गजवदना वंदना – (१०) : वरद गणपती गुणद गणपती

वरद गणपती, गुणद गणपती, सुखद गणपती रे
तव शुभ नामें बिकट पथा निष्कंटक करती रे ।।

चिवट दाट भवतापकर्दमीं जीवनशकट रुते
कुटिल भयप्रद संकट भेसुर विकटकास्य करते
नतद्रष्ट विघ्नांचें सावट, विकटा, हटव पुरें ।।

दुष्ट-कष्ट करतोस नष्ट तूं, हे मंगलमूर्ती
दासांच्या आशांची अविरत तूं करसी पूर्ती
क्लेशमुक्त होतात भक्तगण तव-गुण गाणारे ।।

पापाचरणीं गुरफटलो, प्रिय वासनाच वाटे
भरकटलो मी, उपभोगाचा मजला मार्ग पटे
प्रगट जाहला तूं, हृदयीं मिटले विभ्रम सारे ।।

महोत्कटा, मी घट्ट लगटण्यां चरणां, आसुसलो
तव पदरजभेटीसाठी किति वाट बघत बसलो
हट्ट पुरवुनी तुष्ट करिल मन तुजविण कोण बरें ?

सिद्धीविनायका, कर माझ्या सुखांमधें वृद्धी
अवगुण नाशुन, गुणस्वामी, दे मजला सद्बुद्धी
उघड अनंता या पतिताला चिदानंददारें ।।

– – –

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*