गीता, गॉड्, आणि आनुषंगिक कांहीं गवसलेलें

प्रास्ताविक –

भगवद्.गीतेच्या अनुषंगानें, “माणसाच्या मनाची संभ्रमित अवस्था , आणि त्या अवस्थेत असतांना, आतां यापुढें मी काय करावें हा त्याच्यापुढील प्रश्न” , असें माझ्या एका आप्तानें धाडलेलें वैचारिक टिपण वाचून,  मी स्वत: या विषयावर विचार करायला प्रवृत्त झालो. तो हा माझा वैचारिक प्रवास –

भाग – १

 • भगवद्गीत

भगवद्गीतेबद्दल , ‘सर्वोपनिषदो गावौ दोग्धा गोपालनंदन:’ असें म्हटलेलें आहे. अर्थात्, सगळ्या उपनिषदांचें सार गीतेत आहे.

आतां, मौज अशी आहे की, सगळी उपनिषदें, सगळी दर्शनें कांहीं एकच गोष्ट (The Same Thing) सांगत नाहींत. म्हणजे काय, तर, ज्याअर्थी गीतेत सगळ्यांचें सार आहे, त्याअर्थीं, गीतेत अगदी पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या श्लोकापासून ते अठराव्या अध्यायाच्या, ‘यत्र योगेश्वरो कृष्ण: यत्र पार्थो धनुर्धर: ….’ या अखेरच्या श्लोकापर्यंत, सर्वत्र, एकच एक ( the same) सूत्र आहे काय ? तर, तसें नाहीं.

याचें कारण काय ?

 • गीता हा महाभारताचा एक भाग आहे. महाभारत हें जय (८८०० श्लोक) — भारत ( २४००० श्लोक ) — महाभारत ( एक लाख श्लोक ) , अशा प्रकारें वाढत गेलेलें आहे. नंतरच्या-काळात जेव्हां सूत आणि सौती नैमिषारण्यात शौनकादि ऋषींसमोर महाभारतकथन करतात, तेव्हां त्यांनी आपापला कांहीं वाढीव भाग घातला होता-असणारच. ज्याप्रकारें भाट-चारण-शाहीर-हरबोले गाऊन सांगतांना कथानकात पदरची मीठमिरची घालतातच, तसेंच या कथावर्णन-निरूपण-प्रवचन-कीर्तन करणार्‍या, सूत, पुराणिक, प्रवचनकार, कीर्तनकार या सर्वांचेंही.

-गेल्या कांहीं हजार वर्षांच्या काळात, महाभारतात आजवर बरीच addition झालेली आहे, बदल झालेले आहेत, प्रक्षेप आलेले आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या टीमनें ४० वर्षें मेहनत करून जी ‘क्रिटिकल एडिशन’ काढली, त्यायोगें त्यांनी केवळ इ.स. ९००-१००० नंतरचे क्षेपकच काढलेले आहेत. म्हणजेंच, अजूनही महाभारताच्या प्रतींमध्ये त्याआधीच्या अनेकानेक शतकांमधील क्षेपक तसेच शिल्लक आहेत.

 • महाभारताबद्दल ही चर्चा कां ? तर, गीता ही महाभारताचा एक भाग आहे. जर महाभारतात इतके बदल झाले, तर त्याचा अर्थ हा स्पष्ट आहे की, गीतेतही असेच बदल घडलेले आहेत.

-सांख्य आणि योग ही ’नास्तिकदर्शनें’ आहेत (इथें, नास्तिक म्हणजे, वेदप्रामाण्य न मानणारी). वेदप्रामाण्य न मानणारी, म्हणजेच कालानुक्रमें, वेद-ब्राह्मण_ग्रंथ-आरण्यकें-बरीचशी_उपनिषदें  यांच्यानंतरच्या कालातील ती आहेत. हें स्पष्ट आहे की, सांख्य व योग या नंतरच्या काळातील ‘दर्शनां’च्या तत्वज्ञानाचा वापर गीतेत केला गेलेला आहे. ( ‘सांख्यबुद्धी अशी जाण,  कती योगबुद्धि तूं ’ – गीताई.) गीतेच्या दुसर्‍या अध्यायाचें नांवच आहे – ‘सांख्ययोग’. परत, प्रत्येक अध्यायाच्या नांवात ‘योग’ हा शब्द आहेच . म्हणजेंच, गीतेचा हा, सांख्य व योगाशी संबंधित भाग (तसेंच, अध्यायांचें ‘योग’ असें नामकरण ) पश्चातकालीन आहे.

 • अठराव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, संजय स्वत: धृतराष्ट्राला संगतो की, ‘ज्या पक्षात कृष्ण आणि अर्जुन आहेत, त्या(च) पक्षाला विजय , राज्यलक्ष्मी इत्यादि प्राप्त होणार आहेत’. कौरवांचा अधिकृत ‘बातमीदार’ युद्धाआधीच, कुणाचा विजय होणार, तें सांगतो आहे, व तेंही कौरवांचा पिता, व हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याला !

( त्यावर धृतराष्टाची प्रतिक्रिया काय , याचा उल्लेख नाहीं. गीता तर संजय-उवाच मधील या श्लोकानें संपतेच. इतरत्रही संजयाच्या कथनावर धृतराष्ट्राची प्रतिक्रिया दिलेली दिसत नाहीं. म्हणजे, संजयाची ‘भविष्यवाणी’ धृतराष्ट्राला मान्य होती काय ? तसें नसतें तर, ‘काय बोलतोस! तूं कुणाच्या बाजूनें आहेस?’ असें कांहींतरी धृतराष्ट्र म्हटल्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेख महाभारतात कुठेंतरी यायला हवा होता. असो).

-मूळ मुद्दा हा की, युद्ध सुरूं होण्यांपूर्वीच कौरवांचा बातमीदार संजय पांडवांच्या विजयाची हमी देतो आहे , याचा अर्थच असा की गीतेचा (व महाभारताचा) तो भाग नंतरच्या काळात समाविष्ट करण्यांत आलेला आहे. (‘जय नाम इतिहासो अयम्’ असें सांगून, इतिहास लिहिणार्‍या व्यासांनी तर स्वत: अशा प्रकारचें ‘भविष्य-कथन’ आपल्या रचनेत समाविष्ट केलेंच नसतें).

 

 • म्हणजे, भिन्न भिन्न काळात गीतेच्या भिन्न भिन्न भागांची रचना झालेली असल्यामुळेच, गीतेतला श्रीकृष्ण कुठे एका बाबीवर जोर देतांना दिसतो, तर कुठे दुसर्‍या .

-उदाहरणार्थ, एकदा तो, अर्जुनाला कर्मप्रवुत्त करण्यासाठी, त्याच्या ‘युद्धकर्माचें कर्माचें फल काय होऊं शकेल’ हें दाखवतो ( ‘हतो वा प्रास्यसि स्वर्गम् जितो वा भोज्यसे महीम् ’ ) , तर अन्यत्र तोच कृष्ण ( ‘कर्मण्ये वाऽधिकारस्ते मा फलेषु कदाचन ’ असा ) निष्काम कर्माचा उपदेश करतो.

(याचा उल्लेख पुढेंही येणार आहे).

 

 • अर्जुनाचा विषाद, व द्विधा मनस्थिती –
 • ही खरें तर अर्जुनाची संभ्रमित अवस्था आहे (indecision) , ती नकारात्मक विचारधारा नाहींच. असे कांहींही झालेलें नव्हतें की जें अकल्पित होतें ; युद्ध होणार हें कांहीं कालापूर्वीच ठरून गेलें होतें. असें कांहींही घडलेलें नव्हतें की ज्यामुळे अपयश येऊन अर्जुनाचा ‘भ्रमाचा भोपळा’ फुटलेला आहे, व तो निराश झालेला आहे. अर्जुनाच्या विषादाचें, संभ्रमाचें खरें कारण आंतरिक आहे, आणि तें म्हणजे, त्याचा विचारीपणा , त्याचें ज्येष्ठांवरचें प्रेम , त्याची sensitivity . सारेच पांडव आपल्या ज्येष्ठांसमोर युद्धाला ठाकले होते, पण अर्जुनासारखा कोणां अन्याचा संभ्रम गीतेत वा महाभारतात वर्णलेला नाहीं. भीमाला तर, त्याची वृत्ती पाहतां, असा विषाद होणें शक्यच नव्हतें. अगदी ‘धर्मराज’ म्हणवणार्‍या युधिष्ठिरालाही युद्धापूर्वी असा विषाद झाल्याचें वर्णन नाहीं. (युधिष्ठिराचा विषाद आहे , तो युद्धानंतरचा, त्यातील जीवितहानि पाहिल्यावरचा).

 

 • कृष्णानें स्वत:होऊन अर्जुनाचा रथ भीष्म-द्रोणांसमोर उभा केलेला नाहीं, तर अर्जुनानेंच त्याला आपला रथ कौरवापुढे उभा करायला सांगितलें होतें. (कृष्ण जरी अर्जुनाचा परममित्र असला, तरी इथें तो त्याचा सारथी होता. सारथ्यानें काय करावें आणि काय करूं नये, त्याचे नियम असत, संकेत असत, व ते सर्वांना माहीत असत. त्यामुळे, अर्जुनानें सांगितल्याखेरीज ‘कृष्ण हा सारथी’ रथ कुठेही नेऊं शकला नसता. असो ). त्यासमयीं आपल्या ज्येष्ठांना समोर पाहून, नंतरच मग, विचारी अर्जुनाची मनस्थिती संभ्रमित झाली होती.

 

 

 • { टीप – मला स्वत:ला तरी असें वाटतें की , कौरवांसमोर रथ उभा केल्यावर तिथें कृष्णानें अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली, ही घटना [फक्त प्रत्यक्ष घटनाच, म्हणजे खासकरून तें स्थान ] , ही कविकल्पना आहे. अर्जुन संभ्रमित व व्यथित झाल्यावर, त्यानें कृष्णाला, रथ बाजूला घेऊन जायला सांगितलें नसतें काय? आणि, सारथी म्हणुन कृष्ण तसें करायला बाध्य होता ;  नंतर, बाजूला गेल्यावर, भले तर त्यानें अर्जुनाची कशीही समजून काढली असती. दुसरें म्हणजे, लढायला सिद्ध कौरव आणि पांडव, शेकडो श्लोकांची गीता सांगून होईतो स्वस्थ बसले असते काय ? पांडवांचा सेनापती होता धृष्टद्युम्न (अर्जुन नव्हे). त्यानें युद्ध सुरूं करण्यांचा हुकूम नसता कां दिला ? बरें , अर्जुनाशिवाय युद्ध झालेंच नसतें असें थोडेंच आहे ? बलशाली भीम होताच की !

 

तेव्हां, असें घडलें असावें की, प्रत्यक्ष युद्धारंभाच्या अगदी-आधी (just-before) हा प्रसंग घडला नसावा, तर हा, कांहीं काळ आधी युद्धभूमीवर घडला असावा, अथवा, बहुधा युद्धापूर्वीच्या संध्याकाळीं (on the eve of the war) पांडवांच्या शिबिरात (छावणीत) घडला असावा.

गीतेतील Basic प्रसंग खरा असला तरी, हें ध्यानात घेणे गरजेचें आहे की, त्याचें वर्णन संजयानें धृतराष्ट्राला केलेलें आहे, नंतर व्यासांनी त्याची काव्यरूपात रचना केली, व त्यानंतर त्या काव्यात भर पडत पडत गेली, ती वैशंपायन-सूत-सौती व इतरांकडून.

[ असे, मुख्य-भर घालणारे, किमान 3, ४ ते ५ जण तरी आहेत, असें अभ्यासू-जन म्हणतात. उदा. ‘मूळ गीतेचा शोध’ या पुस्तकात ग.श्री. खेर म्हणतात की, गीतेचे ३ लेखक होते. म्हणजे, अर्थातच, महाभारताचेही (त्यांच्या सूत्राप्रमाणें ३ लेखक होते-असणार). एम्. आर्. यार्दी त्यांच्या ‘The Mahabharata – Its Genesis & Growth’ या पुस्तकात म्हणतात की महाभारताचे — (म्हणजेच पर्यायानें गीतेचेही) — ५ लेखक होते ]. त्यामुळे, कांहीं-काळ-आधी-घडलेला प्रसंग युद्धाच्या justआधी-घडलेला दाखविला गेला असावा. प्रत्यक्ष युद्धापूर्वी असो, किंवा कांहीं काळ आधी युद्ध-भूमीवर असो, किंवा त्याहीआधी छावणीत घडलेला असो, त्यानें मूळ घटनेला बाधा पोचत नाहीं. कुठलीही वेळ घ्या, कौरव-भीष्म-द्रोण हे पांडवांच्या पुढ्यात (वाच्यार्थानें किंवा लक्ष्यार्थानें) युद्धासाठी उभे ठाकलेले होतेच की !

असो, ही घटनेबद्दल चर्चा झाली. पुढे आपण गीतेतील contents वर नजर टाकूं . }

 

 • आपल्या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी, गुरुजनांनी, आपल्याला बालपणापासून वाढतांना पाहिलें असतें, आपल्यावर प्रेम केलेलें असतें, आपल्याला शिकवलेलें असतें, आपल्याला जवळ घेतलेलें असतें, आपलें कौतुक केलेलें असतें. बापाविणा_असलेली_पोरें म्हणून भीष्मांचें पांडवांवर प्रेम होतेंच. नाहींतर, ते पांडवाना , आपल्या स्वत:विरुद्ध जिंकण्यांसाठी  शिखंडीचा उपाय ना सुचवते. यात आपला मृत्यू ओढवणार आहे हें न कळण्याएवढे भीष्म दूधखुळे नव्हते. तरीही त्यांनी, स्वत: कौरवांचे सेनापती असूनही, पांडवांना हा मार्ग दाखवला. असे भीष्म ! द्रोणांचे अर्जुनावर इतकें प्रेम की, त्यांनी अर्जुनाला बर्‍याच कांहीं जास्तीच्या_गोष्टी शिकवल्या की जें ज्ञान त्यांनी (स्वत:चा पुत्र अश्वत्थामा याच्याव्यतिरिक्त) इतरांना शिकवलें नाहीं. एकलव्यानें जरी द्रोणांना गुरू मानलें होतें, तरी खरें तर द्रोणांनी त्याला प्रत्यक्ष शिकवलेलेंच नव्हतें, त्यांनी तर एकलव्य हा निषाद आहे म्हणून त्याला शिकवण्यांस नकार दिलेला होता. तरीही त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ या गोंडस नांवाखाली एकलव्याचा उजवा अंगठा कापून घेतला. या गोष्टीनें आपली नाचक्की होईल ही कल्पना द्रोणांना आलेली असणारच ; आणि तरीही त्यांनी हें कृत्य केलें. कां की, अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असावा-रहावा, त्याला कोणी प्रतिस्पर्धी राहूं नये. हें त्यांचें अर्जुनावरचें गुरुप्रेम !

-अर्जुन हें सर्व जाणून होता. तो सुशिक्षित, विचारी होता, सुजाण होता, सज्जन होता,  ‘भलामानस’ होता. ‘आपल्यावर आयुष्यभर प्रेम केलेल्या ज्येष्ठांना कसें मारायचें हा प्रश्न त्यालाच काय पण कोणाही सभ्य माणसाला पडलाच असता. (अर्जुनाची कांहीं वचनें अशी आहेत – कल्याण न दिसे युद्धीं स्व-जनांस वधूनिया, ‘आम्ही स्व-जन मारूनी सुखी व्हावें कसें बरें?’ – गीताई).

 • श्रीकृष्ण हा राजनीतीज्ञ होता. अशा eleventh hour ला अर्जुनानें अशा प्रकारें वागणें हें पांडवांच्या पराभवाचें कारण बनेल हें त्यानें ओळखलें होतें. म्हणून त्यानें अर्जुनाला क्षत्रियाचें कर्तव्य सांगितलें व युद्धाला प्रवृत्त केलें. (त्यामुळेंच, लोकमान्य टिळक हे, ‘गीतेत कर्मयोग सांगितलेला आहे’, असे म्हणालेले आहेत ).

-कृष्णाच्या या प्रकारच्या उपदेशाचें सार थोडक्यात सांगतां येतें , आणि तें (वर उल्लेख केल्याप्रमाणें) असें – ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जितो वा भोज्यसे महीम्’. क्षत्रिय म्हणून लढणें कसें आवश्यक आहे, तें कसें अर्जुनाचें कर्तव्य आहे, व लढण्यांचे alternative परिणाम काय असणार , हें त्यानें अर्जुनाला दाखवून दिलें, व त्याला कर्तव्यच्युत होण्यांपासून परावृत्त केलें. ही खरी मूळ गीता.

 

 • गीतेचा जो भाग नंतर समाविष्ट केलेला दिसतो, तिथें श्रीकृष्ण अगदी वेगळा approach घेतो.

तिथें तो सद्गुण-अवगुणांची चर्चा करतो, ( ‘कामक्रोध: तथा लोभ: तस्मादेतद् त्रयं त्यजेत्’ ) ; निष्काम कर्माचा उपदेश देतो ( वर उल्लिखित , ‘कर्मण्ये वाऽधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ ) ;  विश्वरूपदर्शन घडवतो (अध्याय अकरावा) ; दार्शनिक चर्चा करतो ( ‘ऊर्ध्वमूलं अध:शाखं अश्वत्थं प्राहुरव्यमं’ ) ; सगुणभक्तीचें वर्णन करतो (अध्याय बारावा) ; मी अवतार आहे व मी तो कां धारण केला आहे तें सांगतो ( ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ ) ; ‘मला(च) शरण जा’ असें अर्जुनाला सांगतो ( ‘मामेकं शरणं व्रज’ ). दहाव्या व अकराव्या अध्यायात ( विभूतियोग व विश्वरूपदर्शनयोग) अर्जुन कृष्णाला ‘परब्रह्म’, ‘अविनाशी’ असें संबोधतो ; व कृष्णही स्वत:ला ‘सर्व भूतांच्या ठायीं असलेला आत्मा’ म्हणतो, ‘सर्व भूतांचा आदि-मध्य-अंतही मीच’ असें सांगतो, म्हणजेच ‘मी परमात्मा आहे’ असें म्हणतो , म्हणजेच ‘मी ब्रह्म आहे (निर्गुण) असेंही तो म्हणतो.

{ जातां जातां – अवतारांची कल्पना भारतीत साहित्यात फार पहिल्यापासून आहे. पुरातनकालीं २२ अवतार मानले गेलेले आहेत. अर्थात्, हें सर्व वेदकालानंतरचें आहे, कारण वेदकालातील दैवतांचें ‘अवतारीकरण’ होण्यांला scope नव्हता. मात्र, कृष्ण जेव्हां ‘मी अवतार आहे, किंवा मी अवतार घेतो, असें म्हणतो , तेव्हां हे ‘अवतार’ म्हणजे विष्णूचे अवतार आहेत. विष्णूचे दैवतीकरण आणि त्यानंतर त्याच्या अवतारांची कल्पना, या नंतरच्या काळातील बाबी आहेत. यावरूनही महाभारत आणि पर्यायानें गीता यांच्यात काळाच्या ओघात भर पडत गेली, हें दिसून येतें. ( ‘दशावतारां’मध्ये तर गौतम बुद्धालाही अवतार मानलेलें आहे.  यावरून या संकल्पेच्या काळाची कांहींशी कल्पना येऊं शकेल) }.

 

 • कृष्ण, जो अर्जुनाचा सखा होता, त्यानें वेळोवेळी अर्जुनाला व पांडवांना मदत केली, सल्ले दिले, उपदेशही केला ; पण, ‘मामेकं शरणं व्रज’ असें इतर समयीं म्हटलेलें नाहीं.

म्हणजेच, ‘मी अवतार आहे, मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे’ हें तत्वज्ञान प्रत्यक्ष कृष्णाचें नसून, तो विशिष्ट भाग ज्या लेखकानें गीतेत समाविष्ट केला, त्या व्यक्तीचें आहे.

(अर्थात् , तें कुणी सादर केलें यावरून मूळ तत्वज्ञानात फरक पडत नाहीं; मात्र,

कुणी तें सादर केलें यारून त्याचें महत्व नक्कीच ठरत असतें.) त्यामुळेंच, ‘तें गीतेत

श्रीकृष्णानें सांगितलेलें तत्वज्ञान आहे’, असें म्हटल्यावर, वाचक त्याच्याकडे अधिक सजगतेनें, अधिक seriously पहायला लागतो.

 

 • थोडक्यात काय , (गीतेनुसार) , अर्जुन स्वत:होऊन कृष्णाला शरण गेलेला नाहीं ; तर, ‘मला शरण जा’ असें कृष्णानें त्याला म्हटलेलें आहे.

( प्रश्न : कृष्णानें समजावल्यावर अर्जुन युद्धाला तयार झाला, व लढलाही; मात्र, त्याचा अर्थ, ‘तो कृष्णाला शरण गेला’, असा काढावा कां ? )

 • कृष्णार्जुनांचें नातें –
 • भाऊ – प्रत्यक्ष नातें म्हणाल तर, अर्जुन हा कृष्णाचा आतेभाऊ होता. मात्र, द्रौपदी-स्वयंवरापूर्वी कृष्णाची अर्जुनाची ओळखही नव्हती. तत्पूर्वी कृष्णानें पांडवांना पाहिलेंही नव्हतें. पण ओळख झाली आणि कृष्णार्जुनांचे सूर जुळले, ते मित्र बनले, परममित्र बनले.
 • मित्र – कृष्ण अर्जुनाचा सखा होता एवढेंच नव्हे तर, ते दोघे ‘bosom pals’ होते, जिवश्चकंठश्च मित्र होते. (माझ्या वाचनात आलेलें आहे, त्याप्रमाणें – ) महाभारतात असें वर्णन आहे की, ‘एके संध्याकाळी कृष्ण व अर्जुनाची हास्य-विनोद करत दिलखुलास बैठक चालली होती, त्यांच्या बायकाही समवेत होत्या. इतकी relaxed व दिलखुलास मैफल जमली होती की, कृष्णानें त्याचे पाय द्रौपदीच्या अंकावर (मांडीवर) ठेवलेले होते आणि अर्जुनानें त्याचे रुक्मिणीच्या मांडीवर’. (इथें मला कोणाचाही अधिक्षेप करायचा नाहींये, अथवा कसलाही गैरअर्थही काढायचा नाहींये). म्हणजे, हा मैत्रीसंबंध इतका आंतरिक, इतका प्रचंड-जवळचा  होता की, असें बसण्यांत न त्यांना कांहीं गैर वाटलें न त्यांच्या पत्नींनाही.
 • गुरु – ‘मी तुझा गुरु आहे’ असें कृष्ण अर्जुनाला स्पष्टपणें गीतेत म्हणत नाहीं. खरें तर, तो ‘गुरु’चा तृतीय-पुरुषी उल्लेख करतो. ( अध्याय १७, श्लोक १४ – देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं —’ ).

(( तर मग, इथें गुरुची चर्चा कशाला ? तर, तें आपण नंतर पाहूंच )).

*भारतीय तत्वज्ञानात गुरु आणि ब्रह्म यांचें अभिन्नत्व ( both being one & the same) वर्णलेलें आहे. जसें की –

 • गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:

गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।

(ब्रह्मा- ब्रह्मदेव)

 • त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु: सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव

(द्रविणं – संपदा )

(विद्येचा उल्लेख आला, म्हणजेंच विद्यादाता गुरुचाही उल्लेख अध्याहृत आहेच).

 

त्यामुळे, कृष्णानें जरी गीतेत, ‘मी तुझा गुरु आहे’ असें उघडपणें म्हटलेलें नाहीं. तरी जेव्हां तो, ‘मी ब्रह्म आहे’ असें म्हणतो, तेव्हां हें गुरुपण त्यात अध्याहृत आहेच.

 

 • God, ईश्वर, ब्रह्म

(‘गॉड्’ हा शब्द इथें हेतुत: वापरलेला आहे. भारतीय शब्दांना धार्मिक, पारमार्थिक, पारंपारिक connotations असतात, कांहीं अर्थ चिकटलेला असतो, कांही काळानुरूप संदर्भ असतात. तें टाळण्यांसाठी इंग्लिश शब्दयोजना केलेली आहे. त्याबद्दल आणखी, नंतरच्या परिच्छेदात ).

कृष्णानें स्वत:बद्दल , किंवा कृष्णाबद्दल अर्जुनानें  व संजयानें , ईश्वर, अवतार, ब्रह्म , परमब्रह्म, परमात्मा, इत्यादी शब्द योजलेले आहेत.

‘मी ब्रह्म आहे’ असें कृष्ण म्हणतो. अर्जुनही तसा उल्लेख करतो, म्हणजे ( गीतेनुसार) अर्जुनाला  कृष्णाचे हें ब्रह्मत्व मान्य आहे असें दिसतें.

 

 • कृष्णाचें अर्जुनाशी नातें complex & multidimensional , बहुआयामी आहे.

**

 

भाग – २

 

२ – अ            

 • गॉड् : देव ;  ईश-ईश्वर-अवतार-परमेश्वर ;  ब्रह्म-परब्रह्म-परमतत्व  –

देव , ईश्वर, ब्रह्म या संकल्पना एकच आहेत (the same) की भिन्न, असा एक तात्विक प्रश्न चर्चेसाठी उठतो. म्हणून आपण येथें ‘गॉड्’ हा शब्द हेतुत: योजला आहे. देव, ईश्वर, ब्रह्म या कशालाही — वेगवेगळेंपणें अथवा एकत्रितपणे (separately or together)  — आपण ‘गॉड्’ म्हणून संबोधूं शकतो. ( कारण इंग्रजीत, आणि पाश्चिमात्य ख्रिस्ती संस्कृतीत, देव, ईश, ब्रह्म, असा भिन्न भिन्न संकल्पना नाहींतच मुळी ).

 • देव :
 • ‘देव’ हा शब्द वेदकाळापासून चालत आलेला आहे. आर्ष-संस्कृतला ‘देववाणी’ म्हणत असत. देव हें वेदकालीन जमातीचें ( clan ) नांव आहे ( जसें की ‘असुर’ हेंही). [ तें जर तसें clan शी संबंधित नसतें, तर अवेस्तानें ‘देव’ला चोर इ. Derogatory नांवें ठेवली नसती ]. वेदकालीन ‘देव’ (दैवतें) म्हणजे इंद्र, मित्र (सूर्य), वरुण, मरुत् , अश्विनीकुमार, वगैरे. ( हे देव महाभारतातही दिसतात , पण ते तिथें फक्त ‘पाहुणे-कलाकारां’सारखे येतात). नंतरच्या काळात इतर देवांचा प्रादुर्भाव झाला. ज्या अन्याजनांना वैदिक संस्कृतीनें सामावून घेतलें, त्यांचीही दैवतें ‘देव’ म्हणून वैदिकांमध्ये सामावली. नंतरच्या काळात ब्रह्मा (म्हणजे, ‘ब्रह्मदेव’, ‘ब्रह्म’ नव्हे), विष्णु,  इत्यादी दैवतांना दैवत्व दिलें गेलें. आधी उल्लेखल्याप्रमाणे, ‘कृष्ण हा विष्णूचा अवतार’, ही संकल्पना त्यानंतरची.
 • गीतेत कृष्णानें ‘देव’चा उल्लेख तृतीय पुरुषी केलेला आहे. ( जसें की, रक्षा देवांस यज्ञानें, तुम्हां रक्षोत देव ते’ – गीताई ). ‘मी अवतार आहे’ असें कृष्ण म्हणतो, ‘पण मी देव आहे’ अशा प्रकारचा उल्लेख नाहीं. अर्थात्, अवतार कुणाचा, तर तो विष्णूचा / देवाचा , हें अध्याहृत असलें तरी उघड आहे. ( निर्गुण ‘ब्रह्म’चा अवतार होऊं शकत नाहीं. त्याविषयीं पुढे ).

-तर मग, ‘देव’ असा तृतीय पुरुषी उल्लेख कां ? म्हणजे येथें, ‘माझ्याव्यतिरिक्त अन्य देव’ असा अर्थ अभिप्रेत आहे काय ? ( कारण, ‘रक्षा देवांस’ या statement मध्ये जर क़ृष्ण स्वत:ही समाविष्ट असता, तर, ‘अंतत: कोण कुणाला रक्षणार, अर्जुनाला कृष्ण, की कृष्णाला अर्जुन व अन्य’ असा विचित्र प्रश्न उपस्थित झाला असता ). असो.

 

 • ईश-ईश्वर-परमेश्वर-(परमात्मा,परमतत्व) :

[ टीप – ‘प्रत्यक्षात ईश्वर अस्तित्वात आहे की नाहीं’  अशा प्रकारची तात्विक (दार्शनिक) चर्चा इथें आपल्याला अभिप्रेत नाहीं ] .

 

*हे शब्द गीतेत कृष्णासाठी योजलेले आहेत ते अर्जुन व संजय यांच्या मुखातून. संजय (अठराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात) कृष्णाला ‘योगीश्वर’ असेंही म्हणतो.

*ईश या शब्दाचा मूळ ‘धातु’ (क्रियापद) ‘ईश्’ हा आहे, व त्याचा अर्थ ‘सत्ता गाजवणें’ असा आहे. ईश् हें नामही आहे. या ईश्.पासून ईश शब्द तयार होतो, व त्याचा अर्थ आहे ‘सत्तेचा स्वामी’. ‘ईश्’ला ‘वर’ प्रत्यय लागून ईश्वर हा शब्द तयार होतो ( जसें नरवर, तरुवर, तसेंच ईश्.वर’ ). ईश व ईश्वर यांचा अर्थ सारखाच आहे. ‘ईश्’ हा अस्तित्ववादी धातु आहे. म्हणजे, खरें तर, ईश्वर याचा अर्थ, ‘जें जें आहे —- exists —- , त्या एकूणएक असण्याचं कारण असलेलं ‘केवल’ असणं —  being, [i.e., ‘being’ as in form of a verb] , isness . ईशावास्य उपनिषदात ज्याला ‘ईश’ असें संबोधलें आहे, त्या ‘केवल’ स्वरूपालाच ( being, isness ) अन्य उपनिषदांनी ‘ब्रह्म’ असें संबोधलें आहे.

-ईश म्हणजे ‘सत्.ता’. ‘असणें-पण’, ‘Beingness’ .

-परमेश्वर म्हणजे या ‘केवल ’ असण्यातील परमतत्व.

( टीप – हें ‘केवल’ म्हणजे मराठीतील ‘केवळ’ नव्हे, म्हणजेच ‘फक्त’ अशा अर्थीं नव्हे. या ‘केवल’चा अर्थ आध्यात्मिक आहे. ‘कैवल्य’ शब्दाचा उगमही या ‘केवल’ पासूनच आहे).

-सदाशिवशास्त्री भिडे त्यांच्या ‘ईशोवास्योपनिषद’ या पुस्तकात म्हणतात, “ एकंदर सृष्टीतील ‘सत्’.तेचें उगमस्थान , हा अर्थ दर्शविण्यारिता ‘ईश’ हें पद आलें आहे”. आचार्य रजनीश ऊर्फ ओशो म्हणतात, “ परमात्मा (परमेश्वर) यानी अस्तित्व, जो है , सिर्फ़ है ; Isness, ‘होना’, जिसका गुण है ”.

(संदर्भ : ‘ईशावास्यम् इदं सर्वम् ….. एक आकलन-प्रवास’ – आसावरी काकडे).

 

– सत् चित् आनंद  – परमेश्वराला, (किंवा त्याच्याशी संबंधित आनंदाला) ‘सत् चित् आनंद’ म्हणून संबोधलें जातें. इथें सत् म्हणजे ‘असणें’, Beingness, हाच अर्थ अभिप्रेत आहे.

 

*अशा प्रकारें, ईश याचा मूळ अर्थ हा, सध्या प्रचलित असलेल्या, सर्वसाधारण जनांना माहीत आलेल्या, popular अर्थापेक्षा, कांहीं अंशीं , (किंवा बर्‍याच अंशीं) , वेगळा आहे.

 

*ईश म्हणजेच ब्रह्म, ही मूळ एकात्मता खरी. पण तरीही, ‘ब्रह्म’ या संकल्पनेमध्ये अधिक खोलात जाऊन व अधिक विस्तृतपणें पहाण्यांची गरज आहे. तसेंच, ब्रह्म या संकल्पनेचा विस्तार होऊन काय फाटे फुटले (forks), तें समजण्यांची आवश्यकता आहे.

* { पुढे जाण्यांपूर्वी, कांहीं गोष्टींचा फक्त उल्लेख करूं या  –

–  [ पुरातन जगतातील संस्कृतीत ‘ईस्तर’ म्हणून एक देवता होती. ‘ईस्तर’ या शब्दाचें ‘ईश्वर’ या शब्दाशी असलेलें साम्य उलगडून दाखवायची आवश्यकता नाहीं. कुणी हा शब्द कुणाकडून घेतला असावा, याची चर्चा आपल्याला अभिप्रेत नाहींये. मात्र एक बाब ध्यानांत घेणें आवश्यक आहे – पुरातन जगतातील दैवतें ही निसर्गाशी संबंधित होती (वैदिक कालातील मित्र, वरुण, मरुत् इत्यादि  दैवतांचेंही तेंच आहे), आणि त्याना गुणावगुण प्रदान केले गेलेले होते. त्या संकल्पनेची ‘ईश्वर’ या संकल्पनेशी तुलना केल्यास असें दिसून येतें की, ‘ईश्वर’ ही संकल्पना, अति-पुरातनकालीन असूनही, खूपच प्रगत, advanced आहे. ]

 

– [ हिंदुंची ईश्वर-संकल्पना आणि ख्रिश्चनांची गॉड्-संकल्पना –

ख्रिस्ती धर्माप्रमाणें, ईश्वर हा, Omnipotent, Omnipresent, Omnisceient, आहे.

हिंदु अध्यात्म तसें स्पष्टपणें म्हणो वा न म्हणो, पण ‘ब्रह्म’ याच्या characteristics  मध्ये पण बरेंचसें असेंच आहे. ( इथें आपण हेतुत: ‘गुण’ हा शब्द वापरला नाहींये, कारण  त्यामुळे सगुण-निर्गुण या चर्चेत जावें लागतें, जें आपण नंतर करणार आहोत.) ].

 

– [ परमेश्वर सर्वशक्तिमान आहे असें म्हटलें जातें. त्यामुळे, कांहीं लोकांच्या मनात , (खास करून बुद्धिवाद्यांच्या मनात) , असा प्रश्न अथवा शंका साहजिकच येते की , ‘जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे ( असें म्हटलें जातें ) , तर मग त्याच्या यात्रेत, किंवा यात्रेला जातांना-येतांना अपघात होऊन लोक कां मरतात ?’. याचें उत्तर / स्पष्टीकरण म्हणून, पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धान्त या गोष्टींचा उल्लेख केला जातो. (तूर्तास, आपण त्या चर्चेत जात नाहीं आहोत, कारण ती चर्चा प्रस्तुतच्या विचारकक्षेबाहेर आहे). ].  }.

 

भाग २ – ब

 • ब्रह्म –
 • वराहपुराणातील गीतामहात्म्यात, गीतेला ब्रह्मत्व दिलें आहे

‘ गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपा न संशय: ।’

-लगेच पढील श्लोकात गीतेला ‘तत्वार्थज्ञानसंयुता’ असें अभिधान दिलेलें आहे. इथें, ‘तत्व’ म्हणजे, अर्थात् (निर्गुण) ब्रह्मच.

 

 • ‘ब्रह्म’ची व्याख्या करणें किंवा त्याचें वर्णन करणें महाकर्मकठीण. मात्र तसा प्रयास अनेक ज्ञानीजनांनी केलेला आहे.

 

 • मात्र, ब्रह्म या शब्दाचें श्रेष्ठत्व इतकें मानलें जातें की अनेक क्षेत्रांमध्ये एखाद्या वस्तूचें महत्व ठसविण्यांसाठी, ‘the ultimate’ हें दर्शविण्यांसाठी, ‘ब्रह्म’ या शब्दाचा वापर केला जातो, जसें की, ‘नादब्रह्म’ ; ‘अन्न हें पूर्णब्रह्म’, ‘ब्राह्ममुहूर्त’.

 • २-ब-१ –

*सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन असलेलें ‘ईशावास्य उपनिषद्’ (शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेतील चाळिसावा अध्याय) म्हणतें –

‘पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णातपूर्णमुदच्यते

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।’

(अर्थ – तें पूर्ण आहे. हें पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण निर्माण होतें. पूर्णातून पूर्ण काढून घेतलें तरी उरतें तें पूर्णच ).

*इतरत्र, ‘ब्रह्म’ याला ‘अनादि’, ‘अनंत’, ‘कालातीत’ म्हटलेलें आहे.

*‘ब्रह्म’ म्हणजे ‘निर्गुण’ असेंही म्हटलें जातें.

*ब्रह्म हें ‘निराकार’ आहे , असेंही आहे.

*निर्गुण ब्रह्म हें विश्वाचें ‘मूलतत्व’ आहे, असें म्हटलें जातें.

* {  एक प्रश्नार्थक विचार – निर्गुण म्हणजे कांहींही ‘गुण’ —- characteristics —- नसलेलें असें.  पण, ‘अनादि, अनंत, कालातीत’, ‘निराकार’, ‘पूर्णत्व असलेलें’, ‘सर्वत्र भरलेलें’ , हे सर्व ‘गुण’च नव्हेत काय?  की ‘गुण’ म्हणजे सद्.गुण-अवगुण, असें अभिप्रेत आहे? } .

*जेव्हां आदिशंकराचार्य, त्यांच्या ‘अद्वैत’ तत्वज्ञानात, ‘ब्रह्म सत्य जगत् माया’ असें म्हणतात, तेव्हां त्यांना हें ‘निर्गुण’ ब्रह्मच अभिप्रेत आहे.

*जेव्हां आपण ‘ब्रह्मज्ञान’ , ‘ब्रह्मविद्या’ इत्यादी शब्द वापरतो, तेव्हांही हें ‘निर्गुण ब्रह्म’च आपल्याला अभिप्रेत असतें, सगुण ब्रह्म नव्हे.

* {  इथें एका गोष्टीची नोंद आवश्यक वाटते –

-आजचें विज्ञान ‘एनर्जी’ ( Energy ) बद्दल जें कांहीं सांगतें, तें पहा –

एनर्जीला रंगरूप नाहीं, एनर्जीचा नाश होत नाहीं, फक्त तिचें स्वरूप बदलतें ; एनर्जी ही सर्व विश्व व्यापते, ती सार्‍या विश्वात भरलेली आहे ; एनर्जीचा विनाश होत नाहीं याचाच अर्थ असा की ती अनादि आहे, अनंत आहे, चिरंतन आहे ; एनर्जीला अन्य गुणावगुण नाहींत.

-आज आपण ज्याला यूनिव्हर्स म्हणतो, त्यालाच पुरातनकालापासून भारता ‘ब्रह्मांड’ म्हणुन संबोधलेलें आहे. ‘ब्रह्मांड’ मध्ये ब्रह्म अंगभूत आहेच (ब्रह्म + अंड). व्ही. एस्. आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी ब्रह्मांड याचा अर्थ असा देते – ‘The Primordial Egg from which the Universe sprang’.

आजचे खगोलशास्ज्ञज्ञ याहून कांहीं वेगळा शब्द (Term) वापरत नाहींत. ‘Big Bang’ नंतर विश्वाची जी स्थिती होती, त्यासाठी ‘Primordial Soup’ ह शब्द ते वापरतात.

-आणि, ब्रह्मांडमधील हें ‘ब्रह्म’ म्हणजे निर्गुण ब्रह्मच, हें वेगळें सांगायाल नको.

एनर्जीच्या charecteristics आणि ‘निर्गुण ब्रह्माच्या’ charecteristics एकच आहेत (the same) याची आपण फक्त नोंद घेऊं या.  }

 • २-ब-२ –

*याउलट, ‘सगुण’ ब्रह्माला गुणावगुण प्राप्त आहेत.

*सर्वसाधारण माणसाला ‘निर्गुण’ ब्रह्म समजणें कठीणच.

-अद्वैतवादाचे प्रणेते आदिशंकराचार्यही, म्हणूनच, इतरत्र, ‘भज गोविंदं मूढमते’ असें म्हणतात.

-सूरदासांच्या काव्यात, गोकुळ-वृंदावनाच्या गोपी उद्धव यास म्हणतातच –

‘निरगुन कौन देस को बासी ?

ऊधो कहि समुझाय सौंह दे, बूझति साँच न हाँसि ।’

-समर्थ रामदास त्यांच्या ‘मनाचे श्लोक’ यामध्ये, पहिल्याच श्लोकात (गणपतीला उद्देशून) म्हणतात, ‘मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।’ .

गणपती म्हटलें की सगुण ब्रह्मच. ( यावर पुढील परिच्छेदात आणखी कांहीं). आणि, तो ‘मूलतत्वा’चा आरंभ आहे, असें रामदास म्हणतात. मूलतत्व म्हणजेच निर्गुण ब्रह्म. त्याच ओळीत पुढे लगेचच समर्थ निर्गुणाचाही स्पष्टपणें उल्लेख करतात ( म्हणजे कुणाच्या मनात संभ्रम राहूं नये).

समर्थ हें सांगतात की, सगुण (ब्रह्म) म्हणजेच निर्गुणाचा आरंभ आहे. अर्थातच, खरें काय, सत्य काय, तर निर्गुण ब्रह्म ; परंतु समजायला, आराधना करायला सोपें म्हणून सगुणापासून उपासनारंभ करावा.

 

-एका कवीनें म्हटलें आहे –

‘….. येत नाहीं निर्गुणाची परि मनाला कल्पना …

…. निर्गुणाच्या प्राप्तिसाठी सगुण, म्हणुनी, पूजतो ।।’

 

*त्या ‘सगुण ब्रह्मा’तच सगुणात्मक ‘देव’/ दैवतेंही समाविष्ट आहेतच , मग तो शिव असो, राम असो, कृष्ण असो, दत्त असो, गणपती असो, विठ्ठल असो, हनुमान असो, ती अनेकरूपी ‘शक्ति ’ असो, दुर्गा असो, काली असो, लक्ष्मी असो, पार्वती असो, कामाख्या असो, चामुंडा असो; म्हसोबा, म्हाळसा (महालसा), वैष्णोदेवी, एकवीरा, रेणुका, हिंगलजा, अशी दैवतें असोत, लोक-दैवतें असोत, वा अन्य कुठलीही दैवतें असोत.

# ‘अद्वैतवाद’ म्हटलें की जीव आणि ब्रह्म यांचें एकात्म्य अध्याहृत आहे. ( आदि शंकराचार्यांचा अद्वैतवाद हा वेदान्तातूनच आलेला आहे ). ‘तत् त्वम् असि’ हें ज्ञानी सांगत आहे, शिकवत आहे; ‘नेति नेति’ किंवा ‘कोऽहम्’ म्हणजे या ब्रह्मासाठीचा शोधप्रवास आहे; तर ‘अहम् ब्रह्मास्मि’ ही स्वत:ला होणारी जाणीव आहे. या सर्वांत ‘एकात्म्य’ (sameness, Unitary-ness ) हा मूल घटक आहेच. आणि, इथें ‘निर्गुण’ ब्रह्मच अभिप्रेत आहे. ‘तत्’ हा शब्द निर्गुण ब्रह्माला उद्देशूनच वापरलेला आहे.

 

# पण जर ‘द्वैतवाद’ (प्रणेते : मध्वाचार्य) म्हटला, तर मग, ‘जीव’ आणि ‘ब्रह्म / ईश्वर / देव’ या दोहोंचें भिन्नत्व अधोरेखित होतें. आपण जेव्हां ‘आत्मा’ आणि ‘परमात्मा’ असा भिन्नभिन्न उल्लेख करतो, तेव्हां हें द्वैतच दिसतें.

वल्लभाचार्यांचा भक्तिपंथ, किंवा चैतन्य महाप्रभूंचा भक्तिपंथ, अथवा वारकरी पंथ, हेही द्वैतच मानतात.

 

#म्हणजे, जेव्हां कुणी, ‘मी अमक्या देवाची आराधना करतो’. किंवा ‘मी ईश्वराला किंवा तमक्या देवाला शरण जातो’ असें म्हटलें, तर तिथें ती व्यक्ति ‘सगुण’ ब्रह्माचा उल्लेख करत आहे, द्वैतवादांतर्गत विचार करत आहे, हें स्पष्ट आहे.

 

{{ टीप –

*ब्रह्म ( संस्कृतमधील मूळ शब्द : ‘ब्रह्मन्’ ) या शब्दाचा आणि ‘ब्राह्मण’ या शब्दाचा संबंध पहावा.

-पुरातनकालीं जाती नव्हत्याच ; म्हणजेच त्या काळीं ‘ब्राह्मण’ हा शब्द जातिवाचक नव्हताच. वर्णाश्रमानुसार ब्राह्मणाचें जीं कार्यें आहेत, त्यांतील महत्वाचें आहे, ज्ञानशोधन-ज्ञानसाधना (Search for Knowledge) , आणि, शिष्यांना ज्ञानदान करून, ज्ञानाचें संवर्धन करणें, हीं आहेत. अर्थात्, उपनिषद्-कालानंतर ‘ज्ञान’ म्हणजें प्रामुख्यानें ‘ब्रह्म’शी संबंधित ज्ञान (ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या ) , असें म्हणायला हरकत नाहीं. त्यामुळें, जेव्हां अशा ज्ञानाशीं संबंधित जनांना ब्राह्मण म्हटलें जाऊं लागलें होतें-असणार

-वरील विचाराला अन्य आधारही आहेत.

@संस्कृतमध्ये ‘ब्राह्मन्’ याचा अर्थ ‘Relating to ब्रह्मन्’ असा आहे. ( संदर्भ- व्ही. एस्. आपटे).

@वेदकालीन ‘ब्राह्मण-ग्रंथ’ (ब्राह्मणम्) प्रसिद्ध आहेत (श्रुति) , जसें की शतपथ ब्राह्मण. त्यांचा काळ उपनिषद्.पूर्व आहे. तिथें ‘ब्रह्म‘ शब्दाचा संबंध, तद्.नंतरच्या उपनिषदीय अर्थाशी जोडलेला असो-नसो ; मात्र तो ‘The Ultimate, The Supreme’ अशा (कांहींशा inferred) अर्थाशी जोडलेला आहे निश्चित. (वेद हे The Ultimate/Supreme Knowledge मानलें जात असे, आणि ब्राह्मण-ग्रंथ हे वेदसंबंधित आचारांचे स्पष्टीकरण देतात ).

*ब्रह्म या शब्दाचा वापर पुरातन संस्कृतीत अनेक ठिकाणी केला गेलेला दिसतो. जसें की – ब्रह्मार्पण ; ब्रह्मावर्त ; ब्रह्मवादी ( Followers of the Vedanta philosophy) ; ब्रह्मगुप्त (सहाव्या शतकातील एका प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचें व्यक्तिनाम) ; ब्रह्मपुराण (एका पुराण-ग्रंथाचें नांव) ; ब्रह्मास्त्र [ महाभारतात उल्लेखलेलें एक अस्त्र. तें सर्वश्रेष्ठ ( महाभयंकर, विनाशकारी ) अस्त्र होतें , ज्याचें ज्ञान अतिशय कमी लोकांना प्राप्त होतें ] ; ब्रह्मराक्षस, ब्रह्मचर्य ; ब्रह्मसूत्र (जानवें) ; ब्रह्मगोल ( the universe. त्यातील ‘गोल’ या शब्दावरून हें दिसून येतें की वें विश्व, हें ब्रह्मांड गोलाकार आहे, याची जाणीव पुरातनकालीन ज्ञानीजनांना होती ) ; ब्रह्मी / ब्राह्मी (एक महत्वाची औषधी वनस्पती) ; ब्राह्मी (एक पुरातनकालीन लिपी) ;  इत्यादी.

-त्रिमूर्तींमधील एक महत्वाचें दैवत आहे ब्रह्मदेव (ब्रह्मा). याला सृष्टीचा Creator (निर्माता) मानलें गेलें आहे. त्याच्या नांवावरून आणि कार्यावरून, त्याचा ‘ब्रह्म’ या संकल्पनेशी कांहीं संबंध कल्पता येतो.

-यावरून, भारतीय संस्कृतीत, ‘ब्रह्म’चें महत्व घ्यानांत यावें.    }}.

**

भाग – ३

 • शरण जाणें – दीन असणें , लीन होणें

*‘मी कुणाला शरण जाऊं ?’ –

‘मी कुणाला शरण जाऊं ?’ या वाक्याचे (विचाराचे) खालील भाग पडतात, आणि त्या प्रत्येकाचा विचार करणें आवश्यक आहे –

 

 • मी
 • कुणाला
 • शरण_जाऊं ?

-आणि अर्थातच, एक अध्याहृत प्रश्न आहे की,

‘शरण जायचें तें कशासाठी ?’

-याला आणखी एक dimension आहे, आयाम आहे,  तें म्हणजे,

मी शरण_जावें काय ?

 

*हें हाय्.लाइट करणें आवश्यक आहे की, उपरोल्लिखित ‘मी कुणाला शरण_जाऊं ?’ या विचारांतर्गत, ‘शरण_जावें_लागणें’ , लीन_होणें, (स्वत:ला दीन समजणें, स्वत:ला संभ्रमित समजणें), हें साधकानें गृहीत धरलेलें आहे ; ‘मी शरण जावें काय ?’ असा प्रश्न त्याच्या मनात आलेला नाहीं.

-(इथें आपण ‘साधक’ हा शब्द वापरलेला आहे तो, ‘साधना करणारा’ अशा अर्थानें नसून ‘कांहीं साधूं पहाणारा, साध्य करूं पहाणारा’ अशा अर्थाचा आहे. अर्थात्, साध्य_करूं_पहाणार्‍यास साधना करावी लागते, हा भाग वेगळा).

*   {टीप – माणूस जर श्रद्धा बाळगणारा असेल, तरच त्याच्या मनांत मी कुणाला शरण_जाऊं?’ असा प्रश्न निर्माण होऊं शकतो. माणूस जर रॅशनॅलिस्ट असेल, बुद्धिप्रामाण्यानुसार वागणारा असेल, तर असा प्रश्न त्याच्या मनात उठणारच नाहीं.  या बाबीकडे पुढेही आपण वळूं. }.

 • ३-अ :   ‘कुणाला’ –

 

 • ३-अ-१ : धर्म  (रिलिजन)  :

*धर्म या शब्दाचे विविध अर्थ आहेत.

– गीता – गीता तर धर्म या शब्दानेंच सुरूं होते. ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ….’ हा गीतेतला पहिलाच श्लोक. कुरुक्षेत्र हें धर्मक्षेत्र, म्हणजेच कुरुक्षेत्रावरील युद्ध हें ‘धर्मयुद्ध’, असा त्याचा अर्थ होतो.

इथें ‘धर्म’ या शब्दाचा ‘रिलिजन’ (religion) हा अर्थ होतो काय ? तर, अर्थातच, नाहीं. इथें ‘धर्म’ याचा अर्थ ‘मॉरल बिहेव्हियर’शी (नीतिनियम, नीति-अनुसारी वर्तन) संबंधित आहे.

-गीतेत कृष्णाचें वचन आहे – ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’. इथेंही धर्म म्हणजे ‘रिलिजन’ नाहीं.

-युधिष्ठिर – त्याला ‘धर्मराज’ हें अभिधान होतें.  तेंही ‘रिलिजन’ या अर्थाचें नाहीं, तर त्याचा नीतिमत्तेशी संबंध आहे.

(आज जी ‘हिंदुधर्म’ म्हणजे ‘हिंदू म्हणवल्या जाणार्‍या लोकांचा रिलिजन’ अशी जी संकल्पान रूढ आहे, ती महाभारतकाळीं अस्तित्वात नव्हतीच.)

– यमधर्म – इथेंही रिलिजन हा अर्थ अभिप्रेत नाहीं. यम म्हणजे ‘धर्म’ कां, तर यम हें मृत्यूशी संबंधित दैवत आहे, आणि मृत्यूचे स्वत:चे नीतिनियम असतात, जे इहलोकातील नियमांच्या पल्याड आहेत.

-ज्ञानेश्वर – ‘पसायदान’ मध्ये ज्ञानेश्वर गीताधर्म असा शब्द वापरतात :

‘थोर गीताधर्म । साद्यंत कथीन ।’.

त्यांनाही गीताधर्म या वचनात ‘रिलिजन’ हा अर्थ अभिप्रेत  नव्हता.

-मोरोपंत – त्यांच्या काव्यात, कर्णाच्या रथाचें चाक जमिनीत रुतलें तेव्हांचा प्रसंग वर्णला आहे. तेथें कर्ण कृष्णार्जुनांना सांगतो की ‘धर्मानें वागा’ . त्यावर कृष्ण उत्तरतो –

‘रक्षावा धर्म असा करिसी उपदेश तरि असे मान्य

रक्षितसों धर्मातें, आम्हां धर्म ठाउका नान्य ।।

इथें एक धर्म या शब्दाचे दोन अर्थ आहेत – एक अर्थ म्हणजे,  ‘धर्मराज’ युधिष्ठिर आहे, तर दुसरा , ‘धर्म’ म्हणजे नीतिनियम / नीतितत्व  (moral law) असा आहे.

 

– अधर्म, सद्धर्म – इथेंही धर्म याचा अर्थ रिलिजन असा नाहीं.

-कर्मधर्मसंयोग, धर्मशील – इथेंही धर्म म्हणजे रिलिजन हा अर्थ अभिप्रेत नाहीं.

– नीतिनियम या अर्थानें आपण धर्म हा शब्द नित्यानें वापरत असतो, जसें की शेजारधर्म, शरीरधर्म, राजधर्म, पुत्रधर्म, आपद्.धर्म, वगैरे.

*बौद्ध – बौद्ध प्रार्थनेतच ‘धम्मं सरणं गच्छामि’ या मंत्राचा समावेश झालेला आहे.  तिथें, धम्म (धर्म) म्हणजे बौद्ध नीतिनियम, जीवनरीती , जीवनपद्धती , असाच तत्कालीन अर्थ होता-असणार. आतां त्याचा अर्थ ‘रिलिजन’ असा झालाहे.

*हिंदुधर्म – खरें तर या नांवाचा धर्म (रिलिजन) नाहींच. भारतातील रहिवाशांना ‘हिंदु’ हें नांव पडलें तें इराण्यांमुळे. ( ते ‘स‘ चा ‘ह’ करत असत, जसें की सप्ताह – हफ्ता, असुर – अहुर ) . हिंदु धर्म म्हणजे भारतातील रहिवाशांचा ‘धर्म’ (moral code) . याला ‘सनातन धर्म’ असेंही अभिधान आहे. मग हा ‘सनातन धर्म’ म्हणजे ‘वैदिक धर्म’ कां ? तर, तसेंही दिसत नाहीं. आपली अनेक दर्शनें ‘नास्तिक-दर्शनें’ आहेत (म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी). यांतील सांख्य व योग यांना  तर गीतेत फार महत्व आहे, आणि गीतेचा, आजच्या ‘हिंदु’ धर्मात खचितच समावेश आहे.

– { एक प्रश्न  :  मग चार्वाक, लोकायतादि ‘नास्तिक’ दर्शनांचें काय ?

-चार्वाक दर्शन तर ईहवादी, निरीश्वरवादी आहे. त्याला ईश्वर, ब्रह्म, अध्यात्म, वगैरे गोष्टी मान्य नाहींत.

-याचा पुढेंही उल्लेख केलेला आहेच.  } .

-त्यामुळे, “ मी ‘धर्माला’ शरण जातो ” याचा अर्थ (‘हिंदु’ धर्मीयांसाठी तरी) प्रत्येकापुरता वेगवेगळा असूं शकेल.

( टीप – अन्य धर्मीयांसाठी तें कांहीं अंशीं सोपें आहे ).

-मात्र, आपण ‘धर्म’ हा शब्द यानंतर, ‘रिलिजन’ या अर्थानें वापरणार आहोत.

 • ३-अ-२ : गुरु –

-‘गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूँ पाँय ? बलिहारी गुरु आपकी, गोविन्द दियो बताय ।’

हा कबीराचा दोहा प्रसिद्धच आहे. म्हणजेच, ‘गुरुचें महत्व आहेच’, असें म्हणतां येईल, कारण तो उन्नतीचा मार्ग दर्शवतो.

-‘गुरुबिन ज्ञान कहाँ से लाऊँ ?’ ही उक्तिही प्रसिद्ध आहे.

३-अ-२-क्ष :

*इथें एक प्रश्न असा उठतो की , “कुणी स्वयंभूपणें, त्याला ‘जें साध्य करायचें तें’ करूं शकतो की नाहीं ?” . त्यात limitations असूं शकतात, अपूर्णता असूं शकते. एकलव्य अर्जुनाइतका चांगला धनुर्धर स्वत:च्या जोरावर बनला होता हे निर्विवाद (द्रोणांनी त्याचा अंगठा कापून मागण्यांआधी) ; पण द्रोणांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र शिकवलें, तसें एकलव्य स्वत:च्या जोरावर कसें मिळवणार ? त्यामुळे, गुरुची आवश्यकता अधोरिखित होते.

-असें म्हणतात की, गुरुच्या guidance शिवाय कुंडलिनी-जागृतीचा प्रयत्न प्राणघातक ठरूं शकतो, किंवा, किमान, brain-damage तरी करूं शकतो. म्हणजे यातही, गुरु, guide, mentor हा हवाच. एवढें मोठें कशाला? कुणी मेंदूच्या ‘अल्फा लेव्हल’ पासून ‘थीटा लेव्हल’ ला जाण्याचा प्रयत्न जर guide विणा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला मधें नक्कीच थांबावें लागतें, पुढें जायला ‘हिचकिचाहट’ होते, कॉन्फिडन्स वाटत नाहीं.

#या संदर्भात, ‘अतींद्रिय उपलब्धी’ (‘अतींद्रिय ज्ञान’ / ‘अतींद्रिय सिद्धि’ / ‘अतींद्रिय जाणिवा’ ) यांचा विचार करायला हवा. त्यावर आपण पुढें चर्चा करूं.

– व्यक्तीला गुरु किंवा गाईड किंवा टीचर असण्यांचा लाभ काय, तर असा, की तो (गुरु) अनुभवी असतो, काय करावें, कसें करावें, किती करावें, कधी करावें, याचें, म्हणजेच ‘Dos and Don’ts’ चें, त्याला ज्ञान असतें , अनुभव असतो. त्यातून तो (गुरु) , शिष्याला फक्त शिकवण देतो एवढेंच नव्हे, तर ‘भिऊं नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा कॉन्फिडन्सही देत असतो. म्हणून सर्वत्र गुरुचें महत्व वर्णलेलें आहे.

– विनोबांनी त्यांच्या एका प्रवचनात गुरुच्या Role बद्दल एक सुंदर उदाहरण दिलेलें आहे (मी स्वत: त्या प्रवचनाला हजर होतो). –

उदाहरण असें – “एका पांथस्थाला गांधारला जायचें होतें, पण त्याला मार्ग माहीत नव्हता. समोर एक व्यक्ती उभी होती. त्या उभ्या असलेल्या माणसाला त्या पांथस्थानें गांधारचा मार्ग विचारला. त्या माणसानें हात वर करून दिशादर्शन करत सांगितलें, ‘एतां दिशां गांधार:’ (गांधार या दिशेला आहे)”.

विनोबा म्हणाले, “गुरु त्या पथदर्शकासारखा असतो. तो त्या पांथस्थाला हात धरून गांधारला धेऊन गेला नाहीं ; ‘माझ्याबरोबर चल. मी तुला गांधारला घेऊन जातो’ असें तो म्हणाला नाहीं; त्यानें फक्त मार्गदर्शन करून त्या पांथस्थाला ज्ञान दिलें (guide केलें)”.  विनोबांनी सांगितलें, “गुरु हा, त्या पथप्रदर्शकासारखा असतो. तो केवळ मार्गदर्शन करतो ; पुढला रस्ता आपला आपण शोधायचा असतो”.

 

-राम, कृष्ण यांना, ज्ञानेश्वरांना, एकनाथांना, नामदेवांना, आदिशंकरांना, कबीरादि संतांना, स्वामी विवेकानंद यांना गुरुचा लाभ झालेला होता. (नंतरच्या काळात, पुढील ज्ञान त्यांनी स्वत: वाढवलें).

 

-शास्त्रीय संगीतासारख्या विद्येच्या बाबतीतही गुरुचें महत्व सर्व थोर गायक-वादक वर्णतात. नृत्यादि कलांच्या बाबतीतही असेंच आहे.

 

*गुरुच्या बाबतीत विविध आयाम आहेत. जसें की –

 

-‘एकतरफा गुरु ’ – ( हें कांहींसें एकतर्फी प्रेमासारखें आहे). शिष्य हा त्या गुरुला ‘गुरुस्थानीं’  स्वीकारतो , पण गुरु हा त्या शिष्याचें ‘शिष्यत्व’ स्वीकारत नाहीं. उदा., एकलव्य, ज्याबद्दल चर्चा आपण आधी केलेली आहे.

 

फॉर्मल’ व ‘इन्फॉर्मल’ गुरु – इथें , ‘फॉर्मल’ व ‘इन्फॉर्मल’ हीं विशेषणें गुरुच्या स्वभावाबद्दल किंवा वर्तनाबद्दल नसून, गुरु-शिष्य संबंधाबद्दल (relationship) आहेत.

#फॉर्मल गुरु म्हणजे जेथें गुरु -शिष्य संबंध फॉर्मली एस्टॅब्लिश्ड् आहे (मान्यताप्राप्त). जसें की गुरु_सांदीपनी आणि कृष्ण , किंवा गुरु_द्रोणाचार्य व कौरव-पांडव.

#संगीत-नृत्याच्या क्षेत्रात ‘गंडाबंद’ शागिर्द असतात. उर्दू शायरीच्या क्षेत्रात उस्ताद-चेला असतात, जिथें चेला उस्तादाकडून ‘इस्लाह’ घेतो. (मराठी गझलच्या क्षेत्रात सुरेश भट यांनी असे अनेक चेले निर्माण केले ).

# इन्फॉर्मल गुरु – इथें गुरु-शिष्य संबंध हा दुतर्फा मान्य असतो, मात्र तो ‘फॉर्मल’ नसतो. कल्याणस्वामी हे समर्थ रामदास यांचें फॉर्मली accepted शिष्य होते, तर समर्थांचें शिवरायांशी नातें इन्फॉर्मल गुरु-शिष्यांचें होतें.

हिंदुस्तानी कंठसंगीताच्या क्षेत्रातील एक उदाहरण : गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांचें विविध फॉर्मल गुरु तर होतेच, पण त्यांच्या आत्या सरला भिडे या त्यांच्या ईन्फॉर्मल गुरु होत्या.

# फॉर्मल असो अथवा ईन्फॉर्मल असो, त्या संबंधामध्ये शिष्य हा गुरुकडून कांहीं ज्ञान मिळवतो.

# मात्र, ‘संपूर्ण शरण जाणें’ ही गोष्ट इन्फॉर्मल गुरुच्या बाबतीत संभवत नाहीं, (असें मला प्रतीत होतें ).

 

एकाच व्यक्तीचे ( शिष्याचे ) विविध, मल्टिपल् , एकाहून_अधिक गुरु

#कधीकधी असेंही होतें की एका व्यक्तीनें एक गुरु केलेला असतो, पण कांहीं कारणानें तीच व्यक्ती (शिष्य) दुसरा , वेगळा, नवीन  गुरु करते.  [ उदा. – पहिल्या गुरुबद्दल असंतुष्ट आहे, म्हणून ; किंवा त्या गुरुबद्दल आदर असूनही, त्याच्या मर्यादा (लिमिटेशनस् ) ध्यानांत आल्यामुळे व पुढे जाण्यांसाठी नवीन गुरु आवश्यक आहे, हें समजल्यामुळे ; किंवा गुरुनें सांगितलेला–सुचवलेला मार्ग त्या शिष्याला पडत नाहीं, योग्य वाटत नाहीं, म्हणून ]. किंवा कधीकधी गुरुच स्वत:ची मर्यादा जाणून शिष्याला अन्य गुरुकडे पुढील वाटचालीसाठी पाठवतो. किंवा, कधीकधी गुरुच्या निधनानंतर, शिष्य अन्य गुरुकडे जातो.

 

#संगीत क्षेत्रात अशी उदाहरणें दिसतात. पं. जीतेन्द्र अभिषेकी यांनी जगन्नाथबुवा पुरोहित व अझमत हुसेन खान या आग्रा घराण्याच्या गुरुंकडून आणि गुल्लुभाई जसदनवाला या जयपुर घराण्याच्या गुरुकडून शिक्षण घेतलें असा उल्लेख मिळतो. एका गायकानें (बहुधा पं. अजय चक्रवर्ती) एका सेमिनारमध्ये सांगितलें की त्यांचे गुरु त्यांना एका अन्य गुरुकडे मारवा राग शिकण्यांसाठी स्वत: घेऊन गेले. ( हें त्यांनी सागितलें, त्या सेमिनारला मी स्वत: प्रेक्षागृहात हजर होतो).

 

{ एक शंका – परंतु, आध्यात्मिक / पारमार्थिक क्षेत्रात काय ? ( तिथेंही गुरु बदलण्यांची उदाहरणें आहेत). } .

# गुरुच्या संदर्भात कांहीं चिंतनीय / विचारणीय गोष्टी आहेत –

– गुरु आणि टीचर एकच आहेत काय ?

– जगप्रसिद्ध विचारवंत व लेखक युवाल नोआह् हरारी ( ‘Sapiens’ , ‘Homo Deus’ या ग्रंथांचा कर्ता )  विपसस्नाचे प्रणेते गोएंका यांना त्याचे ‘टीचर’ म्हणून संबोधतो. याचा अर्थ असा की, त्याच्या मताप्रमाणें गुरु आणि टीचर हे एकच आहेत ( the same thing).

– पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी, ‘गुरु’ हा शब्द इंग्रजीत मान्य-शब्द समजला जात नसे. त्या काळीं, एक गृहस्थानें ‘My Spiritual Guru’ असा उल्लेख केल्यावर, त्याला त्याच्या वरिष्ठानें त्या वापराबद्दल टोकलें होतें. मात्र, आतां ‘गुरु’ हा शब्द इंग्रजीत सर्रास वापरला जातो.

– आपल्याला असा अर्थ घेतां येईल की, गुरु हा टीचर असतो ,गाईड असतो ;  मात्र प्रत्येक टीचर वा गाईड हा गुरु असतोच असें नाहीं , खास करून स्पिरिच्युअल बाबतीत.

 

 • ‘स्पिरिच्युआलिझम्’ च्या (हा शब्द हेतुत: वापरला आहे) बाबतीत ‘इन्फॉर्मल’ गुरुचें काय ; म्हणजे त्या क्षेत्रात अशा प्रकारचा गुरु असतो कां, असूं शकतो कां, आणि त्याचा कितपत फायदा (मार्गदर्शन) शिष्याला होऊं शकतो, या व अशा गोष्टींची खरें तर चर्चा हवी.

 

{ टीप – ‘आध्यात्मिक’ या शब्दाला कांहीं connotations आहेत. म्हणून, जेव्हां ते टाळायचे असतील तेव्हां ‘स्पिरिच्युअल’ असा शब्द वापरला आहे ;  आणि जेव्हां ‘आध्यत्मिक’ या शब्दास असलेला सर्वमान्य अर्थच इथें आपल्यालासुद्धा अभिप्रेत असेल, तेव्हां मात्र ‘आध्यात्मिक’ असाच वापर केलेला आहे. } .

 

– तसेंच, एकाच शिष्याचे विविध गुरु असल्यास आध्यात्मिक क्षेत्रात काय होतें ;  अशा बाबतीत, कुठल्याही गुरुला संपूर्ण शरण जाणें शक्य आहे काय, याचा विचारही करायला हवा.

 

– आपण, ‘स्पिरिच्युआलिझम्’बद्दल कांहीं चर्चा करणें आवश्यक आहे.ती आपण पुढें करूं या.

३-अ-२-य

*पण , ‘सर्वांना गुरु लागतोच कां ?’ , हाही प्रश्न विचारणीय आहे.

-गौतम बुद्धाला स्वत: ‘तप’ करून त्यातून ज्ञान प्राप्त झालें , ‘सत्य’ गवसलें. हें त्यानें गुरुविणा साध्य केलें.

-तुकारामांना कुणी गुरु असल्याचा उल्लेख माझ्यातरी वाचनात आलेला नाहीं.

-मोझेसला गुरु होता कां ? त्याला माउंट सिनाई वर ईश्वरानें  स्वत: ‘टेन् कमांडमेंटस्’ चें ज्ञान दिलें अशी आख्यायिका आहे.

-हजरत मोहम्मद यांना कुणी गुरु होता कां ?

-पुरातन गोष्टी कशाला, कांहीं दशकांपूर्वी एका जपानी गृहस्थाला स्वत:च्या चिंतनातून ‘रेकी’चें तत्व सापडलेंच की ! ‘प्राणिक हीलिंग’चें तत्व आणि उपचारपद्धतीसुद्धा, सुरूर-पूर्व-आशिया मधील एका गृहस्थानें अशीच स्वत: (गुरुविणा) शोधून काढली.

– कणाद, कोपर्निकस, डार्विन, फ्राइड, यांना आधी कुणीतरी गुरु असतीलच की. मात्र, कणादींना  स्वत:ला जें ज्ञान प्राप्त झालें ( उदा. कणादचें अणु-परमाणु चें तत्व, ‘सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, तर पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते’ , हें कोपर्निकसला गवसलेलें तत्व ) , तें कुणां गुरुने दिलेलें नसून स्व-अभ्यासातून त्यांना गवसलेलें आहे.

– ‘रहस्यमय इजिप्तचा शोध’ ( ‘A search in secret Egypt’ ) हा ग्रंथ पॉल ब्रँटन यांनी लिहिलेला आहे, जे  मुक्त विचारांचे विद्वान होते. त्यात ब्रँटन म्हणतात की, ‘ ….विविध ठिकाणांना भेटी आणि गुरु हें सारं थांबवावं लागतं . अंतर्यामीच्या ईश्वराला …… संधी द्यावी लागते ’.

याचा अर्थ असा की, ब्रँटन यांच्या मतानुसार, गुरु हा केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच, एका विशिष्ट पातळीपर्यंतच, उपयोगी असतो ; पुढील उन्नति आपण स्वत:ची स्वत:च करायची असते.

 

*खरें तर, असें म्हणायाल हरकत नसावी की, प्रत्येकाला दीर्घ चिंतनान्तीं त्याच्या-त्याच्यापुरतें ‘सत्य’ ( किंवा ‘सत्’ ) गवसूं शकतें, त्याच्या-त्याच्यापुरता जीवनाचा spiritual अर्थ उमगूं शकतो.

 • ३-अ-३ : ईश्वर / देव : (गॉड्) :

*गुरुला शरण गेलें तर, गुरु काय करतो ? तो शिष्याला गॉड्.कडे ( देवाकडे / परमेश्वराकडे ) जाण्याचा मार्ग दाखवतो.

‘बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय ।’

 

*पण मग, साधक (कांहीं साधूं पहाणारा) डायरेक्टली, थेट, ईश्वराचाच शरण गेला तर ? नाहींतरी

गीतेतला कृष्ण म्हणतोच आहे – ‘मामेकं शरणं व्रज’.

– (टीप – मात्र, गीतेतला ‘ईश्वर’ हा सगुण ब्रह्म आहे की निर्गुण, हा एक प्रश्नच आहे. असो. ) .

-आणि, शरण जायचें, म्हणजे, जीव व ब्रह्म यांचें द्वैत आपण मान्य केलें, असें आहे.

– मग असें म्हणावें कां, की  ‘सगुण ब्रह्म’ला शरण जातां येते ; तर निर्गुण ब्रह्माचा विचार बुद्धिप्रामाण्यानुसार (रॅशनली) करावा लागतो ?

 

*थोडक्यात काय, तर

-‘सगुण ब्रह्म’ला शरण जाणें सोपें आहे. तिथें, श्रद्धा असणें महत्वाचे आहे; तसें असल्यासच रिझल्ट मिळेल, फळ मिळेल.

– आधी उल्लेखलेला, ‘तत् त्वम् असि’, ‘अहम् ब्रह्मास्मि’ किंवा ‘सोऽहम्’, हा बुद्धिप्रवण विचार झाला, त्यामुळें तिथें कुणालाही शरण जाण्यांचा प्रश्नच उठत नाहीं.

 

 • ३-ब – शरण_जाणें :
 • कुणालाही शरण जाणें म्हणजे, ‘स्वत्व’ सोडून देऊन, विसरून, ज्याला-शरण-जातो-तो , (सोयीसाठी त्याला आपण ‘मेंटॉर’ — Mentor — म्हणूं या ; मग तो ‘धर्म’ असो, गुरु असो वा ईश्वर असो), जें जें सांगेल तें तें करणें .
 • म्हणजे, हा ‘मेंटॉर’वर Blind Faith चा भाग झाला, दृढ_श्रद्धेचा भाग झाला. इथें रॅशनॅलिझम्.ला जागा नाहीं, तर्काला जागा नाहीं. मेंटॉर सर्वज्ञानी आहे, तो सांगेल तें बरोबरच असणार, आणि त्यानें दाखवलेल्या रस्त्यानें गेलें तरच आपलें ईप्सित आपल्याला प्राप्त होईल, हा अढळ विश्वास हवा, तिथें शंकेला स्थान नाहीं.
 • ‘शरण जाणें’ याचा, खोलात जाऊन अर्थ असा झाला की, तिथें साधकानें (रस्ता शोधणार्‍यानें) आपला ‘ईगो’ (‘मी’पणा, अहंकार) संपूर्णपणें विसरायला हवा , मेंटॉरपुढे संपूर्ण शरणागती पत्करायला हवी.

इथें Key-Word आहे, संपूर्ण’ .

 

 • याची आणखी एक बाजू, एक aspect, अशी की –

‘शरण-जाण्यांची-इच्छा-करणें’ याचा अर्थ, साधकाचा (साध्य गाठायची इच्छा असणार्‍याचा) स्वत:वरचा-विश्वास कमी झालेला असणार, किंवा नाहींसाच झालेला असणार ;  तो संभ्रमित झालेला असणार ; त्याला, ‘स्वत:च्या-स्वत:ला-आपला-मार्ग-सापडेल-की-नाहीं ’, ‘आपलें-ईप्सित-गवसेल-की-नाहीं ’, याची शाश्वती नसणार.

 • गीतेमधला, कुरुक्षेत्रावरील अर्जुन असाच असणार असा सर्वसाधारण समज आहे. त्याला जर ‘मेटॉर’मुळें उत्तर गवसलें, तर, त्याच मार्गानें जाऊन आपल्यालाही तें गवसेलच, असें साधकाला (वाटचाल करणार्‍याला) वाटणारच, यात नवल नाहीं.
 • थोडक्यात काय, तर, ‘शरण जाणे’ हा त्यातल्या त्यात सोपा ‘मार्ग’ आहे ; रॅशनलिझम्.नें आपला आपण मार्ग शोधणें हें महाकर्मकठीण !

 • ३-क : शरण_जावें काय ?
 • आपण या बाबीला आधी कांहींसा स्पर्श केलेला आहे.
 • प्रथमत: , आपल्याला हें माहीतच आहे की, रॅशनॅलिस्ट माणूस हा, स्वत:चा मार्ग स्वत:च शोधून काढणार. त्यामुळें, त्याच्या बाबतीत हा प्रश्न संभवत नाहीं.
 • जो सश्रद्ध आहे, तोच हा, शरण_जाण्यांचा विचार करणार.

तो ‘सगुण ब्रह्म’वरच श्रद्धा ठेवणारा हवा.

-‘मला स्वत:ला जें साधणार नाहीं, तें मला, कुणा-मेंटॉरला-शरण-जाऊन साधेल’, हा विश्वास   त्याच्या मनात हवा.

-नुसतें, ‘शरण जाऊन’ नव्हे , तर , ‘शरण जाऊन ’ ( इथें, महत्वाचा ) मला ईप्सित साध्य करतां येईल, यावर त्याचा दृढ विश्वास हवा.

-शरण जाणें म्हणजे,  ईगो विसरणें, स्वत्व विसरणें, मेंटॉर जें जें सांगेल तें तें बिनतक्रार , waver न होतां, चित्त डळमळीत न होतां, करणें. हें सर्व साधकाला (लक्ष्य शोधूं पहाणार्‍याला)  आधीपासूनच मान्य असायला हवें. तरच तो आपलें ‘अस्तित्व’ मेंटॉरच्या पायीं अर्पूं शकेल, मेंटॉरनें सांगितलेलें सर्व बिनाप्रश्न, बिनशंका, ‘बिनहिचकिचाहट’ , कृतीत आणूं शकेल

 • ३-ड : कशासाठी
 • शरण जायचें खरें ; पण , कशासाठी , काय साध्य करायला, हा  फार महत्वाचा मुद्दा आहे.
 • जसें की, जीवन सुकर करायला, जीवन सुखकर करायला (भौतिक सुखें मिळवायला) , जीवनाची आसक्ती नाहींशी करायला, मरण सुकर करायला, मरणाची भीती नष्ट करायला, स्वर्गप्राप्ती होऊन स्वर्गसुख प्राप्त करायला, ईश्वरप्राप्ती व्हावी म्हणून , ब्रह्मज्ञान मिळावें म्हणून, मोक्ष वा निर्वाण मिळवायला, जन्ममरणाचा फेरा संपवायला, आत्मिक उन्नयनासाठी,  वगैरे वगैरे.

-त्यांतील कांहींचा आपण आढावा घेऊं या.

 

 • ( i ) – अनेक गुरुंना ‘अतींद्रिय’ जाणिवा ( ESP ) प्राप्त असतात, ‘अतींद्रिय’ ज्ञान प्राप्त असतें, ‘अतींद्रिय’ सिद्धी प्राप्त झालेल्या असतात ( ‘अतींद्रिय शक्ती’, हा, नेहमी वापर होणारा शब्द इथें हेतुत: टाळला आहे, कारण त्यानें अपसमज होण्यांचा धोका संभवतो). ते गुरु आपल्या त्या ‘अतींद्रिय उपलब्धी’ ( अतींद्रिय जाणिवा / ज्ञान / सिद्धी ) वापरतात, अन् त्यांनी त्या अतींद्रिय गोष्टी वापरलेल्या, शिष्यांना दिसतातही.

{ – [ इथें, इकडें ध्यान-आकर्षण करणें आवश्यक वाटतें की ‘आध्यात्मिक’ उंची न गाठतांही ‘अतींद्रिय’-जाणिवा प्राप्त होऊं शकतात . जसें की, गांजा, चरस, मारिआना (marijuana), कॅनबीज् वगैरेंच्या सेवनानें. त्यामुळे, असे अनुभव आणि ‘आध्यात्मिक’ उन्नती यांची गल्लत न व्हावी. ] .

– हेंही ध्यानात घेणें जरुरीचें आहे की, जरी कुणाला ( जसें की, गुरुला ) ‘अतींद्रिय’ शक्ती खरोखरच प्राप्त असल्या, तरी त्या ‘अध्यात्मिक’_उन्नतीच्या द्योतक असतीलच, असें नव्हें.

(याच्या संदर्भासाठी –  पुस्तक, ‘सिद्ध, साधू, योगी’, लेखक- द. पां. खांबेटे, यातील उदाहरणें). } .

 

*त्यामुळे, प्रश्न असा उठतो की,  शोधकानें (शिष्यानें) त्या गुरुला शरण जायचें तें त्या अतींद्रिय  उपलब्धींसाठी काय ? कारण, (असें म्हणतात की ), त्यांतच जर माणूस अडकून पडला, तर त्याची त्यापुढील उन्नती संभवत नाहीं . गुरु स्वत: जर त्या-पायरीच्या-पुढील-पायरीवर पोचला असला, तरच तो शिष्याला पुढील-उन्नतीच्या मार्गावर नेऊं शकतो, हें मात्र खरें.

थोडक्यात काय, तर, ‘अतींद्रिय उपलब्धी’ ही एक मधली-पायरी झाली, तें शोधकाचें (साधकाचें) अंतिम ईप्सित नसेल.

 

* { हें ध्यानांत घेणें आवश्यक आहे की, अतींद्रिय अनुभवांचा ‘आत्मिक’ (म्हणजे , ‘स्वत:च्या’ अशा अर्थानें ; ‘आत्म्याच्या’ अशा अर्थानें नव्हे) उन्नतीशी संबंध नाहीं.

[ टीप – असें मत, अन्य_एका_कुणाची ‘अतींद्रिय सिद्धी’ पाहण्याचा व तें सिद्धही (confirm, prove) होण्याचा अनुभव आलेल्या, आणि स्वत:ही कांहीं अल्पस्वल्प ‘अतींद्रिय’ अनुभव घेतलेल्या, एका व्यक्तीचें आहे ]. } .

 

 • ( ii ) – स्पिरिच्युअल उन्नतीसाठी – ( इथें ‘स्पिरिच्युअल’ हा शब्द हेतुत: वापरलेला आहे). –

– इथें प्रश्न असा उठतो की,  ज्या गोष्टीला सर्वसाधारणपणें ‘आध्यात्मिक’ अशी संज्ञा आहे, त्याच प्रकारें , ‘स्पिरिच्युअल’ अनुभवांसाठी, ‘स्पिरिच्युअल’ आनंदासाठी, किंवा ‘स्पिरिच्युअल’ उन्नतीसाठी, शोध घेणें आवश्यक आहे कां ?

-इथें आपण संगीताचें उदाहरण घेऊं शकतो.  माझी दिवंगत पत्नी स्नेहलता ही शास्त्रीय संगीत शिकलेली होती, आणि मानसशास्त्रातही तिला पी एच्. डी. प्राप्त होती. तिनें यावर विचार करून असें सागितलें की संगीतातूनही स्पिरिच्यअल अनुभव येतो, स्पिरिच्युअल आनंद मिळतो.

हल्लीच मी अटेंड केलेल्या संगीतावरील एक सेमिनारमध्ये जानेमाने संगीतकार-संगीतज्ञसुद्धा exactly तेंच म्हणाले.

 

* { या ‘नाद’चें फार महत्व आहे. ‘नादब्रह्म’ या संज्ञेचा उल्लेख आपण आधी पाहिलाच आहे. आध्यात्मिक बाबतीतही, ‘अनाहत नाद’ (pure) ही संज्ञा वापरली जातें. अनाहत नाद हा आंतरिक, आत्मिक (आत्म्याशी संबंधित) असतो, असें म्हणतात, आणि तो शब्दांच्या ‘परे’ आहे, पल्याड आहे, (beyond words), त्याचा अनुभवच घ्यावा लागतो , असेंही म्हटलें जातें. }.

– नृत्यादि कलांच्या बाबतीतही तेंच होत असणार, असें म्हणायला हरकत नाहीं.

 

-याचा अर्थ असा की, (केवळ) स्पिरिच्युअल उन्नतीसाठी, ‘ज्याला_सर्वसाधारणपणें_आध्यात्मिक_ म्हणतात’ , तसा मार्ग शोधण्यांची गरज नाहीं.

(टीप – अर्थात्, “.‘आध्यात्मिक’ आनंद हा,  ‘स्पिरिच्युअल’ पेक्षा अधिक वरच्या पायरीवरला आहे काय” , ही गोष्ट, ज्याला स्वत:ला या दोन्हींचा अनुभव असेल, तोच खात्रीपूर्वक सांगूं शकेल ).

 

 • ‘आत्मिक’ उन्नतीसाठी – आत्मोन्नतीसाठी – ( इथें, आत्मिक म्हणजे ‘स्वत:च्या’ ; आणि ‘आत्मिक’ म्हणजे आत्म्याच्या, अशा दोन्हीं अर्थांनी ) – इथें अर्थातच, ‘आध्यात्मिक’ उत्थान अभिप्रेत आहे.

 • भाग-३-ई
 • आत्मिक उन्नयन – आतां प्रश्न असा उठतो की, आत्मिक उन्नयन हें कशासाठी आपल्याला

हवें आहे ? What is our Expected_End-Result ?

 

 • स्वर्ग :  तें उन्नयन, स्वर्गात जाण्यांसाठी हवें आहे काय ? (प्रत्यक्षात स्वर्ग आहे अथवा नाहीं, ही चर्चा इथें आपल्याला अभिप्रेत नाहीं).

-स्वर्गात सगळी सुखें प्राप्त होतात (असें म्हटलें जातें).

-सुख म्हणजे काय ?

@याचे दोन अर्थ संभवतात – # Pleasure  # Happiness .

दोन्हींतील फरक असा की, Pleasure हें external आहे, बाह्य कारणांमधून उद्.भवणारें आहे ; तर, Happiness ही internal आहे, ती आंतरिकरीत्या उत्पन्न होते.

-स्वर्गातील सुख म्हणजे Pleasure , असा सर्वसाधारणपणें मानला जाणारा अर्थ आहे.

तर मग, आपलें आत्मिक उन्नयन आपल्याला स्वर्गीय Pleasure साठी हवें आहे काय ? सिद्धीमध्ये अडकून न रहाणार्‍यांसाठी तरी तसें तें नसणार, नसावें.

@‘स्वर्गात अमृत मिळतें’ असें म्हणतात. अमृत = अ + मृत , (No Death) . याचाच अर्थ असा की, स्वर्गप्राप्ती झाल्यास जन्ममरणाचा फेरा वाचतो, व perpetual ‘life’ (in a higher- state-of-existance) प्राप्त होतें.

त्या अर्थानें आपल्याला आत्मिक उन्नयन हवें आहे काय ?

 • मोक्ष –  मोक्ष म्हणजे, ‘सर्वसुख’ मिळणें , The Ultimnate Happiness प्राप्त होणें ,

         व तीच स्थिती सदैव कायम रहाणें.

 • मोक्ष म्हटलें की ‘मुक्ती’ ; मोक्ष म्हटलें की ‘जन्ममरणाचा फेरा’ संपणें, असेंही आहे. (म्हणजेंच, त्यासाठी, पुनर्जन्म या संकल्पनेवर आपला विश्वास हवा).

या limited अर्थानें तरी, स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही, एकच गोष्ट साधतात, (they achieve the same thing).

*थोडक्यात काय तर, आत्मिक उन्नयन हें, मोक्षप्राप्तीसाठी असूं शकतें, म्हणजेच, तें, –

– ‘The Ultimnate Happiness’ मिळणें व the same state perpetually unchanged रहाणें ;  तसेंच,

– जन्ममरणाच्या फेर्‍याबाहेर जाणें, सुटणें ;

– या पृथ्वीवरील सर्व दु:ख-क्लेश यांपासून कायमची मुक्ती मिळणें ,

या ध्येयासाठी असूं शकतें.

[ टीप – इथें हें ध्यानात ठेवणें आवश्यक आहे की, कांहीं धर्म / पंथ पुनर्जन्म मानत नाहींत, जसें की बौद्ध धर्म, इस्लाम इत्यादी. त्यामुळे, त्या धर्मानुयायांसाठी ही संकल्पना अस्तित्वात नाहींच. म्हणून, ‘पुनर्जन्म टाळण्यांसाठी आत्मिक उन्नयन’ हें लक्ष्य (objective, goal) , हिंदु धर्मीयांसाठीच होऊं शकतें. ].

 • निर्वाण – खरें तर, निर्वाण ही संकल्पना हिंदु धर्मात दिसत नाहीं, तर तौ बौद्ध धर्मात दिसते.

निर्वाण म्हणजे, absence of sorrow, absence of misery, absence of pain, दु:खाचा संपूर्ण अभाव, असें आहे.

– आपण कदाचित् असें म्हणूं की, ‘सर्वसुख-प्राप्ती’ आणि ‘दु:खांचा संपूर्ण अभाव’ हें दोन्ही एकच (the same) तर आहे. पण वस्तुत: तसें नाहीं.

– हा मुद्दा जाणून गेण्यांसाठी आपण मानसशास्त्रातील McGregor याच्या ‘Satisfiers and Dissatisfiers’ यांनी मांडलेल्या थिअरीकडे एक नजर टाकूं या.

# मॅक्ग्रेगॉरची थिअरी

@ सॅटिस्.फायर्स् – Satisfiers – हे घटक हजर असले तर आनंद मिळतो ; पण जर नसले तर कांहीं बिघडत नाहीं.

@ डिस्-सॅटिस्.फायर्स् – Dissatisfiers – हे घटक हजर नसले तर दु:ख होतें, क्लेश होतात ; पण जर हजर असले तर कांहींही एक्स्ट्रा (extra) फायदा होत नाहीं.

-याचा अर्थ असा की, Satisfiers व Dissatisfiers , हे इथें एकमेकांच्या-उलट-अर्थाचे शब्द नाहीत (words having oppoasite meaning नाहींत) ; तर ते एकाच contimuum ची दोन opposite  टोकें (ends) आहेत.

– त्यामुळे, हें ध्यानांत घ्यायला हवें की,

@ ‘Absence of दु:ख, sorrow, pain’ म्हणजेच ‘Presence of सुख’, असें नाहीं.

@मोक्ष आणि निर्वाण हे दोन्ही एकच concept नाहींत (not the same).

 • त्यामुळे, हा विचार योग्यच आहे की, आत्मिक उन्नयन हें निर्वाणासाठी करायचें काय ?

 

 • ब्रह्मज्ञान

ब्रह्मज्ञान प्राप्त होणें ही सहज साधणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी आत्मिक उन्नती फार वरच्या पातळीवर असायला हवी (असें म्हणतात).

– परंतु, असाही प्रश्न उठतो की, ब्रह्मज्ञानप्राप्ती झाल्यावर पुढें काय ? Is it an ‘end ’ in itself ( i.e. end of the quest), or is it a ‘beginning ’ for something much higher?

 

 • परमेश्वरप्राप्ती –

ही आत्मिक_उन्नती, परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी आहे काय ? ( अर्थात्, इथें केवळ ‘सगुण ब्रह्म’च ग्राह्य धरावें लागतें).

ब्रह्मज्ञान प्राप्त होणें काय, किंवा ईश्वराशी एकरूप होणें काय, ती उनन्नयनाची The Ultimate,

  The Highest पायरी समजायची कां ?

 

*तसें असेल तर, ब्रह्मज्ञानप्राप्ती / परमेश्वरप्राप्ती हेंच आत्मिक उन्नयनाचें अंतिम लक्ष्य,

  अंतिम ईप्सित ( The ultimate Objective, Goal ) म्हणायला हवें.

{ टीप – कांहीं प्रश्न

 • ‘संजीवन समाधी’ (उदा. – ज्ञानेश्वर) ही परमेश्वराशी / ‘ब्रह्म’शी एकरूप होण्यांसाठी असते काय?

–  ‘अखंड समाधी’ असाही शब्दप्रयोग रूढ आहे. अखंड म्हणजे खंडित न होणारी, perpetual.

अष्टांगयोगात सांगितल्याप्रमाणें, ‘समाधी’ ही अंतिम पायरी आहे. (यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधि ).

(असा, योगसूत्राद्वारें, आपल्याला गीतेचा व समाधीचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध जोडतां येतो).

 • त्या समाधी-अवस्थेत जाण्यासाठी गुरु लागतो काय ?

-(ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी ज्ञानदेवांनंतर समाधी घेतली होती , त्यामुळे त्यांना ज्ञानेश्वर-समाधीच्या समयीं प्रत्यक्ष_स्वानुभवानें_प्राप्त ज्ञान नव्हतें. तर मग, तसें ज्ञान निवृत्तीनाथांना त्यांचे स्वत:चे गुरु गहिनीनाथ यांनी दिलें होतें काय?, (जे ज्ञानदेवांचे परात्पर-गरु होते) .

@परात्पर गुरुच्या ज्ञानाच्या एखाद्याला कितपत उपयोग होतो ?

– ज्याला ‘सहज समाधी’ असें अभिधान आहे, तें कितपत सहाज-साध्य आहे, व ती साध्य करून परमेश्वराशी एकरूप होतां येईल काय ? } .

 • भाग-३-फ

‘मी’ –

 • ‘मी कुणाला शरण जाऊं ?’ या वाक्यातील सर्वाधिक महत्वाचा शब्द आहे – ‘मी’ .

या वाक्याचा कर्ता , म्हणजेच या कृतीमागील कर्ता , ‘मी’ हा आहे. हा जो ‘मी’ आहे, तो आपापल्या_स्वत:च्या_विश्वाचा केंद्रबिंदु आहे.

 • कुणाला तरी संपूर्ण शरण जाणें ( गुरु/धर्म/गॉड्) , म्हणजे आपलें स्वत्व, आपलें ‘मी’पण संपूर्णपणें बाजूला ठेवणें. विसरणें.

-( टीप-  हें किती लोकांना मान्य असेल ? आणि तरीही, त्यांना उन्नयन करायचें असल्यास, तर काय ? ) .

-(मग, प्रश्न असा की, जर ‘मीपण’च उरलें नसेल,  तर मग हें उन्नयन करणारें आहे कोण, आणि तें कुणासाठी? )

– प्रश्न – मग, शरणागती याचा अर्थ असा घ्यायचा कां, की ती संपूर्ण शरणागती नसेल, तर ती, आपला अहंकारावर control करण्यांपुरतीच असेल.

**

भाग-४

मी काय_करावें ?

 

 • (४-अ)
 • इथेंही ‘मी’ हा कर्ता आहे, आणि तो वाक्याचा महत्वपूर्ण भाग आहे. या ‘मी’ बद्दल चर्चा आपण आधी केलेलीच आहे.
 • ‘काय_करावें’ हा त्यातल्या त्यात general प्रश्न झाला. (as compared to – ‘मी कोणाला शरण जाऊं?’ जो जास्त specific आहे ).
 • ‘काय करूं’ ( किंवा ‘कोणाला शरण जाऊं’) असा विचार मनांत येणें म्हणजे ‘संभ्रमित अवस्था’ (indecision), हें खरें ; पण प्रत्येक वेळी, संभ्रम leads to or signifies desperation or depression, असें कांहीं नाहीं .

-(अर्जुनाचा संभ्रम हा तसा मोठाच म्हणायला हवा, कारण त्यानें शस्त्रें खाली ठेवलीं होतीं , पण आपण, केवळ_अर्जुनाचाच विचार ध्यानांत  घेत नाहीं आहोत, तर , त्या अनुषंगानें, generally speaking अशा प्रकारचा विचार करत आहोत ) .

– ‘संभ्रम म्हणजे necessarily depression असें नव्हे’, हा एक महत्वपूर्ण विचार आहे.

-त्यामुळे, indecisive अवस्थेत, Decision-making, निर्णय घेणें , ही गोष्ट महत्वाची ठरते. आणि, जर depression नसेल, तर मग, हा निर्णय विचारपूर्वक घेतां येणें शक्य असतें.

 • हे विचार, भावनाधिष्ठित विचार असूं शकतात, अथवा बुद्धि-अधिष्ठित विचार असूं शकतात.
 • म्हणून, वर म्हटल्याप्रमाणें, हें ध्यानात घेणें आवश्यक आहे की, ‘मी काय करूं?’ याचें उत्तर भावनिक रीत्या, सश्रद्धरीत्या (श्रद्धा ही एक भावनाच आहे, पण specific) , किंवा बुद्धिप्रामाण्यानुसार शोधतां येऊं शकतें.

 • (४-ब)
 • Having stated the above, आतां, हें स्पष्ट आहे की, या प्रश्नाचें उत्तर धोधण्याची प्रत्येकाची वाट भिन्न भिन्न असूं शकते.
 • सश्रद्ध माणूस शरण जाण्याचा विचार करतो आणि त्या अनुषंगानें ‘कोणाला शरण जाऊं?’ असा विचार करतो.
 • {{ टीप – संभ्रमित मनाला श्रद्धेद्वारा कसें ‘बरें’ वाटतें याबद्दलचें नवीन संशोधन –
 • ( संदर्भ – लोकसत्ता , दि. २०.०३.१९ ) – “ज्या वेळीं …. नामस्मरण , एखादा मंत्र … एखादं प्रतीक, विशिष्ट पुस्तक, ज्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, ज्याचं आपण स्मरण करतो, त्या वेळेला ‘ऑक्सिटोसिन’ हें रसायन मेंदूत तयार झालेलं असतं (तयार होत असतं) , आणि ‘आतां सर्व कांहीं नीट होणार’ अशी भावना मनात तयार होते, — विश्वासाची भावना तयार झालेली असते… .  असाही अनुभव … की …. प्रत्यक्ष कोणीही मार्ग दाखवायला आलेलं नसतं; गोंधळ आणि ताण या गोष्टी या रसायनामुळें दूर  सारल्या जातात , मळभ दूर होतं. …. (त्यानंतर आपण लॉजिक आणि अनुभव वापरतो) .. समोरची वाट दिसायला लागते.”  }} .

 

 • बुद्धिप्रामाण्यवादी, निरीश्वरवादी, rationalist, aethist माणूस याचें उत्तर आपापल्या बुद्धीनुसार शोधूं पहातो. याच्या दृष्टीनें हें उत्तर त्यानेंच स्वत: शोधायचें असतें, कुणाला शरण जाऊन नव्हे.
 • असा हा, diametrically opposite प्रवास असूं शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ( व प्रवृत्ती) , हें खरेंच आहे.

प्रत्येकाच्या दृष्टीनें, त्यानेंत्यानें शोधलेलें उत्तर हेंच खरें (unless proved wrong) .

 

**

 

भाग-५ :  सारांश –

 • या गलबल्यातून बाहेर पडून उत्तर शोधणें सोपें नाहीं. एक तर, कुणावर तरी संपूर्ण विश्वास टाकून त्याप्रमाणें करत जाणें ; किंवा, आपापल्या बुद्धीनुसार याचें उत्तर शोधून त्याप्रमाणें वागणें , एवढेच alternatives शक्य आहेत.
 • त्यामुळे, याचें सर्वांसाठी एकच एक ( only one and the same) असें उत्तर संभवत नाहीं.
 • मात्र एक असूं शकतें , आणि तें हें की , वेगवेगळ्या मार्गांनी जाऊनही तेंच (the same) ईप्सित साध्य करतां येऊं शकतें.
 • यात मी (आपण स्वत:) कुठें बसतो, हें ज्यानेंत्यानें ठरवायचें असते.

 

 • अंतत:

– याबद्दलचा निर्णय ज्यानें त्यानें आपापला घ्यायचा असतो (आत्मने आत्मनो बंधु: ) ;

आणि ती गोष्ट ; संस्कृती, रिलिजन (मानणें वा न_मानणें), परंपरा (आणि, तिच्याशी व्यक्तीची बांधिलकी), beliefs-system, श्रद्धा (असल्यास), बुद्धिप्रामाण्य (तसें मानत असल्यास), ‘ईश्वर_मानणें’-vis_a_vis-‘निरीश्वरवाद’ (Aethism), इत्यादी बाबींवर

अवलंबून असते.

+++

– सुभाष स नाईक.

 

ADDENDA TO THE MINOGRAPH

या ‘थॉट-प्रोसेस्’मध्ये कसलाकसला विचार झालेला नाहीं ; व्हायला हवा

 • खरें तर, हा विषय बहुआयामी आहे. या monograph मध्ये अजून बर्‍याच गोष्टींचा, धर्मांचा, पंथांचा, तत्वज्ञानचा, परंपरांचा, कांहीं अंशीं तरी विचार होणें गरजेचें होतें. (नुसता नामोल्लेख पुरेसा नसून, त्यांची philosophy काय, परंपरा काय, वगैरेंच्या आधारें कांहीँ विचार यायला हवा होता).

 

 • उदा., ही यादी
 • हिंदु फिलॉसॉफीमधील कांही-
 • वैदिक तत्वज्ञान ( जें की उपनिषदीय तत्वज्ञानच्या आधीचें आहे)
 • रामानुजाचार्यांचें विशिष्टाद्वैत
 • सगुण भक्ती म्हटली तर –

-शैव – दक्षिणी शैव पंथ , काश्मिरी शैव पंथ

-नाथपंथ

-वैष्णविझम् –

– वल्लभाचार्यांचा भक्तिपंथ

– वारकरी पंथ

– मीरेची मधुरा भक्ती

– चैतन्य महाप्रभु

-राधा-कृष्ण प्रेम  –

– भौतिक पातळीवरील , आणि

– आध्यात्मिक पातळीवरील

-याबाबत, संतांच्या उदाहरणांतून काय बोध घ्यायचा ? –

उदा. गुलाबराव महाराज यांची ‘आंधळी गौळण’ .

-दत्तभक्तीचा पंथ

-गाणपत्य

-इत्यादी.

 • तांत्रिक, कापालिक – जे sex आणि तशाच इतर pratices च्या वापरातून, व त्यांतून बाहेर पडून, उन्नयन करूं पहातात.

(टीप – आचार्य रजनीस — ओशो — त्याच्या ‘संभोग से समाधि तक’ या विचारात, माणसाची भौतिक स्तरापासून ते आध्यत्मिक स्तरापर्यंत प्रगतीबद्दल बोलतात. अर्थात्, ते तंत्रविद्येच्या अनुषांगानें बोलत नाहींत).

 

 • अन्य धर्मीयांचें

याला आपण अल्पस्वल्प स्पर्श केला आहे, मात्र बरेंच बाकी आहे.

(अ)

 • जैन फिलॉसॉफी – श्वेतांबर पंथ (तेरापंथी) , दिगंबर पंथ
 • बौद्ध – (थेरावाद) –

-महायान पंथ, हीनयान पंथ

– नवबुद्धिझम् (Neo-Buddhism)

 

– बौद्ध धर्म हा जगातल्या बर्‍याच इतर देशांमध्ये पसरलेला आहे.

तेथील फिलॉसॉफी – जसें की, जपानी, चिनी, थायलँडची, कंपुचियन वगैरे .

(ब)

 • पारसी – अवेस्तावादी, झोरास्टरियन्स् .

 

 • ज्यू (यहुदी) धर्म – यात पूर्वी सेन्हॅद्रिन, एसेनीज् , फारिसीज् वगैरे पंथ होते.

– (ते आज अस्तित्वात आहेत की नाहींत ?)

-त्यांची फिलॉसॉफी

 

 • इस्लाम – सुन्नी, शिया .

– सूफी – सूफी हे जरी मुस्लिम असले तरी, त्याची परंपरा ही भक्तीपरंपरा आहे, तिच्यात संगीतालाही खूप महत्व आहे.

( सूफी तत्वज्ञान हें भारतीय अद्वैतवादापासून घेतलेलें आहे, असेंही म्हटलें जातें. मात्र, सूफीझम् मधील, मज़ारपुढे झुकणें व तेथें संगीत-गायनादि अर्चना करणें, हें अद्वैतवादानुसार नाहींये).

*फारसी-उर्दूमधील –

# इश्क़े मजाज़ी ( भौतिक पातळीवरील प्रेम) ,

# इश्क़े हक़ीक़ी (पराभौतिक / आध्यात्मिक पातळीवरील प्रेम, म्हणजेच, ‘इन्सान’चें अल्लाह् वरील प्रेम )

 

 • ख्रिश्चन (ख्रिस्ती) –
 • रोमन कॅथॉलिक,
 • प्रॉटेस्टंट

–  ‘सीरियन_ख्रिश्चन’ पंथ – (केरळमधील)

–  ‘ईस्ट_इंडियन’ पंथीय (वसई भागातील) – याच्या परंपरांनुसार, कांहीं वेगळेंपण

आहे काय ?

 • कॉप्टिक ख्रिश्चन
 • उपपंथ – प्रॉस्बिटेरियन, इपिस्कोपियन, मॉरमॉन्स्, क्वेकर्स, फ्रान्सिस्कन्स्,

इपिस्कोपियन्स्, इ.

 

 • इतर – (यांचा कांहींसा उल्लेख झाला आहे) –
 • ईहवादी –

-चार्वाकपंथीय

-निरीश्वरवादी (aethists)

 • -सोशालिस्ट, कम्युनिस्ट इ. – हेतुत: यांचा उल्लेख वेगळा केलेला आहे.

(प्रस्तुत विषयांतर्गत यांचा विचार करायची आवश्यकताच नसावी).

 

 • या सर्वांचा उल्लेख करण्यांचें कारण असें की, वरील कुठलेंही तत्वज्ञान ( मोनोग्राफमधील अथवा Addenda मधील यादीतलें ) all-pervasive नाहींये .

 

 • त्यामुळे, खरें तर, विविधांगी विचारासाठी, Addenda तल्या बाबींचा / पंथांचा समावेश आवश्यक आहे.
 • मात्र, तिथें माझी कुवत कमी पडते.

– – –

सुभाष स. नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*