टिप्पणी-२१०२१९ : मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख

(टिप्पणी-२१०२१९)

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख

(संदर्भ : ‘लोकसत्ता’ दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील लेख)

 

लोकसत्ताच्या लोकरंगमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे.

 

म्हणूनच, या लेखातील किती इंटरप्रेटेशन (अर्थनिष्पत्ती) योग्य वाटतें व किती नाहीं, ही चर्चा उपयुक्त ठरेल.

 

  • ‘कोई उम्मीद बर नहीं आती’

एखादी कविता/ शायरी लिहितांना काय परिस्थिती होती, आपले मनोव्यापार काय होते, ही बाब फक्त, आणि फक्त, कवी / शायरच जाणतो. त्यानें मौखिक किंवा लिखित स्वरूपात त्यासंबंधी कांहीं मांडलेलें असेल, तरच इतरेजन तें जाणूं शकतात. त्यानें तसें केलें नसल्यास, त्याबद्दल आपण , परिस्थीचा विचार करून, कयास बांधूं शकतो. गालिब यांचा बराच पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यात त्यांनी, अमुक शायरीच्या लेखनामागे काय भावना होती, काय प्रेरणा होती, असें लिहिलेलें आहे काय ? मी स्वत:ला मोठा जाणकार अजिबात मानत नाहीं. पण मी गालिबवर जें कांहीं थोडेंफार समीक्षात्मक लेखन वाचलेलें आहे, खासकरून हिंदीत, त्यावरून, गालिब यांनी या विशिष्ट शायरीलेखनाची पार्श्वभूमी लिहिलेली आहे, असें मला तरी प्रतीत झालें नाहीं. मात्र, गालिबचें जीवन पाहतां, हा उपरोल्लिखत विशिष्ट मत्ला लिहिण्यामागे काय पार्श्वभूमी होती-असणार याची कल्पना येते, आणि ती पार्श्वभूमी गुलजार यांनी कल्पिल्यापेक्षा भिन्न आहे .

 

गालिब यांच्या पुरख्यांना पेन्शन मिळत असे. तें पुढे आपल्याला चालूं राहील असें गालिब यांना वाटल्यास, ती अपेक्षा साहजिकच होती, असें म्हटलें पाहिजे. पण तें पेन्शन त्यांना प्राप्त झालें नव्हतें. म्हणून, त्यासाठी गालिब यांनी बराच काळ कलकत्याच्या कंपनी सरकारशी पत्रव्यवहार केला, फॉलो-अप केला. नबाबी संस्कृती, पेन्शनविणा गुजारा करणें कठीण होत होते, पण पेन्शनसाठीचे सारे प्रयत्न व्यर्थ जात होते (in vain).  अशा वेळीं ,पेन्शन मिळण्याच्या संदर्भात, गालिबना वाटलें होतें- असणार की , पेन्शन प्राप्त करून घेण्यांची ‘कोई उम्मीद बर नहीं आती । कोई सूरत नज़र नहीं आती।’

(अशा परिस्थितीत, त्यांच्या एका चाहत्यानें सुचवलें की पेन्शनसाठीचा फॉलो-अप गालिब यांनी कलकत्त्याला स्वत: जाऊन करावा. आणि, त्यानुसार गालिब कलकत्त्याला गेलेही होते ).

 

कर्जाची परतफेड ही मोठी गोष्ट खरी ; पण त्याबद्दल हा मत्ला नसून , त्यामागील जें मूळ कारण , म्हणजे पेन्शनचें मिळणें / न_मिळणें, या बाबीच्या विचारातून हा मत्ला लिहिला गेला, असें म्हणायला हरकत नसावी.

 

  • ‘काबा किस मुँह से जाओगे गालिब’

गुलजार यांच्या या लेखावरून असें दिसतें की , जणूंकांहीं, कर्जफेड करूं शकले नाहींत, म्हणून गालिबना स्वत:ची लाज वाटली, आणि त्यातून हा शेर निर्माण झाला.

 

मात्र, गालिबच्या शायरीतून त्यांचें जें व्यक्तिमत्व पुढें येतें, त्यावरून, अशा तात्कालिक कारणावरून त्यांनी हा शेर लिहिला असावा हें योग्य वाटत नाहीं.

 

  • खरें तर गालिब हे धार्मिक नव्हतेच. इतरत्रही त्यांनी म्हटलेलें आहे – ‘बंदगी में मेरा भला न हुआ’ । हे पश्चात्तापाचे बोल नसून वस्तुस्थितीचें वर्णन आहे, कारण बंदगी तर गालिब यांनी केलीच नव्हती. आणि या बोलांमध्ये एक दडलेला संदेश सुद्धा आहे की, ‘अरे मित्रा, बंदगीनें माझें भलें झालेलें नाहीं. हा माझा स्वानुभव आहे. तो ध्यानात घे, आणि जाणून घे की बंदगीनें — भक्ती करून — कुणाचेंच भलें झालेलें नाहीं. तुझेही होणार नाहीं’.
  • असें म्हटलें जातें की १८५७ च्या ‘गदर’नंतर, एका इंग्लिश फौजी अधिकार्‍यानें गालिब यांना त्यांचा धर्म काय तें विचारले. गालिब उत्तरले, ‘हुजूर, मी अर्धा मुसलमान आहे’. ‘तें कसं ?’, अधिकार्‍यानें पृच्छा केली. ‘ कारण मी हॅम (डुकराचें मांस) खात नाहीं, पण शराब मात्र पितो’, इति गालिब.

 

आपण मशिदीत जात नाहीं, शराब पितो, जुआ खेळतो, तथाकथित धर्म पाळत नाहीं, याबद्दल गालिब यांच्या मनात कसलीही ‘गिल्टी’ (अपराधी) भावना होती, असें प्रतीत होत नाहीं.

‘मैं न अच्छा हुआ बुरा न हुआ’ हा शेरचा मिसरा पहा ( मग तो भिन्न संदर्भात लिहिला गेला असेना कां ). ‘मैं बुरा न हुआ’, म्हणजेच मी बुरा नाहींये, असें गालिबनें स्पष्ट नोंदवलेलें आहे. त्यामुळे, गिल्टी भावनेचा प्रश्नच येत नाहीं.

 

‘शर्म तुझको मगर नहीं आती’ हे शब्द म्हणजे, गालिबनें स्वतचें केलेलें chiding नसून, तें, गालिब एकप्रकारच्या अलिप्तपणें, किंवा अभिमानानें,  सांगत आहेत. आजही नाहीं कां, आपण असे कांहीं लोक पाहतो, जे सहजपणें सांगतात, किंवा कधीकधी अभिमानानें सांगतात की, ‘मी मंदिरात जात नाहीं, मी रिच्युअल्स् (rituals, कर्मकांड) पाळत नाहीं, मी देवपूजा करत नाहीं, मी निरीश्वरवादी आहे, वगैरे वगैरे . तसेंच हें गालिबचें कथन .

 

गालिब हे पारंपरिक ‘धार्मिक’ कधीच नव्हते. त्यांचा हा एक शेर पहा.  त्यात काब्याचा उल्लेख वेगळ्या संदर्भात आहे. ( हा शेर व अर्थ – संदर्भ  – डॉ. विनय वाईकर यांचें ‘कलाम-ए-ग़ालिब’).

शेर असा –

‘काबे में जा रहा, तो न दो ताना, क्या कहीं

भूला हूँ हक़्क़-ए-सोहबत-ए-अहल-ए-कुनिश्त को ?’

( हक़्क – सत्य ; कुनिश्त – मंदिर ; अहल – लोक, माणसें  ; सोहबत – संगत, सोबत )

मी काब्याला निघालोय्, म्हणून मला टोमणे मारूं नका. (पूर्वी) जनांना मंदिरांची संगत होती (आपल्या लोकांसंगें मूर्तिपूजकांचा सहवास होता) हें सत्य मी विसरलेलो नाहीं.

 

कलकत्ता येथें पेन्शनच्या कामासाठी जातांना गालिब बनारसला पोचले. ते तिथल्या (हिंदू धार्मिक) वातावरणानें इतके खुश झाले की कांहीं आठवडे ते बनारसलाच राहले, आणि त्यांनी बनारसवर एक प्रदीर्घ मस्नवीही लिहिली. एक प्रकारची धर्मातीतताच ही.

 

त्यामुळे , गुलजार यांनी सुचवलेलें आहे तसें, ‘काबा किस मुँह से जाओगे गालिब’ हा शेर गालिबनें ‘लाज’ वाटून लिहिला, अपराधी भावनेनें लिहिला , हें योग्य वाटत नाहीं, तर त्यांनी तो अलिप्त भावनेनें, अथवा अभिमानानें, लिहिलेला आहे, हेंच खरें.

 

  • अभिमानाचा विषय आहे, तर गालिब यांच्या आयुष्यातील एका घटनेची चर्चा करणें योग्य ठरेल, जिचा उल्लेख गुलजार यांच्या लेखात आहे.

घटना थोडक्यात अशी की, गालिबना कॉलेजात नोकरी मिळत होती, ती त्यांनी ‘निव्वळ ईगोखातर’ (हे शब्द गुलजार यांच्या लेखातील ) स्वीकारली नाहीं.

 

या घटनेमागची कहाणी अशी आहे –

कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे  चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. गालिबना जरी नोकरीत per se रस नव्हता, तरी नाइलाजास्तव आर्थिक कारणांमुळे ते तयार झाले. (म्हणजेच, त्यांनी या विशिष्ट नोकरीबद्दल ईगो बाळगला नव्हता, हें स्पष्ट आहे). नोकरीच्या पहिल्या दिवशी गालिब जेव्हां कॉलेजात गेले, तेव्हां त्यांची अशी अपेक्षा होती की, शिरस्त्याप्रमाणें प्रिन्सिपॉल स्वत: बाहेर येऊन आपल्याला भेटतील. त्यांनी, आपण आल्याचा निरोप प्रिन्सिपॉलला धाडला, तर  प्रिन्सिपॉलचा उलटा निरोप आला की त्यांनी (प्रिन्सिपॉलनें) गालिबनाच आंत येऊन भेटायला सांगितलें आहे. हें ऐकल्यावर गालिब उलट्या पावलीं माघारी गेले. नंतर इतरत्र भेट झाल्यावर प्रिन्सिपॉलनें पृच्छा केली की, ‘तुम्ही माघारी कां गेलात ?’.  गालिब म्हणाले, ‘नेहमी जेंव्हां मी तुम्हाला भेटायला येत असे तेंव्हां तेंव्हां तुम्ही स्वत: बाहेर येऊन मला भेटून आंत घेऊन जात असा ; मात्र या प्रसंगी तुम्ही बाहेर न येतां मलाच आंत येण्यांचा निरोप धाडलात. तें कां ?’ प्रिन्सिपॉल उत्तरले, ‘नेहमी, एक आदरणीय व्यक्ती म्हणून, एक मोठे शायर म्हणून, तुम्ही येत होतात, त्यामुळे मी स्वत: बाहेर येऊन तुमचें स्वागत करीत असे ; पण या वेळीं तुम्ही माझे मुलाज़िम म्हणून आलेला होतात, तर मग मी बाहेर येऊन तुमचे स्वागत कसें करूं ? म्हणून मी तुम्हांलाच आंत बोलावलें’ . त्यावर गालिब म्हणाले, ‘मला वाटलें होतें की या नोकरीनें माझी इज्जत वाढेल. इथें तर माझी इज्जत कमी होते आहे, खत्म होते आहे, हें मला स्पष्ट दिसतेंय् . मग अशी नोकरी मी कशी स्वीकारूं ?’.

 

आपण हें ध्यानात घेणें आवश्यक आहे की, मिर्झा गालिब हे खानदानी गृहस्थ होते. ‘मिर्झा’ ही कांहीं साधी उपाधि (पदवी) नव्हे. मिर्झा म्हणजे मीरज़ा. मीर हा शब्द ‘अमीर’चें लघुरूप (शॉर्टफॉर्म) आहे, आणि त्याचा अर्थ आहे सरदार, अग्रगण्य व्यक्ती. मीरज़ा ही पदवी शाही खानदानाच्या व्यक्तींसाठी वापरत असत. राजपुत्रांना मीरज़ा ही पदवी वापरली जात असे. शिवकालीन इतिहासात आपल्याला मिर्झा (मीरज़ा) राजे जयसिंह दिसतात. त्यांना औरंगज़ेबानें मीरज़ा ही मानाची (honourific) पदवी दिलेली होती. यावरून राजा जयसिंहांचें दरबारातील महत्व आणि मोठेपण अधोरेखित होतें. अशी मीरज़ा ही सन्मानाची पदवी बाळगणारे गालिब. त्यांना शायर म्हणूनही गालिब मान मिळत असे. बादशहा बहादुरशाह ज़फर याच्या दरबारातील मुशायर्‍यात गालिब यांना सन्मानाचें निमंत्रण असे. पुढे, बादशहाचे शायरीचे उस्ताद इब्राहीम ज़ौक़ यांच्या निधनानंतर गालिब यांना बादशहानें आपले  उस्ताद बनवलें होतें. कॉलेजचे प्रिन्सिपॉलही स्वत: गालिब यांना मानाची वागणूक देत असत, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे.

 

या पार्श्वभूमीवर, गालिब माघारी गेले  या घटनेत, बाब गालिबच्या-अपेक्षेच्या योग्यायोग्यतेची नसून, चालीरीतींबद्दलच्या-त्यांच्या-समजुतींनुसार-असलेल्या-त्यांच्या-अपेक्षेची, आणि त्यांच्या याआधीच्या अनुभवाची, पूर्ती न झाल्यामुळेच, गालिब यांनी ही कृती केली, हें  समजून घेणें आवश्यक आहे. आपल्याला स्पष्ट दिसून येतें तें असें की, गालिबच्या दृष्टीनें आपल्या खानदानी इज्जतीला महत्व होते ; मिंधेपणा गालिबना नको होता. अर्थात्, ही बाब ईगोची नव्हती, वृथाभिमानाची नव्हती, तर खुद्दारीची होती, स्वाभिमानाची होती.

 

-यासाठी आपण शिवाजी महाराजांचें उदाहरण पाहूं या. शिवाजी राजे आग्रा दरबारित औरंगजेबापुढे गेले तेव्हांचा प्रसंग बघा. निघण्यांपूर्वी मिर्झा राजांनी शिवाजी राजांना वचन दिलेलें होतें.  पुढे, दक्खन ते आग्रा या प्रवासात शिवाजी राजांची खातिरदारी होत गेली. या सर्वांमुळें, आपल्याला आग्यात कशी वर्तणूक मिळेल याबद्दल शिवाजी राजांची कांहीं अपेक्षा होत्या. त्यांना सुरुंग लागला तो आग्रा येथें पोंचतांच. मिर्झा राजांचा पुत्र रामसिंह हा सवत: त्याच्या स्वागताला येऊं शकला नाहीं. त्याच्या मुन्शीनें राजांचा मुक्काम एका सरायमध्ये टाकवला. दुसर्‍या दिवशीही त्यांची व रामसिंह यची जवळजवळ चुकामूकच झाली. शेवटी रामसिंह त्यांना दीवान ए खास मधील दरबारात घेऊन गेला, कारण तोंवर दीवान ए आम मधील दरबार संपलेला होता. त्या दरबारामधील शिष्टाचारांची व नियमांची कोणतीही कल्पना शिवाजी राजांना  आधी दिली गेलेली नव्हती. परिणामीं, जेव्हां त्यांनी पाहिलें की त्यांना जसवंइतसिंहाच्या मागील रांगेत उभे केलें गेलें आहे , तेव्हां त्यांचा परा चढणें स्वभाविकच होतें , कारण जसवंतसिंहाचा त्यांनी पराभव केलेला होता. थोडक्यात काय, तर मिर्झा राजांनी देली कल्पना आणि मार्गातील प्रत्येक ठिकाणीं झालेलें त्यांचें  स्वागत यावरून, ‘आपलें दरबारात कसें स्वागत होईल’ त्याबद्दल शिवाजी राजांनी जी अटकळ बांधली होती, तिला संपूर्ण छेद गेला.  त्यामुळें शिवाजी राजांनी, दरबारात दिली गेलेली खिल्लत धुडकावून लावली.

इथल्या शिवाजी राजांच्या वर्तनाला काय म्हणायचें , कारण? तो प्रश्न ईगोचा नव्हता, तर अपेक्षांचा होता.

तेंच गालिब यांच्या कॉलेजसंबंधी वर्तनाबद्दल म्हणतां येईल.

 

-वेगळ्या कारणासाठी कां असेना, पण अशा प्रकारची वर्तणूक मीही पाहिलेली आहे. कॉरपोरेट क्षेत्रातले एक गृहस्थ जर म्युच्युअली अपॉइंटमेंट ठरवून कुणाला भेटायला गेले, आणि ती दुसरी व्यक्ती त्या ठरलेल्या वेळीं तिथें हजर नसली, (आणि , खास करून, स्वत:च्या  absence बद्दल, अनुपस्थितीबद्दल, त्या दुसर्‍यानें कांहीं निरोपही ठेवलेला नसला), तर तें या गृहस्थांना अजिबात पसंत पडत नसे, आवडत नसे , (आणि ती भावना योग्यच आहे) . तरीही ते गृहस्थ कांहीं काळ त्या दुसर्‍या व्यक्तीसाठी थांबत , पण जर २५-३० मिनिटांमध्येसुद्धा जर ती दुसरी व्यक्ती आली नाहीं, तर ते गृहस्थ सरळ माघारी निघून जात.

अहो, हा प्रश्न ईगोचा नाहींच, तर तत्वाचा आहे. गालिबचें कॉलेजच्या नोकरीच्या संदर्भात तसेंच झालें. त्याबद्दल त्यांना व़ृथा दोष देणें योग्य नव्हे.

 

-जो कुणी माणूस स्वत: अशा प्रकारच्या प्रसंगातून गेलेला असेल, जिथें त्यानें स्वाभिमानाला अधिक महत्व महत्व दिलेलें असेल, अशा माणसाला हा मुद्दा लगेच पटेल ; इतरांना तो विचारान्तीं पटेल.

 

  • शेर – ‘ग़मे हस्ती का असद’  –

गुलजार यांनी आपल्या लेखाच्या अखेरीस हा शेर दिलेला आहे; खरें तर या शेरनेंच त्यांनी लेखाचा शेवट केलेला आहे. याची पार्श्वभूमी गुलजार जोडतात ती , गालिब यांचे अमाप कर्ज, तें  फेडतां येण्यांची अक्षमता, आणि त्या सर्वांबद्दल गालिबना झालेला पश्चात्ताप, या गोष्टींशी.

 

इथें आपण हें ध्यानांत घेणें गरजेचें आहे, की गुलजार ज्या परिस्थितीचा संदर्भ देत आहेत, ती गालिबच्या उत्तरायुष्यातली आहे.

 

आतां आपण पाहूं या , त्या परिस्थितीचा या विशिष्ट शेरशी संबंध कां जोडतां येत नाहीं, तें.

 

गालिब यांचें खरें नांव होतें ‘असदुल्लाह्खान’. सुरुवातीला ते ‘असद’ हा तखल्लुस (pen-name, काव्यासाठी घेतलेलें टोपण-नांव) वापरत असत. नंतर, वयाच्या साधारण १८व्या वर्षापासून त्यांनी ‘गालिब’ हा तखल्लुस वापरायला सुरुवात केली.

 

ध्यानात घ्या, अनेक वर्षें ‘गालिब’ हा तखल्लुस वापरून प्रसिद्ध झाल्यानंतर, आयुष्याच्या उत्तरार्धात गालिब आपल्या अनेक वर्षांपूर्वीचा जुना , ‘असद’ हा तखल्लुस कां वापरतील ? म्हणून हें उघड आहे की, हा शेर गालिब यांनी आयुष्याच्या पूर्वार्धातच (खरें तर, लहान वयातच) लिहिलेला आहे, उत्तरायुष्यात नव्हे.

 

म्हणजेच, इथें त्याचा संदर्भ योग्य नाहीं.

 

  • समारोप व निष्कर्ष –

-खरें तर, गालिब नबाबी-संस्कृतीचे असल्यानें, ‘आपण अशा प्रकारेंच रहायचें असतें ’ हीच त्यांची भावना होती, मनोवृत्ती होती. नाहींतर त्यांनी कधीच नोकरी पकडली असती ;  ‘ पेन्शन मिळणें हा आपला अधिकार आहे ’ असें वाटून ते पेन्शन मिळण्यांसाठी दीर्घकाळ खटपट करत बसले नसते .

गालिबचे समकालीन शायर आणि गालिबचे दोस्त मोमिन हेही असेच नबाब होते की ! नंतरच्या काळातही गालिब यांनी जी असाइनमेंट (कामगिरी) स्वीकारली , ती होती बादशहा जफरच्या उस्तादाची, काव्य-गुरुची ; दुसरी कसली नाहीं.

 

-एकीकडे, गालिब हें एक ‘फक्कड’ व्यक्तिमत्व होतें व त्यामुळे त्यांना मनी-मॅनेजमेंट, कर्ज वगैरे बाबींची खास फिकीर नव्हती. ते शराब नेहमीच पीत असत, त्यांना जुआ खेळण्याबद्दल सज़ाही झाली होती. पण त्याचा त्यांना पश्चात्ताप झालेला दिसत नाहीं.

 

-दुसरीकडे, गालिब हें एक सूफीवादानें प्रभावित व्यक्तिमत्व होतें, त्यामुळेंच त्यांच्या काव्यात दार्शनिकता पदोपदी झळकते, अणि याचाही रोजमर्राच्या जीवनात असा परिणाम होई की त्यांचें  डे-टु-डे बाबींकडे खास लक्ष नसे.

 

-‘ग़ालिबे खस्ता के बग़ैर कौन से काम बंद हैं ? रोइये ज़ार ज़ार क्या , कीजिये हाय हाय क्यों ?’

(खस्ता – दुर्दशाग्रस्त ),  हा शेर गालिबची जीवनविषयक फिलॉसॉफी (तत्वज्ञान) विशद करतो.

‘ कशाला रडायचें , कशाला “हाय हाय !” करायचें ’ , हीच त्यांची मनोवृत्ती होती.

 

गालिबना स्वत:च्या परिस्थितीची लाज वाटली, त्यांना पश्चात्ताप झाला, त्यांच्या मनात आपल्या परिस्थितीबद्दल अपराधी भावना (गिल्ट) होती, अशा प्रकारचे उल्लेख गुलजार यांच्या लेखात वेळोवेळी आलेले आहेत. ते यामुळेच योग्य वाटत नाहींत.

 

  • अखेरीस –

गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल  योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा.

 

– – –

 

IITian  सुभाष स. नाईक ,    मुंबई.

मोबाईल : ९८६९००२१२६ , ९०२९०५५६०३.

ईमेल : vistainfin@yahoo.co.in

वेबसाईट : www.subhashsnaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*