रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा (समीक्षा नव्हे)

‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या,  ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! फक्त, त्यात तुम्हालाही प्रत्याप्रत्यक्षरीतीनें सामील करून घेतलेलें आहे, एवढेंच.

 • हातीं आल्यानंतर ‘आर्यमा’ वाचून पूर्ण करायला वेळ लागला. त्याचें कारण मुख्यत: असे आहे की, काव्यसंग्रहाचें पुस्तक, कादंबरीप्रमाणें एका बैठकीत वाचायची गोष्ट नाहीं. ज्याप्रमाणें पंच-रसयुक्त भोजन चव घेत घेत, आनंद घेत घेत, आस्वादायचें असतें, त्याचप्रमाणें काव्यसंग्रह हळूहळू वाचायचा असतो, प्रत्येक कवितेचा समरसून आस्वाद घ्यायचा असतो, ती ऍब्झॉर्ब करायची असते, मनांत मुरवायची असते, असें माझें मत आहे; आणि अर्थातच, वाचतांना व वाचल्यावर, कवितांवर मनन-चिंतन हेंही आपोआपच होत जातें, व त्यालाही वेळ दिला जातो. त्यामुळे, मी रसास्वाद घेत घेत, मन:पूर्वक, समरसून, (हिंदीत म्हणतात तसें, ‘जम के’), काव्यसंग्रह वाचला. प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (नुकत्याच, जानेवारी २०१६ मध्ये,   पिंपरी-चिंचवड येथें पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांची प्रस्तावनाही मनन करत वाचली. प्रस्तावना ही मुख्य-पुस्तकाइतकीच महत्वाची असते, असे मला वाटतें.
 • प्रा. सबनीस यांनी विस्तृत व खुलासेवार डीटेल्ड समीक्षा व रसग्रहण केलेलें आहे. त्यामुळे, मी वेगळें काय लिहिणार ? त्यातून, मी फक्त एक रसिक वाचक आहे, प्रोफेशनल-साहित्यिक नव्हे, विचारवंत नव्हे, समीक्षक तर नव्हेच. म्हणून मी, फक्त, काव्यसंग्रह वाचून, माझें त्याबद्दलचें ऍप्रिसिएशन, व त्या अनुषंगानें मनात आलेले काही विचार, एवढेंच लिहीत आहे. तसेंच, प्रा. सबनीस यांच्या स्टेटमेंटस् बद्दल संपूर्ण आदर व्यक्त करून, व त्यांची आधीच, इन ऍडव्हान्स, क्षमा मागून, मी एवढेंच म्हणतो की, कांहीं ठिकाणी माझ्या मनात काहीं भिन्न विचार आले; ते मी मांडत आहे. (त्यांच्या स्टेटमेंटस् वा विचारांचा अनादर करण्याचा कोठेही हेतू नाहीं, हें आवर्जून नमूद करणे मला आवश्यक वाटतें.)
 • संग्रहाचें शीर्षक व मुखपृष्ठ या विषयाची चर्चा मी अखेरीस करणार आहे. काव्य वाचून मगच संग्रहाच्या शीर्षकाचा ऊहापोह करावा, हेंच मला उचित वाटतें. आधी, काव्यावरील विचार.
 • कवयित्रीचें, एक स्त्री म्हणून, काव्यरूप प्रगटीकरण :

एक माणूस म्हणून स्त्री व पुरुष हे दोघे ज़री समान आहेत, तरी जीवनात त्या दोघांना वेगवेगळ्या तर्‍हेचे अनुभव येत असतात. ‘परकायाप्रवेश’ घेऊन कवी लिहूं शकत असला, किंवा लिहायचा प्रयत्न करू शकत असला, ( ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ ) , तरी, फक्त एक स्त्रीच, स्वत:चें ‘स्त्री’ म्हणून असलेले अनुभव, किंवा विचार, इफेक्टिव्हली, परिणामकाररीत्या मांडू शकते, अन् तें तेवढ्याच परिणामकारकरीत्या, तेवढ्याच ताकदीने, करणें पुरुषाला फार-फार कठीण आहे, (व, vice versa), असे मला वाटतें.  ‘यमाशी दोन हात करून पतीचे प्राण वाचवणारी सावित्री ही फक्त स्त्रीच असू शकते’ असे शब्द कॉन्फिडेन्टली, आत्मविश्वासपूर्वक, फक्त एक स्त्रीच लिहू शकते, कारण तिचा ‘स्त्री’ असण्याचा ‘इन-बॉर्न’ अनुभव.

पुरुषाला असे शब्द सुचतील की नाहीं, मी साशंक आहे, आणि त्यानें ‘परकायाप्रवेश’ केला तरी त्याच्या स्त्री-भूमिकेतून लिहिलेल्या कवितांना तेवढी डेफ्थ व नॅच्युरलनेस, तेवढीच खोली व नैसर्गिकता, येईल कां, हा प्रश्नच आहे. ‘अरे संसार संसार। जसा तवा चुल्ह्यावर। आधी हाताला चटके। तवा मिळते भाकर’ असे परिणामकारक वर्णनाचे, ऍप्ट (apt, अगदी चपखल) अशा उपमा दिलेले शब्द फक्त एक स्त्री बहिणाबाईच लिहू शकतात, पुरुष नव्हे. महादेवी वर्मा ‘बीन भी हूँ मैं तुम्हारी रागिनी भी हूँ’ असें अगदी सहजपणें लिहून जातात. ‘परकायाप्रवेश’ करूनही एखादा पुरुष स्त्री-भूमिकेतून इतक्या सहजपणें असें लिहूं शकेल काय, मला शंका वाटते.

एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, तर, बेलसरे बाईंनी कविता लिहिलेल्या आहेतच.  त्या सामाजिक विषयांवरील आहेत, निसर्गावर आहेत; जीवनावर; यश-अपयश याच्याविषयीच्या ऍटिट्युडवर, जीवनातील-दृष्टिकोनावर आहेत; आणि एक कवि म्हणूनही, कवित्वाबद्दल व कवितेबद्दल आहेत . (‘कवी भाव भावनांचा राजा’, व  ‘अंतर्मनातील अनुभूतीचा आविष्कार असते कविता’ , या ओळी मला भावल्या).  पण मला विशेष उल्लेख करायचा आहे तो, एक स्त्री म्हणून कवयित्रीने लिहिलेल्या कवितांचा. त्या नारीची विविध रूपें दाखवतात, जसे, माहेराबद्दलच्या, आईपणाबद्दलच्या , सासू-सून या नात्याबद्दलच्या ; व अर्थातच, ‘per se नारीत्वा’शी संबंधित कविता ; आणि त्यातही काहीं तरल, तर काही समाजभान असलेल्या, तर काहीं विद्रोहात्मक किंवा  मनातील ‘आक्रोशा’ला शब्दरूप देणार्‍या अशा.  त्या कविता, माझ्यासारख्या एका पुरुषाला, एक नवीन पर्सपेक्टिव्ह, एक नवीन दृष्टी देतात ; नवीन विचारांशी परिचयही होतो. उदाहरणेंच द्यायची झाली, तर,  ‘ती’, ‘लढाई’, अग्निपरीक्षा’, ‘आरक्षण’ वगैरे.

 • संग्रहातील काहीं कविता गद्याकडे जास्त झुकलेल्या आहेत कां ? –

आजच्या एकूण मराठी कवितेतच, ‘फ्री-व्हर्स’ (Free-Verse) म्हणजे मुक्तकाव्याचा ट्रेंड आहे, लयबद्ध काव्यापेक्षाही खूपच अधिक ; अनलाइक उदा. उर्दू , जिच्यात गज़ल व नज़्म या दोहोंनाही महत्व आहे. मला स्वत:ला ग़ज़लसारखें लयबद्ध काव्य  –  वाचायला व लिहायला  –  जास्त आवडत असले, तरीही,  माझें मत आहे की, आपल्याला जें मांडायचें आहे, त्यासाठी मुक्तकाव्य हा फॉर्म जास्त उपयुक्त होईल, असे जर कोणाला कधी वाटलें, तर त्याचा वापर करायला हरकत नाहींच. (मी स्वत: असेंच करतो.)

मुक्तकाव्य हा गद्याकडे झुकणाराच काव्यप्रकार आहे, कधी थोडा कमी, कधी थोडा अधिक. त्यानें तसा फरक पडत नाहीं, असे मला वाटतें.  काव्यासारखे गद्य-लेख लिहिले, तर ते ‘गद्यकाव्य’ म्हटले जातात.

(किंवा, डॉ. राम पंडित यांच्या संज्ञेप्रमाणें, ‘काव्यात्मक गदय’). डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी सांगतात की, एकनाथांची भारुडें ‘लयबद्ध गद्या’त आहेत (मात्र, ती पद्यबद्ध आहेत अशीच साधारणतया समजूत असते).

असें पद्यमय गद्य लेखन जर ऍप्रिशिएट केले जातें, आवडतें ; तर मग, काव्यात, टोकदार भावना काँपॅक्टपणें मांडत असतांना, तें गद्याकडे झुकलें तर काहींही हरकत नाहीं.

माधव जूलियन यांनी त्यांच्या ‘गज्जलांजली’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलें आहे की, वामनपंडित यांची ओवी म्हणजे जवळजवळ गद्यच आहे. वसंत बापट यांनी एका भाषणात सांगितले, (ज्याला मी हजर होतो), की ‘रामदासांचे विचार थोर असले तरी त्यांचे काव्य, ‘काव्य’ या निकषानें श्रेष्ठ नाहीं, कारण तें गद्यमयच आहे ; आणि, रामदास जर आजच्या काळात लिहीत असते तर त्यांनी त्यांचें लेखन गद्यातच केलें असतें’. ना. घ. देशपांडे त्याच्या ‘खूणगाठी’च्या प्रस्तावनेत सांगतात की, “रामदासांच्या ओव्या ‘गद्यघोषा’तच म्हणत असत”. म्हणजेच, तें काव्य गद्याप्रमाणेंच आहे, हें स्पष्ट आहे.

यमक-अनुप्रासादींचा वापर करणारे ट्रेडिशनल, पारंपरिक, धर्तीचे काव्य जर गद्यासमान असूं शकते, तर मग, मुक्तकाव्याबद्दल बोलायलाच नको; तें तर कमीअधिक प्रमाणात, गद्यासमानच असते. विविध भाषांमधे, कितीतरी कवींच्या, फ्री-व्हर्समधील, गद्याकडे झुकणार्‍या, ओरिजिनल व भाषांतरित कविता मी वाचलेल्या आहेत, व , केवळ त्या रूपामुळे कवितांच्या एक्सप्रेशनमधे कांहीं कमतरता आली आहे, असे मला तरी वाटलें नाहीं. अर्थातच, इंपॅक्ट होणें महत्वाचें.

मात्र, असें काव्य खूपच-‘गद्याळलेलें’ बनूं नये, एवढेंच. पुन्हां राम पंडितांचा रेफरन्स. त्यांचें म्हणणें असें की, मराठी कविता अत्यधिक गद्यात्मक होत चालली .. (आहे). ते असेंही लिहितात की, दुर्बोधता हा मराठी काव्यात दाखल झालेला अवगुण … (आहे). माझा अनुभव असा की, ‘मुक्तकाव्य’ असूनही लय असलेलें काव्य मी वाचलें-ऐकलेले आहे, खासकरून हिंदीत. याचा अर्थ असा की, मुक्तकाव्य ‘गद्याळलेलें’ असलेंच पाहिजे, असें नाहीं. आनंदाची गोष्ट ही की, ‘आर्यमा’ संग्रहातील मुक्तकाव्य ‘शब्दबंबाळ’, ‘गद्याळलेलें’ व दुर्बोध झालेलें दिसत नाहीं. थँक् गॉड ! (अँड थँक् दि पोएट् ).

 • सामाजिक विचारांच्या कविता या संग्रहात आहेतच. त्यामधील कांहींमधे ‘विद्रोही’ सूर उमटला तर कांहींही अयोग्य नाहीं, असे मला वाटतें. दलित साहित्य नाहीं कां विद्रोही रूप घेऊन आलें ? शतकानुशतकें जर एखादी ‘जमात’, एखादा वर्ग, एखादा समूह, भरडला गेला असेल, तर, एक्सप्रेशन, प्रगटीकरण, विद्रोही शब्दांमधे होणारच. लोकसंख्येत ५० % स्त्रिया असूनही, त्यांना ईक्वॅलिटी मिळालेली नाहीं, बरोबरीचा दर्जा मिळालेला नाहीं, हें कटु सत्य आहे. त्यामुळे, स्त्रीच्या मनाची जी तगमग होते, तिला जी इनसिक्युरिटी येते, तिच्या मनात जो विद्रोहीपणा मनात येतो, त्याची कल्पना, मला वाटतें, पुरुषाला येणें फार फार कठीण आहे. १९४९ साली सिमॉन द बोव्हुए हिनें लिहिलेल्या ‘सेकंड सेक्स’ (‘जेंडर’, या अर्थानें), या पुस्तकात, तिनें त्या काळातील नवीन व विद्रोही समजला जाणारा असा विचार मांडला की, ‘पुरुष स्त्रीचें शोषण करतो कारण स्वत:ला तो आद्य-तत्व समजतो, तर स्त्रीला परतत्व, दुय्यम-तत्व समजतो’. या पुस्तकातील विचारांमुळे तिच्यावर खूप वैयक्तिक टीकाही झाली. परंतु, त्या अवास्तव टीकेमुळे तिचा सिद्धांत अयोग्य ठरत नाहीं ; तर उलट तें, टीका-करण्याचें-कृत्य, समाजाची अपरिपक्वताच दाखवते.

‘सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते’ असा सिद्धांत जेव्हां गॅलिलिओनें मांडला, तेव्हां चर्चला तो ‘विद्रोही विचार’च वाटला होता. अखेरीस काय झालें ? गॅलिलिओच खरा ठरला !

तसें म्हटलें तर, केशवसुतांच्या काळी त्यांची कविताही नवकविताच होती, व तिच्यातही विद्रोहाची

लक्षणे दिसून येतात. ‘नव्या मनूतिल नव्या युगाचा शूर शिपाई आहे । कोण मला वठणीवर आणूं शकतो तें मी पाहे।’ हा प्रस्थापित समाजव्यवस्थेला चॅलेंजच नाहीं काय? हा विद्रोहच की.  परत, विसाव्या शतकाच्या मध्यावर नवीन, ‘नवकाव्य’ हें रूप साहित्यात आलें व तो ट्रेंड सुरू झाला. ती विद्रोहीच कविता होती. तिच्याबद्दल ना. घ. देशपांडे म्हणतात, ‘भ्रष्ट जीवनाविरुद्ध बंड करून नवकविता उठली ; यात वावगें कांहींच नाहीं.’

काव्यातील विद्रोही भावनेला जर आपण अयोग्य मानणार असलो, तर मग नामदेव ढसाळांसारख्यांच्या काव्याला नाकारायचें काय ? मराठीतील दलित साहित्याची पहिली उघड प्रशंसा पु.लं.नी खुल्या दिलानें केलेली आहे, आणि त्यानंतरच अनेक लोक तें साहित्य वाचूं लागले, दलितांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. हिंदीतले थोर कवी ‘निराला’ हेही विद्रोही कवी होते. ‘देता हुआ बुत्ता। बोला कुकुरमुत्ता । अबे सुन बे गुलाब । भूल मत गर पाई ख़ुशबू रंगोआब । ….. ख़ून चूसा खाद का तूने अशिष्ट । डाल पर इतरा रहा है कैपिटलिस्ट !’  हे निरालांच्या कवितेतील शब्द , समाजातील

पेकिंग्-ऑर्डर (pecking-order) च्या विरुद्ध विद्रोह, तिला दिलेला चॅलेंज, दाखवत नाहींत काय ? उर्दूतील २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या पाच-सहा दशकांमधील ‘प्रगतीशील’ शायरांची नज़्म ही विद्रोही नाहीं काय ? साहिर लुधियानवी यांच्या ‘जला दो इसे, फूँक डालो ये दुनिया’ या शब्दांवर काय प्रतिक्रिया द्यायची ?

अहो, हें तर हल्लीच्या काळचें झालें. संत एकनाथ जेव्हां म्हणतात, ‘संस्कृत भाषा देवें केली ।  मराठी काय चोरापासुन झाली ?’, तेव्हां त्या काळच्या परिस्थितीनुसार तें वचन विद्रोहीच नव्हतें काय ? एवढेंच नव्हे, तर पुरातन कालातील, अवैदिक तत्वज्ञान , ( त्या संदर्भातील शब्द : ‘नास्तिक दर्शनें’ ) , जसें की लोकायत (चार्वाकपंथीय), जैनमत, बौद्धमत वगैरे, हेंही विद्रोहीच होतें की.

लिहिलेले विद्रोही विचार वाचकाला रुचतील न रुचतील, पटतील न पटतील, पचतील न पचतील; मात्र त्या प्रवृत्तीला, त्यामागील कारणांना, समजून घ्यायलाच हवें. विद्रोही विचार हे फक्त काव्यातूनच एक्स्प्रेस होताहेत, नक्षलवाद्यांसारखे हिंसक कृतींमधून  नाहीं ना ? झालें तर ! विद्रोही विचार उघड व निर्भीडपणें मांडले गेले, तरच समाजाची प्रगती होऊ शकते. परिस्थितीनुसार मनात विचार हे तर येणारच, मग ते कॉन्फॉर्मिस्ट असोत किंवा विद्रोही. पण विद्रोही विचार दाबून ठेवले, आवाज उठवला नाहीं, तर समाजातील अयोग्य प्रवृत्ती संपणार कशा ?

कवयित्री स्वत:ला ‘विद्रोही’ समजते, असें मात्र, संग्रहातील काव्य वाचून, मला वाटत नाहीं, कारण मूलत: या संग्रहातील कविता विद्रोही नाहीं.  अर्थातच, या संग्रहातील कवितांमधे जो काहीं विद्रोहीपणा मधून मधून उसळतो, तो, कवयित्री  ‘भरडल्या जाणार्‍या स्त्री-जातीची’ प्रतिनिधी म्हणून प्रस्फुटित करत आहे, व्यक्तिगत अनुभव म्हणून नाहीं, हें मला तरी स्पष्ट आहे.

कवयित्री जेव्हां लिहिते,

*‘रामा आज मलाही तुझी अग्निपरीक्षा घ्यायचीय’,

किंवा,

*‘आतां जन्म देणंच नाकारणार आहोत आम्ही’,

तर मला तें अयोग्य तर वाटत नाहींच, तो मला काव्यातील दोष वाटत नाहींच; तर, ते शब्द माझ्या हृदयाला चरचरून स्पर्शून जातात, ‘अरे !!!’ असा उद्गार ऑटोमॅटिकली, नकळत, मुखातून बाहेर येतो. मला ती, (कवयित्री जिला काव्यात रिप्रेझेंट करत आहे, त्या ), ऑप्रेस्ड-स्त्रीवर्गाची स्वाभाविक प्रतिक्रिया वाटते, स्त्रीच्या जिवंत अनुभवांचें व विचारांचें प्रतिबिंब वाटते, व ती मला अंतर्मुख व्हायला लावते.

 • वरील संदर्भाच्या निमित्तानें, थोडेसें चिंतन रामाबद्दल व रामायणाबद्दल :

एकीकडे कवयित्री,  ‘रामाच्या पवित्र भूमीत’, ‘मर्यादापुरुषोत्तम रामाचा आदर्श ठेवून’ असे लिहून

रामाला वंदनीय ठरवते ; तर दुसरीकडे, ‘तुझ्या घराण्याला दोन दोन वारस देणार्‍या । त्या अर्धांगिनीला तू त्यागले नाहीं रामा । तर केलाय तिचा खून’ ,  किंवा ,  ‘स्त्रियांचे स्त्रीपण जपण्यासाठी ।

रामा ……. टाकायचंय तुला अग्निकंडात’ असे रामाला पुट्-डाउन करणारे (नीचा दिखानेवाले) किंवा शिक्षा (सज़ा) देण्यायोग्य, असे शब्दही लिहून जाते. पण मला यांत काहींही विरोधाभास वाटत नाहीं.

रामायण ही आदर्शांचीच कहाणी आहे. ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाई पर वचन न जाई।’ असे म्हणणारा आदर्श पुत्र राम ; ‘निरोप कसला माझा घेता । जेथे राघव तेथें सीता।’ असे म्हणून वनात जाणारी आदर्श पत्नी सीता ; रामाबरोबर वनवास व दीर्घकालीन ब्रह्मचर्य स्वेच्छेने स्वीकारणारा आदर्श भाऊ लक्ष्मण, पतीविना चौदा वर्षें त्याची आठवण जपणारी आदर्श विरहिणी उर्मिला; मिळालेले राज्य निरपेक्षपणे रामाला परत देणारा, व रामानें वनवास संपायच्या आधी परत यायला नकार दिल्यावर, एक नव्हे दोन नव्हे तर चौदा वर्षे लालसेविणा रामाच्या नावानें , स्वत: नगराबाहेर झोपडीत राहून, राज्य चालवणारा आदर्श भाऊ व आदर्श माणूस भरत; हनुमान हा आदर्श भक्त; परस्त्री सीतेला तिच्या अनुमतीविणा हात न लावणारा रावण हा आदर्श शत्रू ; असे एक ना दोन, अनेक आदर्श !!  खरें तर,

‘हे खग मृग हे तरुबरश्रेनी। तुम देखी सीता मृगनैनी?’ असा आक्रोश करणारा रामही, एक व्यक्ती म्हणून, आदर्श पतीच आहे. राम हा अर्थातच, एक आदर्श राजा आहे, कारण आपण अजूनही रामराज्याचें गुणगान करतो, उदाहरण देतो. पण, पण,  ….

माणूस जीवनात विविध भूमिका (roles) प्ले करत असतो, व तो प्रत्येक वेळी प्रत्येक भूमिकेत आदर्श ठरेलच असे नाहीं. माणसाचे काहीं रोल्स् त्याच्या काहीं इतर भूमिकांशी क्लॅश होऊ शकतात, व निर्णय घेतांना एका ‘रोल’चा विचार केला तर, कदाचित दुसर्‍या ‘रोल’वर अन्यायही होऊ शकतो. अशा वेळी माणसाला त्याच्या प्रायॉरिटीज् ठरवाव्या लागतात, अग्रक्रम ठरवावा लागतो.

राम हा आदर्श शत्रू होता काय ? तर, नाहीं ; कारण व्यक्तिगत वैर नसतांनाही, त्यानें झाडाआडून बालीचा वध केला. पण तो आदर्श राजकारणी मात्र होता, कारण बालीवधामुळे त्याला सुग्रीवाचे व वानरसेनेचे साह्य मिळालें. बिभीषणाचा स्वीकार केल्यामुळे रामाला लंका जिंकणें सोपें झालें . ‘घर का भेदी लंका ढाए’ ही म्हण बरेच काहीं सांगून जाते. (त्या दृष्टीनें, बिभीषण हा आदर्श ‘फितूर’ ठरतो.)

रामानें लंकेत सीतेची अग्निपरीक्षा कां घेतली ? तर, जनतेची संभाव्य टीका टाळण्यासाठी. म्हणजेच, त्यानें आपल्या, ‘पती’ या भूमिकेपेक्षा, आपल्या ‘राजा’ या भूमिकेला अग्रक्रम दिला. नंतर,

राजा झाल्यानंतरच्या काळातील, रामाने केलेला सीतेचा त्याग ही कथा  वाल्मीकि-रामायणात नाहीं, तर ती ‘उत्तररामचरित’ मधे आहे . परंतु, तें कांहीही असो ;  त्या  घटनेचा विचार करायचा झाला तर ,

रामानें सीतेचा त्याग करून तिला वनवासात कां धाडलें ? तर, लोकांच्या टीकेमुळे;  ‘राजा’ या पोझिशनला, पदाला,  (म्हणजे, स्वत:च्या राजेपणाला नव्हे, तर per se ‘राजा’ या स्थानाला, पदाला) कमीपणा येईल, म्हणून. वेदोपनिषदांप्रमाणे, राजा हा प्रजेच्या पित्याप्रमाणे असतो ; अर्थातच, राजाची पत्नी, म्हणजे राज्ञी, ही प्रजेच्या मातेप्रमाणे असते. लंकेहून परत अयोध्येला परतल्यानंतर राम आपले राज्य स्वीकारणार होताच. तेव्हां सीता राज्ञी झाली असती, प्रजेच्या मातेसमान झाली असती. अशा स्थानावरील व्यक्तीवर डाग नको, म्हणून रामानें सीतेला अग्निदिव्य करायला लावलें. आणि नंतर, कालांतरानें, एका रजकाचे बोल कळताच, ‘नृप म्हणजे प्रजेचा पिता’ या स्थानाची महती कमी होऊ नये, म्हणून सीतेला वनवासाला घाडलें. म्हणजेच, राम हा आदर्श पती असूनही, जेव्हा त्याच्या ‘राजा’ व ‘पती’ या भूमिकांमधे क्लॅश झाला, तेव्हां रामानें आपल्या ‘आदर्श राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिले.

पण, हें करत असतांना, सीतेवर मात्र अन्याय झालाच, हें मान्य करणें प्राप्त आहे. कवयित्रीसारखी एक समाजभान असलेली मॉडर्न-जमान्यातील स्त्री, एकीकडे रामाला ‘आदर्श लोकाभिमुख राजा’ म्हणून पाहते, (looks up to him), तें त्याच्या ‘राजा’ या भूमिकेच्या संदर्भात. अन्, दुसरीकडे, राम जेव्हां स्वत:चा, ‘पती’ हा रोल , ‘राजा ’ या रोलपुढे सबऑर्डिनेट करून, दुय्यम ठरवून,  सीतेवर अन्याय करतो, तेव्हां तीच कवयित्री रामावर रागावते, चीत्कार करते, खडे बोल सुनावते. हेंही योग्यच आहे. आधी म्हटल्याप्रमाणें, हा विरोधाभास नाहीं.

रामायणाचाच विषय आहे, आणि रोल्सचा, माणसाच्या भूमिकांचा, विचार करीत आहोत म्हणून, हेंही ध्यानात घेऊ या की, लक्ष्मण जरी आदर्श भाऊ असला तरी, त्यानें ‘आदर्श भाऊ’ या आपल्या भूमिकेपुढे स्वत:च्या ‘पती’ या भूमिकेला दुय्यम स्थान दिलें, कारण त्यानें आपली पत्नी उर्मिलेला १४ वर्षें स्वत:पासून दूरच, अयोध्येलाच, ठेवलें, स्वत:बरोबर नेलें नाहीं. विरहिणी उर्मिलेची व्यथा कितींनी मांडली आहे ? किंवा, गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा हिच्या व्यथेचा किती जणांनी विचार केला आहे ? (दोहोंसाठी, मैथिलीशरण गुप्त हें एकमात्र उदाहरण. ‘सखि वे मुझसे कहकर जाते’ ही त्यांनी काव्यातून दर्शवलेली व्यथा हृदयाला आकुल करते). तेव्हां, उद्या एखाद्या आजच्या नारीनें उर्मिलेचें उदाहरण देऊन लक्ष्मणाला खडे बोल सुनावले, किंवा यशोधरेचे उदाहरण देऊन बुद्धाला; तर तें समजून घ्यायला हवें.

 • संग्रहावरील काहीं अन्य प्रतिक्रिया , थोडक्यात :
 • दाद देतो खालील काही ओळींना :

*चंद्रानें खोडी केली ।  . . . .  रिक्त रिक्त मेघही झाले .. .

*शेवटचा श्वास घेणार्‍या । कळ्यांना जगवावे म्हणून। रिमझिमणारी सर होऊन । तूं ये .

*बारा मासातला एक मास अधिक । एक तिथी, एक श्वास अधिक.

* अन् पुतळे घडवण्याऐवजी। चांगली माणसं घडवा.

*जाणीवपूर्वक मी त्या पानाला। केलं नाहीं बाजूला ।

कालांतरानें संपणारच आहे त्याचं अस्तित्व । मग घाई कशाला ?

*जीवनाच्या या लढाईत । तू हरलास तरी चालेल । पण रणांगणाला पाठ दाखवून । पळणार्‍या पळपुट्याची माता होणं । मुळीच खपणार नाहीं मला । अशावेळी तुझा अभिमन्यू झाला तरी । चालेल मला …

*राक्षस असलेल्या रावणाने । तुझ्या बायकोला हातही लावला नाहीं । तरी सुद्धा । एका नतद्रष्टाच्या चिथावणीनें । तू जानकीला त्यागलेस । …… ती परगोत्री होती म्हणून …

(राक्षस म्हणवल्या जाणार्‍या रावणाच्या किती opposite, विरुद्ध, आचरण मर्यादापुरुषोत्तम म्हणवल्या जाणार्‍या रामाचें होतें, हें, इथें सहज ध्वनित होतें ; त्या comparison वर, त्या तुलनेवर, जोर दिलेला नाहीं, तरीही.)

*आधी कडक उन्हाच्या झळा । मग आशेचा पावसाळा .

*.. तू झेप घ्यावीस म्हणून ।  मी माझे गरुडपंख छाटले.

*मेलेल्या मढ्याला । अद्यापही सरणात । धुमसावसं वाटतंय .

अशी आणखीही उदाहरणें आहेत, सहज आठवली ती वर लिहिली आहेत.

 • काहीं निसर्गचित्रें वाचून ‘हायकू’ आठवले (हायकू ३ ओळींचा असतो, हाच एक फरक). उदा.-

*त्या इंद्रधनुच्या पाती । सप्तरंगात न्हाऊन गेल्या ।

*उंच उंच गगनाला । भिडे खजूराची झाडे ।

*…. मधे वेणूचा आवाज । वाळूबेटातून येई ।

*वाहे ओढा खळाळत । … नाहीं पाणी तें आटत ।

… जाईजुईचें अंगण। … प्रात:काळी घंटानाद।

 • ‘उन्हं तापली तापली’ हें शब्द वाचून बहिणाबाई आठवल्या. तितकेच प्रत्ययकारी शब्द.
 • *‘देवदास’ कवितेतील सुरुवातीचा भाग वाचून आठवला गुरुदत्तचा ‘प्यासा’; आणि अर्थात्, गुरुदत्तचें व्यक्तिगत जीवनही.

*त्याच कवितेतील ‘तू ना अरत्र आहेस ना परत्र, ना भूलोकी आहेस ना अन्यत्र’ या शब्दांनी आठवली विश्वामित्र व त्रिशंकू यांची कथा, आणि त्या कथेत सांगितल्याप्रमाणे पृथ्वी व स्वर्ग यांच्यामधे लोबकळणारा त्रिशंकू.

*त्याच कवितेतील अखेरच्या, अर्ध्या पेल्यासंबंधी ओळी वाचून आठवली ‘Half glass empty or half glass full’ या अर्थाची इंग्रजी म्हण ; आणि मंगेश पाडगावकर यांची एक कविताही –

. . . .  ‘पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणतां येतं

पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणतां येतं

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं,

तुम्हीच ठरवा.

कसं जगायचं, तुम्हीच ठरवा ;

कण्हत कण्हत, की गाणं म्हणत,

तुम्हीच ठरवा’.

*‘देवदास’ ही कविता पारो-चंद्रमुखीचा संदर्भ देऊन, देवदास या कादंबरीची आठवण करून देतेच देते, पण त्याव्यतिरिक्त, जाने-अनजाने में, ती अन्य संदर्भांचीही आठवण जागवते, हा एक ऍडिशनल आनंद तिच्यामुळे प्राप्त होतो.

 • त्याचप्रमाणे, ‘असंच जीवन जगायचं असतं’ मधील,  ‘निंदकाला हितैषी मानायचं असतं’ या ओळीनें एक तर आठवले ‘निंदकाचें घर असावे शेजारी’ म्हणणारे संत तुकाराम महाराज, व दुसरे आठवले, ‘निंदक नियरे राखिये आंगन कुटी छबाय । बिन पानी साबन बिना निर्मल करे सुहाय।’ असे म्हणणारे संत कबीर. संतांच्या मांदियाळीचा उघड उल्लेख नसूनही, तिची आठवण जागी व्हावी, हा कवितेचा गुण.
 • त्रुटी ? असतीलही, आहेतही, असणारच. ( अहो, काढायच्याच म्हटल्या तर, वाल्मीकी व व्यासांच्याही त्रुटी काढता येतील की). पण, मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी समीक्षक नव्हे तर केवळ एक रसिक वाचक आहे. त्यामुळे काव्यसंग्रह वाचतांना, आलोचना-टीका हा माझा हेतू नसून, काव्यातील बलस्थानांचा, सौंदर्यस्थळांचा आनंद घेणें , हा होता ; आणि तो आनंद मला मिळाला .
 • ‘आर्यमा’चें मुखपृष्ठ : शीर्षक व चित्र :

काव्यसंग्रहाचें नांव ‘आर्यमा’ हें, एक वेगळे नांव असल्याकारणानें, नजरेत भरते, मनात ठसतें, लक्षात रहाते.

 • आर्यमाचा अर्थ काय ? संस्कृतमधे, किंवा मराठीतही, ‘आर्यमा’ असा शब्द सहसा दिसून येत नाहीं. तेव्हां आपल्याला विचार करून त्याचा अर्थ शोधायला हवा.
 • शब्दकोशात ‘आर्य’ हा शब्द आहे. अनेकांचा असा समज आहे की आर्य हें वंशनाम आहे. पण तसें नाहीं. आज अनेक इंडोलॉजिस्टही हेंच सांगतात की, आर्य हे वंशनाम नाहीं. व्ही. एस्. आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी सांगते की ‘आर्य’ हें एक विशेषण आहे, व त्याचे त्या शब्दकोशामधे दिलेले कांहीं अर्थ असे आहेत : ‘Worthy, Respectable, Honourable, Noble, Fine, Excellent, A respectable or honourable man, Honorific adjective & a respected mode of address, Revered or honoured Sir, A man who is faithful to the religion & laws of his country’.
 • संस्कृतमध्ये ‘अर्यमन्’ असा शब्द आहे. त्या शब्दापासून ‘आर्यमा’ शब्द बनला असेल काय ? त्याविषयीची चर्चा थोडेसें-पुढें केलेली आहे. प्रस्तुतच्या ठिकाणीं फक्त त्याचा उल्लेख करून ठेवला आहे.
 • शब्दकोशात आणखी एक शब्द आहे : ‘आर्यक’. त्याचा अर्थ आहे – ‘An honourable or respectable man’.

म्हणजे, ‘आर्य’ हें एक विशेषण व ‘आर्यक’ हें एक नाम असलें, तरी , शब्दाला ‘क’ हा प्रत्यय लागूनही, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे . तसेच काहींसें ‘म’ प्रत्ययाचें असावें काय, असा विचार मनात येतो.

 • संस्कृतमधे, ‘म’ प्रत्यय लागूनही अर्थामधे बदल होत नाहीं, असे बरेच शब्द पाहता येतात. उदा.

आदि – आदिम ; अंत – अंतिम ; कर्द – कर्दम (चिखल) .  असेच अन्य शब्द  : मध्य – मध्यम ;

पंचन् – पंचम . ( संगीतात, मध्यम, पंचम हे शब्द आपल्याला परिचित आहेत. ) आणखी एक उदाहरण : ‘महिमन्’  म्हणजे,  ‘High Rank, Exalted Rank or position, Dignity’ . म्हणजेच, महा व महिम यांचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे. यावरून बनलेला शब्द ‘महामहिम’ हें एक विशेषण आहे, व हल्ली राजकारण्यांच्या मुखात हिंदी बोलतांना, राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे VIPs यांचा उल्लेख करतांना हे विशेषण नेहमी येते. फारसीतही, व पर्यायानें उर्दूत, असे ‘म’ प्रत्यय जोडलेले, व अर्थबदल न होणारे, शब्द आहेत. उदा. मर्द – मर्दुम (दोन्हीही म्हणजे, मनुष्य) .

 • थोडक्यात काय, तर मूळ शब्दाला ‘म’ प्रत्यय लागूनही अर्थ साधारणपणें तोच रहातो, राहू शकतो. यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की ‘आर्यम’ व ‘आर्य’ हे समानार्थी शब्द असू शकतात. अर्थात, ‘आर्यम’ हा शब्द, शब्दकोशातला नाहीं; तर मग, हा ‘कॉइन’ केलेला, बनवलेला, निर्माण केलेला, शब्द असूं शकेल काय ?
 • शब्द बनवण्याचें व अस्तित्वात असलेले शब्द वेगळ्या तर्‍हेनें वापरण्याचें पूर्ण स्वातंत्र्य साहित्यिकांना असते, ती त्यांची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलताच, असते.

*एक उदाहरण :  मंगेश पाडगांवकर यांच्या ‘शुक्रतारा’ या गीतातील ही ओळ  :  ‘आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा’. ‘मिसळुनी डोळे पहा’, असा शब्दप्रयोग कुणी कधी पाहिला आहे काय? आपण विविध गोष्टी मिसळतो, पण डोळे नव्हे. पण, ‘मिसळणें’ या शब्दाचा पाडगावकरांनी वेगळा व  किती सुंदर उपयोग केलेला आहे ! नजरेची भेटाभेट होणें याला पाडगावकरांनी डोळे मिसळणें म्हटलें आहे ! वा ! हीच तर कवीची खासियत !!

*आणखी एक उदाहरण : सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी, मुंबई-कोंकण या ‘रूट’वर प्रवास करणारी

‘संत तुकाराम’ ही बोट वादळामुळे बुडाली, त्या घटनेवर एका प्रसिद्ध कवीने बोटीचेंच नाव शीर्षक म्हणून दिलेली एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेत, तुफान-पावसाचे वर्णन करतांना ‘द्रप्स येती..’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. या शब्दाबद्दल एका समीक्षेत अशा अर्थाची टिप्पणी केलेली होती की, ‘‘द्रप्स हा शब्द मराठीमधील नाहीं, तर, drops या इंग्रजी शब्दावरून कवीनें तो बनवलेला आहे; आणि तसें करायची काहीं आवश्यकता नव्हती ; द्रप्सऐवजी ‘थेंब’ शब्द वापरला असता तरी चाललें असतें; लयही बिघडली नसती’’. द्रप्स हा शब्द कवीने तयार केलेला आहे, हे स्पष्टच आहे; पण ज़रासा विचार केल्यावर, हा शब्द किती योग्य आहे, तें लक्षात येते. तुफानात पावसाची जोरदार झड वेगात रपरपा फटके मारत होती, हे सर्व चित्र ‘द्रप्स’ या शब्दातून ध्वनित होते. (तसें, ‘थेंब’ या श्दानें झालें नसतें ).  असा चित्रमय शब्द कवीने coin केला,  हेंच त्याचें कवी म्हणून मोठेंपण.

 • तसाच, कवयित्रीनें कदाचित ‘आर्यमा’ हा शब्द विचारपूर्वक कॉइन केलेला असू शकेल, असें मला वाटतें. आपण ‘आर्यम’ या कॉइन्ड शब्दाचा काय अर्थ असावा, हें पाहिलें. मग आर्यमा म्हणजे काय असावे ? जर आर्यमा हा शब्द कॉइन केलेला असेल, तर असा एक शब्द कॉइन  करून कवयित्रीनें, ‘गागर में सागर’ म्हणतात तसा, त्यात किती अर्थ भरलेला आहे !
 • संस्कृतमधे ‘आर्य’ चें स्त्रीलिंग ‘आर्या’ होतें. तसेंच ‘आर्यम’ चें ‘आर्यमा’ हें स्त्रीलिंग होईल. ही ‘आर्या’ अथवा ‘आर्यमा’ म्हणजे, Worthy, Respectable, Honourable, Noble, Fine, Excellent, Faithful to the religion & laws of the country, अशी स्त्री. अशी स्त्री कोण बरें असावी ?
 • एक शक्यता अशी की, अशी ‘आर्यमा’ स्त्री म्हणजे, स्वत: कवयित्रीच. त्यामुळे, या शीर्षकातून असा अर्थ ध्वनित होऊ शकतो की : कवयित्री ही अशा प्रकारची म्हणजे respectable, honourable स्त्री आहे , म्हणून , तिची ही रचना वाचकांनी सीरियसली, गंभीरतेनें, घ्यावी, त्यातील मुद्द्यांवर मनन-चिंतन करावे ; आणि, ऍज अ कॉनसिक्वेन्स, समाजातील ज्या गैर गोष्टी कवयित्रीनें आपल्या काव्यात एक्स्प्रेस केलेल्या आहेत, त्या काढून टाकण्यासाठी वाचकानें यत्न करावे.
 • किंवा, असाही अर्थ ध्वनित होऊ शकतो, की per se ‘स्त्री’, म्हणजेच प्रत्येक स्त्री, ही आर्यमाच आहे, Noble, Respectable, Honourable आहे. असा अर्थ घेऊन जर या संग्रहातील काव्य वाचलें, तर :  एका बाजूस हा, अगदी योग्य असूनही, ‘युटोपियन’ समाजामधेच अमलात आणला जाईल असा, विचार ; आणि दुसर्‍या बाजूस समाजातील प्रत्यक्ष विषम परिस्थिती, (जिथें स्त्रीला तिची ईक्वल पोझिशन, समान स्थान, मिळत नाहींये) , या दोहोंमधील विरोधाभास उठून दिसतो.
 • मराठी व्याकरणाप्रमाणें, तत्सम/तद्भव मानून , ‘आर्यम’ या शब्दाचें ‘आर्यमा’ हें संबोधन होईल.

जसें आदिम – आदिमा ; अंतिम – अंतिमा .( ‘हे आदिमा हे अंतिमा’ हे गीत प्रसिद्धच आहे ). तेव्हां,

‘आर्यमा’ म्हणजे ‘हे आर्यमा’ , म्हणजेच, हे आर्य माणसा, हे माननीय माणसा, हे आदरणीय माणसा,

हे धर्म (समाजधर्म) व देशाचा कायदा (सामाजिक न्याय) यांच्यावर निष्ठा असणार्‍या माणसा. ‘आर्यमा’ या शब्दातून असाही अर्थ ध्वनित होऊं शकतो.

 • आपण संग्रहातील कविता वाचल्यावर ध्यानात येते की, समाजाभिमुख कविता त्यात आहेत, तसेंच स्त्रीजातीच्या आक्रोशाशी संबंधित विद्रोही भावना एक्सप्रेस करणार्‍या कविताही आहेत. भारतीय संविधानानें, पुरुष व स्त्री यांना ईक्वॅलिटी, समानता, बहाल केलेली आहे. पण वास्तव काय आहे ?

स्त्री ही अजूनही एक्स्प्लॉइट केली जात आहे. म्हणून कवयित्री आपल्या काव्यसंग्रहाला ‘आर्यमा’ हें नांव देऊन,  जणूंकांहीं ‘आर्य’ पुरुषांना उद्देशून करून हें दाखवते आहे, की : ‘‘हे ‘आर्य’ पुरुषांनो, तुम्ही स्वत:ला माननीय म्हणवता ना, आदरणीय म्हणवता ना, समाजधर्म व सामाजिक न्याय यावर निष्ठा असणारे म्हणवता ना, मग हें काटेरी वास्तव पहा ! ; आणि ही अयोग्य, निंदनीय परिस्थिती बदला”.

 • पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहूनही वरील स्पष्टीकरण योग्य आहे, हें प्रतीत होतें. कवयित्रीनें चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी, तिला स्वत:ला अभिप्रेत, शीर्षकापाठील अर्थ समजावून सांगितला होता काय, याची कल्पना नाहीं. पण, तसें नसेल, तर चित्रकारानें योग्य तो अर्थ लावला आहे असे समजायला हवे.
 • भारतीय इतिहासातील, ‘आर्य’ हें संबोधन ज्या व्यक्तीच्या नावाला नेहमी जोडतात, अशी व्यक्ती म्हणजे विष्णुगुप्त चाणक्य. आणि, मुखपृष्ठावरील चित्र नक्कीच आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य (खरें तर, ‘कौटल्य’) याची आठवण करून देते. कौटिल्यानें त्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात, सुयोग्य राज्यव्यवहार कसा असावा, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, चित्र शीर्षकाला पूरकच आहे. शीर्षकाबरोबरच, चित्र पाहिल्यावर असे प्रतीत होतें की, कवयित्री चाणक्याला उद्देशून म्हणते आहे की : ‘हे आर्य चाणक्या, पहा तुझ्या भारतात कशा तर्‍हेचा राज्यव्यवहार व समाजव्यवहार चाललेला आहे !!’
 • आर्यमा म्हणजे ‘सूर्याचें उगमस्थान’, असे प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात.

(‘सूर्याचें उगमस्थान’ म्हणजे, ‘पूर्वदिशा’, असा अर्थ सबनीसांना अभिप्रेत आहे काय, नकळे.)

 •  शब्दकोशात मात्र मला सबनिसांनी सांगितलेला अर्थ सापडला नाहीं. आपटे यांचा

आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी कोश, ‘आर्य’, ‘आर्यम’ अथवा ‘आर्यमा’ यांच्याशी साधर्म्य असलेला एक शब्द दाखवतो. तो आहे ‘अर्यमन्’. हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा एक अर्थ हा शब्दकोश असा देतो : ‘The Sun’. (हा अर्थ, सबनीसांनी दिलेल्या अर्थाशी कांहीं संबंध दर्शवतो, हें खरें).

 

एक गोष्ट अशी की, संस्कृतमध्ये ‘न्’ अंत्याक्षर असलेले पुल्लिंगी शब्द, हे केवळ-तीनच रेफरन्स-शब्दांप्रमाणेंच ‘चालतात’, व ते  तीन शब्द आहेत, ‘तस्थिवान्’ , ‘भगवान्’ आणि ‘आत्मन्’. (रामो हरि: करी भूभृत् भानु: कर्ता च चंद्रमा । तस्थिवान् भगवान् आत्मा दशैते पुंसि नायका: ।). त्याप्रमाणें पाहिलें तर, अर्यमन् पासून ‘अर्यमा’ हा शब्द बनेल (जसें, आत्मन् चें आत्मा , महिमन् चें महिमा); ‘आर्यमा’ बनणार नाहीं. अमरकोशातून कांहीं बोध होतो काय, तेंही पाहू या. ( अमरकोश हा एक हजाराहून अधिक वर्षें जुना ‘संस्कृत धिसॉरस’ आहे ). सूर्यासाठी

जी नांवें अमरकोशात दिली आहेत , त्यातील प्रस्तुत विवेचनाच्या दृष्टीनें उपयुक्त भाग असा :

‘–सूर्यार्यमाऽऽदित्य-’ . याची फोड अशी होईल : ‘सूर्य-अर्यमा-आदित्य’. आचार्य रामचंद्र वर्मा यांचा ‘बृहत् प्रामाणिक हिंदी कोश’सुद्धा हेंच दाखवतो. तो कोश सांगतो की, ‘अर्यमा’ हा संस्कृत शब्द आहे, त्याचें मूळ आहे ‘अर्यमन्’ व त्याचा अर्थ आहे, ‘सूर्य’. म्हणजेच, सूर्य या अर्थानें या पुस्तकात हा संस्कृत शब्द वापरलेला असेल तर, तो ‘अर्यमा’ असा असायला हवा, ‘आर्यमा’ नव्हे.

 • पण, हा ‘आर्यमा’ शब्द जर मराठी ‘तद्भव’ शब्द असेल तर ? मराठीच्या संदर्भात एक शक्यता ध्यानात घ्यायला हवी. ती म्हणजे, संस्कृत शब्द मराठीत येतात तेव्हां त्यांच्यातील कांहींमध्ये झालेला बदल.

संस्कृतमध्ये र्‍हस्व असलेलें अक्षर, खास करून इकार अथवा उकार असलेलें अंतिम अक्षर,  मराठीत अनेकदा दीर्घ होतें, हें आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतें. उदा. कवि – कवी ,

रुचि – रुची, उपाधि – उपाधी, (प्रत्यय) ‘हि’ – ही, बंधु – बंधू, तंतु – तंतू.  पण कांहीं वेळा असा बदल, इकार किंवा उकार नसलेल्या व अंतिमही नसलेल्या अक्षरातसुद्धा होतो. उदा. अंध – आंधळा, पंगु – पांगळा, चंडाल – चांडाळ. येथें ‘अ’चा ‘आ’ झालेला आहे.

तोच ‘न्याय’ आपण ‘अर्यमा’ या संस्कृत शब्दाला लावला तर, त्याचें रूपांतरण मराठीत ‘आर्यमा’ होणें शक्य आहे.

अशा प्रकारेंही  आपण ‘आर्यमा’ हा शब्द मराठी वापरासाठी डिराइव्ह करूं शकतो.

कवयित्रीनें तसें केलें असेल काय ? आणि, तसें असल्यासही, हा शब्द तिनें विचारपूर्वकच निवडलेला आहे, यात शंका नाहीं.

 • { या शब्दाचा उगम शोधतांना, मी विचार केलेल्या आणखी एका गोष्टीचा जातां जातां उल्लेख करतो. ती म्हणजे, ‘आर्यमा’ हा शब्द फारसीमधून आला असेल काय ? कदाचित् ही शक्यता अवास्तव वाटेलही; पण आपण हें ध्यानात घ्यायला हवें की वैदिक संस्कृत आणि जुनी, पुरातन अवेस्तन फारसी भाषा यांच्या शब्दकळेत बरेच साम्य आहे. संस्कृत व पुरातन-फारसी या सामुहिक भाषावंशाला ‘इंडो-इरानियन’ असें म्हटलें जातें. त्यातून, मध्ययुगात फारसी ही भारतातल्या अनेक राज्यांची राज्यभाषा होती, जसें की मुघल व दक्षिणेतील शाह्या. त्यामुळे वर उल्लेखलेल्या शक्यतेचा विचार तरी करायला हवा.

अवेस्तन फारसीमध्ये ‘आर्य’ या शब्दाचा उल्लेख आहे. झरतृष्ट व त्याच्याही आधीच्या ‘यिमा’ यांच्या संदर्भात, ‘आइरियाणाम् (आर्याणाम्) वाईजो’ असा शब्द वापरला गेलेला आहे. (पुरातन पर्शियनमधील या शब्दाचें इंग्रजीत ट्रान्सलिटरेशन असें : ‘Airiyanam vaejo ). पण, तरीही, फारसीमधून ‘आर्यमा’ हा शब्द मराठीत आयात केलेला किंवा डिराइव्ह केलेला दिसत नाहीं. माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) तसेच यू. म. पठाण या दोघांच्याही फारसी-मराठी कोशात ‘आर्यमा’ किंवा त्यासमान दुसरा एखादा शब्द सापडत नाहीं. उर्दूचें काय ? कारण, उर्दूमध्ये अनेक फारसी शब्द आहेत. तिच्याद्वारेंही हा शब्द मराठीत आला असेल काय, हेंही तपासलें पाहिजे. परंतु ‘मद्दाह’ यांच्या उर्दू-हिंदी शब्दकोशात तसेंच श्रीपाद जोशी-एन्. एस्. गोरेकर यांच्या उर्दू-मराठी शब्दकोशातही ‘आर्यमा’ किंवा त्यासमान शब्द सापडत नाहीं. ‘दखनी’ या दक्षिण भारतात मध्ययुगात विद्यमान असलेल्या भाषेतही बरेच फारसी शब्द येतात. पण या भाषेतूनही हा शब्द मराठीनें घेतला असण्याची शक्यता दिसत नाही. उलट, दखनीनेंच मध्ययुगीन मराठीकडून बरेच शब्द घेतले आहेत. डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘दखनी भाषा’ या पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या शब्दकोशातही हा, किंवा त्यासमान, शब्द नाहीं.

त्यामुळे, फारसीमधून हा शब्द मराठीनें, व पर्यायानें, प्रस्तुत कवयित्रीनें, घेतला असण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाहीं. }

 • तें कांहींही असो, सबनीस म्हणतात तसा अर्थ, (म्हणजे, नुसतें ‘सूर्य’, किंवा ‘उगवता सूर्य’, किंवा ‘उगवत्या सूर्याची दिशा, पूर्व’, असा अर्थ), घेतला, तरीही आपल्या विवेचनाला मूलत: बाधा पोचत नाहीं. पृथ्वीच्या दृष्टीनें, सर्वात माननीय, सर्वात आदरणीय, सर्वात वंदनीय काय असेल तर तें म्हणजे, सूर्यच. (त्यामुळे, उगवत्या सूर्याची दिशा पूर्व हीसुद्धा पूज्यच).

मुखपृष्ठावरील चित्रात सूर्यही दाखवलेला आहे.

 • पण मग, ‘आर्यमा’चा खरा अर्थ कोणता, कुठला अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे, अमुक की तमुक? याचें उत्तर असें की : कुठलाही एक असूं शकतो, दोन असूं शकतात, अनेकही असूं शकतात.

*आणखी एक गोष्ट : आपण जो अर्थ काढतो आहोत, तो अर्थ, कवयित्रीला अभिप्रेत नसलेला, असा असला, तरीही काही बिघडत नाहीं.

*संस्कृतमधे असे अनेकार्थी श्लोक खूप आहेत. अशा प्रकारच्या ‘मल्टि-मीनिंग’ श्लोकांबद्दल

अयोध्याप्रसाद गोयलीय त्यांच्या ‘शेरो-सुख़न’ या पुस्तकात लिहितात, ‘संस्कृत में एक-एक शब्द के कई-कई अर्थ होते हैं । अत: संस्कृत कवि अनेकार्थी श्लोक लिखकर अपनी प्रतिभा का परिचय देते रहे’.

(असे अनेकार्थी श्लोक माझ्याही वाचनात आलेले आहेत. उदा. – ‘केशवम् पतितम् दृष्ट्वा पांडवा: हर्षनिर्भरा: । रूरुदा: कौरवा: सर्वे हा हा केशव केशव ।’. जरा पहाच या श्लोकाचा वरवरचा अर्थ आणि आंत दडलेला भिन्न अर्थ ).

*एक जुनी आठवण : शालेय जीवनात बिहारीच्या ‘सतसई’मधील काहीं दोहे शिकत होतो. ‘सर’ म्हणाले की, काहीं दोह्यांचे दोन-दोन तीन-तीन अर्थ निघतात. तें शक्य आहे, असेच मला वाटलें ,

कारण अशा प्रकारचे संस्कृत श्लोक मी वाचलेले होते. ‘सरां’नी पुढे, बिहारीच्या एका दोह्याचें उदाहरण देऊन सांगितले की, याचे नऊ अर्थ निघतात. ऐकून मी थक्कच झालो. वाटलें, काव्य रचतांना, ९-९ अर्थांचा आधीच विचार करून त्याप्रमाणें शब्दरचना करणारा कवी किती बरें सृजनशील असेल !

नंतर काहीं वर्षांनी मला तें कोडें उलगडले.  घडतें असें की, कवी काव्य रचतांना, दोन, किंवा कदाचित तीन, अर्थांचा विचार करून काव्य रचू शकतो, रचतोही ; पण नंतर, तें वाचतांना किंवा त्याचें अध्ययन करतांना भिन्नभिन्न वाचक त्याचे आणखी-जास्तीचे, अॅडिशनल, अर्थ काढत जाऊ शकतात. हे अधिकचे-अर्थ, अॅडिशनल अर्थ, रचना करतांना कवीला अभिप्रेत नसतात. तरीही, ते जर काव्याला पूरक असले, व वाचकवृंदाला योग्य वाटले, तर कांहींच हरकत नाहीं.

 • तसेंच कांहींसें इथेंही आहे. कवयित्रीला पुस्तकाच्या शीर्षकाचा काय अर्थ अभिप्रेत आहे, हें तिलाच विचारायला हवे. परंतु, माझ्या विचारानुसार, मला जो-जो अर्थ ध्वनित होतो आहे, तो-तो प्रत्येक अर्थ

मला माझ्यापुरता तरी, योग्य वाटतो, ऍप्ट (apt) वाटतो, चपखल वाटतो.

 • आणखी एक महत्वाची गोष्ट आहे , आणि ती म्हणजे, एकीकडे जरी कवयित्रीनें कवितांमधे कांहीं ठिकाणीं विद्रोही सूर लावला असला, तरी, ‘आर्यमा’ हें संस्कृतमय शीर्षक देऊन, तिनें दुसर्‍या बाजूला भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा संदर्भ ध्वनित करून, बॅलन्स साधायचा, समतोल साधण्याचा, प्रयत्न केलेला आहे, असेंही मला प्रतीत होतें.
 • तेव्हां, कवयित्रीला असें सांगावयास हरकत नाहीं की , “हे आर्ये, तुझा ‘आर्यमा’ शब्द, हा काव्यसंग्रहाला शीर्षक म्हणून नुसता योग्यच नाहीं, तर तो संग्रहाचें सौंदर्य खचितच वाढवतो” .
 • कुठल्याही सृजनशील व्यक्तीची गाडी एका संग्रहावर थांबत नाहीं. श्रीमती बेलसरे यांच्या पुढल्या संग्रहांबद्दल औत्सुक्य आहे. आणि, ते प्रसिद्धही झालेले आहेत. पण, (‘इरमा ला द्यूस’ या इंग्रजी सिनेमातील, किंवा ‘मनोरंजन’ या हिंदी सिनेमातील, वाक्याप्रमाणें), मी म्हणेन की, ‘तें सर्व पुन्हां केंव्हांतरी’.

— सुभाष स. नाईक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*