पाहिजे तेवढं Brain-Strom
पण, How will you avoid a storm
Brexit नावाचं ?
-
Brexitच्या प्रत्येक विकल्पाला
MP म्हणतात, ‘Not OK’.
अन् इकडे, फासावर चढलाय UK.
-
MP बसलेत डोकं खाजवत
UK च्या नांवाला लागतोय् बट्टा.
अरे, Brexit आहे की थट्टा !
-
ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ
की, मतदानावर मतदान चाललंय्
पण निघतच नाहीं तोड.
-
ब्रेक्झिट तर हवं
पण Backstopचा लागलाय फास
अन् प्रत्येक विकल्प होतोय्
Parliament मधें नापास.
-
डोकेफोड, उरस्फोड
सगळं सगळं व्यर्थ
‘House’ मधल्या ब्रेक्झिट-चर्चेला
उरला नाही अर्थ.
-
लंडन ते ब्रुसेल्स
किती तंगडतोड !
पण थेरेसा मे चं Deal
कुणालाच लागत नाहीं गोड.
–
‘House’ मधे बोलून बोलून
आवाज बसला
पण MPs घेत नाहींत
निर्णयच कसला!
-
हें ही नको तें ही नको
काय हवें तें मात्र कळेना
Deadlineचा लागला फास
तरी ब्रेक्झिट फळेना.
-
UK आणि EU
कोण रावण कोण सीता ?
मात्र दोघेही हरतील
लक्ष्मणरेषा ओलांडतां.
–
लक्ष्मणरेषा : ब्रेक्झिटसाठीची Deadline
-
‘Quie..e..e..t’ ओरडून Speaker चा
घसा कोरडा झाला
तरी ब्रेक्झिट-मतदानाचा
पुरता राडा झाला.
-
ब्रिटिश राज्यावरती पूर्वी
सूर्य मावळत नसे
आतां indecisive UK चें
होई जगतीं हसें.
-
अर्धं जग होतं जागत
अन् लंडनकडे होतं बघत
पण Brexit चऽ जहाज
किनार्याला नव्हतं लागत.
-
भाष्यं सतराशेसाठ
अठरापगड गट
सगळे भुईसपाट.
Brexit सकट.
-
‘House’ च्या आंत अन् बाहेर
सगळेच anxious, भावुक
Brexit मध्यें काय हवंय् MPs ना,
तें त्यांनाही नाहीं ठाऊक.
-
Brexit साठी Deal
बनवुन तर आणली नामी
पण पार्लियामेंटचा feel
पडला कमी.
-
UK मध्यें आली ‘जगबुडी’
‘House’ मधील विस्कटली घडी
इकडे तळमळतेय्
Brexit ची कुडी.
-
Brexit च्या दोरावर हिंदकळतेय्
UK ची anxious कुडी
टीका करतायत् धेंड बडी बडी
ते ‘वैद्य’ बनून तपासतायत् UK ची नाडी.
-
UK निघालंय् काडीमोड घ्यायला EU पासून
देशाच्या भवितव्याची बाब आहे ही.
पण MPs वागतायत् असे, की
जगात UK ला काडीची किंमत राहिली नाहीं.
-
EU मोडतंय् बोटं
पण तें बेटं
करणार काय !
ब्रेक्झिटवाल्या UK ला
‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’
म्हणणं आहे प्राप्त,
नाहीं अन्य उपाय.
-
कोण द्वाड?
EU की UK?
कोण unreasonable?
EU की UK?
कोणाला कायकाय हवं आहे ?
अन् कोण त्याला म्हणत नाहींये Ok ?
-
अगं बाई, थेरेसा मे
आतां झालं बस्स
आतां खाली बस.
आजवर झालीय् सगळी चर्चा फोल
आतां Parliament घेतेय् कंट्रोल.
अगं, तूं Houseमधें अऽस किंवा नऽस
आम्हाला ‘नन्ना’चा पाठ
झाला आहे पाठ.
-
ब्रेक्झिट चा आत्मा काय आहे ?
Exit की Backstop ?
की परदेशी नागरिक ?
की, टिकणें उद्योगधंद्यांची मत्ता ?
की, नोकर्यांची सुरक्षितता ?
अन् continued आर्थिक सुबत्ता ?
Priority काय आहे ?
Why आहे ?,
तें कुणीच सांगत नाहींये बेटा.
फक्त चर्विचर्वण चालूं आहे.
Parliament मधें जे कांहीं घडतंय्
तें फारच हळूं आहे.
-
Common Market
की Common Customs-tariff ?
पण कसल्याच विकल्पाची
होत नाहीं तारीफ.
सगळेच विकल्प
होतायत् fail.
होणार की काय
ब्रेक्झिट ची गाडी derail ?
UK ला घ्यायचाय् काडीमोड
ब्रेक्झिट च्या नांवं;
पण, त्याच्या terms काय
तें कुणालाच नाहीं ठावं.
-
ब्रेक्झिट-भाषणांत
Point of Order
उठसूठ.
चालूं आहे PM चं
बस आणि ऊठ
बस आणि ऊठ.
-
ब्रेक्झिट साठी PM घालतेय लंगडी
विपक्षनेता बहाद्दर गडी
घालतोय् तंगडी.
प्रत्येकाची बाजू
पडतेय् लंगडी
अन् जगात UKची होतेय हुर्रेवडी.
-
ब्रेक्झिटच्या विकल्पांचं
कांहींच ठरत नाहीं.
मग थेरेसा मे च्या डीलचं काय ?
वासरांत शहाणी ठरेल कां
लंगडी गाय ?
-
कुणी कुणाची उडवतंय् पगडी
कुणी कुणाची उडवतंय् रेवडी
चालूं दिनरात गडबडी बडबडी
रचल्या जातायत् शब्दबंबाळ लगडी
कुठल्या विकल्पाची होडी
लागेल पैलथडी
तें कुणालाच नाहीं ठाऊक.
मात्र होतायत् सगळेच
ब्रेक्झिटसाठी भावुक.
-
‘कोण बसलंय बोटं मोडत ?’ –
‘UK मधला जनाधार’
‘कोण बसलंय क्षण मोजत?’ –
‘आयर्लंडचे सरकार’. १
Brexit आणि Backstop
यांचं होणार काय ?
कुणी सांगेल काय ? २
-
हाऊस ऑफ कॉमन्स मधले MP
रात्र रात्र जागत होते
EU कडून आणखी वेळ मागत होते;
TV चॅनलवाले
नव्या-जुन्या बातम्या सांगत होते
अन् Brexit चें गाडें
कासवाच्या गतीनें रांगत होतें.
-
‘Brexit Brexit’ खेळूं खेळ
इथें न कसलाही ताळमेळ
ठराव मांडू, ठराव हटवूं
पुनश्च मांडू, पुनश्च हटवूं
जुनी-नवी चिवडूंया भेळ.
चालुं दे भातुकलीचा खेळ.
-
Brexit लागू करण्याची
आली अंतिम घडी
पण अजूनहीं
विस्कटलेलीच आहे घडी
येतच नाहींये रुळावर
निर्णयांची गाडी.
-
बॉरिस जॉन्सन
मारुं नको गमजा अती
EU संगें
चर्चेमध्ये
तारे चमकतिल् डोळ्यांपुढती.
–
बॉरिस जॉन्सन : The present PM of UK
-
अरे बॉरिस
हा crisis
ब्रेक्झिट आणिक EU ;
कसा सोडवणार हा गुंता
हे बॉरिसभाऊ ?
-
————————————
घोळ
ब्रेक्झिट ची अंतिम मुदत
आलीय संपत
इकडे Web वर ब्रेक्झिट विरुद्ध
लोंढा कोसळलाय्
तिकडुन ‘Brexit Means Brexit’ घोकत
जत्था शेदोनशे मैल
तुडवुन आलाय
Parliaments च्या व्हिजिटर्स-गॅलरीत
एक गट
नाराजी व्यक्त करत
विवस्त्र झालाय्. १
Backstop च्या चिंतेमुळे
Northern Ireland चा जीव
टांगणीवर लागलाय्
अन् Parliament मधें
‘Hard-Brexit’ की ‘Soft-Brexit’
की ‘No Deal-Brexit’,
घोळ वाढतच चाललाय्. २
कुणालाच नाहीं कळत
हा घोळ कुठवर राहणार चालत ? ३
–
———————————
गट
एक ‘Hard-Brexit’ वाला गट
एक ‘Soft-Brexit’ वाला गट
एक ‘Common Market 2.0’ ला supportive
एक ‘Backstop’च्या against गट
एक ‘Cancel-Brexit’ वाला
एक नवीन Referendum मागणारा
एक ‘EU चं बंधन तोडा’ म्हणणारा
अन् , ‘Decision-Making’ साठी
UK करता total-independence मागणारा. १
गट गट गट
हा गट तो गट तो गट
पण जर ‘No Deal-Brexit’ झालं
तर सगळेच होतील भुईसपाट,
देशासगट. २
-
——————————
पुनश्च हरि ओम्
UK Parliamentमध्ये
ब्रेक्झिटचं माजलंय् स्तोम
ठरत नाहीं
कांहींही.
कळतच नाहीं,
कोणालाही,
काय आहे त्यातली गोम. १
उगवतांच नवा दीस
नवी tussle, नवा कीस
नवा आव
नवा बनाव
नवा ठराव
‘नवी खोज’
नवे dose.
लांबच लांब भाषणें
एकामेकां दूषणें.
चर्चा जबरदस्त
पण, खरं तर, नुसतं,
घेउन् नवीनवी pose,
होतंय् दररोज
पुनश्च हरि ओम्. २
– – –
———————————-
Leave a Reply