(काव्य) : ‘प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)’

(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें)

‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन !
कम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १

आमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो
आणि नंतर आम्हालाच छळतो
आम्हाला कळतंय् त्याचं तंत्र
पण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ !
अहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं
हें आधी ठरवा तर खरं
अन् मग करा त्याचं निष्ठेनं पालन.
Of Course, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! २

गर्भातच मुलींचा पडतोय् खून
पण पोलीस काय करतायत् तें बघून ?
विनयभंग, बलात्कार यांचा सुळसुळाट
आयाबहिणींचे तळतळाट
अन् मीडियातील बातम्यांचा कलकलाट.
रोजरोज नवनव्या बातम्या कळतात
अधिकारी फक्त नक्राश्रूच ढाळतात.
कुठं गेलं आमचं संवेदनाशील मन ?
But, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! ३

जातपातींची दरी अजून जात नाहीं
वायफळ बडबडीशिवाय करत नाहीं कुणी कांहीं
धडपडतायत सारे दाखवायला, ‘मी SC, ST’,
पण जातभाईंच्या क्लेशांनी होतात त्यांतले कितीक कष्टी ?
आतां तर OBC ना सुद्धा हवं आहे आरक्षण.
Oh Yes ! आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! ४

किती क्षेत्रांत देशाची झाली आहे प्रगती ?
जिंकणार कशा ‘अडथळ्यांच्या शर्यती’ ?
एक पुढे गेला की इतर ओढतात पाय
हवी आहे सार्‍यांनाच, फक्त ‘दुधावरची साय’
इतरांचा विचार करायचं अजिबात नाहीं कारण.
कारण, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! ५

परदेशात ‘इंडिया डे’ साजरा होतोय्
मात्र इथला शेतकरी राबतोय् अन् मरतोय्
पाऊस नाहीं, पाणी नाहीं, नाहीं वीज, नाहीं पीक
आतां स्वत:लाच विक
किंवा फास लावून घे
नंतर आक्रोशायला तयारच आहेत ‘बघे’
खेड्यांमधे, शहरांतही
असंच जीवन इतरांचंही.
आभाळच फाटतंय्, ठिगळ कसलं !
सारं सारं आयुषष्यऽच नासलं
इथें सूर्य उगवत नाहीं
‘अंधारा’च्या फासात जगवत नाहीं
सुटका होईल, जर येईल मरण .
तरीपऽण, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! ६

अधोगतीच्या हळहळीचा उपयोग काय ?
करयंय् कां कुणी Long Term उपाय ?
कसचं काय नि कसचं काय !
जें काहीं होतंय्, तें पुरणार कां ?
सगळे असेऽच मरणार कां ?
शेवटी सरकार हरणार कां ?
याचा विचार करतायत कितीजण ?
फक्त म्हणतायत, ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन’ ! ७

उत्तराचा नाहीं पत्ता, फक्त प्रश्न प्रश्न प्रश्नऽ
प्रश्न राहूं द्या तसेच, आपण मनवूं या ‘जश्न’
ढोल-ताशे बडवून
तिरंगा वर चढवून
साजरा करूं ‘इंडिया डे’
अरे, रोज मरे त्याला कोण रडें ?
नागडें असूं द्या शतसहस्त्र तन
क्लेशांत बुडूं द्या ‘आहत’ जनगण,
या, जोषानें गर्जू आपण –
‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन !’ ८

बट् , अॅम् आय् ? ९
– – – (२२.०८.१६).
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126. eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*