संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (१०)/११

 सारांश , आणि निष्कर्ष :
आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं माहिती दिली, कांहीं नवीन मुद्दे मांडले . त्या सर्वाचा सारांश, आणि कांहीं निष्कर्ष, आतां थोडक्यात पाहूं या.
• (पण त्यापूर्वी एक स्पष्टीकरण : माझें स्वत:चें मिडलस्कूलपासूनचें शिक्षण इंग्लिश-मीडियम-पब्लिक-स्कूलमध्ये झालेलें आहे ; व पुढील, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट वगैरे सर्व शिक्षणही अर्थातच इंग्रजीतच. नंतरच्याही काळात, कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे, कायम इंग्रजीतच व्यवहार. संस्कृत मी फक्त हायर-सेकंडरीपर्यंतच शिकलो. त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊं नये की, मी संस्कृतच्या क्षेत्रातच काम करतो आहे, व म्हणून मी त्या अनुषंगानें माझी मतें मांडलेली आहेत. वस्तुस्थिती तशी नाहीं).
• संस्कृत ही ‘देव ’ नांवाच्या टोळीची (क्लॅन) भाषा होती, म्हणून तिला ‘देववाणी’ म्हणत ; याचा देवता (डेइटी) किंवा ईश्वराशी कांहींही संबंध नाहीं. पुरातन काळीं ही भाषा जनसाधारणही बोलत असत.
• संस्कृत ही प्राकृत भाषांपासून निर्माण झाली ही विचारांची ‘फॅलसी’ आहे. वैदिक भाषा (छांदस किंवा देववाणी), अर्थात जिला हल्ली आर्ष-संस्कृत म्हणतात, ती पाउड (प्राकृत) म्हणजे पाली-अर्धमागधी-शौरसेनी-महाराष्ट्री-पैशाची या भाषांपेक्षा कांहीं शतकें वा कांहीं सहस्त्रकें पुरातन आहे. त्यामुळे या भाषांमधून आर्ष-संस्कृत निर्माण होण्याचा प्रश्नच उठत नाहीं ; उलट त्याच , संस्कृतचें सरलीकरण करून तयार झालेल्या बोली आहेत. ( आणि आपण हें सोदाहरण पाहिलेलें आहे).
• वैदिककालीन अन्य भाषांकडून आर्ष-संस्कृतनें कांही शब्द वगैरे घेतलेले आहेत, पण अशी प्रक्रिया व देवाणघेवाण सर्वच भाषांच्या बाबतीत चालते ; पण त्यामुळे, संस्कृत ही त्या भाषांपासून निर्माण झालेली आहे, असें अजिबात नाहीं.
• आज जी संस्कृत (पाणिनीच्या कालानंतरची ) दिसते, ती म्हणजे आर्ष-संस्कृतवर संस्करण झाल्यामुळे निर्माण झालेलें रूपांतर आहे, पाणिनी किंवा कुणी वैयाकरणानें मुद्दाम निर्माण केलेली भाषा नव्हे. कोणीही अशी शून्यातून भाषा निर्माण करूं शकत नाहीं. ( बोलीभाषेतून, घेतले तर शब्द वगैरे घेतले जातात; पूर्ण नवीन भाषा बनवितां येत नाहीं. याची अनेक उदाहरणें आहेत). वैयाकरणी काय करतात, तर, जी भाषा प्रचलित असते , तिचे फक्त नियम ते लिहितात, व सुसूत्रपणा आणतात.
• नंतरच्या काळात, संस्कृत ही कुणाची मातृभाषा म्हणून उरली नसली तरी ; संपर्क-भाषा, ज्ञानभाषा , संस्कृतीची भाषा, म्हणून अनेक शतकें तिनें योगदान दिलेलें आहे.
• प्रादेशिक भाषांमध्ये जी ग्रंथनिर्मिती सुरूं झाली, तिचा आधार, संस्कृत ग्रंथच होता. उदा. रामायण, महाभारत, भगवद्गीता, हरिवंश, भागवत, इत्यादी.
• समाजातल्या घटकानें किंवा घटकांनी , कांहीं अन्य घटकांना या ज्ञानापासून वंचित ठेवलें, ( आणि, तें नुसतें आक्षेपार्हच नाहीं, तर निंदनीयही आहे ) ; पण त्यासाठी समाजाला वा समाज-घटकाला जबाबदार धरायला हवें, कुठल्याही भाषेला नव्हे. (आपण हेंही सोदाहरण पाहिलेलें आहे).
• संस्कृत भाषेच्या काठिण्याबद्दल आपण अन्य भाषांच्या उदाहरणांवरून पाहिलें की, कितीतरी भारतीय व परदेशीय भाषा , ( अगदी मराठी, तमिळसारख्या भारतीय भाषाही ) पर-भाषियांना ‘कठीण’ वाटतात. पण त्यामुळे, त्या भाषांचे महत्व आणि त्यांचा वापर अजिबात कमी होत नाहीं.
• ज्यांना त्यांच्या नित्याच्या प्रोफेशनल कामांमुळे संस्कृत शिकाय-समजायला वेळ नाहीं, त्यांना ती शिकण्याचें कुठलेंही कंपल्शन नाहीं, बंधन नाहीं. पण , ज्यांना तिचा वापर करायचा आहे, किंवा ती शिकून पुरातन ज्ञान-कला-साहित्य इत्यादींची माहिती मिळवायची आहे, त्यांना तसें करायला नक्कीच मुभा आहे.
• हल्लीच्या काळीं सायन्सचें महत्व आहेच; यात वादच नाहीं. पण, सर्व-समाजच जर नुसतेंच सायन्स शिकून व फक्त त्याच क्षेत्रात वावरायचें म्हणेल, तर समाज एकसुरी होईल, व या ‘लॉपसाइडेडनेस’चा समाजाच्या उन्नतीवर अनिष्ट परिणाम होईल. समाजाची चतुरस्र प्रगती आवश्यक असते; आणि तसेच होणार, कारण प्रत्येकाची आवडनिवड भिन्न असते. समाज कुणावरही अमुक एका प्रोफेशनची सक्ती करूं शकत नाही.
• गेली शतकें-सहस्त्रकें, राज्यें बदलली , राज्यकर्ते बदलले, राज्यांच्या सीमा बदलल्या, अन्य अनेक बदल झाले; पण भारतात भावनिक-एकता अखंड राहिली, याचें कारण संस्कृत-संस्कृती आहे.

• आणि अखेरीस :
 संस्कृत आतां राष्ट्रभाषा बनणें कठीण आहे ; तो चान्स १९४७-१९५० मध्ये हुकला.
 संस्कृतच्याद्वारें शतकानुशतकें चालत आलेलें ‘रिच् हेरिटेज्’ आपण दुर्लक्षित करतां कामा नये. तें प्रिझर्व व्हावे म्हणून सरकारनें ‘फोकस्ड प्रयत्न’ करायला हवेत.
 सरकारनें, (अजून तसें केलें नसल्यास) , संस्कृत ही एक ‘मान्यताप्राप्त भाषा’ म्हणून डिक्लेअर करायला हवी. तेच योग्य होईल.
– – –
( पुढे चालू ) — (परिशिष्टें )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*