(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें) : माय मराठी : (लघुकाव्य-संच)

(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें

 

(१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा

माय मराठीला करूं मानाचा मुजरा

चला, आज  मराठीचे गोडवे गाऊं

उद्या  तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं  ।।

(२)     भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला

भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला

करील पुनरुत्थान, हरील हताशा

कोण असा, पाहील मराठी भाषा ?

(३)     संकर झाला, होऊं द्या की , मराठी मरणार नाहीं

इंग्लिश-हिंदी-संगणकाच्या-भाषेला डरणार नाहीं

सहस्त्रकें दो , आक्रमणांतुन तगली मराठ-भाषा जी,

तिच्या भविष्याची कोणीही करूं नका काळजी ।।

(४)     दोन हजार वर्षांत मराठी बदलली नाहीं कां ?

मूळ रूपापासुन थोडीही ढळली नाहीं कां ?

मग आतां शब्दांचा संकर हा कसला अनर्थ आहे ?

मर्‍हाट-भाषा स्वत: काळजी घेण्यां समर्थ आहे  ।।

(५)     हिची अनवती करील, असा

तुम्हांम्हांविण आहेच कोण ?

तुमचीआमची उदासीनता

हीच तिच्या र्‍हासाला कारण ।।

 

बाहेरचे एल्गार परतवूं

मराठीचा हात  धरून

कांहीं शुद्धता-आग्रह धरून

कांहीं संकर मान्य करून ।।

 

करूं नका जयकार हिचा

एकच दिवस , अरे

मराठभाषा अमुची माता

हिला ज़पूं सारे  ।।

 

– – –

सुभाष स. नाईक      मुंबई

M – 9869002126   .  eMail  : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com ; www.snehalatanaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*