आम्ही स्वतंत्र आहो (काव्य)


(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )

आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो

स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”

अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता

बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो

त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो

निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही

परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं

गंगाजळीच संपे ,  हातीं कटोरा धरला

जागतीकरण मारी  देशी उद्योगाला

इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती

झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती

जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा

परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा

उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’  ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया

साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’

 

शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही

घुसती दहशतवादी, त्यांना आधार  देई

कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली

देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली

बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही

डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं

वदतो , ‘शाबास !  ऐशा  प्रगतीत देश नाहो !’ ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें

बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें

पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती

नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती

‘टोचणी’स  निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?

परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र

राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता

उघडलें दार आम्हिच, सार्‍या उगाच बाता

बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे

पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे

शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी

आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’

‘जयकार’ झाकतो की –  जन फोडतात टाहो ।।

स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

ऐसे नव्हे , कुणाला  कांहींच ठावकी ना

प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?

करण्यांस साध्य, कोणां  उरली न संधि कांहीं

लागली चटक, त्याला  रोखणें शक्य नाहीं

एकल्या-यत्नवंतां  लोभी-जगत् न दाहो ।।

‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं

सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही

चकमा न खाउं, जोखूं  अपुलेंच आपण स्वत्व

दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व

ठरवूं या  – हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।

स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

 

– – –

लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो

वज्रबाहू  : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा

(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )

 

– सुभाष स. नाईक

( M- 9869002126).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*