पावनखिंडीतला ढाण्या वाघ ( १२-१३ जुलै १६६०)

शाहीर पहिला –

पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं
अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी ।

दुश्मनास चकवून धावती चिखलातुन पायीं
सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई ।

पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे
आतां कैसे पुढला वेढा फोडुन वरती जावें ?

बोलत बाजी, ‘थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं
निजदेहांचे बांध बनवुनी झुंडी अडवत राहूं ।

‘लाखांचे पोशिंदे तुम्ही, खुशाल जावें पुढती
अडवूं-तुडवूं आम्ही दुश्मन, मरणाची ना भीती’ ।

अखेर पुढती गेले राजे विशाळगड गाठाया
पाय रोवुनी तटले बाजी , शत्रूला रोखाया ।
*
बाजी प्रभू देशपांडे – ( मावळ्यांना) –

जबरी दुश्मन, मुठभर आपण, परंतु निधडी छाती
तुफान रोखूं, ठाकूं बनुनी सह्यकड्यांच्या भिंती ।।

निबिड अरण्यामधल्या खिंडित अरुंद छोटी वाट
आली कितिही तल्वारींची लाटेवरती लाट
सहज थोपवूं इथें अरीच्या महापुराची शक्ती ।।

वेगें दौडत, विशाळगड नृप अपुला गाठूं पाहे
अपुल्या निष्ठेची शौर्याची आज परीक्षा आहे
स्वराज्ययज्ञीं शोणित शिंपुन देऊं प्राणाहुती ।।

‘दीन दीन’चा निनादतो स्वर, ‘हर हर’ आपण गर्जू
शत्रूच्या समशेरींपुढती खड्ग आपुलें परजूं
तल्वारींच्या खणाखणीनें करूं मृत्यु-आरती ।।

अतुलनीय शौर्य धैर्य अपुलें, मरणाचें भय कैचें ?
वेगें विचरूं, जैसे तांडवनृत्य महादेवाचें
अशक्य बनवूं दुश्मनास पाऊल टाकणें पुढती ।।

घटी-प्रहर-पळ अचल, अचंबित काळ थांबु दे आज
तोफांचे ध्वनि येईतों स्पर्शणार ना यमराज
तोंवर अरिवर अखंड बरसूं लवलवणारी पाती ।।
*
शाहीर पहिला –

झाल्या जखमा प्राणांतिक, पण नाहीं हटले बाजी
लढत राहिले निजप्राणांची लावुन अंतिम बाजी
स्पर्श कराया त्यांना, मृत्यूचीही शामत नव्हती ।

अखेर आले गडावरूनी तोफांचे आवाज
म्हणती बाजी, ‘अंतिम मुजरा स्वीकारा महाराज
मराठदेशा, ठेव जागती अविरत स्वराज्य-ज्योती’ ।
*
शाहीर दुसरा –

ऐसे लढले बाजी, ऐसे शूर मावळे लढले
मर्दुमकीची शर्थ करूनी धारातीर्थीं पडले
स्वराज्य राखाया स्वीकरली खुशिनें वीरगती ।

धन्य स्वराज्याचे पाइक ते, धन्य धन्य रणगाजी
धन्य धन्य ती घोडखिंड, अन् धन्य बहादुर बाजी
धन्य मृत्यु ते, पावन ध्येया संजीवन जे देती ।
तुफान रोखत बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।

– – –
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*