती अशी होती की, मराठ्यांना नेहमीच पैशाची कमतरता भासत असे. राघोबा १७५७ साली जयपूरच्‍या राजाला लिहितो, ‘‘झुंजल्‍याखेरीज दाणा नाही, रुपया नाही, कर्जही न मिळे, निदानी येक येक दोन दोन रोज फाके लष्‍करास झाले’’. १७६० साली सुभेदार मल्हारराव होळकराचा दिवाण गंगोबा तात्‍या पेशव्‍यास लिहितो, ‘‘कर्जपटीचा मजकूर वायदेविसी स्‍वामी आज्ञा समक्ष केली, येथे आप्रिया कोणे गोस्‍टीने युक्‍तीस न पडे. खर्च बहुत आये थोडा. राजश्री सुबेदाराचेही . . . येंदा खर्चामुळे डोहात आहेत.’’  २६ जून १७६० रोज खुद्द भाऊ चंबळेजवळ गंभीर नदीच्‍या काठून लिहितो, ‘‘खर्च फार, जमा थोडकी . . . इकडील सावकार परागंदा झाले. कर्जवाम कोठे पैसा मिळत नाही.’’ या अडचणीचे अंशतः निवारण करण्‍यासाठीच भाऊला दिल्‍लीत ‘दिवाणे आम’च्‍या छताचा पत्रा काढून फौजेस रोजमुरा द्यावा लागला. त्‍यानंतर पानपतपूर्वी पैशांअभावी मराठी फौजेचे झालेले हाल सर्वांना माहीत आहेतच.

मराठ्यांना अर्थव्‍यवहार जमला नाही, पैशाची त्‍यांना सदैव उणीवच भासत राहिली आणि अर्थकारणासाठीच दिल्‍लीच्‍या नामधारी बादशहाला तसेच शिल्‍लक ठेवणे त्‍यांना सोयीस्‍कर वाटले; हे आपण विसरून चालणार नाही.

 

अब्‍दाली –

         १७६०चा विचार करतांना एक महत्त्वाचा घटक ध्‍यानात ठेवायला हवा आणि तो म्‍हणजे अहमद शाह अब्‍दाली. तो ‘दुर्रानी’ या अफगाण टोळीतील होता. १७४७ मध्‍ये नादिरशहाचा मृत्‍यू झाल्‍यावर अब्‍दाली अफगाणिस्‍तानचा स्‍वतंत्र राजा बनला. आधी त्‍याने नादिरशहाच्‍या हिंदुस्‍थानस्‍वारीत भाग घेतलेला होता. राजा बनल्‍यावर १७५२ पर्यंत त्‍याने भारतावर तीन स्‍वार्‍या केलेल्‍या होत्‍या. १७५७च्‍या चौथ्‍या स्‍वारीत त्‍याने दिल्‍ली लुटली होती. १७५८ मध्‍ये त्‍याने भारतावर पाचवी स्‍वारी केली. जानेवारी १७६० मधील अब्‍दालीच्‍या सैन्‍याशी झालेल्‍या चकमकीत, बयाजी व दत्ताजी शिंदे पडले. मार्च १७६० मध्‍ये अब्‍दालीच्‍या सरदारांनी मल्‍हाररावाच्‍या सैन्‍याला मात दिली. ऑगस्‍ट १७६० मध्‍ये भाऊ दिल्‍लीस पोचला तेव्‍हा अब्‍दाली जवळच यमुनेपलिकडे तळ टाकून होता. भाऊ व अब्‍दाली यांच्‍यात आपण तह घडवून आणतो असे शुजाने भाऊला कळवले होते. या घटनाही आपल्‍याला ध्‍यानात घ्‍यायला हव्‍या.

 

ऑगस्‍ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्‍लीपती बनण्‍यासाठी अनुकूल नव्‍हती –

         स्‍वारीस निघाल्‍यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्‍वारीत मराठ्यांना येऊन मिळण्‍याविषयी पत्रे पाठवली होती. त्‍याने गुजरातेतील कमालउद्दीन बाबी याला बोलावले, अयोध्‍येच्‍या शुजाला बोलावले, बुंदेलखंडातील हिंदुपत वगैरे राजे, राजपुतान्‍यातील बिजेसिंग, माधोसिंग वगैरेंना मदतीस आणण्‍याबद्दल गोविंदपंत बुंदेल्‍यास लिहिले. सूरजमल तर दिल्‍लीस आल्‍यावरही काळी काळपर्यंत भाऊबरोबर होता. अब्‍दालीशी लढायला आल्‍यावर आणि त्‍यासाठी हिंदुस्‍थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्‍यावर आणि स्‍वतः अब्‍दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्‍यावर, मराठ्यांना त्‍यावेळी दिल्‍लीपती कसे होता आले असते ?

 

ध्‍यानात घ्‍या, शाहूचे धोरण होते की मुघल सल्‍तनत नष्‍ट न होता मराठ्यांचे महत्त्व वाढावे. त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर १७६० पर्यंत केवळ १०च वर्षे गेलेली होती. त्‍यातील पहिली ५-६ वर्षे तर अंतर्गत सत्ता केंद्रित करण्‍यातच गेलेली होती. मागील ४३॥ वर्षे चालत आलेले धोरण आमूलाग्र बदलण्‍यासाठी, दिल्‍लीचा वंश राखण्‍याऐवजी स्‍वतःच दिल्‍लीपती बनण्‍यासाठी, १० वर्षांचा ( खरे तर ४-५ वर्षांचाच ) काळ अपुरा होता. शिवाजीचेच उदाहरण घ्‍या. हिंदवी स्‍वराज्‍याचे ध्‍येय त्‍याच्‍यापुढे सुरूवातीपासून होते. तरीही, तोरणा घेतल्‍यापासून ते राज्‍याभिषेकापर्यंत त्‍याला २९ वर्षे लागली. नानासाहेबाला तर शाहूमुळे अस्तित्‍वात आलेले धोरण संपूर्ण उलटे फिरवायला लागणार होते. पुढे काही वर्षांनी योग्‍य वेळ येताच त्‍याने बादशहाला बाजूस सारलेही असते. जानेवारी १७६० नंतर, दत्ताजी पडल्‍याची बातमी मिळाल्‍यावर, मल्‍हाररावाची चूक दाखवतांना, ‘‘मल्‍हाररावांनी आधी काम कोणते करावे मग कोणते करावे . . . माधोसिंगाचा मजकूर काय ! जेव्‍हा म्‍हटले तेव्‍हा पारिपत्‍य होते, तो विचार त्‍यांनी न केला’’, अशा त्‍याच्‍या शब्‍दांचा उल्‍लेख आलेला आहे. जयपूरच्‍या राजाच्‍या पारिपत्‍याला ही वेळ योग्‍य नव्‍हे, हे ज्‍या नानासाहेबाला समजते, त्‍याला, दिल्‍लीच्‍या पातशहाला दूर सारून मराठ्यांची स्‍वतः दिल्‍लीपती होण्‍यांसही ही वेळ योग्‍य नाही, एवढा सारासार विचार नसेल, असे संभवत नाही. पानपतावर मराठे जर जिंकले असते, तर पुढे काही वेगळे घडलेही असते; पण तसे घडायचे नव्‍हते !

 

महादजी –

आता आपण महादजीकडे वळू. मराठ्यांसाठी त्‍याने दिल्‍लीची मुतलकी मिळवली, ती घटना आहे १७८४ची. त्‍याआधीची व त्‍याच्‍या काळातही राजकीय आणि सैनिकी परिस्थिती काय होती ते आपण जाणून घ्‍यायला हवे.

 

१७६५ मध्‍ये बादशहाने इंग्रजांना बंगालचे दिवाण नेमले होते. १७५९च्‍या सुमारास वझिराकडून त्‍यांना सुरतेचा किल्ला व शिद्दीच्‍या जागी मुघली साम्राज्‍याच्‍या आरामाराची मुख्‍य सत्ता मिळालेली होती. पुढील   २०-२५ वर्षांमध्‍ये ते चांगलेच प्रबळ झालेले होते. मराठ्यांनी इंग्रजांना वडगाव व सिप्री येथे हरवले होते व त्‍यात महादजीचा हात होता हे खरे, पण इंग्रजांनीही महादजीला १७८० मध्‍ये गुजरातेत व १७८१ मध्‍ये कोलरस येथे हरवले होते. थोडक्‍यात काय, तर, त्‍याकाळी इंग्रज ही मराठ्यांना तुल्‍यबळ अशी शक्‍ती झालेली होती. उत्तर हिंदुस्‍थानात ते कधीचे अलाहाबादपर्यंत येऊन पोचलेले होते. शीखही प्रबळ होऊ लागले होते. राजपूत तर प्रबळ होतेच. ( पुढे १७८७ मध्‍ये महादजी व मोगली सेना युद्ध हरली, आणि  एवढे झाले की महादजीला एक वर्ष इकडून तिकडे भटकत घालवावे लागले व नाना फडणिसाची मदत मागावी लागली. )  ह्यावरून ध्‍यानात येईल की, १७८४ मध्‍ये महादजी मुतलक (मुतालिक) झाला खरा, पण तेथे आपला अधिकार टिकवून धरण्‍याएवढी शक्‍ती त्‍याच्‍याकडे नव्‍हती. १७८८ मध्‍ये सुद्धा महादजी पुन्‍हा दिल्‍लीला पोचला तो नानाने पाठवलेल्‍या तुकोजी होळकर व अलीबहादुर यांची मदत घेऊनच. पुढे १७९२ पर्यंत त्‍याला राजपूत व इतर राजांशी सतत लढाया करत राहावे लागले.

 

महादजीकडे मराठ्यांमधील निरंकुश सत्ताही नव्‍हती. नाना फडणिसाला त्‍याचे महत्त्व वाढू द्यायचे नव्‍हते. १७८४ मध्‍ये जेव्‍हा बादशहाने महादजीला वकील-इ-मुतलक म्‍हणून नेमले, त्‍याचवेळी महादजीने त्‍याच्‍याकडून पेशव्‍याची नायब-इ-मुनाइब व बक्षी-उल्-ममालिक अशी नेमणूक करून घेतली होती. वस्‍तुतः पेशव्‍याच्या नेमणुका मुघली राज्‍याच्‍या संदर्भात होत्‍या, तर महादजीची केवळ बादशहाच्‍या व्‍यक्तिगत संदर्भात. परंतु , महादजीने पेशव्‍यांपेक्षा मोठा सन्‍मान स्‍वीकारला आहे असे त्‍यावेळी नानाने नाराजीने महादजीला कळवले. म्‍हणून महादजीला तो सन्‍मान बादशहातर्फे पेशव्‍याच्‍या नावे देववावा लागला आणि स्‍वतःची नेमणूक पेशव्‍याचा सहाय्यक म्‍हणून करून घ्‍यावी लागली. महादजीचे होळकरांशी पटले नाही. १७८८ मध्‍ये तुकोजी होळकर व अलीबहादुर यांचे त्‍याच्‍याशी वाटपावरून भांडण झाले. हा सर्व गुंता सोडवण्‍यासाठीच त्‍याला १७९२ मध्‍ये पुण्‍याला जावे लागले आणि तेथेच त्‍याचा १७९४ मध्‍ये अंत झाला.

 

महादजीला इंग्रजांच्‍या प्राबल्‍याची पूर्ण कल्‍पना आलेली होती. नानाच्‍या मदतीशिवाय त्‍याचे चालले नसते. जो नाना महादजीच्या मुतलकीच्‍या नेमणुकीबद्दल नाराजी दाखवतो, त्‍याला एवढे खचितच समजत होते की मराठ्यांनी दिल्‍लीपती होणे म्‍हणजे महादजीला अधिक प्रबळ बनवणे. स्‍वतःचा अधिकार अबाधित ठेवणारा नाना महादजीचे महत्त्व वाढू देण्‍यास तयार झाला असता काय, ह्याचे उत्तर अगदी सरळ आहे.

 

थोडे मानसशास्‍त्रीय विश्र्लेषण –

१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. धोरण ठरवणारे त्‍यांचे धनी ( आणि त्‍या धन्‍यांच्‍या जवळचे इतर राजकारणी ) एक हजार मैल दूर, लांब दक्षिणेत बसलेले होते. दिल्‍लीस जाऊन धडकल्‍यावर, मराठ्यांना दिल्‍लीपती बनवण्‍यासाठी बाजीराव, भाऊ व महादजी या तिघांपुढे दोनच पर्याय असू शकले असते – एक पर्याय म्‍हणजे छत्रपतीच्‍या द्वारे दिल्‍लीश्वर म्‍हणून ग्‍वाही फिरवणे आणि दुसरा म्‍हणजे स्‍वतःच दिल्‍लीपती बनणे.

ज्‍या काळात स्‍वामिनिष्‍ठेला व इमानाला अत्‍याधिक महत्त्व दिले जात असे, त्‍या काळात स्‍वामीला दूर सारून, किंवा त्‍याच्‍या मर्जीविरुद्ध स्‍वतःच अधिपती बनणे, त्‍यांच्‍या विरोधात गेले असते. महादजीला जहागिरीचा अधिकार प्राप्‍त झाला, तोच मुळे माधवराव पेशव्‍यामुळे. म्‍हणून त्‍याच्‍या मनात पेशव्‍यांबद्दल कृतज्ञतेची भावना असणे स्‍वाभाविक आहे. नानासाहेबाने अधिकार हातात घेतले, तरी तो स्‍वतः छत्रपती बनला नाही. बाजीरावाला आणि नानासाहेबाला तरूण वयातच, पेशवाईचा अधिकार वंशपरंपरागत नसतांनाही, आणि अंतर्गत विरोध असूनही, शाहूने पेशवा म्‍हणून नेमले होते, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या मनात शाहूबद्दल आणि छत्रपतींच्‍या गादीबद्दल आदराची व कृतज्ञतेची भावना असणार, हे उघड आहे. भाऊ तर नानासाहेबाचा चुलत बंधूच आणि स्‍वतः पेशवाईचा कारभारी. त्‍याची निष्‍ठ पेशव्‍यांच्‍या गादीवर आणि पर्यायाने छत्रपतींच्‍या गादीवर असणारच. अशा स्थितीत, बेइमानी करून स्‍वतःलाच दिल्‍लीपती म्‍हणून घोषित करणे त्‍या कोणालाही पटले नसते. स्‍वामिनिष्‍ठा हा मध्‍ययुगातील हिंदू समाजाच्‍याच मनोरचनेचा भाग होता.

 

स्‍वामिनिष्‍ठेचा विचार बाजूला ठेवला तरीही आपण त्‍याच निष्‍कर्षाला पोचतो. जर बाजीराव, भाऊ किंवा महादजीने स्‍वतःला दिल्‍लीपती म्‍हणून घोषित केले असते, तर ते धन्‍याविरुद्ध बंडच मानले गेले असते. आजूबाजूला बाहेरील शत्रू सिद्ध होतेच, पण तशा परिस्थितीत त्‍या तिघांना अंतर्गत शत्रूंशीही युद्ध करावे लागले असते. तशी निर्णायक शक्‍ती त्‍या तिघांकडेही नव्‍हती आणि तशी शक्‍ती आपल्‍याकडे नाही हे जाणण्‍याचा विवेक त्‍यांना खचितच होता.

 

त्‍यांच्‍यापुढील जो अन्‍य पर्याय असू शकला असता, तो म्‍हणजे छत्रपतीला दिल्‍लीचा अधिपती म्‍हणून घोषित करणे, परंतु त्‍यासाठी बाजीरावास शाहूची आणि इतर दोघांना किमान पेशव्‍याची तरी परवानगी लागली असती. योग्‍य वेळ आलेली आहे असे नानासाहेबाला वाटत नव्‍हते. महादजीला पेशवा (म्‍हणजे खरे तर नाना फडणीस ) तशी परवानगी देईल असा संभव नव्‍हता.

 

शिवाय बादशहाला नामधारी म्‍हणून तसाच ठेवून त्‍याद्वारे मराठी सत्ता वाढवावी असे शाहूसकट सर्वांनाच वाटत होते. त्‍यामुळे बादशहाला दूर सारून स्‍वतःच घाईघाईने दिल्‍लीपती होण्‍याची मराठ्यांना निकड भासली नाही. तसे करणे त्‍यांना त्‍या परिस्थितीत योग्‍यही वाटले नाही व आवश्‍यकही वाटले नाही.

 

समारोप –   

         अठराव्‍या शतकातील चित्र असे आहे की, अनेक बादशहा आले-गेले, अनेक वझीरही आले-गेले ( स्‍वतः निजाम-उल्‍मुल्‍कही दिल्‍लीचा काही काळ वझीर होता ) नादिरशहा व अब्‍दालीने दिल्‍ली लुअली, पण मुघलांची पातशाही नेस्‍तनाबूद करून स्‍वतः दिल्‍लीपती होणे कोणालाच आवश्‍यक वाटले नाही. त्‍या काळातील सर्वच हिंदू, मुस्लिम सत्ताधार्‍यांनी व राजकारण्‍यांनी हेच धोरण स्‍वीकारलेले होते, ही गोष्‍ट ध्‍यानात घेणे आवश्‍यक आहे. इंग्रजांनी सुद्धा शक्‍यतो स्‍थानिक राजांना व संस्‍थानिकांना नावापुरते त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या गादीवर तसेच राहू दिले व आपल्‍या हातात सत्ता घेतली. त्‍यांनाही १८५७ पर्यंत ( म्‍हणजे स्‍वतःचे भारतातील अस्तित्‍वच धोक्‍यात येईतो ) मुघल बादशलाला पदच्‍युत करण्‍याची आवश्‍यकता वाटली नाही. १७व्‍या शतकातही शहाजीने लहानग्या निजामशहाला मांडीवर घेऊन, स्‍वतः वझीर बनून राज्‍यकारभार चालवण्‍याचा असाच प्रयोग केला होता. राजकारणात अशीच व्‍यवहाराशी सांगड घालून आपले ईप्सित साध्‍य करावे लागते.

 

सैनिकी व राजकारणी दृष्‍टीने सत्ता काबीज करण्‍यापेक्षाही महत्त्वाची गोष्‍ट आहे सत्ता टिकवणे. हेमूनेही सत्ता काबीज केलीच होती, पण किती काळ त्‍याची सत्ता टिकली ? शहाजीचा निजामशाहीतील प्रयोग अयशस्‍वी झाला कारण त्‍याची सैनिकी शक्‍ती अपुरी पडली. पानपताच्‍या आधी दिल्‍लीश्वर म्‍हणून मराठ्यांची सत्ता टिकू शकेल अशी परिस्थिती येण्‍याची संधीच राहिली नाही ! हे इतिहासातील सत्‍य आपण समजून घेतले पाहिजे.

मराठ्यांचे दोष अथवा चुका कबूल करायलाच हव्‍या. मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. मराठीमनोवृत्ती, ‘मराठीसंस्‍कृती किंवा मराठीपरंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. इतिहासाचा योग्‍य तो अन्‍वयार्थ लावल्‍यावर हाच निष्‍कर्ष निघतो.

 

‘मराठी’ संस्‍कृती व ‘मराठी’ मनोवृत्ती यांच्‍याबद्दल मराठी माणसाची दिशाभूल होऊ नये, मराठीपणाचा अभिमान बाळगणे म्‍हणजे अलपसंतुष्‍टपणा नव्‍हे हे त्‍याला पटावे, म्‍हणून हा सारा प्रपंच.

 

–—

– सुभाष स. नाईक

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*