‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य :

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  :

व, त्या अनुषंगानें

एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें :

 

एक टिपण

विभाग

ज्ञानेश्वरांच्या भाषा-वैविध्याबद्दल ऊहापोह करण्यांसाठी, आपण कांहीं प्रश्न मांडून त्यांच्यावर चर्चा   करूं या.

 • मूळ प्रश्न : ज्ञानेश्वरीतली भाषा आणि इतर समकालीन संतांची भाषा, यांत फरक कां ?
 • उपप्रश्न : एकच रचयिता असूनही , ज्ञानेश्वरीची भाषा व हरिपाठाची भाषा यांत फरक कां ?
 • वाढवलेला उपप्रश्न :  एकच (same) रचयिता असूनही , एकीकडे ज्ञानेश्वरीची  भाषा, व दुसरीकडे ज्ञानेश्वर-रचितच हरिपाठ, विराण्या, अभंग, पदें, अशी तुलना करतां, दोन्हीतील भाषेचें ‘रूप’( style, शब्दांचा वापर, प्रतिमांचा वापर , वगैरे ) भिन्न कां ?

कांहीं आनुषंगिक मुद्दे :

 • स्पेसिफिकली, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाबद्दल अधिक विचार करायचा असल्यास, त्यांचें व त्यांच्याबद्दलचें कांहीं अंशीं तरी वाचन करणें अनिवार्य आहे. (तेव्हां, त्यांच्याविषयी नंतर कधीतरी).
 • अमृतानुभवाचें काय ? ( मूळ नांव अनुभवामृत ). आणि चांगदेवपासष्ठी ? ज्ञानेश्वरांबद्दल भाषिक विचार करतांना, या दोहोंच्या भाषेचाही विचार करायला हवा. ( त्यांच्याविषयीसुद्धा नंतर ).
 • तसेंच, त्याकाळातील यादव-दरबारातली भाषा, महानुभावीयांची भाषा, भाषेच्या-बेसिक्-स्वरूपात- झालेलें-ट्रान्झिशन् , यांचाही विचार करायला हवा.
 • त्याचप्रमाणें, ज्ञानदेवांवर प्रभाव पाडणार्‍या नाथपंथ, हठयोग, एकेश्वरवाद, अद्वैतवाद, द्वैतवाद, भक्तिपंथ, यांच्यातही कांहीं अंशीं तरी जायला हवें —- (आध्यात्मिक दृष्टीने न जमलें तरी, वाङ्मयीन दृष्टीनें).
 • ज्ञानेश्वरांच्या भाषेचा विचार करतांना, ज्ञानेश्वरकालीन ‘देशी’ ( म्हणजे, तत्कालीन मराठी ) भाषेचाही basic विचार करायला हवा . त्याबद्दल, नंतर ).

 

 • एक मूलभूत प्रश्न उठतो , तो हा की –  एकच (सेऽमsame ) व्यक्ती, जसें की ज्ञानेश्वर, आपल्या विविध रचनांमध्ये, भाषेचें भिन्नभिन्न स्वरूप कां वापरते ?

 

 • याचा विचार भाषिक अंगानें करायचा असल्यामुळे, तूर्तास आपण ज्ञानेश्वरांच्या ‘संत’ या रूपास आध्यात्मिक अंगानें analyse करण्याचा, विश्लेषण करण्याचा , विशेष असा प्रयत्न न करतां, ज्ञानदेव या त्यांच्या साहित्यिक’ रूपाकडे (भूमिकेकडे) बघूं या , आणि पाहूं या कांहीं उत्तर मिळतें कां .

 • त्या विवेचन-विश्लेषणासाठी, आपण तूर्तास आपला प्रश्न Re-phrase करूं या , वेगळ्या शब्दांमध्ये त्याची मांडणी करूं या –

ज्ञानेश्वरांव्यतिरिक्त असे कोणी साहित्यक , किंवा अन्य क्रिएटिव्ह व्यक्ती , आहेत कां, जे आपल्या साहित्यात , किंवा क्रिएटिव्ह आर्टमध्ये,  भिन्न भिन्न रूपें वारपतात ?

 • या प्रश्नाच्या उत्तरादाखल ( भिन्नभिन्न रचनाकारांचें — साहित्यिकांचे, व कांहीं अन्य क्षेत्रांमधील ‘क्रिएटिव्ह’ — सृजनशील — व्यक्तींचे ) जेवढे supportive मुद्दे , ( Or, otherwise), मिळतील, तेवढे ज्ञानदेवांच्या भाषेबद्दलचें उत्तर शोधणें सोपें जाईल.

विभाग 

 • यासाठी आपण कांहीं उदाहरणें पाहूं या.

पुढें, शक्य तिथें कोट्स्’ (quotes) दिलेले आहेत.  ( इतर कोट्स् नंतर सामील केले जातील ) . मुद्दा महत्वाचा ; कोट्स् हें त्यासाठी ‘सपोर्टिव मटीरियल’ आहे.

 

 • प्रथम एक जनरल् उदाहरण पाहूं या. –  मध्ययुगात ( त्यातील इ.स. चें १४ वें ते १८ वे शतक या काळात), मराठी भाषेतील गद्याचें स्वरूप आणि आणि पद्याचें स्वरूप ही दोन्ही भिन्न भिन्न होतीं. दिल्ली-सुलतानियत, दक्षिणेतील शाह्या व मुघल पातशाही या राजवटींच्या प्रभावामुळे, मराठी भाषेत फारसी शब्दांचा प्रचुर शिरकाव झाला. त्याकाळच्या राजकीय गद्यात तर फारसीचा प्रचंड प्रभाव दिसतोच. मात्र, पद्य-साहित्यात, त्यामानानें फारसी शब्दांची घुसखोरी बरीच कमी होती, व म्हणून पद्यें आपल्याला त्यातल्या त्यात मराठीच्या शुद्ध स्वरूपात दिसतात. (लावण्या, हा अपवाद). अन्य लोकगीतेंही बर्‍याच शुद्ध स्वरूपात आढळतात.

(अर्थात् हा ज्ञानेश्दवरांच्या नंतरचा काळ होय).

 • मध्ययुगीन काळात संस्कृतमध्येही रचना होत होत्या. मराठी रचनाकार पाहिले तर, शिवभारत, पर्णाल-पर्वताख्यान, राधामाधवविलासचंपू अशी संस्कृत काव्यें त्या काळीं लिहिली गेलेली आहेत. नीळकंठानें बनारसला राहून, महाभारताच्या विविध हस्तलिखित प्रती जमवून महाभारताची ‘नीळकंठी’ प्रत तयार केली, जी महाराष्ट्रात प्रमाण मानली जाते ( किमान, भांडारकर इन्स्टिट्यूटची संशोधित आवृत्ती येईतों तरी, ती तशी मानली जात असे ). म्हणजेच, तत्कालीन ‘उच्चशिक्षित’ जनांना संस्कृत उत्तम येत होती, आणि त्याचा, त्यांच्या पद्य रचनांवर परिणाम झालेला दिसतो. ( वर उल्लेख केलेली मंडळी / रचना सुद्धा ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळातील आहेत).

या रचना करणारी मंडळी सरकारी सेवेत असल्यामुळे, त्यांना दखनी-हिंदी (म्हणजे नंतरच्या काळात जिला रेख़्ता / उर्दू म्हणून संबोधलें गेलें, ती भाषा) , तसेंच फारसीचें उत्तम ज्ञान होतें, आणि साहजिकच तत्कालीन गद्यलेखनाचा हेतू भिन्न असल्यानें, गद्याची भाषाही पद्यापेक्षा भिन्न होती. (उत्तर-हिंदुस्तानातील हिंदी-पट्ट्यातही असेंच होतें. त्याकडे आपण नंतर थोडेसें वळणार आहोत. )

उदा. – एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी (ज्यांनी एकनाथांच्या लहान वयातच त्यांना ज्ञानेश्वरी ‘ऐकवली’ —–  उकलून ‘शिकवली’ असें म्हणूं या ) , हे तर देवगडच्या किल्ल्यावर सरकारी नोकरीत होते. एकनाथांना स्वत:ला उत्तम फारसी येत होती (त्यांना उत्तम संस्कृत भाषा येत होती, हें तर सांगायलाच नको). संस्कृत ग्रंथ ‘शिवभारत’ चे रचयिते कवीन्द्र परमानंद शिवरायांच्या पदरीं होते ; राधामाधवविलासचंपू व पर्णालपर्वताख्यान ( पर्णालपर्वत म्हणजे पन्हाळा) रचणारे जयराम पिंड्ये हे शाहजी राजांच्या पदरी होते, व त्यांना चौदा भाषा येत होत्या. ‘नलदमयंतीस्वयंवराख्यान’चे रचयिते रघुनाथ पंडित हेही शिवरायांच्या पदरी होते (ते रचयिते म्हणजे रघुनाथपंत हणमंते की रघुनाथ पंत ‘पंडितराव’ या वादानें आपल्या analysis मध्ये कांहीं फरक पडत नाहीं). पेशवे काळातील अमृतराय हेही राजकीय स्वरूपाच्या नोकरीत होते. त्यांना फारसी उत्तम येत होती.

विभाग

आपण कांहीं व्यक्तींकडे नजर टाकूं या.

विभाग

 • एकनाथ : आपण एकनाथांच्या काव्यसंपदेकडे एक नजर टाकूं या.
 • नाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील कांहीं भाग पाहूं –

‘बाबा आदम माया हवा (म्हणजे हौव्वा, ईव्ह) जाली । ती म्हणतां तुम्ही सैतानें नेली । …..

पांच वख्त खुदाचे जाले । बाकी वख्त काय चोरीं नेले ? …

तुरुक कहे वो बात सही । खुदाकु तो जात नहीं ।

बंदे खुदाकु नहीं जदाइ । वो कहे रसूलिल्ला हजरत परदे । …’

 • यादवकालीन भाषेचे आणि मध्ययुगीन संतसाहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. शं. गो. तुळपुळे म्हणतात की, ‘सरकार-दरबारचे रीतिरिवाज नाथांना चांगले परिचित होते. …  देहगांवचे किंवा शरीरगांवचे सुभेदार जिवाजीपंत आणि ब्रह्मपुरीचे सरकार आत्मारामपंत या दोघांतील अभयपत्रें, ताकीदपत्रें, अर्जदास्ती, जाबचिठ्ठ्या, कीलनामे इत्यादी नाथांनी लिहिली (आहेत) . ही रूपकें म्हणजे फारसीमिश्रित मराठी गद्याचा सुंदर नमुना आहे’.

त्यातील कांहीं भाग –

‘समस्त राज्यकर्ते धुरंधर, परगणे शरीराबाद सुभा, ताकीदपत्र दिधलें की कायापुरास जिवाजी नामें गृहस्थ. ……. त्यानें  बंदोबस्त परगणा बुडविला आणि यमाजीपंत कमाविसदार यांचे घरीं एकांतस्थळ स्थापन केलें. त्यावरून हें ताकीदपत्र सादर केलें कीं नवीन मसुदे व कामगार आहेत ते त्यागावे. …. सरकार हुजुरांचे मुत्सद्दी कामगार आहेत,  तर त्यांचें हातें काम घ्यावें. ….. बहुत काय लिहिणें ? हें ताकीदपत्र.’

 • नाथांच्याच ‘भागवतटीके’चा कांहीं भाग पाहूं –

‘तैं अविद्येची जुनी पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।

नवपल्लवीं विराजमानें । विरतृक्तपणें अनुरक्त ।।  ……

सद्.भावाच्या आमोदधारा । सेवितां सुख जालें भ्रमरां ।

हृदयकमळीं केला थारा । मध्यमद्वारां चालिलें ।। ….

तेथें मोक्षसुखाचें धड । डोलतां दिसे अतिगोड ।

तेथें जीवाचें पुरत कोड । करिती घुमाड सोहं शब्दें ।। ….

मुमुक्षुमयूर अतिप्रीतीं । पिच्छें पसरूनि नाचती ।

येऊन वसंतवनाप्रती । टाहो फोडिती गुरुनामें ।। …’

*हें वाचून ज्ञानदेवांची आठवण येते. ( आणि तें स्वाभाविकही आहे, कारण एकनाथांच्या मनात ज्ञानेश्वरांबद्दल अपार श्रद्धा होती. ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनीच, तिच्यातील क्षेपक काढून, शुद्ध केली ; आणि आज वारकरी पंथ त्याच प्रतीला मान्यता देतो. )

 

एकनाथी भागवतातील,

‘संस्कृतवाणी देवें केली । प्राकृत काय चोरापासौनि जाली ?

असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ?’

हे तर ज्ञानदेवांच्या मराठी भाषेच्या अभिमानासारखेंच बोलणें आहे ; फक्त तत्कालीन परिस्थितीनुसार, अधिक स्ट्राँग .

 

*डॉ. तुळपुळे म्हणतात, ‘या दोन सत्पुरुषांत (ज्ञानदेव आणि एकनाथ) कालानें जरी तीनशे वर्षांचें अंतर असलें तरी दोघांची हृदयें मात्र एक आहेत.’

 

 • रुक्मिणीस्वयंवर‘ या आख्यानाचा विषय असा आहे की, त्यामुळे त्यातील भाषाही वेगळें रूप घेतें. –

 

 

हें श्रीकृष्णाचें वर्णन पहा-

‘अतिसुरंग चरणतळें । उपमे कठिण रातोत्पळें ।

बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टांचांची ।। …

सुनील नभाचिया कलिका । तया आंगोळिया देखा ।

वरि नखें त्या चंद्ररेखा । चरणपीयूषा लुब्धल्या ।। …’

याच ग्रंथात पुढे रुक्मी जेव्हां कृष्णाबद्दलच्या द्वेषानें बोलतो, तेव्हां भाषेचें वेगळें वळण पहा –

‘एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा ।

ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ।।

मुळीच नाहीं जन्मपत्र । कवण जाणें कुळगोत्र । … ’

( त्यातूनच, पुढे एकनाथांनी पारमार्थिक अर्थही आणलेला आहे ).

 

 • हेच एकनाथ जेव्हां पदें, भारुडें, गौळणी, गोंधळ, जोहार, ‘डौर’ लिहितात, तेव्हां त्यांची भाषा वेगळें रूप घेते . ( त्यांतूनही, एकनाथांनी पारमार्थिक अर्थ आणलेला आहे ) . कांहीं उदाहरणें बघूं      या  –
 • असा कसा देवाचा देव बाई ठकडा ग । देव एका पायानें लंगडा ग ।।
 • वारियानें कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।

राधा पाहुनि भुलले हरि । बैल दुभे नंदाघरीं ।।

हरि पाहुनि भुलली चित्तां । राधा घुसळी डेरा रिता । …..

 • कृष्णा माझा पदर धरूं नको, सोड ।

जाउनि सांगेन मी यशोदेला । मोडिन चांगली खोड ।।

 • दार उघड बया दार उघड । ….

रणवाद्य भम् भम् भम् । दण् दण् दण् कड् कड् कड् ।

तोच गोंधळ अंबे तुजप्रती । बया दार उघड ।।

 • उदो म्हणा उदो पांडुरंग माउलीचा वो ।

तुझियेनि नामें गोंधळ घालिन सत्वाचा वो ।।

 • आलें धरा, ढवळा धरा, मासा धरा, बांदी धरा ।

जातें धरा, मेंढा धरा, बेटकुळी धरा । …

 • मी आलों रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ।।
 • जोहार मायबाप जोहार । मी विठू पाटलाचा महार ।

हिशेब देतो ताबेदार । लंकेचा कारभार कीं जी मायबाप ।।

 • शंखिण बाबा डंखिण रे ।।

हाट करूनि घरासि आणली बसली वसरिच्या काठीं रे । …

 

या प्रकारच्या रचना एकनाथांनी, सामान्य जनांनी गाव्यात अशा प्रकारेंच लिहिल्या आहेत , (आणि त्यांतून पारमार्थिक ज्ञानही दिलें आहे). आजच्या ‘आधुनिक’ काळातील किती माणसांना एकनाथांच्या, say, ‘रुक्मिणीस्वयंवर’ काव्यातील बारकावे माहीत असतील’ ? ;  मात्र मराठी जनांना ‘बया दार उघड’ हें पद नक्कीच माहीत आहे.

 

*एकनाथांच्या कुठल्याही काव्याला कमी लेखायचा येथें हेतू नाहींच. जिजाबाई आणि शिवाजी राजे एकनाथांचें ‘भावार्थ रामायण‘ इत्यादी, पुराणिकांकडून वाचवून घेत होते (असें म्हणतात) ;  व त्या काव्यांचा शिवबांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असला पाहिजे. यावरून त्या काव्यांचें श्रेष्ठत्व आणि त्यांची महती कळून येते.

* एक मुद्दा :  पण, मुद्दा हा, की, कुठलेंही काव्य गाणें (सुरात म्हणणें) हें, अर्धशिक्षित-अशिक्षित जनसामान्यांसाठी नक्कीच सोपें आहे, त्यामुळे तशा प्रकारच्या रचना एकनाथांनी (तसेंच ज्ञानदेवांनी व इतर संतांनीही) केल्या.

*अर्थातच, एकनाथांनी निरूपणातील भाषेपेक्षा, आणि ‘पंडिती’ पद्धतीचे वर्ण्यविषय असलेल्या व तशी मांडणी असणार्‍या पारंपरिक पद्धतीच्या आख्यानकाव्यातील भाषेपेक्षा,  अभंग, भजनें, भारुडें, गोळणी इत्यादींमध्ये भाषेचें वेगळेंरूप’ (style), हेतुत: वापरलें.  त्याचें कारण म्हणजे, त्या पद्धतीच्या रचनांचा audience सामान्य अर्धशिक्षित-अशिक्षित माणूस आहे व तें गायलें जाणार आहे (सुरात म्हटलें जाणार आहे) . मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांचें प्रबोधन करायचें आहे, हा नाथांचा हेतू होता.

विभाग

 • तुकाराम :

तुकारामांनी वापरलेला काव्यप्रकार म्हणजे मुख्यत: अभंग. तसेंच, त्यांना एकाच तर्‍हेचा ऑडियन्स् अपेक्षित आहे. त्यामुळे, त्यांच्या भाषेची स्टाइल् (शैली) अपेरंटली सारखीच दिसते. तरीही, कांहीं फरक आढळतात.

 • ही भाषा पहा –
 • ‘फोडिलें भांडार । धन्याचा हा माल ।

मी तंव हमाल । भारवाही ।।

 • एक पाहतसां एकाची दहनें ।

कां रे त्या गुणें सावध न व्हां ?

 • घोंटवीन ज्ञान । ब्रह्मज्ञान्याहातीं ।

मुक्ता आत्मस्थिती । सांडवीन ।।

 

 • तुका म्हणे होय । मनासी संवाद ।

आपुलाचि वाद । आपणांसी ।।

 • सोनियाचें ताट । क्षीरीनें भरिलें ।

भक्षावया दिलें  । श्वानालागीं ।।

 • हेच तुकाराम रोखठोक, अश्लील, ग्राम्य वाटेल अशी भाषा वापरायलाही कचरत नाहींत.
 • परपुरुषाचे सुख । भोगे तरी ।

उतरोनि करीं । घ्यावें सीस ।।

इथें, पारमार्थिक रूपक वापरतांनाही ‘विवाहबाह्य शारीरिक संबंधा’बद्दलचा दृष्टान्त तुकारामांनी वापरलेला आहे.

*(२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळच्या, पुण्याच्या, अश्लीलतेविरुद्ध ओरडा करणार्‍या ‘मार्तंडांना’ असा उल्लेख खचितच पटला नसता ! ज्या ‘मार्तंडां’नी माधव ज्यूलियन यांच्या प्रेमकवितांविरुद्ध रान उठवले, त्यांनी तुकारामांच्या अशा काव्याचें काय केलें असतें ? खालील अभंग तर त्यांनी खचितच पुन्हां इंद्रायणीत बुडवले असते ! ).

 • शृंगारिलें मढें । जीवेवीण जैसे कुडें ।।

आपल्या अभंगात ‘मढें’ हा तद्दन ‘colloquial’ व ग्राम्य शब्द वापरायला तुकारामांना आक्षेपार्ह असें कांहीं वाटलें नाहीं.

 • तुका म्हणे रांड । न करितां विचार ।

वाहुनिया भार । कुंथे माथा ।।

‘रांड’ हा शब्दही असाच आहे. तो बोलीभाषेत सहज वापरला जात असला, शिवी म्हणूनही वापरात असला, तरी त्याचा वापर करण्यांस तुकाराम कचरले नाहींत.

 • भले तरी देऊं । गांडीची लंगोटी ।

नाठाळाचे काठी । हाणूं माथा ।।

*हा अभंग जेव्हां शालेय पुस्तकात घालायचें ठरवलें, तेव्हां आचार्य अत्रेंसारख्या ‘भन्नाट’ माणसानेंही काय केलें ?  ( त्यांच्या भन्नाटपणाबद्दल, त्यांचा लेख : ‘आम्हीही फार चावट होतो’ वाचावा. त्यांच्या भाषणातील ‘जें तुमच्या मनांत आहे, तें माझ्या हातात नाहीं’ हें वाक्यही प्रसिद्ध आहे. त्यांतून अत्रे यांच्या श्लीलाश्लीलतेबद्दलच्या नव-विचारांची कांहींशी कल्पना येते). हेच अत्रे तुकारामांचा हा अभंग शालेय पुस्तकात घालतांना बिचकले, त्यांनी शब्दात बदल केला, आणि ‘भले तरी देऊं कासेची लंगोटी’ अशी ओळ दिली. मात्र, तुकारामांना, आपण वापलेल्या शब्दात कांहीही अश्लील किंवा क्रूड वाटलें नाहीं, तर, तो शब्द वापरणें त्यांना योग्यच वाटलें.

 • म्हणजेच, आवश्यतेनुसार तुकारामांनी उच्चप्रतीचे शब्द व विचारही वापरले, आणि अन्यत्र ग्राम्य, अश्लील वाटणारे शब्दही वापरले. हा फरक ध्यानात घ्यावा.

विभाग  :

 • कबीर :

कबीराचा काळ हा एकनाथांच्या थोडा आधीचा आहे. ( कबिराच्या मृत्यूनंतर एकनाथांचा जन्म आहे). कबिराच्या स्वत:च्याच म्हणण्याप्रमाणें तो (रूढ अर्थानें) अशिक्षित होता. तो म्हणतो –

‘मसी कागज़ छुयो नहीं । कलम गह्यो नहीं हाथ । ( आपली मराठी संतमंडळी, चोखा मेळा, सावता माळी, जनाबाई, हीसुद्धा रूढ अर्थानें अशिक्षित होते असणार. मात्र, पारमार्थिक भक्त व संत होण्यासाठी ‘रूढ शिक्षण’ मिळालें नाहीं तरी कांहींही फरक पडत नाहीं, त्यांच्या क्रायटेरिया भिन्न आहेत). कबीरानें दोहे, साखी, पद, भजन, सबद, उलटबासियाँ, ग़ज़ल, वगैरे विविध प्रकारच्या रचना केलेल्या आहेत. आपण थोडीशी उदाहरणें पाहूं या.

खालील रचना आध्यात्मिक आहेत –

 • पंषी उड़ानी गगन कूँ , प्यंड रह्या परदेस ।

पाँणी पीया चंच बिन, भूलि गया यहु देस ।।  … (साखी)

 • जल में कुंभ, कुंभ में जल है, बाहर भीतर पानी

फूटा कुंभ , जल जलहिं समाना, यह तथ्य बुझौ गियानी ।।

 • माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय

इक दिन ऐसा आयगा, मैं रौंदूँगी तोय ।।

 • झीनी झीनी भीनी चदरिया ।
 • दुई जगदीश कहाँ तैं आयौ, कहूं कौने भरमाया ?

अल्ला राम करीम केशव हरि हज़रत नाम धराया । …

उलटबाँसी’    :    गोरखनाथ, अमीर खुसरो यांनी ‘उलटबासियाँ’ लिहिलेल्या आहेत. मात्र, सर्वाधिक प्रसिद्ध आहेत कबीराच्या.  या पारमार्थिक पण कूट रचना आहेत.

 • तरुबर पर इक मछली ब्याई

पकड़ बिलावें मुर्गी खाई ।

*(मुक्ताबाई व एकनाथ यांच्यासुद्धा अशा ‘उलटबाँसी’ पद्धतीच्या रचना आहेत).

 

आतां या सर्वांच्या तुलनेत, कबीराचे हे कांहीं दोहे पहा –

 • काँकर पाथर बाँध के मस्जिद लई चुनाय

ता चढ़ि मुल्ला बाँग दे, बहरा तेरा ख़ुदाय ?

 • मूँड़ मुंड़ाए हरि मिलै, सब कोई लेय मूँड़ाय

बार बार तैं मूँड़ते, भेड़ न बैकुंठ जाय ?

 • माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
  कर का मनका डारि दे, मन का मनका फेर ।

 

इथें कबीरानें प्रचलित परंपरा-प्रथांवर कोरडेच ओढले आहेत, त्यामुळे भाषेची tone सुद्धां भिन्न आहे.

 

कबीराची एक ग़ज़ल पहा –

 • हमन हैं इश्क़ मस्ताना, हमन से होशियारी क्या

रहे आज़ाद या जगसे हमन दुनिया से यारी क्या ।

न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े पियारे से

उन्हीं से नेह लागी है, हमन को बेकरारी क्या ।

कबीराचें पद, भजन, सबद पहा –

 • रहना नहीं , देस बिराना है ।

यह दुनिया कागज़ की पुड़िया, बूँद पड़े घुल जाना है ।।  … (पद)

 • मोको कहाँ ढूँढे बंदे, मैं तो तेरे पास में ।

खोजि होय तो तुरंत मिलिहौं पलभर की तलास में

कहें कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ बिस्वास में ।। … (भजन)

 • मन लागौ यार फ़क़ीरी में ।

आख़िर यह तन ख़ाक मिलेगा, कहाँ फिरत मग़रूरी में ?

कहत कबीरा सुनो भाई साधो, साहिब मिले सबूरी में ।। … (सबद)

पद, भजन, सबद, ग़ज़ल हे रचनाप्रकार गायले जाण्यासाठी असतात, याची पूर्ण कल्पना कबीराला होती, व त्यामुळेच त्यानें त्याप्रकारें रचना केल्या.

 

 

 • अमीर खुसरो

हा ज्ञानदेवांचा समकालीन होता. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी-स्वारीत तो त्याच्याबरोबर होता असें म्हटलें जातें. तो चार सुलतानांच्या दरबारात महत्वाच्या पदांवर होता. तसेंच, तो निज़ामुद्दीम औलिया या सूफी संताचा शिष्य होता. त्याच्या अनेक रचना फारसीत आहेत. पण ज्या कांहीं ‘हिंदुई’त आहेत व कांहीं उत्तर-भारत भूभागातील बोलीभाषांमध्ये आहेत. त्या कांहीं आपण पाहूं या.

(त्या काळीं ‘हिंदी’ हें भाषिक नाम निर्माण झालेलें नव्हतें. ‘हिंदुई’  हें नांवही खुसरोनेंच प्रथम वापरलें. हिंदुई (हिंदवी) म्हणजे, ‘हिंदची’).

खुसरोचे कांहीं दोहे पहा –

 • खुसरो पाती प्रेम की, उल्टी वाकी धार

जो उतरा सो डूब गया, जो डूबा, सो पार ।

 • खुसरो सरीर सहाय है, क्यों सोवे सुखचैन ?

कूच नगारा साँस का बाजत है दिन रैन ।

 • अपनी छबि बनाई के मैं तो पी के पास गई

जब देखी छबि पीहू की  सो अपनी भूल गई ।

 

अमीर खुसरो व कबीर यांच्या दोह्यांच्या style मध्ये विलक्षण साम्य आहे. कबीरावर सूफी प्रभाव होताच, आणि त्याला अमीर खुसरोच्या रचना माहीत होत्या असणार.

 

खुसरोची एक ग़जल पहा, जिच्यात त्यानें प्रत्येक ओळ अर्धी फारसी व अर्धी ‘हिंदुई’त लिहिली आहे –

ज़े हाल मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल, दुराये नैना बनाये बतियाँ

के ताबे हिज़्राँ नदारम ऐ जाँ, न लेहों काहे लगाये छतियाँ ।

छतियाँ, बतियाँ यावरून कुणाच्याही ध्यानात येईल की, इथें त्यानें बोलीभाषेचा उपयोग केलेला आहे (जसें उपरोक्त रचनांमध्येही त्यानें केलें आहे). मात्र इतरत्र कांहीं ठिकाणीं त्यानें हिंदुईच्या अशा रूपाचा उपयोग केला आहे, ज्याला १९व्या शतकापासून ‘खड़ी बोली’ म्हणूं लागले. ( ही भाषा खुसरोच्या काळीं दिल्ली-मेरठ या भागातील बोलीभाषा होती ).

 • बहुत कठिन है डगर पनघट की

कैसे भर लाऊँ मधवा से मटकी

मेरे अच्छे निज़ाम पिया ।

 • तीसों का सर काट लिया

ना काटा ना ख़ून किया ।   –  (कूट) …. ( उत्तर – ‘नाखून’, नखें )

 • पंडित प्यासा क्यों ?

गधा उदासा क्यों ?     –     (कूट) —- ( उत्तर – ‘लोटा न था’. इथें ‘लोटा’चे दोन अर्थ आहेत )

भिन्न प्रकारच्या रचना, वेगळ्या प्रकारची भाषा.

अशीच त्याची एक संभ्रमात्मक रचना पहा –

बखत बखत मोए वा की आस

रात दिना रहत ऊ  मो पास

मेरे मन को सब करत है काम

ऐ सखि साजन ?, ना सखि !, राम ।।

किती रंजक पद्धतीनें पारमार्थिक अर्थ दाखवला आहे .

 

कांहीं रचना त्यानें गायल्या जाण्यासाठीच रचल्या आहेत, हें स्पष्ट आहे.

( खुसरो गायकही होता. त्यानें देवगिरीचा केशव नायक याचा गायनात पराभव केला, व त्याला आपल्यासंगें दिल्लीला यायला लावलें , अशी आख्यायिका आहे).

पहा –

 • अम्मा मेरे बाबा को भेजो री – कि सावन आया

बेटी तेरा बाबा तो बूढ़ा री – कि सावन आया । ….

 • जो पिया आवन कह गए, अजहुँ न आए

अजहुँ न आए स्वामी हो ।

 

 • मोहे चीर पायो निजामुद्दीन औलिया

निजामुद्दीन औलिया, अलाउदीन औलिया । …

ही तर कव्वालीच वाटते. कव्वाली हा प्रकार सूफींनीच पॉप्युलर केला. त्यामुळे सूफीपंथाच्या खुसरोनें कव्वाली रचली तर नवल नव्हे.

*निरीक्षण : गायल्या जाण्यासाठी त्यानें केलेल्या रचनांचा ‘घाट’ ( शैली / style) भिन्न आहे, हें लगेंच ध्यानात येतें.

विभाग

कांहीं निरीक्षणें :

 • यावरून एक महत्वाची बाब स्पष्ट होते. ती अशी की, ज्याप्रमाणें, desired audience ( जसें की, सुशिक्षित, अशिक्षित,अल्पशिक्षित ;  पुरुष, स्त्रिया ;  वृद्ध ,बाल इ. ) ; रचनेचा वर्ण्यविषय ( जसें की राम, श्रीकृष्णलीला, गीता, निर्गुण-सगुण ब्रह्म, परंपरेविरुद्धच्या-समाजसुधारणा, इ.), presentation style (उदा. – कबीराच्या अध्यात्मिक रचनांची स्टाइल्, आणि त्यानें परंपरावर फटके मारले आहेत त्या दोह्यांची स्टाइल् , या दोन्ही भिन्नभिन्न स्टाइल्स् आहेत) ; निवेदनपद्धती ( जसें की, निरूपण, भाष्य / टीका, आख्यान, पठण, भजन, कीर्तन, गायन, इ. ) ;  तसेंच, ‘वाचकानें/पाठकानें शब्दांचा सरळसरळ वाच्यार्थ घ्यावा की लक्ष्यार्थ घ्यावा यापैकी रचनाकाराला काय अभिप्रेत आहे ; त्याचप्रमाणें, वाचकानें/पाठकानें रचनेत ओपनली व्यक्त केलेला अर्थ घ्यावा की अव्यक्त ( reading between the lines)’ याबद्दल रचनाकाराची काय अपेक्षा आहे ; या व अशा बर्‍याच गोष्टींवर रचनेची भाषा अवलंबून असते. तसेंच, रचनेसाठी काय काव्यप्रकार निवडला आहे (जसें की, भारूड, अभंग, ओवी, पद, दोहा, साखी, सबद, ग़ज़ल, इ.), यावरही रचनेची भाषा अवलंबून असते.

*(गायनपद्धत भाषा  हें आणखी एक detailing होईल, व त्याबद्दल आपण नंतर बोलूं).

विभाग  

 

विभाग

 • कांहीं अन्य उदाहरणें :

रहीम, वाज़िद अली शाह, इतर  –

 • रहीम (अब्दुल रहीम ख़ाने ख़ाना )

हा अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक. त्याला फारसी आणि संस्कृत दोन्ही उत्तम येत होत्या. त्यानें बाबरच्या बाबरनामाचें, बाबरच्या ‘चगताई’ भाषेतून फारसीत भाषांतर केलें. यावरून त्याची भाषांवरील पकड ध्यानात यावी. अकबराचा दरबारी हाकिम असल्यामुळे, त्याचें राजकाराभारासंबंधीचें लिखाण फारसीत, आणि दफ़्तरी रिवाजानुसार असणार. त्याशिवाय, त्यानें संस्कृतमध्ये ज्योतिषशास्त्रावर दोन ग्रंथ लिहिले. त्याच्या अन्य रचनांमध्ये घनाक्षरी, मदनाष्टक, तसेंच बरेच दोहे, सोरठे व सवैये आहेत. ज्योतिषविषयक ग्रंथातील भाषा, मदनाष्टकातील भाषा आणि पारमार्थिक दोह्यांच्या भाषेचा पोत भिन्नभिन्न असणार, हें सांगणें नकोच.

 • वाज़िद अली शाह

हा अवधचा नबाब होता. त्याचें नृत्य, संगीत, नाटक, साहित्य या क्षेत्रांत योगदान आहे. त्याला फारसी व रेख़्ता (उर्दू) उत्तम येत होत्या, व त्यानें दोन्ही भाषांमध्ये लिहिलें आहे. तो ‘अख़्तर’ हा तख़ल्लुस घेऊन काव्य करत असे. त्यानें कंपनी सरकारशी (ईस्ट इंडिया कंपनीशी)  केलेल्या पत्रव्यवहाराची भाषा, व उर्दू काव्याची भाषा यात फरक असणारच.  १८५६ मध्ये जेव्हां त्याला पदच्युत करून exile मध्ये कलकत्त्याला ठेवण्यात आलें , तेव्हां त्यानें लिहिलेली, ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ ही आर्त ठुमरी आजही सुप्रसिद्ध आहे. त्यानें लिहिलेल्या फारसी पुस्तकांतली भाषा, त्याच्या रेख़्ता (उर्दू) शायरीची भाषा आणि ‘बाबुल मोरा’ ची व्याकुळ भाषा यांत फरक असणारच , हें स्पष्ट आहे.

 • मुन्शी प्रेमचंद :

मुन्शी प्रेमचंद हे हिंदी व उर्दूतले श्रेष्ठ साहित्यिक समजले जातात. त्यांनी पद्य लिहिलें नाहीं, तर कथा व कादंबर्‍या लिहिल्या. प्रेमचंद यांची, श्रेष्ठ साहित्यिक म्हणून खासियत अशी की, त्यांची भाषा पात्राप्रमाणें बदलते. या गुणासाठी अन्य साहित्यिकांनी, समीक्षकांनी तसेंच वाचकांनी प्रेमचंदांची स्तुती केलेली आहे. उदाहरणार्थ, त्याच्या ‘गोदान’ या कादंबरीतील मुख्य व्यक्ती आहे ‘होरी’ नांवाचा एक शेतकरी. हा होरी बोलतो तें भाषिक रूप वेगळें, आणि होरीच्या मृत्यूनंतर घरीं बोलावलेला पंडित (भटजी) कर्मकांड, पुण्य, स्वर्ग-गमन इत्यादींबद्दल बोलून होरीचा मुलगा ‘गोबर’ याला ‘गो-दान’ करायला संगतो, त्याचें भाषिक रूप वेगळें आहे. या भाषिक भिन्नतेमुळे, प्रेमचंदांच्या कथा-कादंबर्‍या वाचकांच्या मनाचा सहज ठाव घेतात. भाषेचें वेगवेगळें स्वरूप हा प्रेमचंदांचा मोठा गुण आहे.

 • अमृतराय

१८व्या शतकातील अमृतराय हे औरंगाबादेस मुसाखोरी म्हणून मुत्सद्याच्या पदरीं नोकरीला होते. नंतर ते ईश्वरभजनाकडे वळले. त्यांना फारसीचे ज्ञान होतें. त्यांनी बरीच पदें व आख्यानें रचलेली आहेत. अमृतराय यांनी मराठी ग़ज़लही लिहिली आहे (पण, फरक एवढाच की, मत्ला दोन ओळींऐवजी एक ओळीचाच ठेवला आहे). मात्र त्यांनी ती रचना पारमार्थिक विषयासाठी केलेली आहे. नोकरीत असतांनाचा मुलकी व राजकीय स्वरूपाचा लेखनव्यवहार याची भाषा आणि पारमार्थिक पदें-आख्यानें यांची भाषा यात फरक तर असणारच.

 • नाना फडणवीस

नानांनी पानिपत युद्धानंतर कांहीं काळानें आपलें आत्मचरित्र लिहिलें आहे. तें बहुधा मराठीतील पहिलेंच आत्मचरित्र असावें.

नंतरच्या काळात नाना हे पेशवाई राखणार्‍या मंडळींमधील अध्वर्यूच बनले. त्या काळात त्यांनी, इंग्रज, महादजी शिंदे, राघोबा दादा, दिल्ली-दरबार वगैरेंशी केलेल्या दरबारी / राजकीय पत्रव्यवहाराची भाषा  ही, त्यांच्या आत्मचरित्राच्या भाषेहून भिन्न असणार, हें उघड आहे.

 • इक़बाल

अल्लामा इक़बाल यांनी आधी उर्दूत सगळें लेखन केले. त्यांची रचना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ प्रसिद्ध आहे. मात्र, नंतरच्या काळात जेव्हां इकबाल यांना फिलॉसॉफिकल् लिहायचें होतें, तेव्हां त्यांना उर्दू अपुरी वाटायला लागली (आणि तें साहजिकच आहे, कारण उर्दूला तशी दार्शनिक परंपराच नव्हती). त्यामुळे त्यांनी तें लेखन फारसीत केलें.

 

 • एक निरीक्षण : याचा अर्थ असा की, विषयानुसार नुसतें भाषिक स्वरूपच नव्हे, तर कधी कधी लेखनात वापरायची मूळ भाषाच बदलावी लागते .

 

विभाग

 • आधुनिक कळातील कवी : निराला आणि वसंत बापट

 

 • सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ :

निराला हे विचारांनी ‘डावीकडे’ झुकलेले होते. त्यांच्या, ‘कुकुरमुत्ता’ या एका कवितेचा अंश पहा –

‘देता हुआ बुत्ता

बोला कुकुरमुत्ता

अबे सुन बे गुलाब

भूल मत गर पाई ख़ुशबू, रंगोआब,

ख़ून चूसा खाद का तूने अशिष्ट

डाल पर इतरा रहा है, कैपिटलिस्ट !’

ही आणखी एक कविता पहा, शीर्षक आहे ‘भिक्षुक –

‘वह आता–
दो टूक कलेजे के करता पछताता
पथ पर आता ।

पेट पीठ दोनों मिलकर हैं एक,
चल रहा लकुटिया टेक,
मुट्ठी भर दाने को — भूख मिटाने को
मुँह फटी पुरानी झोली को फैलाता–
दो टूक कलेजे के करता पछताता पथ पर आता ।

…..

चाट रहे जूठी पत्तल वे सभी सड़क पर खड़े हुए,
और झपट लेने को उनसे कुत्ते भी हैं अड़े हुए !’

 

आणि ही –

‘बापू, तुम मुर्गी खाते यदि
तो क्या भजते होते तुमको
ऐरे-ग़ैरे नत्थू खैरे – ?
सर के बल खड़े हुए होते
हिंदी के इतने लेखक-कवि ?’

या कवितांच्या भाषेची, त्यांच्या सरस्वतीस्तवनातील भाषेशी तुलना करावी.

‘वरदे वीणावादिनी वरदे !
प्रिय स्वतंत्र-रव, अमृत-मंत्र नव भारत में भर दे ।
……

नव गति, नव लय, ताल-छंद नव
नवल कंठ, नव जलद मंद्र रव
नव नभ के नव विहग-वृंद को नव पर, नव स्वर दे ।’

भाषिक तुलनेसाठी, त्यांची आणखी एक कविता पाहूं या.

‘जागो फिर एक बार!

आँखे अलियों-सी
किस मधु की गलियों में फँसी,
बन्द कर पाँखें
पी रही हैं मधु मौन
अथवा सोयी कमल-कोरकों में ? –
बन्द हो रहा गुंजार –
जागो फिर एक बार !’

 

निराला हे आधुनिक काळातले हिंदीतील एक उत्कृष्ट गझलकारही आहेत.

 

 • एक निरीक्षण : विषयानुसार, आणि हेतूच्या अनुसार निरालांच्या रचनांची भाषा बदलते, आणि तेंच परिणामकारक ठरतें.

 

 • कवी वसंत बापट

वसंत बापट यांची सोशलिस्ट विचारसरणी सर्वांनाच माहीत आहे. १९४२ च्या चळवळीच्या काळी व नंतर त्यांनी लिहिलेली ‘सैनिक गीतें’ त्याकाळी प्रसिद्ध होती, व गायलीही जात. त्यातील एक-              ‘किसनांच्या बाया आम्ही शेतकरी बाया

नाहीं रहाणार आतां दीनवाण्या गाया ।।’

 

त्यांच्या विरश्रीयुक्त कविताही प्रसिद्ध आहेत –

 • शिंग फुंकलें रणिं, वाजतात चौघडे

सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे ।।

 • उत्तुंग आमची उत्तरसीमा इंच इंच लढवूं ।।
 • वाजे विजयतुतारी रे

तोरण बांधा दारीं रे

रजतजयंती स्वातंत्र्याची

दुमदुमते ललकारी रे

चला रे घुमवा जयजयकार

जयजय भारतमाता ।।

 

राष्ट्र सेवा दलासाठी कांहीं दशकांपूर्वी त्यांनी लिहिलेलें ‘महाराष्ट्रदर्शन’सुद्धा प्रसिद्ध होतें/आहे. त्यात त्यांनी ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच्या, संतांचा, साहित्याचा, लोककलांचा आढावा घेतलेला आहे. त्या कार्यक्रमांतर्गत त्यांची भाषाही, आवश्यकतेनुसार, बदलते.

 

एक वृद्ध गृहस्थ स्वत:च्या संभाव्य मृत्यूबद्दल बोलतो, तेव्हां काय म्हणतो, हें बापटांनी ‘लाइटर व्हेन’मध्ये पण इफेक्टिव्हली दाखवलें आहे. तिथें त्यांनी हेतुत: ग्रामीण (ग्राम्य नव्हे) भाषा वापरली आहे. शब्द आहेत –

‘आतां जायाचंच की कवातरी पट्.दिशी ।’

 

हेच समाजवादी व निरीश्वरवादी वसंत बापट जेव्हा ‘अष्टविनायक’ या चित्रपटासाठी गीतें लिहितात, तेव्हां त्याची भाषा बदललेल्या स्वरूपात येते. (अशी गीतें लिहिल्याबद्दल बापटांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाहीं. आपण केवळ भाषिक अंगानेंच याकडे पहात आहोत.) –

 • अष्टविनायका तुझा महिमा कसा

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा ।।

 • प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया ।।
 • तूं सुखकर्ता तूं दु:खहर्ता,

तूंच कर्ता तूंच करविता

मोरया मोरया

मंगलमूर्ती मोरया ।।

बापटांना माहीत होतें की ही गीतें चित्रपटासाठी आहेत, चित्रपट पहाणारा व गीतें ऐकणारा प्रेक्षकवर्ग कशा प्रकारचा असेल, गीताचा वर्ण्यविषय काय आहे, आणि तो कशा पद्धतीने प्रेझेंट् करायचा आहे. त्या सर्वाला अनुकूल अशी भाषा त्यांनी तिथें वापरली.

 

आधुनिक काळातील अन्य कवींकडे आपण नंतर पुन्हां वळूं.

विभाग

 • गायनप्रकार, गायन, गायक व भाषा

हें कदाचित् कांहींसें विषयांतर वाटेल, पण वस्तुत: तें तसें नाही.

 

 • निरीक्षण : भाषेचें रूप हें, ती कोणत्या गायनप्रकारासाठी वापरली जात आहे, यावरही अवलंबून असतें. उदा. भजन, कीर्तन वगैरेंसाठीची भाषा, व भारुड, लोकगीतांसाठीची भाषा हिच्यात फरक असणारच;  व साधारणपणें तो असतोही.

 

*अर्धशिक्षित लोकांना भान हरपून भजनें गातांना मी स्वत: ऐकलेलें आहे. त्यावरून कळतें की

भजनांची रचना (काव्य) किती सरल पण इफेक्टिव्ह असेल तें.

 

 • बेगम अख़्तर यांच्या गायनावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. त्या लखनऊला रहात होत्या. त्या भागात उर्दू बोलली जाते, तशीच पूरबी, अवधी, भोजपुरी, या बोलीभाषाही चालतात. ग़ज़लसाठी रचनाकार उर्दू वापरतो ; तर ठुमरीसाठी हिंदीची बोलीभाषा.

 

अख़्तरीबाईंनी गाइलेल्या या दोनतीन ग़ज़लांची झलक पहा –

 • ग़ज़लगो : शकील बदायूनी

मेरे हमनफ़स मेरे हमनवा, मुझे दोस्त बन के दग़ा न दे

मैं हूँ सोज़े इश्क़ से जाँ-ब-लब, मुझे ज़िंदगी की दुआ न दे ।

मेरे दाग़े दिल से है रौशनी, इसी रौशनी से है ज़िंदगी

मुझे डर है मेरे चारागर, ये चराग़ तू ही बुझा न दे ।

 • मोमिन : ( काळ : बहादुरशहा जफ़रचा ) –

वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हो कि न याद हो

वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो कि न याद हो । …

कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी

कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो कि न याद हो ।

 • शकील :

ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया

जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया ।

 

बेगम अख़्तर यांनीच गाइलेल्या या ठुमर्‍या पहा –

 • निहुरे निहुरे बहारे (बुहारे) आँगनवा, गलियाँ निहुरे ।
 • मोरी अटरिया पे आओ सजनवा, देखादेखी सनम होई जाए ।

 

* निरीक्षण : भाषा भिन्न, भावही भिन्न. ठुमरी स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली गेलेली असते, तर ग़ज़ल ही पुरुषाच्या. आणि आपण अख़्तरीबाईंचें हें गायन ऐकलें तर, या दोन्ही प्रकारांच्या रचनांचे त्यांचे सादरीकरण वेगवेगळे ( different) असतें, सुरुवातीचा आवाज लावण्यापासून ते गीताची pace व सगळ्या गीतातून त्यांनी प्रगट केलेली भावना, येथपर्यंत ; जणूं की ग़ज़लगायिका बेगम अख़्तर आणि ठुमरीगायिका बेगम अख़्तर या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात. आर्ततेतून, स्वरांमधून व शब्दांतून,  दरवेळी एक वेगळी व्यक्ती आपल्यासमोर उभी रहाते, आणि ती व्यक्ती खरें तर अख़्तरीबाई नसतात ; ती व्यक्ती असते त्या त्या काव्याची नायिका किंवा नायक.

 

 • उपशास्त्रीय गायनात आपण बेगमे अख़्तर यांचे उदाहरण पाहिलें. शास्त्रीय गायनाच्या बाबतीत विदुषी किशोरी आमोणकर यांचें उदाहरण पाहूं. त्यांच्याबद्दल २०१७ च्या विविध दिवाळी अंकांमध्ये जे त्याच्या शिष्यांचे व इतर जाणकारांचे लेख येताहेत, त्यातून त्यांचें मोठेपण स्पष्ट होतें. शास्त्रीय गायन त्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत. पण त्याव्यतिरिक्त, त्यांनी, ‘गीत गाया पत्थरों ने’ सारखें सिनेगीत ( नंतरही त्या सिनेमासाठी गायल्या आहेत) ; ‘जाईन विचारित रानफुला, भेटेल तिथें गऽ सजण मला’ यासारखें भावगीत ; ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक जाला’ यांसारखे अभंगही गाइले. त्यांचें ‘अवघा रंग’चें गायन ज्यांनी ऐकलें असेल, त्या जनांना त्यातील अनुभूतीचें सचैल स्नान घडलें असेलच. वादयाबरोबर केलेली जुगलबंदी, कर्नाटक कंठसंगीतातले अध्वर्यू डॉ. बालमुरलीकृष्णन् यांच्याबरोबरची जुगलबंदी, हेही वैविध्यपूर्ण प्रयोग त्यांनी यशस्वीरीत्या केलेले आहेत. आणि, जरी आपण ‘जुगलबंदी’ म्हटलें तरी त्यात कुठेही स्पर्धात्मक भावना नसून, सहकाराच्या भावनेनें हे प्रयोग केलेले आहेत .  एवढेंच नव्हे , तर संगीतावर ‘स्वरार्थरमणी : रागरससिद्धान्त’ हा ग्रंथ लिहून, किशोरीबाईंनी त्यात मौलिक चिंतन केलें आहे. प्रतिभा तर खरीच ; पण वैविध्यही केवढे ! हें दोन्ही त्या व्यक्तीला great बनवतें. त्यांना ‘गानसरस्वती’च म्हटलें जात असे.
 • तेंच पं. कुमार गंधर्व यांचें. जी व्यक्ती लहान वयातच संगीत महोत्सवात थोरामोठ्या गायकांना इंप्रेस् करते, व ज्यामुळे तिला ‘कुमार गंधर्व’ ही उपाधि दिली जाते, त्या व्यक्तीबद्दल काय आणि किती बोलणार ! कुठलेंही एक घराणें फॉलो न करतां त्यांनी नवनवीन प्रयोग केले, नवनवीन राग निर्मिले, नवीन बंदिशी बांधल्या. त्यांनी नाट्यगीतांना संगीतच दिलें असें नव्हे, तर गायलेंही, जसें की ‘देव दीनाघरी धावला’मधील ‘ऋणानुबंधाच्या ..’ . बालगंधर्वांच्या गायकीवर त्यांनी ‘मला उमगलेले बालगंधर्व’ याचे प्रयोगही केले, त्यांनी माळव्यातील लोकगीतांवर कार्यक्रम केले, तसेंच निर्गुणी भजनांवरही केले. ‘अनूपरागविलास’ हें द्विखंडात्मक पुस्तकही त्यांनी लिहिलें. पहा हा आवाका , पहा हें वैविध्य !

 

 • सिनेमा व भावगीतांच्या क्षेत्रात, जर एखादें गीत लता मंगेशकर गाणार असतील तर, गाण्याचे शब्द, गाण्याची चाल, संगीत सर्वच भिन्न असे.

‘मुग़ले आज़म’ मधील शकीलनें लिहिलेली गीतें पहा, जी लताबाईंनी गाइली आहेत  –

 • प्यार किया तो डरना क्या ?

प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहें भरना क्या ?

 • मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे

मोरी नाज़ुक कलैयाँ मरोड़ गयो रे ।

 

*लताबाईंची अनेक भिन्नभिन्न प्रकारची गाणी आहेत. हिंदी व मराठी सिनेगीतें ; ‘वैरिण झाली नदी’ सारखी भावगीतें ; ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां’ ;  भा. रा. तांबे, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे गायन ; ग़ालिब ; मीरेचे   ‘चाला वाही देस’ ;  शिवाजीवरील ‘शिवकल्याणराजा’ ; ‘पसायदान’.  यादी फार मोठी आहे, वैविध्यही तसेंच. आशाबाईंचेंही तेंच. किशोरकुमार घ्या. तो गंभीर गाणी जितकी सुंदर गातो, तितक्याच उत्तम प्रकारें विनोदी गाणीही गातो. एकीकडे त्याची, ‘लेकिन पहले दे दो मेरा पाँच रुपैया बारह आना’ सारखी tomfoolery करत गाइलेली लाइटर व्हेन् ची, हलकेंफुलकी गीतें ; तर दुसरीकडे ‘कहीं दूर गगन की छाँव में’, ‘ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीँ आते’ यासारखी संजीदा (गंभीर) गीतें, दोन्ही तितकीच gripping असतात.

 

विभाग

कांहीं निष्कर्ष :

 • थोडक्यात काय, तर
 • Creative activity / field मध्ये, प्रतिभा आणि तिचा वैविध्यपूर्ण वापर हें दोन्ही त्या व्यक्तीला महान बनवतात.

इथें आपण शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचें उदाहरण घेतलें आहे. अन्य प्रकारच्या creative activities बद्दल सुद्धा तेंच म्हणतां येईल.

 • काव्य रचना, किंवा अन्य साहित्यप्रकाराची रचना, हीसुद्धा basically creative activity च आहे. म्हणून, काव्यादी प्रकारांच्या रचनाकाराबद्दलही तेंच म्हणतां येतें. अशा रचनाकाराला, presentation method & style ; ती रचना गाइली जाणार असेल तर, गायनप्रकार, गायक ; इत्यादी बाबींचाही विचार करावा लागतो, व त्याप्रमाणें त्याच्या रचनांच्या भाषेमध्ये, स्टाइल् मध्ये, शब्दाच्या चयनामध्ये फरक होतो. गायनाबरोबर नृत्यही होणार असेल तर, त्याचाही विचार  त्याला करावा लागतो.

( वारकरीमंडळी अभंग व भजन गायनाबरोबर नृत्यही करतात. कीर्तनकारही कीर्तनात, गायनाबरोबर थोडें नृत्यही करतात. कथक वगैरे नृत्यप्रकारांच्या समवेत तर गायन असतेंच ) .

म्हणजे, काव्यादी रचनाकाराच्या बाबतीतही, प्रतिभा व तिचा वैविध्यपूर्ण उपयोग, हें दोन्ही त्याला great बनवतात.  

विभाग

 • क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात, आपण ज़रा आधुनिक काळातील गीतकारग़ज़लकारांकडे वळूं :

शकील, साहिर, मजरूह

कोणाला असें वाटण्यांची शक्यता आहे की, अरे ! ज्ञानदेवांच्या काव्याची चर्चा करतां करतां आपण सिनेगीतकारांकडे कसे आणि कशाला वळलो आहोत ?’  पण, ध्यानीं घ्यावें की, आपण साहित्यिक , तसेंच सृजनशीलतेच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पहात आहोत, आणि महत्वाची गोष्ट ही की, हे वरील तिघेही प्रतिथयश व सृजनशील शायर होते, जे केवळ व्यवसाय म्हणून सिनेमाच्या क्षेत्रात आले.

 • शकील बदायुनी. एक गीतकार घेऊं या, शकील बदायुनी. वर आपण शकीलची ग़ज़ल पाहिली, शकीलची कांहीं सिनेगीतेंही पाहिली. वरील दोन्ही गीतें नृत्यांसाठी लिहिलेली आहेत, पण नाच मात्र दोहोंतील  अतिशय भिन्न.

शकीलचें ‘लीडर’मधील हें प्रेमाची महती गाणारें गीत पहा-

एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल

सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है ।

‘प्यार किया तो डरना क्या ?’ हेंही प्रेमगीत आहे व ‘एक शहनशाह ने’ हेंही. मात्र, दोन्हींमधील फरक पहावा.

याच शकीलनें ‘अपनी आज़ादी को हम हर्गिज़ मिटा सकते नहीं’ यासारखें राष्ट्रभावनेनें भरलेलें गीत लिहिलें ; ‘मन तरपत हरिदरशन को आज’ यासारखें उत्कृष्ट भजन लिहिलें ; ‘नैन लड़ जई हैं तो मनवा माँ कसक भई वै करी’ यासारखें बोलीभाषेतील आणि नृत्याच्या संगतीनें गाण्यासाठीचें गीत लिहिलें ( आणि हें नृत्य ‘प्यार किया तो..’ पेक्षा अशगदीच वेगळें) ; ‘सर जो तेरा चकराए’ सारखी हलकीफुलकी गीतेंही लिहिली. केवढें वैविध्य, आणि कुठेही गुणवत्तेशी compromise, तडजोड नाहीं.

 • साहिर लुधियानवी

साहिरसारख्या शायराबद्दल खरें तर अधिक लिहायची जरूरच नाहीं. तो कॉलेजमध्ये असतांनाच त्याचा ‘तल्ख़ियाँ’ हा उर्दू काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला होता, व त्याचें नांव झालेलें होतें. नंतर तो (प्रकाश पंडित यांच्या समवेत) दिल्लीला एका उर्दू मासिकाचा संपादक होता. यावरून त्याच्या बुद्धीची झेप ध्यानात यावी. त्याच्या ताजमहालावरील रचनेचा एक अंश पहा –

‘एक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर

हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ ।

मेरी महबूब, कहीं और मिला कर मुझ से ।’

त्याने आधीच लिहिलेल्या रचनांना सिनेमांमध्ये घेतलें गेलें, जसें की ‘चकले’ , ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों‘.

साहिर हा , ‘जला दो इसे फूँक डालो ये दुनिया…. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है !’ असें भेदक गीत लिहितो ; ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ असें ‘रूहानी’ प्रेमाचें गीत लिहितो, ‘बंदे को ख़ुदा करता है इश्क़ … ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़’ असे फ़लसफ़ा (philosophy) असलेलें गीत लिहितो ; नृत्यासाठीच रचलेली ‘रेशमी शलवार कुरता जाली का’ व ‘उड़े जब जब ज़ुल्फ़ें तेरी’ अशी गीतें लिहितो ब ‘मैं बंबई का बाबू’ यासारखें हलकेंफुलकें गीतही लिहितो. पहा हें वैविध्य !

 • मजरूह सुलतानपुरी :

हाही मूलत: शायरच. शकीलप्रमाणें यालाही नौशाद यांनी मुशायर्‍यातील शायरी ऐकून सिनेक्षेत्रात आणलें. बेगम अख़्तर यांनी गाइलेल्या ग़ज़लांमध्ये मजरूहच्या ग़ज़लचाही समावेश आहे.

मजरूह हा, ‘जलते हैं जिसके लिये’ असें प्रेमाचें हळुवार गीत लिहितो, ‘लेके पहला पहला प्यार‘ हें प्रेमगीतही लिहितो, तसेंच ‘हम तो मुहब्बत करेगा’ असें प्रेमाचेच धसमुसळें गीतही लिहितो. ‘थाड़े रहियो ओ बाँके यार’ हे, कोठ्यावरील नृत्यासाठी गीत लिहितो, तर कोठेवालीनेंच म्हटलेली ‘रहते थे कभी जिनके दिल में हम जान से भी प्यारों की तरह‘ ही व्यथित ग़ज़ल लिहितो ; तसेंच तो, ‘सी-ए-टी कॅट्, कॅट् मानर बिल्ली’ असें अत्यधिक हलकेंफुलकें गीतही लिहितो. हें वैविध्यच नव्हे काय ?

 

*कोणी असें म्हणूं शकेल की, ‘ते मोठे शायर होतें, मान्य ; पण त्यांनी सिनेगीतें ही, व्यवसाय म्हणून, चित्रपटाची गरज म्हणून, व पैशासाठी लिहिली’. तें एक दृष्टीनें खरेंही आहे. अर्थात्, त्यामुळे त्याच्या बहुरंगी, सृजनशील प्रतिभेला व काव्याला बाधा येत नाहीं.

*तरीही, आपण कांहीं अशा श्रेष्ठांची उदाहरणें पाहूं या, जिथें कुणाला ‘पैशासाठी केलेली रचना’ असें म्हणतां येणार नाहीं.

विभाग :

बालसाहित्य :

विभाग

 • कुसुमाग्रज आणि रवीन्द्रनाथ  बालगीतें  :
 • कुसुमाग्रज यांची तारीफ वि. स. खांडेकर, बा. भ. बोरकर इत्यादी श्रेष्ठ साहित्यकांनी केलेली आहे. त्यांना ज्ञानपीठ पारितोषिकही प्राप्त झालेलें आहे. त्याचें श्रेष्ठत्व वादातीत आहे. कुसुमाग्रजांनी काव्य तर लिहिलेंच, पण इंग्लिश नाटकांची भाषांतरें केली, स्वतंत्र नाटकेंही लिहिली. ‘नटसम्राट’ हें ग्रीक ट्रॅजेडीची आठवण आणून देणारे त्यांचें श्रेष्ठ नाटक. काव्याचें म्हणाल तर, त्यांनी नाट्यगीतें लिहिली ; ‘पृथ़्वीचें प्रेमगीत’ यासारखें आगळी प्रेमभावना दाखवणारे आगळें गीत लिहिलें ;   ‘गर्जा जयजयकार क्रांतिचा’ हें स्फूर्तिप्रद गीत लिहिलें, ज्यानें अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यासारखे शिवशाहीतील एका भावनोत्कट पण दु;खद घटनेची आठवण जागवणारे काव्य लिहिलें ; १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळीं, ‘ बर्फाचे तट पेटुनि उठले, सदन शिवाचें कोसळलें । रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळलें ।’ अशी राष्ट्रभावना चेतवणारी कविता लिहिली, ‘कांही बोलायाचें आहे, पण बोलणार नाहीं’ हिच्यासारखी ग़ज़लही लिहिली.

त्यांच्या ‘कणा’ या कवितेचा एक अंश पहा –

खिशाकडे हात जाताच हंसत हंसत उठला
“पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त ‘लढ’ म्हणा” !

असे हे कुसुमाग्रज, ‘उठा उठा चिऊताई । सारीकडे उजाडले । डोळे तरी मिटलेले । अजूनही ।‘ असें बालगीतही लिहितात. नंतर त्यांनी बालगीतांचे एक पुस्तकच लिहिलेलें आहे.

 • एक मुद्दा : कवितांमधील व्हरायटी ही एक बाब झाली. पण बालगीतांचा वाचक/ पाठक/ ऑडियन्स् वेगळा असतो, बालकें ती गीतें ऐकतातही आणि एकट्यानें किंवा समूहात गातातही. हा विचार करूनच बालगीतें लिहावी लागतात. कुसुमाग्रजांना बालगीतांचें पुस्तक लिहायची काय गरज होती ? पण, पुढल्या पिढीसाठी त्यानी तें केलें. बालगीतांची गरज वेगळी, नाट्यगीतांची गरज वेगळी, अन्य कवितांची वेगळी. अशा वैविध्यावरून, त्यांच्या प्रतिभेची झेप दिसून येते.

 

 

 • रवीन्द्रनाथ ठाकुर ( टागोर )

रवीन्द्रनाथांबद्दल लिहावें तेवढें कमीच. आधी त्यांनी गीतांजली बंगालीत लिहिली, व नंतर तिचें इंग्रजीत भाषांतर केलें. ते ‘नोबेल प्राइझ’ चे मानकरी होते, यावरून त्यांच्या सहित्यिक प्रतिभेची कल्पना यावी. अनेक उत्तमोत्तम कविता, कथा, कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या ; ‘रवीन्द्र संगीता’सारखा नवीन जॉनर् (genre) सुरू केला ; ‘जन गण मन..’ हें त्यांचें गीत १९४७ नंतर राष्ट्रगीत बनले. शांतिनिकेतनसारखी आगळ्या वातावरणात शिक्षणाचे पाठ देणारी संस्था त्यांनी सुरूं केली. अशा रवीन्द्रनाथांनी अगदी-लहान मुलांसाठी शिशुगीतांचें पुस्तकही लिहिलें आहे. केवढें हें वैविध्य !

पहा त्यांच्या एका शिशुगीताचा अंश –

ताँतेर बाडी

बाँगेर भाषा

…..

खान खाय गान गाय

नॉय रे नॉय रे नॉय ।

बेडकाबद्दलचें हें शिशुगीत आहे. वेळूतील घर, ‘बांग’ देतात तशी भाषा (आहे त्याची). तो खाणें खातो, व ‘नॉय नॉय नॉय’ असें गाणें गातो. बेडकाच्या ‘आँय आँय’ अशा ओरडण्याला किती सुंदरपणे रवीबाबूंनी ‘नॉय नॉय’ असें दाखवलें आहे !

रवीन्दनाथांना काय गरज होती शिशूंसाठी गीतें लिहिण्यांची ?  पण, पुढल्या पिढीसाठी आपलें दायित्व म्हणूनच त्यांनी तें केलें, आणि त्या काव्यात त्याच्या प्रतिभेचा एक आगळा आविष्कर दिसून आला.

विभाग :

 • आपण वैविध्याच्या संदर्भात बालगीतांबद्दल व बालसाहित्याबद्दल बोलतो आहोत, तर हेंही पहा –
 • इतर थोर बंगाली साहित्यिकांनीसुद्धा (बंगालीत) बालगीतांची पुस्तकें लिहिली आहेत, जसें की शरत्.चंद्र. त्याशिवाय, हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे इंग्रजीत बालकवितांचें पुस्तक आहे.
 • माधव ज्यूलियन यांना आपण ‘मराठी असे आमुची मायबोली’ या कवितेसाठी ओळखतोच. त्यांनी फारसी-मराठी शब्दकोश निर्मिला आहे. उमर खय्यामच्या ‘रुबाईयात’ चें त्यांनी तीन प्रकारें भाषांतर केलेलें आहे. सामाजिक विषयावरही त्यांनी दीर्घकाव्य लिहिलें आहे. ग़ज़ल या काव्यप्रकाराची सुरुवात मराठीत त्यांच्या ‘गज्जलांजलि’नेंच केली. (अमृतराय आणि मोरोपंत यांच्या कांही रचना जरी भजनें असल्या, तरी त्या मूलत: गजलाच आहेत, हें त्यांनीच दाखवून दिलें). छंदांवर त्याचें मौलिक पुस्तक आहे ‘छांदोरचना’. भाषाशुद्धीसाठीही त्यांनी विविध लेख लिहिले, भाषणें दिलीं. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितासंग्रहाचें त्यांनी संपादन केलें. याच माधव ज्यूलिन यांनी ‘कासासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ यासारखें बालकाव्यही लिहिलें.
 • ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेची महत्ता आपल्याला माहीतच आहे. त्यांनी diverse काव्य लिहिलें ; ‘अष्टदर्शनें’ यासारखें, पाश्चिमात्य दार्शनिक आणि चार्वाक यांच्या  तत्वज्ञानावर अभंगस्वरूपात पुस्तक लिहिलें ; त्यांनी ‘कणिका’ही लिहिल्या. ( हें नांवही त्यांनीच दिलेलें).

 

अशा विंदांनी १२ बालकाव्य-संग्रहही लिहिलें. ( संदर्भ – लोकसत्ता, मुंबई आवृत्ती,

दि. २५.१०.१७). त्यांच्या एका बालकाव्याचा अंश पहा –

डोळे मिटुनी पिशी मावशी

गाते गाणें साधेंभोळें

डोळे उघडुनी पाही पुढती

सापाचें डुलतें वाटोळें …

 • सत्यजीत राय हे जागतिक कीर्तीचे फिल्म-डायरेक्टर. ते फिल्म-मेकिंगमधील अन्य बाजूही चांगल्याप्रकारें जाणत होते. अशा सत्यजीत राय यांनी लहान मुलांसाठी, ‘फेलु-दा’ हें पात्र निर्माण करून रहस्यकथा लिहिलेल्या आहेत.
 • एक मुद्दा : बालसाहित्याबद्दलची एवढी उदाहरणें द्यायचें कारण म्हणजे, बालकांसाठी लिहितांना लेखनाची धाटणी पूर्णपणें वेगळी ठेवावी लागते. जाणकार, सुशिक्षित ग्रोन्-अप्स् साठी आपण जसें लिहितो, तसें लहानग्यांसाठी लिहून चालत नाहीं, प्रतिभा आणि वैविध्य साधणारी व्यक्तीच हें योग्यप्रकारें करूं शकते.

 • आणखी कांहीं उदाहरणें  :
 • मंगेश पाडगांवकर –  नवकाव्य, उदासबोध, ग़ज़ल, एक नवीन पायंडा पाडणारी ‘बोलग़ज़ल’, वात्रटिका, विचारप्रवर्तक लेख, बायबलचे मराठी भाषांतर, असें त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत.

‘आतां एकलाच मनीं मंत्र जपा मंत्र जपा ; लारीलप्पा लारीलप्पा लारीलप्पा लारीलप्पा‘ किंवा, ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ या कविता पहा आणि खालील कांही ग़ज़लमधील शेर पहा –

थंड प्रेतासारखी वस्ती दिसे

उठत कां नाहींत इथली माणसें ?

किंवा

फासून रंग रात्री,  दिवसा भकास सारे

खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी  ।

त्यांच्या ‘उदासबोधा’ची ही चुणूक पहा-

महायोगी :

शेटजींचें आठवावें रूप  । शेटजींचें आठवावें तूप ।

शेटजींस जे जे अनुरूप  । तें तें लिहावें ।।

 

विक्रयकला :

विकणें हाचि परम धर्म । विकणें हेंचि परम कर्म ।

विकणें हेंचि मानावें मर्म । संस्कृतीचें ।।

 

*वर दिलेली सर्व उदाहरणें सामाजिक आशयाच्या पद्यांची आहेत ; मात्र नवकवितांचा वाचक वेगळा आणि ग़ज़लचा audeience वेगळा ; दोन्ही काव्यप्रकारांचा बाज वेगळा, presentation-style वेगळी, भाषेचें स्वरूपही वेगळें. उदासबोधाचा घाट आणखी वेगळा.

त्यांच्या ‘वात्रटिके’चें एक उदाहरणण:

खर्जेखां

एक होता गवई

तो नेहमी खर्जात गाई.

खर्जात गाता गाता

एक दिवस मृत्यू आला.

पुन्हां जन्म मिळाला

तेव्हां तो बेडूक झाला

तरी सवय जात नाहीं

खर्जात गातो अजूनही !

पाडगांवकरांच्या इतर प्रकारच्या काव्याचा वाचक आणि वात्रटिकांचा वाचक हा जरी एकच ( सेऽम, same ) असृला, तरीही इतर काव्य वाचतांनाचा त्याचा मूड् आणि वात्रटिका वाचतांनाचा त्याच मूड् यांच्यात फरक हा असणारच. तो फरक रचनेतही जाणवतो. हेंच तर परिणामकारक वैविध्य !

( जातां जातां  : एक निरीक्षण : पाडगावकरांनी बेडकावर लिहिलें आहे , आणि रवीन्द्रनाथांनी बेडकावर लिहिलें आहे. बेडकाचें ओरडणें तेंच ( सेऽम), पण दोघा सहित्यकांना अभिप्रेत ऑडियन्स भिन्न. बेडकाच्या ओरडण्याचें वर्णन करतांना दोघांनी कसा वेगवेगळा अप्रोच घेतला आहे, पहा. ही प्रतिभा ! )

 • पं. भीमसेन जोशी –  किराणा घराण्याची पताका जगभर उंच फडकवत ठेवणार्‍या भीमसेन यांचे भक्तीपर अभंगही सुप्रसिद्ध आहेत. जितके त्यांच्या ख़याल (ख्याल) मध्ये आपण भान विसरतो, तेवढेच आपण त्यांच्या अभंगातही विसरतो. शास्त्रीय कंठसंगीत आणि भक्तीपर अभंग हे दोन्ही प्रकार अगदीच भिन्न. त्यांचा श्रोतावर्गही भिन्न. पण बहुआयामी प्रतिभेच्या भीमसेनांनी हे दोन्ही सहज साध्य केले, कष्टाविना.

*तसेच, डॉ, बालमुरलीकृष्णन् यांच्याबरोबरचें भीमसेनांचें सहगायनही एक आगळी उंची गाठतें. हीच तर प्रतिभा, हेच तर तिचें वैविध्य.

 • आत्तापर्यंत उल्लेखलेल्या सर्व व्यक्तींच्या व्यतिरिक्त अजून कितीतरी व्यक्तींची या संदर्भात उदाहरणें देतां येतील. मात्र, एवढी उदाहरणें पुरें आहेत. दिलेल्या उदाहरणांवरून आपला मुद्दा सुस्पष्ट झालेला आहे.

 

* एक निष्कर्ष  : वरील चर्चेवरून आणि उदाहरणांवरून, भाषेचे वैविध्य कशाप्रकारें इफेक्टिव्ह, परिणामकारक, असतें, हें आपल्याला वाङ्मयीन दृष्टिकोनातून स्पष्ट दिसतें.

 

विभाग – १०

 • पुन्हां ज्ञानदेवांकडे :

पुन्हां ज्ञानदेवांकडे वळतांना, या अनॅलिसिसचा (विश्लेषणाचा) आपल्याला उपयोग होईल.

 कांहीं निरीक्षणें :

 • सुजाण, शिक्षित श्रोतृवंदासाठी टीकात्मक, दार्शनिक रचना करणें वेगळें ; आणि अर्धशिक्षित व अशिक्षित जनसाधारणांना गाण्यासाठी, ऐकण्यासाठी रचना करणें वेगळें, याची पूर्ण जाण ज्ञानदेवांसारख्या ज्ञानवंताला असणारच, यांत तिळमात्र शंका नाहीं.
 • यावरून स्पष्ट उमगतें की, ज्ञानदेवांनी विविध पद्धतीच्या रचनांमध्ये भाषिक वैविध्य वापरलें, हा खरें तर त्यांचा स्ट्राँग-पॉइंट् आहे, व तो त्यांचें श्रेष्ठत्व सिद्ध करतो. त्यांचें ज्ञान, त्यांचें संतपण हे तर वादातीतपणें श्रेष्ठ आहेतच, पण साहित्यिक म्हणूनही ते श्रेष्ठच होते.
 • साधारणजनांना कळेल अशा भाषेत, सरल, सोप्या शब्दांत, ते जन मग्न होतील अशा गायनसुलभ पद्धतीनें , भक्तिमार्गातून, उत्थानाचा पथ त्यांना दाखवून द्यायचा हें सोपें काम नव्हतेंच ; पण ज्ञानदेवांनी तें सहजपणें साध्य केलें. हें, भाषेचें, विचारांचें, प्रेझेंटेशनचें, वैविध्य ज्ञानेश्वरांचे मोठेंपण अधिकच वाढवतें.

निष्कर्ष :

 • नंतरच्या काळात भक्तिपंथात बरेच असे संत झाले ज्यांनी भक्तिरसपूर्ण सरल, सोप्या रचना केल्या, जसें की एकनाथ, तुकाराम, सूरदास, मीराबाई, नरसी मेहता, चैतन्य महाप्रभू इ. मात्र, कालानुक्रमें पाहतां, ज्ञानदेव आणि त्यांची संत-मांदियाळी (नामदेव इत्यादी) हे आधुनिक भारतीय भाषांमध्ये, बहुधा याबातीत आद्य ठरतात .

 

 • त्याचबरोबर, एकीकडे, जाणकारांसाठी टीकेसारखें गंभीर व प्रगल्भ लेखन, आणि दुसरीकडे, अर्धशिक्षित-अशिक्षितांना सहज समजेल अशा भाषेत, सहज गातां येईल अशा शब्दांत, अध्यात्मिक-पारमार्थिक विषय विशद करून सांगणार्‍या रचना करणें, याबाबतीत नंतरच्या काळात एकनाथांसारखे संत झाले खरे ; पण कालक्रमानें पाहतां मराठीत तरी, किंबहुना सर्व भारताच्या पटलावरील प्राकृत (व आधुनिक) भाषांच्या संदर्भातही, बहुधा ज्ञानेश्वरच कालक्रमानें आद्य असावेत. असा नवीन पायंडा पाडणारी व्यक्ती साधीसुधी नव्हेच !

 

 • ज्ञानेश्वरांची सखोल , तसेंच ‘वाइड्’ (wide) , विस्तृत दृष्टी , तिच्यामुळे आलेले रचनात्मक वैविध्य, आणि त्यांचे कालातीत विचार , हें सर्व, ज्ञानेश्वरांचें वाङ्मयीन श्रेष्ठत्व अधोरेखित करते. 

 

इति लेखनसीमा .

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY

                                                         –

– सुभाष स. नाईक     Subhash S. Naik

M – 9869002126 .   eMail : vistainfin@yahoo.co.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*