पुनर्भेट : एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान

पुनर्भेट  :   एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान  

(( टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’  — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट  )).

**

पु. ल. देशपांडे म्‍हणतात की – ‘विनोद ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. दोन कुत्र्यांना हसतांना कधी कोणी पाहिलेलं नाहीं’. ( अर्थातच, विनोद हा भाषेशी संबंधित आहे).

चार्लस् बार्बर हा भाषाशास्‍त्रज्ञ म्‍हणतो – ‘भाषा ही पटकन दिसून येणारी अशी एक गोष्‍ट आहे जी माणसाचं प्राणीजगताहून वेगळेपण दाखवून देते’.

आजच्‍या परिसंवादात आपण भाषेचा एका विशिष्‍ट दृष्टिकोनातून विचार करणार आहोत.

 

 • हे उघड आहे की आजचा विषय निवडतांना, इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे पुढील काही दशकांनंतर आपल्‍या भारतीय भाषा अस्तित्‍वात राहणार आहेत की नाहीं, आणि राहिल्‍यास त्‍यांचं स्‍थान काय असेल? असाच विचार संयोजकांच्‍या मनात होता.

इंग्रजीचं भारतीय भाषांवर आक्रमण होत आहे व त्‍यामुळे आपल्‍या भाषांच्‍या अस्तित्‍वालाच धोका आहे, अशी चर्चा सर्वत्र होत असते. अनेक विचारवंतही वारंवार असंच म्‍हणतात.

इतिहासाचार्य राजवाडे यांनी एका शारदोपासक संमेलनाच्‍या अध्‍यक्षीय भाषणाच्‍या वेळी, हवा तेथे इंग्रजी शब्‍दांचा मराठीत धुडगूस चाललेला पाहून, ‘‘मराठी भाषा मरणार’’ असें भविष्‍य वर्तवले होते. सुदैवाने मराठी भाषा अजून जिवंत आहे!

तेव्‍हां आपण आतां या प्रश्नाचा बुद्धिप्रामाण्‍यतेनुसार उहापोह करूं या.

त्‍यासाठी आपल्‍याला भाषाशास्‍त्राचा व भाषेच्‍या इतिहासाचा विचार करणे क्रमप्राप्‍त आहे.

 

 • भाषाशास्‍त्रज्ञ सांगतात की, भाषेचा विचार करतांना एक गोष्‍ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे की बोलली जाणारी मौखिक भाषा हेंच भाषेचं मूलभूत स्‍वरुप आहे; लिखित भाषे हें त्‍यापासून तयार झालेलं व दुय्यम दर्जाचं स्‍वरुप आहे.

साहित्‍याला आपण ‘वाङ्मय’ (वाक्.मय) म्‍हणतो, ‘लिख्.मय’ म्‍हणत नाही. प्रत्‍येक माणूसही लहानपणी बोलण्‍याचं शिक्षण आधी घेतो त्‍यानंतर लिहिण्‍याचं.

आपल्‍याला चिंता वाटते ती मराठी भाषा टिकेल की नाहीं याची. मोडी लिपी अस्‍तंगत झाली याची खंत फारसं कोणी करतांना दिसत नाही. मला लिपीचं महत्त्व माहीत आहे. तिच्‍यामुळे साहित्‍याचा विस्‍तृत प्रसार होतो व ते दीर्घकाळ टिकून राहतं. पण आपल्‍याला मूलतः मौखिक भाषेचा विचार करायला हवा. त्‍यानंतर, व त्‍या अनुषंगाने आपण लिखित भाषेचा विचार करुं शकूं.

भाषा ही नदीसारखी आहे. ती प्रवाही आहे, गतिमान आहे. ती सतत वाहत असते, बदलत असते. काळाच्‍या ओघाबरोबर भाषा कशी बदलत जाते हे पाहण्‍यासाठी आपण एका युरोपीय भाषेचं उदाहरण घेऊं. हा उतारा पहा –

‘We cildra biddap pē, ēala ūs sprecan rihte, forpām ungetoerade wē sindon, and genioemmodlice wē sprecap’.

हा उतारा इंग्लिशमधला आहे. एलफ्रिक ( आयनशॅम चा बिशप ) याने AD (इ.स.) ९९० मध्‍ये लिहिलेल्‍या ‘कॅलिक्‍वे’ यातील हा उतारा आहे. याचा अर्थ आजच्‍या इंग्रजीत असा आहे.

‘We children beg you, oh teacher, please teach us to speak correctly, as we are ignorant and speak correctly’.

ती सुद्धा इंग्लिशच, अन् ही सुद्धा इंग्लिशच!

 

 • भाषेनं लवचिक असायलाच हवं. भाषेनं काळानुसार बदलायलाच हवं, स्थिर अविचल असूंच नये. वापरात असलेल्‍या कुठल्‍याही भाषेत बदलाची प्रक्रिया सारखी सुरुंच असते. जिवंत भाषा बदलत असतात, मृत भाषा बदलत नाहीत.

भाषेत कुठल्‍या प्रकारचे बदल होतात –

 • नवीन शब्‍दांची भर
  • कालानुसार नवीन शब्‍द तयार होतात, घडतात.

ब) दुस-या भाषेतून घेतले जातात.

 • नवीन वाक्प्रचार व म्‍हणी
 • उच्‍चारात बदल
 • शब्‍दांच्‍या स्‍वरुपात बदल, वाक्‍यरचनेत बदल, व्‍याकरणात बदल, अर्थामध्‍ये बदल.
 • लिपीत बदल.

 

इंग्रजीच्‍या, भारतीय भाषांवरील व विशेषतः मराठीवरील आक्रमणाचा विचार करतांना ,

*पहिली गोष्‍ट अभिप्रेत आहे ती,

 • मराठीत शिरणार्‍या इंग्रजी शब्‍दांबद्दल ,

*आणि, दुसरी ही, की

 • इंग्रजी रोजच्‍या बोलचालीची भाषा म्‍हणून आपल्‍या मातृभाषेची – मराठीची – जागा घेईल, व आपल्‍या मातृभाषेला हद्दपार करून टाकेल, नामशेष करून टाकेल.

प्रथम आपण, इंग्रजी शब्‍दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्‍याचा विचार करुं या.

व्‍यासंगी विद्वान  ( आणि कलकत्ता येथील नॅशनल लायब्ररीमधील भूतपूर्व  ग्रंथपाल) श्रीयुत श्री. बा. जोशी यांनी आपल्‍या एका लेखांत सांगितलं आहे की – ‘‘जेव्‍हां सबंध देश एखादी भाषा शिकत असतो, तेव्‍हां त्‍या परभाषेचा एतद्देशीय भाषेवर परिणाम होणें अपरिहार्य असतें. परकीय भाषा बोलतांना आपल्‍या भाषेतील शब्‍द तिच्‍यात शक्‍यतो न येतील अशी आपण काळजी घेतो, पण मातृभाषेत बोलतांना अशी बंधने नसतात, आपण अधिक मोकळेपणानं बोलत असतो. सहज परभाषेतले शब्‍द आले तरी त्‍याची पर्वा बाळगत नाही.’’

‘श्री. बां.’ चं म्‍हणणं अगदी बरोबर आहे. माझी आणखी एक टिप्पणी अशी की, हल्‍ली जर भारतीय तरुण इंग्रजी बोलतांना भारतीय भाषांपासून बनवलेल्‍या कित्‍येक शब्‍दांचा मुक्‍त वापर करतात.

मग इंग्रजी शब्‍दांचा भारतीय भाषांमध्‍ये होणारा वापर स्‍वाभाविकच आहे, नाहीं कां?

मराठीत शिरलेल्‍या इंग्रजी शब्‍दांबद्दल एका मित्राशी चर्चा करतांना मी म्‍हणालो, ‘‘आपल्‍या भाषेनं परकीय भाषेतले शब्‍द आपलेसे केले तर हरकत कसली?’’

माझा मित्र खवळून म्‍हणाला, ‘‘खबरदार असलं भलतं कांही बोललास तर ! तुझी अक्‍कल ठिकाणावर आहे ना ? असली वृत्ती म्‍हणजे एक विकृति आहे, मानसिक आजार आहे ! आम्‍ही कांहीं बाजारात नाही बसलेलों की कुणीही यावं अन गल्‍लाभरू शब्‍द आमच्या दप्‍तरात कोंबावे’’ , वगैरे वगैरे.

रागाच्‍या भरात माझ्या मित्राच्‍या लक्षातच आलं नाहीं की त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या बोलण्‍यात किती अमराठी शब्‍दांचा वापर झाला आहे.

खबरदार, अक्‍कल, आजार, बाजार, दप्‍तर, गल्‍ला हे अरबी-फारसीतले किंवा त्‍या शब्‍दांचा अपभ्रंश होऊन बनलेले शब्‍द आहेत.

असेच – बाबा, किल्‍ला, तब्‍येत, ताकद, तोफ, तारीख, शिकार, अब्रू , दवाखाना, चुगली असे शेकडो शब्‍द मराठीत इतके मिसळून गेले आहेत, की अनेकदा त्‍यांचा उगम लक्षातही येत नाही.

 

असे दुसर्‍या भाषेतून आपलेसे केलेले शब्‍द कालांतराने आपल्‍या भाषेत मिसळून जातात, तिचे स्‍वतःचे होऊन जातात. आणि त्‍यात गैर काय आहे? भाषेमध्‍ये नवनवीन कल्‍पना, नवे विचार, नवे अनुभव मांडायची, स्‍पष्‍ट करून सांगायची (to express) ताकद असायलाच हवी. त्‍यासाठी कालानुसार नवीन शब्‍द घडवण्‍याची व परभाषांतून शब्‍द स्‍वीकारून आपलं भांडार वाढवायची तयारी असायलाच हवी.

 

इंग्रजीत तर अशा परभाषेतून आलेल्या शब्दांसाठी Hobson-Jonson हा शब्दकोशच आहे.

परभाषेतून आलेल्‍या शब्‍दांचे ऑक्‍सफर्ड इंग्लिश शब्‍दकोशानुसार ३ वर्ग पडतात आणि त्‍याचं सुंदर विवेचन श्री. बा. जोशींनी केलेलं आहे.

 • Natural – नैसर्गिक – श्री. बा. जोशींनी अश शब्‍दांना ‘घरजावई’ असं नांव दिलं आहे. हे शब्‍द नैसर्गिक प्रक्रियेनं भाषेत मिसळून गेलेले असतात.
 • Alien – परकीय शब्‍द – श्री. बां. नी या शब्‍दांना ‘अतिथी’ शब्‍द असं नांव दिलेलं आहे. ते वापरले गेले तरी त्‍यांचा भिन्न तोंडवळा लक्षात राहतो. सतत आणि सहजपणे वापरात राहिले तर ते पहिल्‍या वर्गात चढतात, नाहींतर कालांतराने पाठीमागे पडून तिसर्‍या वर्गात जातात.
 • Casuals – कारणपरत्‍वे वापरले जाणारे शब्‍द – श्री. बा. यांना ‘उपरे / आगंतुक’ शब्‍द असे संबोधतात. हे भाषेत आज आहेत, उद्या असतीलही, नसतीलही.

ह्या अनुषंगाने १६व्‍या शतकातील मराठीचा एक नमुना पाहूं या – ‘‘अर्जदास्‍त अर्जदार बंदगी बंदेनवाज अलेकं सलाम साहेबांचे सेवेसी बंदे शरीराकार जीवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्‍ला कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्‍वार झाले . . . ( वगैरे वगैरे ) इणें तमाम परगणा जेरदस्‍त केला. क्रोधाजी नाईकवाडी याणें तमाम तफरका केला.’’

हें मराठी !! यांत मराठी किती अन् फारसी किती हे आपणच पहा!

गंमत म्‍हणजे, हा मजकूर दुसर्‍या तिसर्‍या कोणी लिहिलेला नसून प्रत्‍यक्ष एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. त्‍यातील आध्‍यात्मिक अर्थ आपल्‍या लक्षात आला असेलच.

या उदाहरणावरून एक गोष्‍ट स्‍पष्‍ट होते, ती ही की त्‍या काळी गद्याची व पद्याची भाषा वेगळी होती. गद्याची भाषा रोजच्‍या बोलाचालीची फारसीमिश्रित होती व पद्याची भाषा ( जी आपल्‍या परिचयाची आहे ) सुबोध मराठी होती. तसंच आजची व्‍यवहारातली मराठी, इंग्रजीमिश्रित आहे व साहित्यिक मराठी शुद्ध स्‍वरुपात आहे.

या उदाहरणावरून दुसरा मुद्दा स्‍पष्‍ट होतो की त्‍या काळातले अनेक फारशी शब्‍द वापरातून गळून पडले व कांहीं शब्‍दच ‘नैसर्गिक’ म्‍हणून टिकून राहिले.

 

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ).

हा थोडासा नमुना बघा –

संस्‍कृत                   फारसी

छाया                        साया

श्वेत                         सफेद

बुद्ध                          बुत

शरद                        सर्द

श्‍याम                       स्‍याह

द्वार                          दर

सप्‍ताह                      हप्‍ता

बाहू                         बाज़ू

मास                         माह

हस्‍त                         दस्‍त

आप                         आब (पाणी)

फूल                         गुल

वात                         बात

भूमि                         बूमी

सम                          हम    ( हमनाम, हमशकल )

नाम                         नाम  ( बाबरनामा, अकबरनामा )

जानु                         ज़ानू

शुष्‍क                        खुश्‍क

खर                          खर  ( गाढव )

उदा. ‘‘गावब गुजरात रफ्त

खर बखुरासान शिताफ़्त’’

( औरंगजेबाच्‍या फौजेची दाणादाण कशी झाली त्‍याचं हे वर्णन आहे.)

 

वरील शब्‍द संस्‍कृतोद्भव ( अथवा संस्कृतसमान) आहेत हें इराणमधल्‍या कुणाच्‍या लक्षातही येणार नाही.

(या शब्दांच्या देवाणघेवाणीचें कारण, आर्ष-संस्कृत व अवेस्तन-इराणी या भाषाभगिनी होत्या, हें असूं शकेल).

 

अहो, फारसीत काय, जपानीतही भारतीय शब्‍द आहेत – ‘झेन’ म्‍हणजे ज्ञान. जपानीत भिक्षुला ‘रोशी’ म्‍हणतात. ‘रोशी’चा मूळ शब्‍द ऋषी आहे. हे सांगायलाच नको. असे शब्‍द परकीय भाषांतून घेतल्‍यामुळे फारसी किंवा जपानीचं अस्तित्‍व नाहीसं झालं आहे काय? मध्‍ययुगात सर्व भारतीय भाषांमध्‍ये जे फारसी शब्‍द शिरले त्‍यामुळे भारतीय भाषांचं अस्तित्‍व केव्‍हांच संपुष्‍टात यायला हवं होतं, पणं तसं झालं नाही.

म्‍हणून मी असा मुद्दा ठळकपणे मांडू इच्छितो की, संकराने भाषा विकृत होते, हें म्‍हणणे सर्वार्थानं खरं नाही. उलट, शब्‍दांचा देवघेवीनं भाषा समृद्ध होते, तिचं भांडार वाढतं. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्‍यात घाबरण्‍यासारखं काय आहे?

आणि म्‍हणूनच जैमिनीनं आपल्‍या म्‍लेंच्‍छ प्रसिद्धार्थ प्रामाण्‍याधिकरण सूत्रात सांगितलं आहे की –  ‘‘केवळ परकीय म्‍हणूनच शब्‍द त्‍याज्‍य मानू नयेत’’.

 

 • भाषा हे संस्‍कृतीचं एक अंग आहे. संस्‍कृती समावेशक असली तर ती टिकून राहते. कूपमंडूक वृत्ती संस्‍कृतीला संकुचित बनवते, तिची पीछेहाट व्‍हायला कारणीभूत ठरते. जोपर्यंत आपली संस्‍कृती लवचिक होती, समावेशक होती, तोपर्यंत तिने शक – कुशाण – हूण सर्वांना सामावून घेतले. एवढेच नव्‍हे तर ती इंडोचायना, मलेशिया, इंडोनेशिया वगैरे भूभांगांमध्‍येही पसरली. पण पुढे मध्‍ययुगात आपली संस्‍कृती शहामृगप्रवृत्तीनं संकुचित झाली. रोटीबंदी – बेटीबंदी – सिंधुबंदी सारखी बंधन आपण स्‍वतःवर लादली व त्‍यामुळे आपली पीछेहाटच झाली.

भाषासुद्धा लवचिक राहिली तरच तिची प्रगती होते.

 

 • ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं.

इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे.

इंग्लिशमध्‍ये आलेले परभाषिक शब्‍द

#AD 750 / 1050             

Egg

Skirt

Take

Crave

Leg

Neck

Window

Sky

Knife

Wrong

Law

Loose

Odd

Hat

Ugly

 

#From Old Norse (Danish / Norwegian )

Anger

To cast

Ill

By-law

Skin

Dirt

Bag

Cake

Fog

Fellow

Get

Give

Call

Want

Drag

Smile

Raise

Though

They

Them

Their

 

 

#From French

Sovereign

Prince

Peer

Duke

Count

Government

Crown

State

Parliament

Council

People

Country

Justice

Court

Judge

Prison

Verdict

Sentence

Attorney

Plea

Accuse

Crime

Punish

People

Perfume

Religion

Service

Prayer

Tower

Dress

Costume

Art

Beauty

Colour

Beauty

Column

Paint

Music

Poem

Romance

Cruelty

Courtesy

Mercy

Charity

Obedience

Palace

Servant

Beef

Park

Mutton

 

#From Arabic

Elixir – अल् – अक्‍सीर

Alchemy – अल् – किमया

Alembic – अल् इम्बिक

Alcove – अल् – काव्वा

Syrup – शराब

Algebra

Alcohol

Tamarind – तमर – इ – हिंद (खजूर)

 

#भारतीय शब्‍द

 • Wilson च्‍या शब्‍दकोशानुसार – २००००
 • Basic ( मौखिक ) शब्‍द – ९००
 • Hobsen-Jobson

Pepper – पिप्‍पाली

Camphor – कर्पूर

Sugar – शर्करा – सक्‍कर

Lac – लक्ष

Ginger

Jungle

Bungalow

Teapoy

Karma

Guru

Juggernaut

Puqqa Sahib

Brahmin

Movie

Moghul .

 

 • भारताच्‍या बर्‍याच भागात मुघल काळात फारसी राजभाषा होती. तसं पहिलं तर कुतुबुद्दीन ऐबक पासून म्‍हणजे इसवी सन १२०६ पासून ते १८५७ पर्यंत अशी ७॥ शतकं भारताच्‍या बर्‍याच भागात अरबी-फारसी-तुर्की इत्‍यादी भाषांना मान होता. महाराष्‍ट्रात शिवाजीपर्यंत व कर्नाटकात विजयनगरच्‍या काळापर्यंत ह्याच भाषांचं राजकीय प्राबल्‍य होतं. पण त्‍यामुळे भारतीय भाषांचं अस्तित्‍व लोपलं नाही, कारण त्‍या लोकभाषा होत्‍या, सर्वसाधारण जनता त्‍यांचाच उपयोग करत होती – त्‍या इथल्‍या लोकांच्‍या मातृभाषा होत्‍या व आहेत, म्‍हणून त्‍या टिकून राहिल्‍या.

एक गोष्‍ट लक्षात ठेवायला हवी की राज्‍यकर्त्‍यांना राज्‍य करायचं असतं. त्‍यांचं लक्ष्‍य वेगळं असतं. लोकभाषेला नामशेष करायचा प्रयत्‍न ते कशाला करतील? औरंगजेबासारख्‍या कट्टर धर्माभिमानी राजानंही ते केलं नाहीं. इंग्रजांनीही ते राज्‍यकर्ते असतांना तसा प्रयत्‍न केला नाही आणि केला असता, तर तो असफल झाला असता. आणि इंग्रजी राजभाषा असतांना जे करूं शकली नाहीं, ते आज ती कशी करू शकेल? जे राजसत्तेचं तेंच अर्थसत्तेचंही आहे.

 

माझे मित्र श्री. निशिगंध देशपांडे आपल्‍या एका लेखात म्‍हणतात की, अर्थकारणामुळे भाषा नष्‍ट होऊ शकते. माझ्याशी बोलतांना त्‍यांनी त्‍यासाठी आदिवासींचं उदाहरणही दिलं होतं. भारतीय आदिवा‍सींची भाषा नष्‍ट झाली काय याचा शोध घ्‍यायला हवा. (मी याबद्दल साशंक आहे. पण तसं झालं असल्‍यास, त्‍याचं कारण वेगळंच असणार आहे , असं मला वाटतं) .

 

 • भाषा नष्‍ट होऊ शकते ती मुख्‍यत्‍वे राजकीय किंवा आर्थिक कारणांमुळे नव्‍हें. तर मुख्‍यत्‍वे सांस्‍कृतिक कारणांमुळे. आम्‍ही जर आमची संस्‍कृती सोडली, तर आमची भाषा नष्‍ट होऊ शकेल. परंतु आमची संस्‍कृती हजारो वर्षे जुनी आहे. आम्‍हाला आमच्‍या संस्‍कृतीचा अभिमान आहे. आमच्‍या उच्‍चवर्णियांनी जरी पाश्चिमात्त्य संस्‍कृतीतल्‍या कांही गोष्‍टी स्‍वीकारल्या असल्‍या, तरी तो संस्‍कृतींचा मिलाप समजायला हवा.

आमची संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्‍हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्‍हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्‍या संस्‍कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्‍हणूनच आमची संस्‍कृती व आमची भाषाही नष्‍ट होण्‍याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं.

 

 • भाषेचा शुद्धपणा व लोकभाषा

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.

आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं.

कुठलीही एक भाषा घेतली तरी, एक गोष्‍ट लक्षात ठेवायला हवी की तिची वेगवेगळी रुपं असतात. भाषेचं रूप काळाबरोबर बदलतं, हे जसं खरं; तसंच हें ही खरं की एकाच वेळी भाषेची भिन्न रूपंही अस्तित्‍वात असतात. एकनाथी काळात गद्य व पद्याच्‍या भाषेचं स्‍वरूप कसं वेगवेगळं होतं हें ही आपण पाहिलं आहे. आजही बोलचालीची व साहित्यिक भाषा भिन्न आहे. दर बारा कोसांवर बोली बदलते असं म्‍हणतात. त्‍यातही पुन्‍हा, अमुक शहरातली भाषा अधिक शुद्ध आहे, किंबहुना तेंच भाषेचं खरं रूप असा आग्रह धरला जातो. उत्तर भारताच्‍या एका विस्‍तृत प्रदेशात हिंदी किंवा तिच्‍या बोलीभाषा बोलल्‍या जातात. पण शुद्ध हिंदी समजलं जातं बनारस, अलाहाबादचं. मराठीच्‍या बाबतीतही, पुण्‍याची मराठी हेंच तिचं खरं रूप आहे असं आज अनेक विद्वान म्‍हणतात.

असं प्रतिपादन योग्‍य आहे किंवा नाहीं हा भाग वेगळा. पण एक महत्त्वाची गोष्‍ट आपण ध्‍यानांत घेत नाही की ही so-called शुद्ध भाषा ( म्‍हणजे शुद्ध म्‍हणविली जाणारी भाषा ) उच्‍चवर्णीय आणि उच्‍चवर्गीयच बोलतात, जनसामान्‍य बोलत नाहींत. याचाच अर्थ असा की ही so-called शुद्ध भाषा म्‍हणविली जाणारी भाषा फक्‍त ३% मंडळीच बोलतात ( मी ही त्‍यातलाच एक असं म्‍हणायला हवं ). विशेष करून आजच्‍या काळात, जेव्‍हा समाजाच्‍या विविध थरात जागृती झाली आहे , होत आहे , त्‍यामुळे अशी ३% लोकांच्‍या उपयोगात असलेली इंग्रजी, आमच्‍या भारतीय लोकभाषेचं अस्तित्‍व कसं नाहींसं करू शकेल?

प्राकृत भाषांचं अस्तित्व आपल्‍याला भारतात गेली २००० वर्षं दिसतं आहे. संस्‍कृत ही लोकांच्‍या बोलाचालीची भाषा राहिली नव्‍हती. तरीही लोकभाषा हीन लेखली जात असे. एकनाथांना काशीच्‍या ब्राह्मणांना खडसावून विचारावं लागलं की, ‘‘संस्‍कृत भाषा देवें केली, मराठी काय चोरापासून झाली?’’ आज तेंच वाक्‍य आपण इंग्रजीच्‍या बाबतीत म्‍हणून पहावं.

आपल्‍या भारतीय मातृभाषोची जागा इंग्रजी घेईल असं आपण म्‍हणत असतो. खरंच तसं झालं तर काय होईल याची कल्‍पना करून ३ दृष्यं आपण डोळ्यासमोर आणू या –

 • दोन भारतीय शेतकरी शेतात नांगर धरतांना – ‘‘The बाजरी crop is good this year?’’

किंवा ‘‘Take a spade and water the करडई.’’ असं बोलत आहेत.

 • खेडेगांवातल्‍या दोन शेजारणी अंगणात भांडी घासतांना, ‘‘Jowar is very costly these days.’’ किंवा ‘‘I have to still prepare भाकरी & पिठलं.’’ असं म्‍हणत आहेत.
 • एखादा भिकारी हात पसरून, ‘‘Give in the name of Allah!’’ किंवा ‘‘May your couple live happily like रामसीता.’’ असं काही म्‍हणत आहे.

ही दृश्‍य पाहिली, की इंग्रजी आपल्‍या मातृभाषेचं स्‍थान घेईल, ही कल्‍पना किती हास्‍यास्‍पद आहे, हे कळून येईल.

 

 • बहुभाषिकत्‍व

भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं.

अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या.

अनेक लोक व्‍यापारासाठी किंवा तीर्थयात्रेसाठी प्रवास करीत. सिंधु संस्‍कृतीच्‍या लोकांचेही संबंध मध्‍यपूर्व आशिया, आफ्रिका इथल्‍या लोकांशी होते.

नामदेवांनी उत्तरेत तीर्थयात्रा केली ती हिंदीचं ज्ञान असल्‍याशिवाय शक्‍य नव्‍हतीच. नामदेवांचे गुरू ग्रंथसाहिब मधील हिंदी दोहे याचे साक्षीदार आहेत.

चक्रधर स्‍वामी मूळचे गुजरातमधील पण महानुभाव पंथाची स्‍थापना व विस्‍तार त्‍यांनी महाराष्‍ट्रात केला.

शंकराचार्यांनी भारतभर प्रवास केला व चारी कोपर्‍यांत पीठं स्‍थापन केली. रामानंद स्‍वामी व वल्‍लभाचार्य दक्षिणेतून काशीकडे यात्रा करीत व त्‍यांचा शिष्‍यवर्ग विशेषकरून उत्तरेत होता.

अशी अनेक उदाहरणं देतां येतील आणि हे केवळ अपवाद समजूं नका. आजही अनेक भारतीयांना २/३ भाषा बोलता येतात किंबहुधा समजतात तरी. युरोपमध्‍येही असंच आहे. इंग्रजीचा वापर करतो म्‍हणून कोणी युरोपीय किंवा जपानी माणूस तिचा आपली मातृभाषा म्‍हणून स्‍वीकार करील कां? मग आम्‍ही भारतीयच आपली मातृभाषा कशी टाकून देऊ? उगीच नाही माधव ज्‍यूलीयन म्‍हणून गेले –

‘‘जरी पंचखंडातही मान्‍यता घे

स्‍वसत्ता बळें श्रीमती इंग्रजी

भिकारीण आई जहाली म्‍हणूनी

कुशीचा तिच्‍या तीस केंवी त्‍यजी?’’

 

 • Link Language – भिन्न भाषिकांमधील दुवा

भारतात इंग्रजीचं मुख्‍य स्‍थान आज काय आहे व काय राहील? इंग्रजीचं स्‍थान आहे भिन्नभाषिकांनां सांधणारा दुवा म्‍हणून. आपण इंग्रजी शिकतो तें आपल्‍याला देशी व विदेशी परभाषिकांशी व्‍यवहार करता यावेत म्‍हणून.

इसवी सनापूर्वीच्‍या ६व्‍या शतकापासून भारतात प्राकृत भाषा दिसून येतात. त्‍या आधीपासूनच अस्तित्‍वात असल्‍याच पाहिजेत. (प्राकृत म्‍हणजे नैसर्गिक व संस्‍कृत म्‍हणजे संस्‍करण केलेली, असाच त्‍यांच्‍या नावाचा अर्थ आहे. अर्थात्, पाणिनीच्या काळीं या भाषेला संस्कृत ही संज्ञा नव्हती). अगदी ऋग्‍वेदकालीन ऋचा पाहिल्‍या तरी ही गोष्‍ट दिसून येते. त्यात, ‘ळ’ व ‘ल’ या दोन्‍हींचा वापर आढळतो. वर्ण ६३ किंवा ६४ मानले जातात असाही उल्‍लेख दिसतो. ‘ळ’ चा उपयोग सार्‍याच वैदिक ऋषींनी केलेला नाहीं.

संस्‍कृत घरगुती बोलाचालीची व दैनंदिन व्‍यवहाराची भाषा होती की नाहीं, व असल्‍यास कुठल्‍या काळी होती  ( उदा. वैदिक काळीं ) , हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण, गेली २ – २॥ हजार वर्षे संस्‍कृत एक दुवा सांधणारी भाषा (संपर्क-भाषा) म्‍हणून वापरली जात होती, हे निश्चित. तिला प्रतिष्‍ठा लाभली व तिच्‍यात साहित्‍यसृजन सुद्धा झाले. पण ह्या सगळ्याचं मुख्‍य कारण हेंच की ह्या विस्‍तृत खंडप्राय भूभागावरील अनेक लोक ही भाषा समजू शकत होते.

हीच गोष्‍ट चीनमध्‍यें मॅंडरिन भाषेची आहे. हीच गोष्‍ट युरोपमध्‍ये लॅटिनची होती. आधुनिक युरोपीय भाषा गेली १००० वर्षें अस्तित्‍वात असल्‍या तरी, आणि रिनेसाँच्‍या काळात त्‍यांची खूप प्रगती झाली, तरीही १९व्‍या शतकापर्यंत लॅटिन युरोपची दुवा-भाषा (संपर्क भाषा) म्‍हणून अस्तित्‍वात होती.

दुवा म्‍हणून वापरली जाणारी भाषा जर लोकभाषा म्‍हणून – मातृभाषा म्‍हणून – एखादा जनसमूह बोलत नसेल ; तर , तिची दुवा म्‍हणून आवश्‍यकता न राहिल्‍यास, ती अस्‍तंगत होते. लॅटिनचं हेंच झालं. भारतातही इंग्रजी दुवा-भाषेचं काम करूं लागल्‍यावर संस्‍कृतची दुवा-भाषा म्‍हणून आवश्‍यकता संपुष्‍टात आली.

दाई कधी आईची जागा घेऊं शकत नाहीं. त्‍याचप्रमाणें, मातृभाषा विकसित असतांना दुवा-भाषा तिचं स्‍थान घेऊं शकणार नाहीं.

विज्ञानाचा आधार घेऊन पाहिलं असतां असं दिसतं की कदाचित उद्या ‘क्‍लॉनिंग’चं तंत्र विकसित झालं, ( आणि, त्याची कांहीं सुरुवात झालेलीच आहे ), तर , प्रत्‍यक्ष आईच्‍या गर्भात वाढ न होतांही मूल जन्‍मू शकेल. पण त्‍यामुळे आईच्‍या मायेची, जवळिकीची गरज कशी पूर्ण होणार? आईहा केवळ एक भौतिक घटकंच नाही, तर त्‍यात मानसिक घटकांचाही फार मोठा सहभाग आहे. तसंच मातृभाषेचंही आहे.

भाषावार प्रांतरचनेचे फायदे-तोटे याची चर्चा आज आपल्‍याला करायची नाही. पण त्‍यामुळे भारतीय भाषाभाषिकांची स्‍वभाषाविषयक अस्मिता जागी झाली, व भारतीय भाषांच्‍या विकासाला मदत झाली, हें निर्विवाद. अशा स्थितीत, इंग्रजी आमच्‍या मातृभाषेचं उच्‍चाटण कशी करुं शकेल?

या विषयी चार्लस् बार्बर हा भाषाशास्‍त्रज्ञ काय म्‍हणतो पाहा – ‘‘विविध भागातील सुशिक्षित भाषिकांमधील व्‍यवहारासाठी इंग्रजी हेच प्रमुख माध्‍यम आहे. राज्‍यव्‍यवहार व व्‍यापारासाठी बहुतांशी तिचाच वापर होतो. मध्‍ययुगीन युरोपममधें लॅटिन जी भूमिका बजावीत होती, तशीच भूमिका अजून बराच काळ इंग्रजी बजावील. पण अशी स्थिती प्रदीर्घ काळापर्यंत चालूं राहूं शकणार नाहीं. असे देश अखेरीस शिक्षण व व्‍यवहारात इंग्रजीऐवजी एक किंवा अधिक स्‍वदेशी भाषांचा उपयोग करू लागतील.’’

चार्लस् बार्बरचं विवेचन बर्‍याच अंशी हिंदीच्‍या स्‍वरुपात खरं ठरतं आहे, हें आपण पाहातच आहोत.

 

 • नव्‍या प्रक्रिया, नवे प्रवाह –

एकविसाव्‍या शतकाच्‍या उंबरठ्यावर उभे असतांना, जगांतील नव्‍या प्रवाहांचा विचार, व त्‍या अनुषंगानें भाषेचा विचार, आवश्‍यक ठरतो.

आज जागतिकीकरणाच्‍या (globalization) प्रक्रियेला वेग आला आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍समुळे दळणवळण व संदेशवहन अतिशय सोपं झालं आहे. संगणक आदेशावली (computer software)च्‍या आश्चर्यकारक प्रगतीमुळे इंग्रजी भाषेचा प्रसार वाढला आहे.

त्‍यामुळे, एक वैश्विक संस्‍कृती निर्माण होईल, इंग्रजी ही वैश्विक भाषा होईल, अशी भीती आमचे विचारवंत व्‍यक्‍त करत असतात.

आमची गोष्‍ट एकवेळ बाजूला ठेवूं. पण फ्रेंच, रशियन, जर्मन, जपानी वगैरे लोक इंग्रजीला वैश्विक भाषेचं स्‍थान द्यायला व स्‍वतःच्‍या मातृभाषेला विसरायला तयार होतील कां? तर मग आम्‍ही असा विचार – अशी शक्‍यताही – मनांत आणायचं काय कारण?

एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे.

तेव्‍हां एक गोष्‍ट स्‍पष्‍ट आहे, की हा संख्‍येचा प्रश्न नाहींच. हा प्रश्न आहे विश्वासाचा. आम्‍हाला इंग्रजीची भीती वाटते कारण आमचा स्‍वतःवर विश्वास नाहीं, आपल्‍या संस्‍कृतीच्‍या दीर्घायुष्‍यावर विश्वास नाहीं, आपल्‍या भाषेच्‍या लवचिकपणावर विश्वास नाहीं.

वैश्विक भाषा ही फक्‍त एक हवीहवीशी वाटणारी मनोरम कल्‍पना आहे , ‘युटोपिया’ आहे, एक स्‍वप्‍न आहे. निकट भविष्‍यात तरी कुठलीही एक भाषा वैश्विक मातृभाषा बनेल असा संभव दिसत नाहीं. आणि तेंच चांगलं आहे. जगात एकच भाषा असली तर सगळं एकसुरी, कंटाळवाणं, monotonous होईल. वैविध्‍य आहे, त्‍यामुळे वेगळेपणा आहे, आणि त्‍यामुळेच विकासाला विविध दिशांना संधी आहे.

नव्‍या प्रवाहांचा विचार करतांना आणखी एका प्रक्रियेचा विचार करायला हवा. जगात जशी एका बाजूला व्‍यापारउद्योगांमध्‍ये जागतिकीरणाची प्रक्रिया सुरुं आहे, तशीच राजकीय क्षेत्रात, मोठ्या देशांच्‍या विघटनाची व लहान लहान नवीन देश निर्माण होण्‍याची प्रक्रिया सुरुं आहे. यू.एस्.एस्.आर., झेकोस्‍लोव्‍हाकिया, युगोस्‍लाव्हिया ही त्‍याची कांहीं उदाहरणं. या विघटनाची कारणं केवळ राजकीय नाहींत, तर ती सांस्‍कृतिक, भाषिक, आणि धार्मिक आहेत, ती भिन्नभिन्न जनसमुदायांच्‍या अस्मितांशी संबंधित आहेत.

ह्या एकमेकांविरुद्ध दिशेला जाणार्‍या प्रक्रियांचा अर्थ एकच. जागतिकीकरणाचा अर्थ, वैश्विक साम्राज्‍य, वैश्विक संस्‍कृती, वैश्विक भाषा असा नसेल. स्‍वतःची संस्‍कृती, भाषा, वेगळेपण, अस्मिता व अस्तित्‍व टिकवून इतर जगाशी संबंध राखणारं, युती साधणारं असं हें नवं युग असेल.

पूर्वी जें घडत आलेलं आहे, तसच पुढेही घडणार आहे. आपण दोन पातळ्यांवर जगतो – बौद्धिक व भावनिक. आपण दोन भूमिका निभावतो – एक आपल्‍या उद्योगधंद्यातील व दुसरी त्‍याव्‍यतिरिक्‍त इतर व्‍यवहारातली. आणि हें जसं द्वैत राहणार आहे, तसंच द्वैत भाषांच्‍याही बाबतीत राहणार आहे – एक असेल इंग्रजी किंवा अन्‍य एखादी दुवा-भाषा (संपर्क भाषा) व दुसरी आपली स्‍वतःची मातृभाषा.

 

 • आमच्‍यापुढील कार्य –

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां?

भाषाशास्‍त्राचा सिद्धान्‍त सांगतो की जेव्‍हा एकाच क्षेत्रात दोन भाषांची स्‍पर्धा आहे तेव्‍हां दोन्‍हींमधे कायम स्‍वरुपाचं संपूर्ण संतुलन अशक्‍य आहे. कुठल्‍याही एका विशिष्‍ट काळी एक भाषा दुसरीला मागे सारून पुढे जातं असते. अर्थात, परिस्थिती बदलल्‍यास ह्या भूमिका उलटूं शकतात, आणि आधी मागे राहिलेली भाषा पुढे जाऊं लागते.

आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे.  त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू.

इंग्रजी व लॅटिन शब्‍दांसाठी भारतीय भाषांमध्‍ये प्रतिशब्‍द तयार केले गेले पाहिजेत. विज्ञान, कायदा, वैद्यक, मानसशास्‍त्र, समाजशास्‍त्र, अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांत असे प्रतिशब्‍द तयार केले गेले पाहिजेत. त्‍यासाठी प्रांतीय सरकारें सुद्धा प्रयत्‍नशील आहेत. हे प्रयत्‍न वाढवायला हवे.

प्रतिशब्‍द तयार करतांना अशी काळजी घ्‍यायला हवी की विविध भाषांमध्‍ये एकच प्रतिशब्‍द शक्‍यतो वापरता यावा. त्‍यामुळे भिन्नभाषिकांचे वैचारिक आदानप्रदान सोपे होईल.

भारतात विविध भाषा आहेत, आणि हें वैविध्‍य या मार्गातही एक अडचण आहे, असं वरवर पाहतां, आपल्‍याला वाटतं. पण ते खरं नाही.

बहुतेक भारतीय भाषा संस्‍कृतोद्भव आहेत. त्‍यांची वर्णमाला सारखी आहे. त्‍यांचं व्‍याकरण पुष्‍कळ अंशी सारखं आहे. त्‍यांच्‍यांत समान शब्‍दसुद्धा आहेत. ही समानता आपण पुष्‍कळदा लक्षात घेत नाहीं.

हा मुद्दा स्‍पष्‍ट करायला, मी आपल्‍याला एक संगणकक्षेत्रातील उदाहरण देतो. संगणक आदेशावली (computer software)मधे बहुतांशी इंग्रजी भाषा व रोमन लिपी वापरतात हें आपणांला माहीत आहेच. ही रोमन अक्षरे संगणकाला कळावीत म्‍हणून ASCII कोड वापरलं जातं. भारतीय लिप्‍यांचा संगणकात कसा वापर करायचा हा फार मोठा प्रश्न भारतीय संगणकवैज्ञानिकांपुढे होता. भारतात अनेक भाषांच्‍या वेगवेगळ्या लिप्‍या संगणकाच्‍या कोडमध्‍ये बसवायच्‍या कशा, हा त्‍यांना यक्षप्रश्न होता. पण त्‍यांच्‍या लक्षांत आलं की सर्व भारतीय भाषांची वर्णमाला सारखीच आहे – ती ध्‍वनीजन्‍य आहे. फक्‍त लिपी वेगवेगळी आहे. त्‍यावरून त्‍यांनी, भारतीय भाषेतील अक्षरें संगणकाला समजावीत यासाठी ISCII कोड तयार केलें. सर्व भारतीय भाषांसाठी एकच ISCII कोड वापरले जाते. फक्‍त वेगवेगळ्या लिप्‍यांची प्रिंटर यंत्रावर छपाई करण्‍यासाठी वेगवेगळ्या ग्राफिक्‍सचा उपयोग केला जातो.

अशाच तर्‍हेने आपण भारतीय भाषांमध्‍ये समान प्रतिशब्‍द तयार करुं शकूं. हे प्रतिशब्‍द खालीलपैकी कुठल्‍याही तर्‍हेचे असू शकतात.

 • संस्‍कृतोद्भव शब्‍द
 • अरबी – फारसी – तुर्की भाषेतून आलेले, पण भारतीय भाषेत रुळलेले शब्‍द.
 • भाषाभगिनीकडून घेतलेले.
 • इंग्रजीवर आधारित.

 

मात्र प्रतिशब्‍द दुर्बोध नकोत याची काळजी घ्‍यायला हवी. रिपोर्टर साठी वार्ताहर हा सुंदर प्रतिशब्‍द सावरकरांनी सुचवला व तो रुढही झाला. ‘उपस्‍कर’ या प्रतिशब्‍दाने आम्‍हाला काय समजतें? त्‍याऐवजी ‘अवजार’ हा सोपा शब्‍द काय वाईट आहे? (तो मूळचा अरबी असला तरी.) आणि प्रत्‍येक इंग्रजी शब्‍दाला प्रतिशब्‍द हवाच असंही नाहीं. टेलिफोनवर बोलतांना ‘हलो’ हा शब्‍द इतका रुढ झाला आहे, की त्‍याला प्रतिशब्‍द तयार करणं एक घोडचूकच ठरेल. तसेच स्‍टेशन, सिग्‍नल, ओयासिस वगैरे शब्‍द. हे शब्‍द तसेच ठेवले तर कांहींच बिघडत नाहीं.

सुरुवातीला प्रतिशब्‍दांचा वापर करणें अवघड वाटेल, पण हळूहळूं त्‍याची सवय होईल. आपण नाहीं का पै – पैसे – आणे याऐवजी नव्‍या पैशांचा हिशेब शिकलो? आता तर मुलांना पै – आणे तर कळतच नाहींत, कारण ते कालबाह्य झाले आहेत. ब्रिटिश राजवटीतली रस्‍त्‍यांची नांवें जाऊन नवी नावें आली. सुरुवातीला लोक जुनीच नावें वापरत राहिलें. आतां नवीन नांवें रुढ झाली. तसेच , प्रतिशब्‍दही पुढल्‍या पिढीत रुळतील.

पुढली गोष्‍ट ही  –  भारतीय भाषांमध्‍ये आपसात अधिक वैचारिक देवाणघेवाण व्‍हायला हवी. त्‍यासाठी अनेक भाषांतरं व्‍हायला हवीत. अनेक नवनवीन विषयांवर – विशेषतः आधुनिक विषयांवर बोललं-लिहिलं जायला हवं. अन्‍य भारतीय भाषा शिकण्‍यासाठी जाणीवपूर्वक उत्तेजन दिलं जायला हवं. स्‍वस्‍त दरात पुस्‍तकं उपलब्‍ध व्‍हायला हवीत. हिंदी पॉकेटबुक्‍स मधें बच्‍चन यांची ‘मधुशाला’, महादेवी वर्मांच्‍या कविता, शेरो-शायरी, गझल असं विविध साहित्‍य स्‍वस्‍तात उपलब्‍ध आहे. तस मराठीत नाहीं. आज अनेक इंग्रजी वृत्तपत्र व मासिकांच्‍या हिंदी व गुजराती आवृत्त्या निघतात, तसं अन्‍य भाषांमध्‍येही व्‍हायला हवं. आंतरराष्‍ट्रीय वृत्तपत्र व मासिकांच्‍या अरबी, फारसी आवृत्या निघतात. आपण अशी परिस्थिती निर्माण करायला हवी की अशा वृत्तपत्र व मासिकांच्‍या भारतीय भाषेत आवृत्या निघतील.

हे काम सोपं नाहीं. हें काम एकट्याचं नाहीं. त्‍यात शासनाची सक्रिय मदत तर हवीत. त्‍याशिवाय या चळवळीला आर्थिक पाठबळ लाभणार नाहीं.

पण संस्‍कृती ही कांहीं शासनाची मिरासदारी नाहीं. भाषा सर्वांची आहे, तशीच संस्‍कृतीही सर्वांची आहे. भाषा जतन करणं, ती समृद्ध करणं ही शासनाची किंवा साहित्यिकांचीच जबाबदारी नाहीं. ही जबाबदारी समाजातल्‍या प्रत्‍येक थराची आहे, प्रत्‍येक सुजाण व्‍यक्‍तीची आहे. डॉक्‍टर, इंजीनियर, वकील, शास्‍त्रज्ञ, मॅनेजर, उद्योजक, शिक्षक सर्वांनीच यावर विचार केले पाहिजे व आपापल्‍या परीनं सक्रिय कृती केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्‍हणजे, आम्‍हाला ज्‍या कसल्‍यातरी न्‍यूनगंडानं पछाडलेलं आहे, तो दूर करायला हवा.

आज जगाची नजर आशियाकडे लागलेली आहे, भारताकडे लागलेली आहे. ह्यात कसलीही अतिशयोक्ति नाहीं, तर तें सत्‍य आहे. भारतीयांच्‍या योग्‍यतेची आम्‍हाला नसली तरी पाश्चिमात्त्यांना कल्‍पना आहे. ‘How Race, Religion & Identity Determines Success in the New Global Economy’ या नावाचं एक पुस्‍तक जोएल कॉटकिन या गृहस्‍थानं लिहिलं आहे व तें न्‍यू यॉर्क हून १९९२ साली प्रसिद्ध झालें आहे. त्‍यावर आधारित लेख, ‘World Executive Digest’ ह्या हाँगकाँगहून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्‍या डिसेंबर १९९३च्‍या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

 • हे सर्व सविस्‍तर सांगायचं कारण असं की भारतियांविषयी हें जें लिहिलं आहे, तें कुणी भारतीयाने नव्‍हे आणि लिहिलं गेलं आहे ते हल्‍लीहल्‍लीच, कधी पुराणकाळी नव्‍हे.

हा जोएन कॉटकिन ‘Global Tribes’, म्‍हणजे जगभर फैलावलेल्‍या एकवंशीय समूहांबद्दल लिहितो आहे. त्‍यात त्‍यानें फक्‍त पाच समूहांनाच जागतिक म्‍हणून संबांधलं आहे. ते पाच असे.

 • ब्रिटिश व अमेरिकन
 • ज्‍यू
 • चिनी
 • जपानी
 • भारतीय

 

त्‍याच्‍या लिखाणाचं मराठी भाषांतर करण्‍याचं टाळून मी मुद्दामच त्‍यातील संबंधित भाग मूळ इंग्रजीत दिलेला आहे, कारण त्‍याच्‍या आशयात मी तिळमात्रही बदल करुं इच्छित नाहीं.

= अवतरण सुरूं =

Global Tribes . . . will increasingly shape the economic destiny of mankind.

पुढे तो भारतीयांविषयी लिहितो, ‘‘. . . further in the future lives the possible emergence of yet another great Asian tribe, the Indians . The Indians boast a long historical memory and a well-developed cultural sense of uniqueness . . . they have in recent decades developed their own increasingly potent global diaspora from North America and Britain to Africa and South East Asia. The more than 20 million overseas Indians today represent one of the best educated, affluent groupings in the world. They boast one of the world’s deepest reservoirs of scientific and technical talent . . . they (Indians) may prove to be the next diaspora to emerge as a great economic force.’’

 = अवतरण समाप्त =

 

तेव्‍हां आपण स्‍वतःवर, आपल्‍या संस्‍कृतीवर आणि पर्यायानें आपल्‍या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्‍हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –

हिचे पुत्र आम्‍ही, हिचे पांग फेडूं

वसे आमुच्‍या मात्र हृद्मंदिरी

जगन्‍मान्‍यता हीस अर्पू प्रतापे

हिला बसवू वैभवाच्‍या शिरीं ।।

 

–—

 • सुभाष स. नाईक

 

 

– सुभाष स. नाईक

 

 

 

 • पान क्र. १ वर – वाङ्मय – हा शब्‍द वाङ् मय असा लिहिण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र मधील स्‍पेस काढून टाकल्‍यावर तो परत वाङ्मय असा होतो.

 

पान क्र. १ वर – लिख्मय – वरील प्रमाणेच. जोडाक्षर होते.

पान क्र. १५ वर – संस्‍कृतोद्भव  – संस्‍कृतोद् भव असे टाईप होत नाही, जोडक्षर होते.

पान क्र. १७ वर – वाचत आहे – च्‍याऐवजी – देत आहे असे ठीक वाटेल.

 

 • पिवळ्या रंगाने हायलाईट केलेले शब्‍द कृपया तपासावेत.
 • या लेखामध्‍ये जुन्‍या पद्धतीप्रमाणे शब्‍दांवर अनुस्‍वार दिले आहेत.
 • १२ क्रमांकाचा फॉन्‍ट वापरला आहे.

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*