पंढरीचा राणा : विठूचे पद मजला लाभावे

विठूचे पद मजला लाभावे
देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवें ?

नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ?
असती कां क्षितिजापल्याड श्रीविठ्ठलवस्तीच्या खुणा ?
विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।।

अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं
त्या सार्‍यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती
मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।।

क्षणभंगुर ही दुनिया चंचल, पळभर येथें थांबायाचें
त्या थांब्यावर, अखंड तोंडीं नाम चिरस्थिर-विठुरायाचें
नच गंगा, अंतीं ओठांना विठुनामच लागावें ।।

– – –
– सुभाष स.नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*