नाना फडणवीस

#नाना फडणवीस यांच्या बद्दल ही थोडी आणखी .

– या आडनांवात ‘नवीस’ हा फारसी प्रत्यय आहे. फडनवीस चें कांहीं ठिकाणीं मराठीत फडणीस झालें.
– पेशावरून हें आडनांव पडलेलें आहे. जसें – चिटणीस ( चिट्ठीनवीस), वाकनीस, पोतनीस.
ही आणखी कांहीं आडनांवें : पागनीस, पारसनीस, सबनीस.
– नाना १४ व्या वर्षीं फडणवीस झालेले नाहींत. १७६१ च्या पानिपत लढाईच्या वेळी ते १९ वर्षांचे होतें. त्या काळात त्यांनी लिहिलेलें आत्मचरित्र, हें मराठीतील एक पुरातन आत्मचरित्र म्हणायला हरकत नाहीं.
– पानिपतानंतर सहाएक महिन्यांनी नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाला. माधवरावाला जरी पेशवा केले गेलें, तरी तो तसा अल्पवयून होता, व म्हणून त्याचे ‘पालकत्व’ राघोबाला मिळाले. पण राघोबाला स्वत: पेशवा व्हायचें होतें. त्यानंतरचें राजकारण कांहीं काळ चाललें. नंतर माधवरावानें राघोबाला कोपरगांव येथें नजरकैदेत ठेवले, व स्वत: पेशवेपदाचा कारभार हातात घेतला. नानांची फडणवीस म्हणून नियुक्ती ही त्यानंतरची घटना असणार. ( सनावळी पाहून त्याची खात्री करून घेता येईल). म्हणजेच, नानांना फडणविशीची वस्त्रें २२-२३ व्या वर्षीं मिळाली असणार.
# नाना फडणवीसांनी मराठी राज्य सांभाळलें , हें खरें आहे; विशेषकरून नारायणरावाच्या मृत्यूपासून ते सवाई माधवराव वयात येईतो. त्यानें आत्महत्या केली , किंवा त्याचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हांही नानाच कारभार बघत असत. लेखक ना.स. इनामदार यांनी नानांच्यावरील कादंबरीला योग्य नांव दिलें आहे – ‘शर्थीनें राज्य राखलें’.
#पण नानांना, महादाजी शिंदे यांना महत्वानें-मोठे होऊं द्यायचें नव्हतें. महादाजींना दिल्लीच्या मुघल पातशहानें जेव्हां ‘मुतालिक’ ही पदवी दिली, तेव्हां नानांनी आक्षेप घेतला, की ही पदवी पेशव्यांना मिळायला हवी. हा महादजींचा मोठेपणा की त्यांनी बादशहाकडून तसें करवून घेतलें. नंतर, नानांशी दिलजमाई करायला महादाजी पुण्याला आलेही होते, पण वानवडीला छावणीत त्यांचें निधन झालें.
#विजय तेंडुलकारांनी त्यांच्या नाटकात ‘नवकोट नाना’ असा उल्लेख केलेला आहे, तो बरोबर आहे. असा ऐतिहासिक उल्लेख आहे ( एक पत्र आहे) की, अमुक कामासाठी नानांना ५ कोटी रुपये दिले. ( अर्थात, ते त्यातील कांहीं इतरांना वाटणार होते असणार.) . पण, त्यांनी ‘माया’ केली , यावरून त्यांचें राजकीय महत्व कमी होत नाहीं.
# पण नानांचें मुख्य shortcoming हें आहे की, आपला खरा / मुख्य शत्रू इंग्रज हेच आहेत, ही गोष्ट एकतर त्यांना समजली तरी नाहीं, किंवा त्यांनी ती नजरेआड तरी केली. टिपू सुलतानाचे अवगुण काय असतील ते असोत, पण, इंग्रज आपले मुख्य वैरी आहेत, ही गोष्ट त्यांनें ओळखली होती, व म्हणून तो फ्रेंचांशी संधान बांधून होता. पण, मराठे, निझाम व इंग्रज यांनी मिळून टिपूचा विनाश केला. यात खरें तर, maximum नुकसान मराठ्यांचेंच झालें यात शंका नाहीं.
# आणि तरीही, नानांचें महत्व मराठी राज्यासाठी मुळीच कमी होत नाहीं. हें यावरूनच दिशून येतें की, नानांच्या निधनानंतर २-३ च वर्षांनी , म्हणजे १८०२-१८०३ ला दुसरा बाजीराव पेशवा यानें इंग्रजांशी करार केला; व अखेरीस १८१८ ला त्यानें पेन्शन घेऊन, पेशवाईच इंग्रजांच्या स्वाधीन केली.

– सुभाष स. नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*