पुनर्भेट : आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! (जागतिकीकरणाबद्दल एक चिंतन)

०७८.०३.२०१९

(( टीप –  मार्च २०१९ – 

 • पुनर्भेटीपूर्वीचें प्रास्ताविक :  

भारतात १९९१ सालीं अशी परिस्थिती आली होती की, आधीच्या सरकारांच्या पॉलिसीज् मुळें देशाचा परकीय चलनाचा खजिना जवळजवळ रिता झालेला होता. वर्ल्ड् बँक, आय्. एम्. एफ्. सारख्या संघटना तसेंच पाश्चिमात्य देश, भारताची बाजारपेठ खुली करण्यांसाठी तत्कालीन भारत सरकारवर दबाव आणत होते (म्हणजे ती बाजारपेठ त्या देशांना काबीज करतां आली असती) . अशा परिस्थितीत तत्कालीन प्रधानमंत्री श्री. नरसिंह राव यांना जागतिकीकरणाला सुरुवात करावी लागली होती. असें करण्यांवाचून त्याच्यापुढें अन्य पर्यायच नव्हता. या जागतिकीकरणाच्या निर्णयाबद्दल तत्कालीन सरकारची  स्तुती  करणारांनी हें विसरतां कामा नयें की, तो निर्णय भारतानें स्वत:होऊन घेतलेला नसून , तो घ्यायला भारताला बाध्य केलें गेलेलें होतें.

-त्या निर्णयानंतर, सर्व भारतीयांची, ‘जागतिकीकरण कसें देशासाठी योग्य आहे, तें म्हणजे कसा प्रगतीचा मार्ग आहे’, हें सांगण्याची अहमहमिका लागली होती. जागतिकीकरणातील धोके सांगणारा आवाज अतिशय weak होता, क्षीण होता, अरण्यरुदन होतें, तो ऐकण्यांची कुणाची तयारी नव्हती. इंडस्ट्रियलिस्टांचा ‘बाँबे क्लब’ हा असा एक आवाज. ( नंतर तो बंद झाला व कुठेंतरी लुप्तच झाला. असो ).

-प्रस्तुत लेखक इंडस्ट्रीचा कांहीं दशकें अनुभव असलेला माणूस आहे. त्यानें कांहीं इंडस्ट्रीजना जागतिकीकरणामुळे गर्तेत जातांना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तो वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी लिहीतही आलेला आहे.

-प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता.

-१९९३ ते २०१९ , म्हणजे २६ वर्षें. (म्हणजेच, एका पिढीचा काळ ) .या काळात पुलाखालून बरेंच पाणी वाहून गेलेलें आहे.

-१९९३च्या  लेखात अमेरिकेचा (USA) प्रत्याप्रत्यक्षपणें उल्लेख आहे. आण्विक क्षेत्रात कांहीं वर्षांपूर्वी भारताला अमेरिकेनें कांहीं सवलती दिल्या खर्‍या ; पण ती अमेरिका अजूनही भारतातील अमेरिकन वस्तूंवरील आयात कर बंद करण्यासाठी दबाव आणत आहे , जेणेंकरून अमेरिकन वस्तूंसाठी प्रचंड भारतीय बाजापेठ संपूर्णपणें खुली व्हावी. तसें करण्यांसाठी भारत सरकार दबत नाहींये, असें पाहून, अमेरिका भारतीत वस्तूंवरील आयात कर वाढवत आहे.  पहा :   #०६.०३.१९ च्या, लोकसत्ता मंबई आवृत्तीमधील बातमीचा एक अंश : ‘अमेरिकी उत्पादनांना आपली बाजारपेठ पूर्णपणें खुली करून द्यायला भारत तयार नसल्यानें ….’ .   #याच तारखेच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या मंबई आवृत्तीमधील, यासंबंधीच्या बातमीचा अंश  : ‘At the heart of the dispute is the US insistence that India should remove the price-cap on knee-implants and stents , which New Delhi now regulates as ‘essential medicine’, but which is a money-spinner for western companies. India declined ….’ .

( या व अशा निर्णयांबद्दल सद्य भारत सरकार अभिनंदनास पात्र आहे ) .

-एका बाजूला हें असें, तर दुसरीकडे तीच अमेरिका, स्वत:च्या देशांतील उद्योगधंदा वाढावा म्हणून जागतिकीकरणाविरुद्ध जाणार्‍या इंपोर्ट पॉलिसीज् स्वत:च्या देशांत आणत आहे . ग्रेड ब्रिटन हें ,‘ब्रेक्झिट’ या अभिधानाद्वारें युरोपीय यूनियन (EU) मधून बाहेर पडूं पहात आहे. कारण , जागतिकीकरणामुळे व  EUशी बांधलें गेल्यामुळें आपलें किती व कसें नुकसान होत आहे , याची त्या देशाला जाणीव झालेली आहे.

-१९९३ मध्ये चीन हा महाशक्ती म्हणुन उदयाला आलेला नव्हता, तर त्याची त्या दिशेनें केवळ प्रगती चालूं होती. तसेंच, आर्थिक दष्टीनें त्याकाळीं त्याचा भारतावर फारसा परिणाम नव्हता. त्यामुळे तत्कालीन लेखात चीनचा specific उल्लेख नाहीं. मात्र आतां चीन एक आर्थिक महासत्ता झालेला आहे, आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठ व इंडस्ट्रीवर दिसून येत आहे. त्याबद्दल प्रस्तुक लेखकानें मतप्रदर्शन करणारे लेख लिहिलेले आहेत; आणि यथावकाश आणखी एक विस्तृत लेख त्यावर लिहिला जाणार आहेच. मात्र, भारतात  चिनी वस्तूंची ‘लीगल् घुसखोरी’ चालूं असतांनाच, अमेरिका व चीन यांची ‘ट्रेड वॉर’ चालूं आहे, याची नोंद घेणें आवश्यक आहे.

-अशा परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.  ))

 

= १९९३ चा लेख =

भाग – १

 • प्रस्तावना –

भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?

 

भाग-१-अ

 • ऐतिहासिक पार्श्वभूमी :
 • प्रथम आपल्‍या इतिहासाचं उदाहरण घेऊं. भारताला शिकंदराच्‍या स्‍वारीपूर्वीचा इतिहासच नाहीं असं अनेक पाश्चिमात्त्य विद्वानांनी १८व्‍या व १९व्‍या शतकांत आग्रहान प्रतिपादन केलं. आमचा इतिहास अगदी फारफार तर बुद्धापर्यंत पोचविला.
 • शिकंदराच्‍या स्‍वारीचा उल्‍लेख कुठल्‍याही भारतीय वाङ्मयांत मिळालेला नाहीं याचा अर्थ असाही असू शकतो की भारताच्‍या दृष्‍टीने त्‍या स्‍वारीला महत्त्व नव्‍हतं . या खंडप्राय अजस्र देशात अनादि काळापासून असे कितीतरी हल्‍लेखोर आले आणि गेले. प्रत्‍येकाचा उल्‍लेख कोण करणार? ग्रीकांच्‍या दृष्‍टीनें , व म्‍हणूनच अत्‍याधुनिक युरोपियनांच्‍या दृष्‍टीनें, शिकंदर हा जगज्‍जेता होता . पण तत्‍कालीन ज्ञात जगताच्‍या कितीतरी मोठ्या भागाला त्‍याचा अल्‍प स्‍पर्शही झाला नाहीं हें ऐतिहासिक सत्‍य आहे. भारताच्‍या कोपर्‍याला त्‍याचा अल्‍प स्‍पर्श झाला इतकेंच , पण भारतात मात्र त्‍याची कोठेही डाळ शिजली नाही. मगधाच्‍या सामर्थ्‍याची कीर्ती ऐकून शिकंदराच्‍या सैन्‍याला भय वाटलें , सैनिक विद्रोहाला सिद्ध झाले, तेव्हां शिकंदराला मागे फिरावं लागलं. लहान लहान गणराज्‍यांनीही त्‍याच्‍याशी जबर लढा दिला. भारत जिंकायचं त्‍याचं स्‍वप्‍न साकार होऊ शकलं नाहीं, हे तत्‍कालीन ग्रीक इतिहासकारांच्‍या वृत्तान्‍तावरून स्‍पष्‍ट दिसतं.

-शिकंदराच्‍या भारतभेटीचा व तत्कालीन भारताचा उल्‍लेख ग्रीक इतिहासकार करतात तेव्‍हा भारतीय राजा ‘सँड्रॉकॉट्टस्’चं नाव पुढ येतं. १७९३ साली विल्‍यम जोन्‍सनें असं मत मांडलं की हा सँड्रॉकॉट्टस् म्‍हणजेच चंद्रगुप्त मौर्य होय. या सिद्धांताचं काही विदेशी व भारतीय विद्वानांनी त्‍यावेळीच व नंतरही खंडन केलं.  १८५९ मध्‍ये मॅक्‍समुल्‍लरने या सिद्धान्‍ताला भारतीय इतिहासाच्‍या कालक्रमाचा  ‘मूलाधार’ ( शीट एँकर ) असं नांव देऊन दुजोरा दिला व तेव्हांपासून तोच भारतीय इतिहासाचा पाया मानला जाऊं लागला. पुढे व्हिन्‍सेंट स्मिथनेंही तीच ‘री ओढली’. आजही आपला इतिहास त्‍याच सिद्धान्‍तानुसार लिहिला जातो, शिकवला जातो.

-खरं तर, पं. भगवद्दत्त, तेलंग, त्रिवेदी व इतर विद्वानांनी अभ्‍यासपूर्वक सँड्रॉकॉट्टस् म्‍हणजे चंद्रगुप्त मौर्य हा सिद्धांन्‍त खोडून काढला होता व भारतीय वाङ्मयातील पुरावे दाखवून आपल्‍या संस्‍कृतिचं प्राचीनत्‍व सिद्ध केलं होतं. पण पारतंत्र्याच्‍या त्‍या काळात ते अरण्‍यरूदनच ठरलं.

 • भारत स्‍वतंत्र झाला तेव्हां आपल्‍याला, आपल्‍या इतिहासाचा पुन्‍हा अभ्‍यास करून, जुने सिद्धांत पारखून, आपल्‍या संस्‍कृतिचं प्राचीनत्‍व सिद्ध करण्‍याची अमूल्‍य संधी आलेली होती. कोटा वेंकटचलम वगैरे विद्वानांनी तशा विनंत्‍याही केल्‍या होत्‍या. पण आपली बौद्धिक गुलामगिरी संपली नव्‍हती. १००-१५० वर्षांपूर्वीचे सिद्धांत पारखून पहायची, खोडून काढायची, कोणाला गरज वाटली नाही.

– वस्‍तुतः पुराणांमध्यें भारतीय राजवंशांच्‍या वंशावळी दिलेल्‍या आहेत. व त्‍या महाभारताच्‍या युद्धापासून सुरूं होतात. इक्ष्‍वाकूपासून महाभारतापर्यंतची वंशावळही आढळते. या वंशावळींनुसार कालगणना केली असतां आपला इतिहास फार प्राचीन ठरतो. भारतीय संस्‍कृती एवढी प्राचीन असूं शकते यावर तत्कालीन पाश्चिमात्त्य विद्वानांचा विश्वासच बसला नाही कारण ते युरोपियनांचे वंशश्रेष्‍ठत्‍व मानत होते. त्‍यामुळे त्‍यांनी पुराणांमधील पाठभेदावर व माहितीतील भिन्नतेवर अतिरिक्‍त भर दिला व स्‍वतःला सोईस्‍कर असे अर्थ व पाठ स्‍वीकारले. वेगवेगळ्या पुराणांमध्यें दिलेल्‍या काही वंशावळींत भेद आहेत खरे; पण असे भेद मौखिक प्रसारात अथवा हाताने प्रतिलिपी लिहितांना येणे स्‍वाभाविक आहे. पण केवळ त्‍यामुळेच पुराणांमधील सर्वच माहिती अविश्वसनीय ठरत नाही.

– अनेक पुराणें मध्‍ययुगात, म्‍हणजे बर्‍याच नंतरच्‍या काळात लिहिली गेली म्‍हणून त्यांतील माहिती विश्वसनीय नाहीं असें कांहीं विद्वान प्रतिपादतात. पुराणातील माहिती विसंगत आहे, पुराणें अतिशयोक्‍त वर्णनें करतात म्‍हणून ती विश्वासार्ह नाहीत असाही एक मुद्दा पुढे केला जातो. पण आपण हे ध्‍यानी घेऊ इच्छित नाही की विसंगत असोत वा नसोत, अतिशयोक्‍त असोत वा नसोत, परंतु वंशावळी देण्यांमागला पुराणांचा उद्देश इतिहासवर्णन हाच होता. पुराणें रचणारांपुढे जुन्‍या पोथ्‍या व इतर मौखिक माहिती असलीच पाहिजे कारण त्‍याशिवाय त्‍यांना विविध राजवंशांच्‍या अनेक पिढ्यांची माहिती देताच आली नसती. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे अगदी अलीकडल्‍या काळापर्यंत छपाईचं तंत्र भारतात अवगत नव्‍हतं व दळणवळणाची सुलभताही नव्‍हती. अशा परिस्थितीत आपल्‍या हाती आज उपलब्‍ध असलेल्‍या पुराणांच्‍या हस्‍तलिखित प्रतिलिप्‍यांमध्यें कांहीं त्रुटी असणें स्‍वाभाविकच आहे.

– भांडारकर प्राच्‍यविद्या संस्‍थेनें अनेक वर्षें खपून अभ्‍यासपूर्वक प्रसिद्ध केलेल्‍या महाभारताच्‍या ‘अधिकृत’ प्रतीमध्‍ये  (क्रिटिकल एडिशन) अजूनही काही दोष राहिलेले आहेत पण त्‍यामुळे त्‍या कार्याचें व त्या प्रतीचें महत्त्व कमी होत नाहीं . त्‍या मार्गावरील तो एक महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे व अभ्‍यासकांना आता तिथून पुढे जायचं आहे . त्‍याच प्रकारें, पुराणांची ‘अधिकृत’ प्रत तयार व्‍हायला हवी व तौलनिकरीत्या पुराणांमधील वंशावळींचा नव्‍यानें ऐतिहासिक अभ्‍यास व्‍हायला हवा. त्‍याचप्रमाणें, वैदिक परंपरेतील साहित्‍याचा, बौद्ध व जैन परंपरेच्‍या वाङ्मयाचा तुलनात्‍मक अभ्‍यास होऊन त्‍यातून भारताचा खरा इतिहास लिहिला जायला हवा.

– मॅगेस्‍थनीजनें लिहिलेल्‍या वर्णनांना स्‍ट्रॅबो इत्यादी जुने इतिहासकारही अविश्वसनीय ठरवतात. तरीही आम्‍ही मॅगेस्‍थनीजवर आंधळा विश्वास ठेवतो. ‘पेरिप्‍लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ हा ग्रंथ तर जणू भारतीय इतिहासाचा मूलाधार असल्‍याप्रमाणे त्‍याच्‍या शपथा वाहतो , पण तो अतिशय विस्‍कळित स्‍वरूपात आणि पुराणांप्रमाणेच सदोष आहे हें विसरतो. आपली पुराणें मात्र आम्हांला फक्‍त भाकडकथाच वाटतात. त्‍यांचा उपयोग इतिहास संशोधनासाठी करून घ्‍यावा असे आमच्‍या विद्वानांना वाटत नाही. How sad !

 

भाग-१-ब

 • आमच्या विद्वानांच्या शंका :

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें. अविरत नूतनीकरणाच्‍या प्रक्रियेमुळे प्राचीन अवशेषांचा होणारा नाश तर आजही आपल्‍या डोळ्यांसमोर होतच आहे. आमचे पुरातत्‍वीय पुरावे या प्रक्रियेने अभावितपणे नष्‍ट केले. दुसरें म्‍हणजे, आमची तक्षशिला व नालंदा येथील प्रचंड ग्रंथालयें लुटारूंनी उद्ध्‍वस्‍त केली व त्‍यामुळें कितीतरी पुरातन ज्ञानाला आपण पारखे झालो. जुन्‍या ग्रंथ व पोथ्‍यांमध्‍ये त्‍याहूनही-प्राचीन अशा ग्रंथांचे उल्‍लेख सापडतात, पण ते ग्रंथ मात्र उपलब्‍ध नाहीत. तिबेटमध्यें व इतरत्रही जुने बौद्ध वाङ्मय उपलब्‍ध आहे पण त्‍याचा पद्धतशीररीत्‍या सखोल अभ्‍यास झालेला नाहीं. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, ध्‍यानात घेण्यांजोगा मुद्दा पुरातत्वशास्‍त्राशी ( आर्कियॉलॉजी ) संबंधित आहे. खर्‍या अर्थानें या शास्‍त्राला चालना दिली नेपोलियननें . हे शास्‍त्र २०० वर्षेच जुनें आहे म्‍हणजे तसं नवीनच आहे. या क्षेत्रातलं बरंच भांडार अजून लुप्‍तच आहे. जसजसा काळ पुढे जात आहे तसतशा नवनवीन गोष्‍टी उजेडात येत आहेत आणि तसतसे आपल्‍याला जुने सिद्धान्‍त बदलावे लागत आहेत ; पुढेही बदलावे लागतील. विसाव्‍या शतकाच्‍या तिसर्‍या व चवथ्‍या शतकात मोहेनजादारो व हडप्‍पा येथील उत्‍खननानें भारतीय संस्‍कृतीचा काळ खूपच मागे नेला व पाश्चिमात्त्यांना जुने सिद्धान्‍त बदलणें भागच पडलें. पण त्‍यांनी सहजासहजी ते मान्‍य केलें नाहीं. सिंधू संस्‍कृतीला त्‍यांनी द्रविडियन तथा अनार्य म्‍हणून संबोधलं आणि तिचा सध्‍याच्‍या भारतीय संस्‍कृतिशी दुवा नाही असा प्रचार केला. पुढे भारताच्‍या विभाजनाच्‍या वेळी मोहेनजोदारो व हडप्पा ही दोन्‍ही स्‍थळें पाकिस्‍तानात गेली. त्‍यामुळे की काय, पण भारतीय शास्‍त्रज्ञांनी जिद्दीने या संस्‍कृतीशी संबंधित कालीबंगन, लोथल, दायमाबाद इत्‍यादी नवनवीन स्‍थळं उजेडात आणली. नव्‍यानें उजेडात आलेल्‍या धोलावीरादी हरप्‍पीय शहरांच्‍या उत्‍खननामुळे भारतीय इतिहासातील कित्‍येक सिद्धान्‍त बदलावे लागत आहेत, बदलावे लागतील.

– अलिकडील काळातल्‍या उत्‍खननांमुळे व अन्‍य संशोधनामुळेच द्वारकेत भूमीवर व समुद्राखाली संस्‍कृतीचे अवशेष सापडले. सरस्‍वती देवीचे लुप्‍त पात्र सापडलें व त्‍याभोवतीच्‍या अनेक वसाहतीही उजेडात आल्‍या. अगदी नुकतीच एक हडप्‍पीय वसाहत बिहारमध्‍येही सापडली आहे.

-वैदिक साहित्‍यातील सरस्‍वती संबंधीच्‍या उल्‍लेखांवरूनच शास्‍त्रज्ञांनी तिचं पात्र शोधून काढलं. तोपर्यंत सरस्‍वती नदी ही केवळ एक आख्‍यायिकाच समजली जात होती. सरस्‍वतीच्‍या पात्राभोवती उत्‍खननात सापडलेल्‍या वसाहतींचा वैदिक वाङ्मयात वर्णन केलेल्‍या संपन्न नगरांशी संबंध जोडता येत आहे. सिंधु-सरस्‍वती संस्‍कृतीची वैदिक संस्‍कृतीशी एकात्‍मता संस्‍थापित होत आहे. ते जें कांहीं असेल तें असो,  परंतु ६०-७० वर्षांपूर्वी पाश्चिमात्त्यांनी केलेल्‍या अपप्रचाराला कित्‍येक भारतीय , विशेषतः दाक्षिणात्‍य विद्वान, अजूनही बळी पडतात.

 

 • रिप व्‍हॅन विंकल वीस वर्षे झोपल्‍यावर जागा तरी झाला पण राजकीय स्‍वातंत्र्य मिळाल्‍यावर ( १९९३ पर्यंत ) ४६ वर्षें झाली तरी आमची झोप उडत नाही, आमच्‍या बुद्धीचं भ्रमपटल दूर होत नाहीं हे आमचं दुर्दैव ! भारतीय संस्‍कृतीचें प्राचीनत्‍व नाकारण्‍याच्‍या कसोशीच्‍या प्रयत्‍नांमागे पाश्चात्त्य विद्वानांचा एक विशिष्‍ट हेतू आहे. भारतीय संस्‍कृतीत स्‍वतःचं असं कांहींच नाहीं, तिनें पाश्चिमात्त्य संस्‍कृतीकडून सगळ्या चांगल्‍या गोष्‍टी उचलल्‍या आहेत, असें सिद्ध करण्‍याचा हा सगळा खटाटोप आहे. राम म्‍हणजे इजिप्शियन राजा रॅमसीस आहे व रामायण इजिप्शियन कथेवर आधारित आहे – हा असाच एक सिद्धांन्‍त मल्‍लादि वेंकटरत्‍नम् व भास्‍करराव जाधव यांनी मांडला. कालीदासाने ग्रीक नाटकांची नक्‍कल करून स्‍वतःची नाटके लिहिली असा एक तर्क मांडला गेला. रामायणातील हनुमानाने सीतेला दिलेल्‍या मुद्रिकेचा उल्‍लेख ग्रीक वाङ्मयातून घेतलेला आहे हा आणखी एक आक्षेप. ग्रीक व गांधार शैलीवर आमची शिल्‍पकला आधारित आहे ; हडप्‍पीय वसाहतींची आखणी मेसोपोटेमीयन वसाहतींवरून घेतलेली आहे; मनू व महापुराची कथा मेसेपोटेमियन महाकाव्‍यावर आधारित आहे; आमचं ज्‍योतिषशास्‍त्र ग्रीक ज्‍योतिषशास्‍त्राची नक्‍कल आहे, एक ना दोन किती उदाहरणं द्यायची ?
 • विविध संस्‍कृतींमध्‍ये देवाणघेवाण ही व्‍हावयाचीच, हे मान्‍य आहे, पण आमच्‍या संस्‍कृतीत सगळ्या चांगल्‍या गोष्‍टी दुसर्‍यांकडून घेतलेल्‍या आहेत असा दुराग्रह हे बुद्धिभ्रमाचंच लक्षण आहे. ब्रिटिश राजवटीत पाश्चिमात्त्यांकडे गहाण टाकलेली बुद्धि, चिकित्‍सक वृत्ती, जिज्ञासा, विचारशक्‍ती आम्‍ही खर्‍या अर्थाने मुक्‍त करू शकलेलो नाही ;  त्‍यांच्या गुलामगिरीतून अजूनही आम्‍ही सुटलेलो नाही. हा हन्त हन्त !

**

भाग-२

आजची स्थिती  :

आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें.  पेटंटचा कायदा बदलावा म्‍हणून भारतावर दबाव आणला जातो तो कशासाठी, तर औषधोत्‍पादक ( फार्मास्‍युटिकल ) पाश्चिमात्त्य उद्योगांच्‍या सुरक्षिततेसाठी आणि संगणक आदेशबंध (कॉम्‍प्‍युटर सॉफ्टवेअर ) क्षेत्रातील कंपन्‍यांच्‍या वाढीसाठी. अति-शीत वातावरणात चालणारे (क्रायोजेनिक) एंजिन, महासंगणक (सुपर कॉम्‍प्‍युटर ) आम्‍हाला द्यायचे नाहींत, पण रेफ्रिजरेटर, टी.व्‍ही. इत्‍यादी ‘कंझ्युमर ड्युरेबल्‍स’ (व्हाइट गुडस्) म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या व इतर तत्‍सम उत्‍पादनाचें तंत्रज्ञान विकत घ्‍यावं म्‍हणून आम्‍हाला उत्तेजन दिलं जातं , प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरीत्‍या आमच्‍यावर दबावही आणला जातो. वस्‍तुतः या वस्‍तूंची निर्मिती आम्‍ही अनेक वर्षे करतच आलेलो आहोत, त्‍याविषयीचं तंत्रज्ञान आमच्‍या तंत्रज्ञांनी केव्हांच आत्‍मसात केलेलं आहे ; तरीही असल्‍याच उत्‍पादनांसाठी आम्‍ही परदेशियांशी करार करतो व पुन्हां अशा वस्‍तूंचे सुटे-भाग सुद्धा त्‍यांच्‍याचकडून विकत घेतो. मग आमच्‍या देशाच परकीय चलन संपलं नाहीं तरच नवल ! परकीय चलनाअभावी आम्‍हाला पुन्‍हा हातात कटोरा घेऊन पाश्चिमात्त्य देशांपुढे भीक मागायला उभं राहावं लागतं आणि पुन्हां नवनवीन कंपन्‍या भारतात प्रवेश करतात , साबण, टूथपेस्‍ट, वॉशिंग मशीन, शीतपेये बनवायला अन् इथल्‍या पैशांचा ओघ परदेशाकडे वळवायला.

-आण्विक ( न्‍यूक्लिअर ) तंत्रज्ञान विकसित देशांनी वापरत राहायचं, पण आम्‍हाला तो अधिकार असूं नये म्‍हणून आमच्‍यावर त्‍यांचा दबाव येतच राहणार. आमची वित्तीय नीती कशी असावी हे ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ आम्‍हाला सांगणार. आम्‍ही आमच्‍या विकास योजना कशा आखाव्‍यात ते ‘वर्ल्‍ड बँक’ ठरवणार! प्रत्‍येक क्षेत्रात आमच्‍या स्‍वायत्ततेवर असं आक्रमण होत आहे आणि आम्‍ही ते स्‍वीकारत आहोत.

 

 • भारताच्‍या इतिहासाच विश्र्लेषण करतांना वीर सावरकरांनी एके ठिकाणीं असं विशद केलं आहे की, मध्‍ययुगात आमच्‍याच बांधवांचं धर्मांतर त्‍यांच्‍या इच्‍छेविरुद्ध झालं पण पुढील पिढ्यांसाठी ते धर्मांतर संस्‍कृतीबदल ठरले व त्‍यामुळे आमच्‍याच बांधवांचे वंशज आमचे शत्रू बनले. आपण येथें धर्मविषयक चर्चा करत नाहीं आहोत ; मात्र या कथनाचा अर्थ असा की ‘संस्‍कृती-बदल’ हा मित्राला शत्रू बनवूं शकतो. आमच्‍या बुद्धिजीवी वर्गाचा आज असाच संस्‍कृतीबदल झालेला आहे. अनेक बुद्धिवंत कायमचेच परदेशवासी झालेले आहेत आणि बाकीचेही पाश्चिमात्त्य संस्‍कृतीचे दास झालेले आहेत.

-प्रस्तुत लेखकाचे स्‍नेही श्री. निशिगंध देशपांडे एक अवतरण सांगत असतात ते खरं आहे की ‘दास्‍यत्‍व बंदुकीच्‍या नळीमधून उगम पावत नाही, ते बुद्धिवंतांच्‍या मनांमधून प्रवाहित होतं ’. जेव्हां केंव्हां कुठेही बुद्धिवंतांच्‍या वर्गानें परकियांचें अधिपत्‍य मनानें स्‍वीकारलें आहे, तेव्हां तेव्हां तिथें दास्‍यत्‍व आलेलें आहे , आणि जेव्हां जेव्हां बुद्धिवंतांनी अशा अधिपत्‍याविरुद्ध लढा दिलेला आहे तेव्हां तेव्हां सामान्‍य जनता त्‍यात सामील झालेली आहे , तिनें परकीयांचें जोखड झुगारून दिलेलं आहे, हेच आम्‍हाला इतिहासात वारंवार दिसलेलं आहे.

 • भारतीय बुद्धिवंतांनी पाश्चिमात्त्यांचें आर्थिक, बौद्धिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक अधिपत्‍य स्‍वीकारलेलं आहे! भारताच्‍या गुलामगिरीचा, पारतंत्र्याचा आणखी काय पुरावा  हवा ?
 • भारताची ही गुलामगिरी, ही परतंत्रता बघून तुम्‍ही चकित व्‍हाल, अस्‍वस्‍थ व्‍हाल. होतंय तें अकल्पित आहे, भयानक आहे असंही तुम्‍हाला वाटेल ; यावर उपाय काय, असाही सवाल तुम्‍ही कराल.

**

भाग-३

सोल्यूशन, उपाय  :

 • आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात.

मी सुद्धा तुम्‍हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्‍का बसला ?  पण खरोखरच सांगतो, आपल्‍या उन्नतीसाठी आपल्‍यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.

– ध्यानात घ्या, बुद्धिवंतांचे, नेत्‍यांचे शब्‍द व माझे शब्‍द एकच आहेत, सांगणे एकच आहे, कृतीही एकच आहे, पण उद्दिष्‍ट मात्र संपूर्णपणें भिन्न आहे. त्‍यांच्‍या व तुमच्‍या-माझ्या जाणिवेतला फरक, कारणमीमांसेतील फरक व उद्दिष्‍टातला फरक , हाच खरा त्‍यांच्या व आपल्‍यातला वेगळेपणा. ते ‘वैश्र्विक राष्‍ट्रवादा’च्‍या (सुपरनॅशनॅलिझम ) नांवाखाली या परावलंबित्‍वाचं समर्थन करीत आहेत , तर तुम्हांआम्हांला भारताच्‍या उत्‍थानासाठी या नीतीचा अवलंब करायचा आहे.

– जरा विचार करा, जे या परावलंबित्वाचं समर्थन करतात असे बुद्धिजीवी व असे नेते, या पारतंत्र्याचा विरोध कसा आणि कां करतील ? आणि समजा, तुम्‍ही-आम्‍ही या प्रक्रियेला विरोध करावयाचं ठरविलं तर हा जगन्नाथाचा अजस्र रथ थांबवण्‍यचं , उलट्या दिशेला वळविण्‍याचं सामर्थ्‍य तुमच्‍या-आमच्‍यात आहे कां ? आणि त्‍याहूनही महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे, हे बलशाली पाश्चिमात्त्य देश आम्‍हाला असं करू देतील का ? ह्या प्रक्रियेस विरोध करणें म्‍हणजे प्रत्‍यक्ष विकसित पाश्चिमात्त्य देशांनाच आव्‍हान देणं , आणि तसं करूं गेल्‍यास, आमचं विघटन, आमचं पतन, आमचा विनाश अटळ आहे.

 • तर मग आमच्‍या उन्नतीसाठी आमच्‍यापुढे काहीच उपाय नाही का? आहे ! उपाय आहे ! सुरक्षित व हमखास असा एक उपाय आहे. तो म्‍हणजे, या परावलंबित्‍वाच्‍या, पारतंत्र्याच्‍या प्रक्रियेला अधिकाधिक चालना देणं , गती देणं. आमची अवनतीच आम्‍हाला उन्नतीकडे घेऊन जाईल. अवनतीतून उन्नती कशी? तेच आतां पाहूं या.

 

 • अवनतीतून उन्नती :
 • संस्‍कृतीची वाटचाल चक्राकार गतीने होते. उन्नती व पतन हाच जगातला चिरंतन नियम आहे. समाजाची प्रगती होत गेली, की नंतर एक काळ असा येतो ज्‍यावेळी ती प्रगती थांबते, खुंटते, बुद्धिची धार बोथट होते, समाज सुखासीन होतो, संकटाशी झगडायची त्‍याची इच्‍छा, त्‍याची शक्‍ती नाहींशी होऊन जाते. असा समाज साचलेल्‍या डबक्‍यासारखा बनतो. समाज हा गतिशील आहे, त्‍याला स्थिरत्‍व नाही ; त्‍यामुळें त्‍याची प्रगती थांबली की त्‍याच्‍या अधोगतीला सुरूवात होते. पण गंमत अशी आहे की अशी अवनती होत आहे हें जाणवतच नाहीं . आपली प्रगतीच होत आहे असंच तत्कालिनांना वाटत असतं. त्‍यांचं पतन दिसतं तें, नंतरच्‍या काळातील लोकांनी मागें वळून पाहिल्‍यानंतर .
 • याची उदाहरणं कांहीं थोडी नाहींत. इजिप्‍तची संस्‍कृती अतिप्राचीनकाळी उदयाला आली, वाढली, तिची पुढे अवनती झाली व अखेरीला विलयाला गेली. तेंच पुरातन ग्रीक संस्‍कृतीचें झालें, तेंच रोमनांचें झालें, असीरियन, बॅबीलोनियन, पर्शियन इत्‍यादी अनेक संस्‍कृत्‍यांचेंही तेंच झालें. मध्‍ययुगात डोकावल तर, इंका, मयॅ, एझ्टेक संस्‍कृतींचाही असाच अंत झाला. युरोपिअन देशांचेंही तेंच म्हणतां येईल. पंधराव्‍या शतकांत स्‍पेन व पोर्तुगाल इतके प्रबळ होते की १४९४ साली पोप अलेक्‍झांडर सहावा यानें, सगळं जग त्‍या दोन राष्‍ट्रांसाठी विभागून दिलं होतं. कुठे गेल्या त्या दोन जगज्‍जेत्या सत्ता ? इंग्‍लंडच्‍या साम्राज्‍यावर एके काळी सूर्य मावळत नसे. आतां त्‍याला जगात कितीसं महत्त्व आहे ? महाबली कम्‍युनिस्‍ट यू.एस.एस.आर.चं विघटन आपण हल्‍ली हल्‍लीच पाहलं आहे. लांब कशाला जा, भारताकडेच पहा ना. एके काळी भारतीय वैदिक संस्‍कृती व बौद्ध संस्‍कृती दूरदेशांमध्यें पसरली होती , भारताच्‍या संपन्नतेची ख्‍याती जगभर दुमदुमत असे. तो काळ गेला, आपली अवनती झाली, आपण परतंत्र झालो. उन्नतीनंतर अवनती ही व्‍हायचीच .
 • उन्नत समाज सुखासीन होतो व अशा साम्राज्‍याला दास्‍यत्‍व येतें. दास्‍यत्‍व येतें तें, दुसरा समाज, अन्‍य संस्‍कृती, ह्या-सुखासीन-समाजापेक्षा अधिक प्रगत असतात म्‍हणून नव्‍हे तर ते अधिक प्रबळ, अधिक आक्रमक, अधिक लढाऊ असतात म्‍हणून . सुखासीन समाजाची लढायची झगडायची जिद्द संपलेली असते म्‍हणून त्‍याला दास्‍यत्‍व येते. अशा जितांच्‍या समाजावर ज्‍येत्‍यांचा समाज सर्व क्षेत्रांमध्‍ये श्रेष्‍ठत्‍व प्रस्‍थापित करू पाहतो. त्‍यामुळे जेते जितांवर अनेक प्रकारें दडपशाहीचा वापर करतात .
 • या नंतरच्‍या शक्‍यता तीन.

पहिली म्‍हणजे जितांचा समाज हळूहळू जेत्‍यांच्‍या समाजात विलीन होऊन जातो, सामाऊन जातो.

दुसरी म्‍हणजे जित व जेते मिळून एक नवीन समाज तयार होतो.

तिसरी शक्‍यता म्‍हणजे जितांवरील जेत्‍यांचे अत्‍याचार, त्‍यांची दडपशाही इतकी वाढत जाते की एक दिवस एक स्‍फुल्लिंग पडतो, एक ज्‍वाला उठते, झोपलेली मुर्दाड मनें जागी होऊन उठतात आणि ज्‍येत्‍यांचं जोखड झुगारून देऊन जितांचं पुनरुथ्‍थान होतं. लंबक दुसर्‍या बाजूला जाऊन झोका घेतो व अवनती थांबवून त्‍या संस्‍कृतीची, त्‍या समाजाची उन्नतीच्‍या पथावर पुन्हां नव्‍या जोमानें वाटचाल सुरू होते . मानसशास्‍त्रीय ‘अति-प्रतिपूरणा’च्‍या (ओव्‍हर-कंपेनसे) सिद्धान्‍ताप्रमाणें , अशी झोपेतून-जागी-झालेली मनें अधिकच जागृत होतात, त्‍यांच्‍यात तीव्र चेतना निर्माण होते व त्‍यामुळे ही संस्‍कृती वाढत्‍या वेगानें विकसित होते. मध्‍ययुगीन इंग्‍लंडनं फ्रेंचांचं वर्चस्‍व झुगारून देऊन अशीच उन्नती केली होती. शिवाजीनं ३०० वर्षांच्‍या परकीय सत्तेला आव्‍हान देऊन स्‍वराज्‍य निर्माण केल होतं.  आणि, १९४७ मध्‍ये भारताला राजकीय स्‍वातंत्र्य प्राप्‍त झालं होतं.

 

 • आपल्‍यावरचं परकियांचं आक्रमण असंच सुरू राहिलं , वाढत राहिलं , आपली गुलामगिरी अशीच चालूं राहिली व आपण आपल्‍या समाजाला अवनतीच्‍या मार्गावर पुढे पुढे नेत राहिलो तर, चक्रनेमिक्रमेण या न्‍यायानें आपलं त्‍यानंतर पुनरुथ्‍थान निश्र्चितच होईल ! म्‍हणून भारताला परतंत्रतेच्‍या मार्गावर नेणं हेंच अंतीं हितावह ठरणार आहे. पुढच्‍या पिढ्यांच्‍या प्रगतीसाठी आपण हा मार्ग जाणूनबुजून स्‍वीकारायलाच हवा, तेंच आपलं धोरण असायला हवं.
 • आपल्‍या विचारवंतांनी गुलामगिरी स्‍वीकारली आहे खरी, आपण आपलं बौद्धिक, औद्योगिक, आर्थिक व सांस्‍कृतिक स्‍वातंत्र्य घालवत आहोत हेंही खरं ; पण तुम्ही-आम्ही हें सारं निष्क्रियतेनं नुसतं बघत उभे नको राहूं या, आपण स्‍वतः होऊन या प्रक्रियेला चालना देऊ या. आपण जाणीवपूर्वक भारताला अधिकाधिक गुलामगिरीत लोटत गेलो तर नक्‍कीच आपण एक दिवस पुन्हां स्‍फुल्लिंग फुलवूं शकूं , पुन्‍हा नवचेतना जागवूं शककूं , भारताला पुन्हां उन्नतीपथावर अग्रेसर करूं शकूं , त्याचं  उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवूं शकूं.

 

 • आपल्‍यापुढे आता फक्‍त एकच मार्ग आहे, आणि तो हा –

स्‍वावलंबनाचे आता थांबवूं पवाडे

उघडू परकीयांसाठी आपुली कवाडें

घालू या पायघड्या, करूं या सलामी

पुरोगामित्त्वाच्‍या नावें करूं या गुलामी .

उतरेलच एके दिवशीं गुलामीची झिंग

मनी पुन्‍हा स्‍वातंत्र्याचे फुलतिल स्‍फुल्लिंग

मिळेल पुनरुत्थानाचा त्‍यामधुनी संदेश

त्‍यातूनच राहील उभा पुन्हां उन्नत देश .

म्‍हणून आम्‍हा स्‍वीकराया आगळी नीती हवी

उन्नतीसाठीच  आतां  अवनती हवी .

उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी उरलें एकमात्र तंत्र –

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र .

***

–—        – सुभाष स. नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*