आगर व आगरी : एक धांडोळा

प्रास्ताविक :

माझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर यांच्या नावात व मिठागर यासारख्या शब्दांमधेंही ‘आगर’ आढळलें. कुळागर असाही शब्द दिसला. मुंबईला स्थायिक झाल्यावर, कोकणात अभिप्रेत असलेला ‘आगर’ चा अर्थ माहीत झाला. गुहागर, दिवेआगर, आगरवाडी, आगरीपाडा (आग्रीपाडा) अशी ग्रामनामेंही ऐकण्यात-वाचनात आली. माझ्या पत्नीचे आजोळ आहे रत्नागिरीजवळील भाट्याच्या खाडीला लागून असलेलें एक गाव, तोणदे . तिथें गेल्यावर कोकणातलें ‘आगर‘ मी घराशेजारी प्रत्यक्ष पाहिलें. ‘आगरी‘ या समाजाच्या नावाशीही मी मुंबईला आल्यावर परिचित झालो ; घाटावर लोकांना या समाजाचे नाव विशेष माहीत नाहीं. हल्ली मात्र टीव्हीवरील कॉमेडी शोज् मधे ‘आगरी’ बोली ऐकू येत असल्यामुळे, आख्ख्या महाराष्ट्राला हा शब्द सुपरिचित झालेला आहे.

आगर व आगरी असे किंवा त्यांच्यासमान शब्द इतर भाषांमधेसुद्धा आढळतात. त्या शब्दांचा समावेश असलेली गांवें व आडनावेंही इतरत्र दिसतात. म्हणून, या शब्दांचा मराठीत , इतर  भाषांमधे, आणि अन्य मुलुखांमधे धांडोळा घेऊन, त्यातून काय माहिती मिळते हे पहाण्याचा हा प्रयत्न.

आगरी :

महाराष्ट्र शब्दकोश व मराठी व्युत्पत्ति कोश सांगतात की, ‘आगरी’ हा शब्द शके १२८९ (इ.स. १३६७)च्या नांगाव येथील यादवकालीन शिलालेखात प्रथम लिखित स्वरूपात आढळतो. तें वाक्य असें आहे:

        “ हें दान वरत सकोश कवळिआ मुख्य करुनि समळि आगरियां मागिउडिळि ”.  

गेली ६५० वर्षें आगरी हा शब्द लिखित स्वरूपात मराठीमधे आहे. म्हणजेच, या शिलालेखापूर्वी १००-१५० वर्षें तरी, किंवा त्याहून अधिक काळ, तो शब्द बोलचालीच्या, रोजच्या व्यवहाराच्या, भाषेत प्रचलित असलाच पाहिजे, अन्यथा त्याचा समावेश शिलालेखात झालाच नसता. मराठी भाषेतील शिलालेख व साहित्यात मराठी भाषेचे उल्लेख देवगिरीच्या यादव नृपतींच्या कांही शतकें आधीपासून आढळत असले (उदा. इ.स. ९८१ चा श्रवणबेळगोळा येथील शिलालेख, ज्यात ‘चामुंडरायें करवियले’ असा उल्लेख आहे), तरी शिष्टसंमत मराठी भाषेची सुरुवात मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांच्या काळापासूनच मानली जाते. (त्या काळापूर्वी ‘महाराष्ट्री’ प्राकृत, ‘अपभ्रंश’ भाषा अशा भाषा प्रचलित होत्या). मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ साधारणपणे इ.स. ११८८ चा, महिमभट्टाचें ‘लीळाचरित्र’ १२३८ च्या जवळपासचें,  व ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थात् ज्ञानेश्वरी १२९० च्या आसपासची. म्हणून, असा निष्कर्ष काढायला हरकत नाहीं की, मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून ‘आगरी’ हा शब्द प्रचलित असावा. त्याचा उगम त्याही आधीचा असणार.

‘आगरी’ या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोश देतात तो असा : एक कुणबी जात, आगरो-कुणबी, कोळ्यांपैकी एक जात, मिठागारातील कामकरी, शेतकरी, बागवान, बागाईतदार.’ (कुणबी घाटावरही आढळतात, पण आगरी हे कुणबी असले तरी, फक्त कोकणातच आहेत). ‘डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ सांगते की, आगरी हा शब्द संस्कृत ‘आगरिक’ (म्हणजेच, शेतकरी) या शब्दापासून उद्भवला आहे. ‘आगरिक’ हा शब्द ‘आगर’ पासून बनलेला आहे, हें स्पष्ट आहे. [ जसें, आकरिक (म्हणजे खाणीवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ति), किंवा नागरिक ]. ‘आगरीगाव’ अथवा ‘आगरगाव’ म्हणजे आगरें असलेलें गाव. ‘आगरी बोली’ ठाणे व रायगड (कुलाबा) या भागात बोलली जाते, असेही हे कोश नमूद करतात.

‘आगर’ या शब्दाला ‘ई’ हा प्रत्यय लागून मराठीमधे आगरी हा शब्द बनला आहे, असे दिसते. जसें कोल्हापुरी, सातारी, नगरी, कोकणी, खानदेशी इत्यादी; तसेंच आगरी. त्यानुसार आगरी म्हणजे ‘आगरातला, आगराचा, आगराशी संबंधित, आगरावर उपजीविका करणारा’, असा अर्थ होतो.  अशा अर्थाचा ‘ई’ हा प्रत्यय आपल्याला संस्कृतमधे, इतर संस्कृतोद्भव भाषांमधे व उर्दूतही दिसतो. उदा. महाराष्ट्री, देवनागरी, अर्धमागधी, हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, मलयाली (मल्याळी); (शायर) (हफीज) जालंधरी, (शायर) (मजरूह) सुलतानपुरी, आजमगढ़ चे म्हणून (शायर) (कैफी) आजमी, इत्यादी .

म्हणून, आपण ‘आगर’ या शब्दाचा शोध घेणें इष्ट होईल.

आगर :

विविध मराठी शब्दकोशांमधे ‘आगर’ शब्दाचे बरेच अर्थ दिलेले आहेत. कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ति कोश सांगतो, (व इतर कोशही सांगतात), की, आगर या शब्दाचा उगम ( वेगवेगळ्या अर्थांच्या दृष्टिकोनातून) संस्कृतमधील ‘आकर’ (खाण, प्रचुरतेचें स्थान, समूह, श्रेष्ठ, इ.), ‘आगार’ (बाग, मळा, साठा इ.), ‘अग्र’ (टोक), ‘अज्र’ या शब्दांपासून झालेला आहे.  त्यांपैकी ‘अज्र’ हा शब्द वैदिक-संस्कृतमधील आहे ; तो आधुनिक काळच्या संस्कृत कोशांमधे सापडत नाहीं.

‘आगर’ शब्दाचे विविध अर्थ असे आढळतात : बाग, मळा, फळझाडांचा-मळा, झाडांची राई (वनराई), (कोकणातील) नारळी-पोफळी(सुपारी) ह्यांचा मळा, उद्यान, शेत, आवार, परसूं, आलय, घर, गृह, छप्पर, घराभोवतीच्या आवारात भाजीपाला लावण्याची जागा (आगरभुवन), कुंपण, चंदन (अगरचंदन असाही शब्द आहे), समुद्रकिनार्‍यावर किंवा खाडीजवळ मिठाचें क्षेत्र (मिठागर, सॉल्ट-पॅन. याला आगरपाव्ह असेंही नांव आहे), आगरात उत्पन्न होणारा पदार्थ, खाण, साठा, ठेवा, संचय, कोष, निधि, संग्रह, खजिना, कोठार, भांडार, स्थान, रहाण्याचें-स्थान, वसतिस्थान, संग्रहस्थान, उत्पत्तिस्थान, कांहीं विशेष गुणांचें किंवा प्रचुरतेचें / वैपुल्याचें स्थान, खूप-अधिक, श्रेष्ठ, उत्तम, चतुर, दक्ष, कुशल.

मराठी व्युत्पत्ति कोशातील टिप्पणी महत्वाची आहे – ‘मिठागर वगैरेतील आगर शब्द संस्कृतोत्पन्न नसावा अशी शंका येते.’  तसेंच, हेंही वाक्य – ‘(आकर व आगर) या दोन अर्थाचे शब्द निराळे असून त्यांची मुळेंही निराळी असावीत’.

आतां थोडें इतर भाषांकडे पाहूं या.

कोकणी :  कोकणी (गोमंतकी) भाषेत ‘आँगर’ असा शब्द आहे, असें महाराष्ट्र शब्दकोश सांगतो. त्याचा अर्थ आहे कुंपणाचें बेडें , किंवा दुबेळकें लाकूड. पहिली गोष्ट म्हणजे, कोकणी भाषेत सानुनासिक उच्चार होतात. हें म्हटल्यावर, मराठीतील आगर आणि कोकणी भाषेतील आँगर, यांच्यातील साम्य वेगळें सांगायला नको. आणखी एक गोष्ट. दुबेळकें लाकूड बेड्याला वापरतात, अन् बेडें कुंपणात घातलें जातें, व  कुंपण आगराला-बागेला-शेताला घातलें जातें. असा कोकणी भाषेतील अर्थाचा मराठीतील अर्थाशी संबंध जोडता येतो. कोकणी भाषेप्रमाणेंच, महाराष्ट्राच्या कोकण भागातील मराठीच्या बोली देखील कमीअधिक प्रमाणात सानुनासिक आहेत, जसें मालवणी, संगमेश्वरी. तसेंच, कांहीं दशकांपूर्वीपर्यंतच्या काळात कोकणामधील माणसें शिष्टसंमत-मराठीसुद्धा सानुनासिक बोलत असत. आणि, चित्पावनांच्या पुणें शहरातील वास्तव्यामुळे तेथील चित्पावनही अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत सानुनासिक बोलत. [चित्पावनांच्या ‘चित्पावनी’ बोलीचा, (जी आतां महाराष्ट्रात नामशेष होऊं घातली आहे; परंतु कर्नाटकात पूर्वीच्या काळी स्थायिक झालेले चित्पावन अजूनही घरी ती वापरतात, असा उल्लेख आढळतो), अभ्यास केल्यास, कदाचित् आगर-आँगर याबद्दल कांहीं अधिक माहिती मिळूं शकेल ].  हे सानुनासिक उच्चार ध्यानात घेतल्यावर, आंग्रे (आंगरे-आँगरे) या आडनावाचा ‘आगर’शी संबंध कदाचित जोडता येऊं शकेल. ( आगरकर किंवा आंग्रे या आडनावांची मंडळी आगरी समाजातील नाहीत, हे खरे ; पण, या आडनावांवरून हें नक्कीच स्पष्ट होतें की, ‘आगरा’शी कोकणातील सर्व सामाजिक स्तर संबंधित होते ).

इतर भारतीय भाषांचा मुलुखांचा शोध :

 

हिंदी :  हिंदीचे कोश आगरचे असे अर्थ देतात –  अधीक, खान (खाण), गृह, ढेर, भंडार, आकर, समूह, कोष, निधि, खज़ाना, नमक जमाने का गड्ढा, अगार, आगार, छाजन (छप्पर), कुहर (छेद), घर, श्रेष्ठ, उत्तम, बढ़कर, चतुर, होशियार, दक्ष, कुशल.

हिंदीत आगरचे बरेच अर्थ मराठीसारखेच आहेत. आणि,  तें साहजिकच आहे, कारण हिंदीसुद्धा मराठीप्रमाणेच संस्कृतोद्भव भाषा आहे. अर्थात् , ‘कोकणातील नारळी-पोफळीचा मळा’ हा अर्थ हिंदीत नाही, कारण तो महाराष्ट्रातील भूगोलाशी निगडित आहे. ‘आगरी’  हें हिंदीत आगर चें स्त्रीलिंग होतें. हिंदीत आगरीचा आणखीही एक अर्थ होतो, तो म्हणजे, ‘खानमजदूर’ (खाणमजूर). म्हणजेच, ‘आगर’(खाण)शी संबंधित. हिंदीत आगरी या शब्दाचा कोकणातील आगरी समाजाशी संबंधित अर्थसुद्धा मिळत नाहीं. तेंही साहजिक आहे, कारण आगरी समाज फक्त उत्तर कोकणातच आढळतो.

हिंदीत, आगर शब्दाशी साधर्म्य असलेले अन्य शब्दही आहेत. त्यांच्यावर जरा नजर टाकून पुढे जाऊं. ‘अगर’ म्हणजे ‘सुगंधिऔत लाकूड असलेलें एक प्रकारचें झाड, उदा. ‘ऊद’. (अगरबत्ती अथवा उदबत्ती     हा शब्द आपल्याला सुपरिचित आहे.). मराठीतील चंदन या अर्थाशी हिंदीतील या अर्थाचें साधर्म्य आहे. आगर अथवा अगर या शब्दांशी साधर्म्य असलेले अन्य हिंदी शब्द असे – अगरना (क्रियापद), अगरा, अगरो, अगरु, अगार, अगारी. हे शब्द ‘अग्र’ या संस्कृत शब्दाशी निगडित आहेत. त्याशिवाय, अगराना (क्रियापद) म्हणजे ‘प्यार या दुलार से छूना’ (प्रेमानें/ वात्सल्यानें अंजारणें-गोंजारणें); अगरु म्हणजे    अगर या झाडाचें किंवा ऊदाचें लाकूड ; अगरी म्हणजे अर्गला (कडी) तसेंच अनुचित अथवा वाईट बोलणें. ग्रामनामाचा विचार केल्यास, आगरा या शहराच्या नांवाचा संबंध ‘अग्र’शी आहे ; आगरा म्हणजे      ‘आगे बढ़ा हुआ’. आडनांवाचा विचार केल्यास, उत्तरेत अगरवाल / आगरवाल हा बनिया समाज दिसून येतो ; त्यात वाल/वाला हा प्रत्यय आहे. त्या समाजनामाचा मूळ संबंध आगर म्हणजे कोठार / भांडार याच्याशी असावा, वनराईशी नव्हे.

उर्दू  :  उर्दूत जो ‘अगर’ शब्द आहे, (जो हिंदीतही वापरला जातो), त्याचा अर्थ आहे ‘जर’, ‘यदि’. आणि, हा अगर’ फारसीतील आहे. उच्चारसाम्य असलें तरी, त्याचा संस्कृतोद्भव ‘अगर’ किंवा ‘आगर’शी कांहीं संबंध नाहीं. उर्दूत अरबीमधून आलेला ‘अज्र’ असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, ‘प्रत्युपकार’, किंवा

‘पुण्याचें फळ’. उर्दूत ‘अग़ाल’ असाही फारसीमधील शब्द आहे, ज्याचा अर्थ दिला जातो, ‘जंगल में भेड़-बकरियों के सोने का सुरक्षित स्थान’.  पण या सर्व उर्दू-फारसी-अरबी शब्दांचा आपल्याला सध्या उपयोग नाहीं.

गुजराती : गुजरातीमधे आगर चा अर्थ खाण, समूह, उत्पत्तिस्थान इ. , म्हणजेच इतर संस्कृतोद्भव भाषांप्रमाणेच आहे. जरा तशाच उच्चाराचा आणखी एक गुजराती शब्द आहे ‘अगार’, म्हणजे ‘पहाणें’.

तो आपल्याला उपयोगी नाहीं.

त्रिपुरा : अतिपूर्वेला त्रिपुरामधे आगर शब्दाचा समावेश असलेले शहर आहे, ‘आगरतला’. इथें आठवण होते ‘अमृतानुभव’ची, ज्यात ज्ञानेश्वर म्हणतात – ‘बोल्हावतु कां मानसें । आगरातळीं’. त्यामुळे असें दिसतें की, दूर उत्तरपूर्वेतही आगरचा अर्थ संस्कृतोद्भव भाषांप्रमाणेच असावा.

इंग्रजी व अन्य परकीय भाषा :

आतां इंग्रजी शब्दांचा आढावा घेऊं ; तसेंच हिब्रू व अन्य भाषांवरही जरा नजर टाकूं. बर्‍याच इंग्रजी शब्दांचा उगम ग्रीक अथवा लॅटिनमधे सापडतो, हें सर्वांना माहीतच आहे, आणि तें पुढील शब्दांमधेही स्पष्ट होईल.

 • ‘Agor’ / ‘Agora’ : हा पुरातन ग्रीक भाषेमधील शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे –

open space, public square, a market-place, forum, popular (political) assembly, a place where such assembly meets. वेबस्टर डिक्शनरीप्रमाणें, या शब्दाचा उच्चार ऍग्अर (ऍग्-अ-र) होईल.

त्याचें ‘आगर’शी उच्चारसाम्य उघड आहे. ग्रीकमधील या शब्दाच्या बहुवचनाचा उच्चार  होतो : ऍग्अरी

(ऍग्-अ-री). [ म्हणजे, इथेंही आपल्या ‘आगरी’ शब्दासमान आलाच ! ].

इथें लगेचच आपल्याला पारशी लोकांची ‘अग्यारी’ आठवते. [ अग्यारी हा शब्द पुरातनन (अवेस्तन) पर्शियन भाषेशी संबंधित आहे ] . तिथेंसुद्धा लोकांचा समूह एकत्र येतो ;  तें धार्मिक स्थान आहे. परंतु, पुरातन काळीं धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच जात असत. म्हणजे,  इंग्रजी (किंवा ग्रीक) शब्दाचा अर्थ पुरातन पर्शियन (अवेस्तन) भाषेतील अर्थाशी साधर्म्य ठेवतो. परंतु, त्यातून कोकणातील ‘आगर’ला असलेला अर्थ थेट ध्वनित होत नाही. मात्र, ग्रीक भाषेतील ‘agora’ मधे व पारशी अग्यारीतही गर्दी असते (माणसांची), व कोकणी आगरातही गर्दी असते (झाडांची), हा एक योगायोग समजावा काय ?

Agor/agora या नांवाची स्थळें इटली, ग्रीस, टर्की इथें आढळतात. हा शब्द मूळ ग्रीक आहे, हें आपण पाहिलें. अर्थातच, तो ग्रीकमधून रोमन म्हणजे लॅटिन भाषेत गेला. त्यामुळे तो ग्रीक व लॅटिन या भाषांमध्ये आढळतो, ग्रीस व इटली या देशांमध्ये आढळतो. मग टर्कीचें काय ? त्याचें स्पष्टीकरण असें आहे की, ज्याला आजच्या काळात टर्की म्हणतात, त्या भूभागात अनेक शतकांपूर्वी (इ.स. पूर्वी) ग्रीक वसाहत होती. (तिला ते बायझेंटियम म्हणत असत, व त्या भागाला अनोतोलिया असें नांव आहे). त्या काळी तेथें ग्रीक भाषेंचें प्राबल्य होतें. नंतरच्या काळात त्या भूभागात रोमन लोकांचें राज्य आलें. (त्यांनी त्या शहराला कॉनस्टँटिनोपल नांव दिलें). त्यानंतर अनेक शतकें तिकडे लॅटिन भाषेचें प्राबल्य होतें. पंधराव्या शतकात तुर्कांनी तिकडील रोमनांना हरवून आपलें राज्य त्या भूभागात स्थापलें. त्यांनी राजधानीच्या शहराचें नांव बदलून, कॉनस्टँटिनोपलचें इस्तंबूल केलें खरें, पण त्या भूभागातील अनेक स्थानिक नांवें तसीच राहिली. त्यामुळे आजही टर्कीमध्ये Agora हें स्थलनाम दिसून येतें.

 • इंग्रजीत आणखीही एक ‘agora’ आहे, ज्याचा उगम हिब्रू ‘आगोरॉट्’ या शब्दात आहे. [ कांहीं वेळा शेवटचें अक्षर अनुच्चारित असतें, अथवा त्याचा उच्चार ‘निसटता’ होतो. (आजही इंग्रजीत आपण असे उच्चार पहातो). हा शेवटचा ‘ट्’ जर ,कांही जमातींच्या उच्चारांमधे, ‘silent’ (अनुच्चारित) किंवा ‘निसटता’ असेल, तर त्या हिब्रू शब्दाचा उच्चार साधारणपणें मराठी ‘आगर’ सारखाच होईल. वेबस्टर डिक्शनरी या ‘agora’चा उच्चार देते ‘आगोरॅ/आगोरा’ ]. इस्त्राइलमधील एका जुन्या नाण्याचे तें नांव आहे. नाणें हें देवाणघेवाणीचें साधन आहे. म्हणून, पुरातन काळी जेंव्हा बार्टर-सिस्टम चालत असे, त्या काळात या (किंवा त्यासमान) शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूशी / स्थानाशी निगडित होता काय हें बघावें लागेल. त्यासाठी ग्रीक, लॅटिन, कॉप्टिक, आरॅमाइक, वगैरे भाषांमधे शोधावें लागेल. तसेंच, महाराष्ट्रातील

‘बेने-इस्त्राइल’ या ज्यू कम्युनिटीच्या ‘ज्युडिओ-मराठी’ बोलीमधेसुद्धा पहावे लागेल.

 • ‘Agri-‘ : A prefix relating to farming. हा शब्द लॅटिन ager (म्हणजे, शेत) या शब्दापासून उद्भवला आहे. त्याच्या उच्चाराचें ‘आगर’ / ‘आगरी’ या शब्दांशी साधर्म्य पहावे. (मराठी ‘आगर’चा एक अर्थ ‘शेत’ हाही आहेच).
 • ‘Agro-‘ : A prefix relating to agriculture. हा शब्द ग्रीकपासून उद्भवला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘Soil’ म्हणजे माती ( खास करून, शेतातील माती).
 • ‘Agger’ : (उच्चार aj’ar, म्हणजे ‘अजर’.  या उच्चाराचें वैदिक संस्कृतच्या ‘अज्र’ या उच्चाराशी साम्य पहावें). या शब्दाचा उगम लॅटिन आहे, अशी माहिती वेबस्टर डिक्शनरी देते :  या शब्दाचा अर्थ असा –
 • A high tide in which water rises to a certain level, recedes, then rises again.
 • A low tide in which water recedes to a certain level, rises slightly, then recedes again.

Both these are also called ‘Double Tide’.

 1. या शब्दाचा आणखीही एक अर्थ आहे : Rampart in an ancient Roman Building , Or an Earthern mound. (पण, या अर्थाचा आपल्याला आपल्या सध्याच्या अभ्यासात उपयोग नाहीं.)

हा ‘agger’ शब्द महत्वाचा आहे, असें मला वाटतें. कारण, हें जें लाटांचें वर्तन वर वर्णिलेलें आहे, तें खाडीच्या काठीं बघायला मिळतें. कोकणातील आगर सुद्धा साधारणपणें खाडीजवळच असतें, तेव्हां ही वरखाली जाणारी लाट आगरात शिरणारच किंवा किमान आगराच्या कडेपर्यंत तरी जाणारच.

अशा प्रकारानें आपल्याला कोकणी आगराचा व इंग्रजी (लॅटिन) agger याचा संबंध जोडता येतो.

Agger हा शब्द जर्मनीतील एका नदीलाही आहे. तिथेंही, या शब्दाचा पाण्याशी संबंध आहे, हें ध्यानात येईल. हा शब्द जर्मनीत कसा गेला असावा ? त्याचें स्पष्टीकरण असें आहे की, युरोपच्या तिकडील भागात पूर्वी रोमनांचें राज्य होतें. त्यामुळे, हा शब्द लॅटिन शब्द तिकडे वापरला गेला असणार, व त्याचा वापर तसाच unchanged स्वरूपात तिकडे चालू राहिला.

 • या समुद्रकाठाच्या किंवा खाडीकाठाच्या संदर्भानें आपण आणखी एक शब्द पाहूं. तो आहे, मलय भाषेमधील (मलेशिया मधील) ‘ अगर’ अथवा ‘अगर-अगर’, तें एका समुद्री वनस्पतीचें (sea-weed चें) नाव आहे. मध्ययुगीन चीनमधे ‘अगर-अगर’ या वनस्पतीचा वापर केला जात असे , आजही केला जातो. या ‘अगर’ / ‘अगर-अगर’ चा वापर मध्ययुगात एक जेली म्हणून रतिक्रीडेच्या वेळी, किंवा एक डिसइनफेक्टंट म्हणून होत असे. आज, याचा वापर जिलेटिनच्या ऐवजी खाद्यपदार्थांत होतो;  व वेबस्टर डिक्शनरीअनुसार याला ‘चिनी-जिलेटिन’ किंवा ‘जपानी-जिलेटिन’ म्हणतात. त्याअर्थी, एकाहून अधिक सुदूर-पूर्व-आशियामधील / आग्नेय आशियामधील (Far-Eastern Asian / South-East Asian) भाषांमध्ये ‘अगर-अगर’ हा शब्द प्रचलित होता व आहे. अशा वनस्पत (sea-weeds) तिवरांमधेही (mangroves मधे) असूं शकतात ; व तिवरें खाडीकाठी असतात, हें आपल्याला ठाऊक आहे.  हा शब्द Far-Eastern Asia मध्ये कुठून आला, याचा शोध घ्यायला हवा. चीनचा गेली हजार वर्षेंतरी मलायाशी समुद्री व्यापार असल्यामुळे, चिन्यांनी तो शब्द मलायाकडून , किंवा मलेशियानें चीनकडून, घेतलेला असण्याची शक्यता नाकारतां येत नाहीं. भारताचा या ‘अगर-अगर’शी कांहीं संबंध ? त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत.

पुन्हां एकदा कोकणातीलआगर’ :

आतां, माझें प्रतिपादन असें आहे की, कोकणातील ‘आगर’ म्हणजे ‘नारळी-पोफळीची बाग’ या अर्थाचा शब्द, संस्कृतोद्भव ‘आगर’ म्हणजे स्थान, श्रेष्ठत्व वगैरे अर्थांच्या ‘आगर’ शब्दापेक्षा वेगळा आहे (उच्चार एकच असला तरी). इथें मराठी व्युत्पत्ति कोशातील टिप्पणीची पुन्हा आठवण करून देतो, की,  ‘मिठागर वगैरेतील आगर शब्द संस्कृतोत्पन्न नसावा अशी शंका येते.’

तर मग, प्रश्न असा उठतो की, हा ‘आगर’ म्हणजे ‘नारळी-पोफळीची बाग’ या अर्थाचा शब्द कोकणात  आला कुठून ? त्याच्यावर आपण आतां थोडा विचार करूं या. माझें मत असें आहे की तो समुद्रापलिकडून आला असावा. इथें आपण दोन शक्यतांचा विचार करूं या.

पहिली शक्यता :

 • पहिला भाग आहे, पूर्वेकडूनचा प्रवास तपासून पहाणें. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच मलाया, थायलंड, कंबोडिया इथें भारतीय वंशाचे राजे होते. (इंडिनेशियामधील ‘बाली’ बेट तर आजही हिंदू आहे). तेथील तत्कालीन भाषांमधेंही संस्कृत, पाली इ. भारतीय भाषांमधून आलेले शब्द दिसतात. त्या देशांचा भारताशी व्यापारी संबंध होता. त्यामुळे भारत व मलाया यांच्यात एकीकडून दुसरीकडे या शब्दाचा प्रसार झालेला असूं शकतो. हिंदीत ‘अगर’ हें (सुगंधी) वनस्पतीचें/ झाडाचें नांव आहे. पालीमधेंसुद्धा त्यासारखाच शब्द असणार, आणि पालीमधून तो मलायाला जाणें शक्य आहे. मध्ययुगीन दक्षिण भारतामधील नृप ‘सप्तसमुद्राधीश’ अशी पदवी लावीत. म्हणजेच, दक्षिण भारताकडूनही पूर्वेच्या देशांशी संबंध होते. असें असल्यामुळे, भारतीय संस्कृति व भाषांकडून तिकडे शब्द गेले असण्याची शक्यता आहे, तसेंच तिकडूनही इकडे शब्द आले असण्याची शक्यता आहे. ( ‘अगर’ आणि ‘आगर’ या शब्दांचा झाडें / वनस्पतींशी संबंध आहे. त्यातूनच, मलायात एका वनस्पतीला ‘अगर-अगर’ असें नांव पडलें असेल काय, असा प्रश्न आपण आधी उपस्थित केलेलाच आहे). कंबोडियातील जगप्रसिद्ध ‘अँग्कॉर वॅट’ (Angkor Wat) हें १३व्या शतकातील नृपति सूर्यवर्मन याच्या काळातील हिंदू ‘temple-complex’ म्हणजे मंदिरांचा संच आहे. (याचें मूळ नाव वेगळेंच होतें). ‘विकिपीडिया’ सांगततो की, अँग्कॉर हा शब्द ‘नोकोर’ या शब्दापासून आला आहे, व तो शब्द संस्कृत ‘नगर’ या शब्दापासून आला आहे’ . असा ‘द्राविडी प्राणायाम’ करण्यापेक्षा, मला असा विचार अधिक योग्य वाटतो, की ‘अँग्कॉर’ हा शब्द आकर/आगार/आगर/आँगर अशा एखाद्या शब्दावरून येऊं शकतो. ‘वॅट्’ हा शब्द पाली ‘वत्त’ पासून आलेला आहे, असें विकिपीडिया सांगतो, व त्याचा अर्थ देतो, ‘temple grounds’. हा शब्द पाहिल्यावर तर, ‘ मंदिर, त्याचें आवार व आजूबाजूचें आगर ’ हा ‘अँग्कॉर वॅट’ चा अर्थच योग्य वाटतो.

पण, हें झालें शब्द भारतातून तिकडे जाण्याचें. तिकडून शब्द इकडे येण्याचें काय ? त्याचें उत्तर असें : असा समज आहे की, नारळ हें फळ ( इ.स. च्या पहिल्या शतकात ) मलायामधून, किंवा इंडोनेशिया वगैरे भूभागामधून, भारतात आलें असें म्हणतात. त्याचप्रमाणें, कांहीं शब्दसुद्धा पूर्वेच्या समुद्रापलिकडून इकडे आले असतील. आधी भारतातून तिकडे शब्द गेला व नंतर कांहीं काळानें, (म्हणजे, कदाचित् इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात), तो शब्द तसाच किंवा त्याचें अपभ्रंश रूप होऊन, ( व, मूळ अर्थानें किंवा सुधारित अर्थानें ), तिकडून इकडे परत आला, असें होऊं शकतें. तसें झालें असल्यास, तो कोकणात एकतर दक्षिण भारताकडून आला असूं शकेल, किंवा पूर्व भारतातील आंध्रभागाकडून. त्याकाळीं सोपारे व चौल पासून नाणेघाट (जुन्नरभागात) व तेर (मराठवाड्यातील उस्मानाबाद) मार्गे व्यापारी सार्थ (तांडे) आंध्रभागात जातच असत. तेव्हां त्या मार्गानेंही शब्दाची आयात शक्य आहे. कोकणच्या संस्कृतीचा, खाद्यपदार्थांचा व लोककलांचा दक्षिणेशी संबंध आहेच. त्यामुळे तिकडूनही शब्दाची आयात होणें शक्य आहे. (मराठी जनसामान्यांच्या भाषेतील कांही शब्दांचे मूळ तमिळ भाषेत आहे, असा सिद्धांत विश्वनाथ खैरे यांनी मांडलेला आहेच. तसेंच मराठी शब्दांवरील कानडीच्या प्रभावाबद्दल शं. बा. जोशी यांनी लिहिलेलें आहे). म्हणून , शब्दांच्या अशा  स्थलांतराची शक्यता अभ्यासण्यासाठी, आपल्याला तमिळ, कानडी, तेलगु, मल्याळी या भाषांमधे ‘आगर’ किंवा त्यासमान शब्द शोधून अधिक खोलात जावें लागेल.

जरी अशी भारतात पूर्वेच्या समुद्रापलिकडून आगर शब्द येण्याची शक्यता कमी असली, तरीही असा अभ्यास व्हायला हवा.  तसेंच, (समुद्रापलिकडून न येवो न येवो, पण भारतातल्या-भारतातच, अशा प्रकारें सुद्धा), आंध्र, तमिळनाडु, कर्नाटक, केरळकडून हा शब्द मराठीत आला असेल काय याचाही अभ्यास होणें आवश्यक आहे.

तरीपण, पूर्वेच्या समुद्रापलिकडून आगर या शब्दाचें कोकणात आगमन झालेलें आढळलें तर, तें त्याचें पुनरागमनच असेल, असें मला वाटतें. त्याचा उल्लेख आधी केलेलाच आहे. म्हणजेच, त्या शब्दाचें कोकणातील मूळ-आगमन (सर्वप्रथम-आगमन, first-time entry), अन्य कुठून तरी व बर्‍याच आधीच्या काळात झालेलें असावें (आणि मधल्या काळात तो इथून लुप्त झालाच नसावा) असें माझें मत आहे. ती शक्यता आपण तपासून पाहूं या.

दुसरी शक्यता :

मला ही शक्यता अधिक वाटते की, कोकणात रूढ असलेल्या अर्थाचा ‘आगर’ हा शब्द मूलत: पश्चिमेकडून समुद्रमार्गानें आलेला असावा (आणि तोही इ.स.च्या सुरुवातीच्या काळात किंवा त्याच्याही आधी) . अशा प्रकारें आलेले इतर शब्द आपण पहातोच की. देवीसिंह चौहान यांनी दाखवून देलें आहे की, ‘व’ हा प्रत्यय अरबी दर्यावर्दी व्यापार्‍यांकडून मराठीत आलेला आहे. त्याचप्रमाणें, जंजीरा (जझीरा), नाखवा (नाख़ुदा) हे शब्द मराठीत फारसीमधून आलेले आहेत. ‘आगर’चें तसेंच कांहींतरी असूं शकतें.

प्रथम गोष्ट म्हणजे, इंग्रजीमधून किंवा पोर्तुगीजमधून हा शब्द मराठीत थेट (डायरेक्टली) येणें शक्य नाहीं. कारण, वास्को-द-गामा (जो पोर्तुगीज होता) हाच मुळी भारतात आला १४९८ मध्ये .

इ.स. १६०० मधे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, आणि त्यानंतरच इंग्रजांचा भारताशी खरा संबंध सुरू झाला. पण, आपण तर आगर / आगरी हा शब्द इ.स. १३६७ च्या शिलालेखात पाहिला आहे.

तीच गोष्ट फारसीची. अल्लाउद्दीन खिलजीनें देवगिरीचें यादवांचें राज्य जिंकलें १३०६/१३०७ मधे, व दिल्लीच्या अफगाणांची सत्ता दक्षिणेत खरी स्थापन झाली १३१५ नंतर. त्यानंतर दक्षिणेत राजकीय उलथापालथ होत राहिली, व बहामनी राज्य स्थापन झालें १३४७ मधें. १३६७ पर्यंत त्यांचा वावर कोकणात कितपत सुरूं झालेला असेल ? कारण, त्या काळी कोकण हें विजयनगरच्या अधीन होतें. नागाव येथील १३६७ च्या शिलालेखात फारसीतला शब्द येण्यास, मधील काळ फारच अपुरा आहे.

परंतु त्याच्या अनेक शतकें आधीपासून अरब, ग्रीक वगैरे लोक भारतात येत होते. अरब दर्यावर्दी होते व त्यासाठी भारताच्या किनार्‍याला भेट देत असत. शिकंदर भारतात आला इ.स.पू. चवथ्या शतकात. असें म्हणतात की, शिकंदराच्याही आधी बॅक्ट्रिया भागात ग्रीक वसत होते. तें कांहींही असो, पण शिकंदरानंतर, भारतात ग्रीक विविध कारणांनी येत होते, त्यांनी भारताच्या जवळच्या बॅक्ट्रिया भागात राज्येही स्थापली होती, व त्यांचे भारताशी संबंधही होते. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या काळापासून, किंवा त्याही आधीपासून, भारताचे मध्यपूर्व आशियातील देशांशी व रोमशी (अथवा सध्याच्या टर्की या देशातील तत्कालीन रोमन राज्याशी) व्यापारी संबंध होतेच. या सगळ्या संबंधांच्या फलस्वरूप, इ.स.च्या पहिल्या सहस्त्रकाच्या सुरुवातीच्या काळात, किंवा त्याच्याही आधी,  हा  ‘आगर’च्या जवळपासच्या उच्चाराचा शब्द कोकणात पोचला असावा. आपण ‘agger’ या लॅटिन शब्दाचा अर्थ पाहिला आहे, व त्याचा कोकणातील आगराशी कसा संबंध पोचूं शकतो, हेही पाहिलें आहे. कोकणपट्टीवर येणार्‍या व्यापारी  अरबांतर्फे, किंवा इ.स. च्या सुरुवातीच्या शतकात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेल्या बेने-इस्त्राइलींतर्फे, किंवा त्यांच्या एक-दोन शतकानंतर गुहागरला उतरलेल्या चित्पावनांतर्फे, हा शब्द तत्कालीन प्राकृत भाषेमधे सामील झाला असावा, असें मला वाटतें. (मौर्यकाळापासूनच उत्तरेकडून दक्षिणेकडे जनसमूहांचें स्थलांतर होतच होतें. चित्पावन उत्तरेकडून समुद्रमार्गानें गुहागरला आले, अशी आख्यायिकाच आहे. चित्पावन मूळचे ग्रीकवंशीय असावेत असें मला वाटतें. त्याचें थोडें विवेचन पुढें केलेलें आहे ) .

पुढे गुप्तकाळात (साधारणपणें इ.स. ३२० ते ५५०) संस्कृत ही राजभाषा झाली, संस्कृतचें पुनरुत्थान झाले, व प्राकृत शब्दांचें संस्कृतीकरण (संस्कृतायझेशन) झाले (उदा. सोपारें चे शूर्पारक). त्यावेळी, या शब्दाचें ‘आगर/आगार’ असें रूप झालें, व तें अन्य अर्थ असलेल्या समानुच्चारी शब्दाशी मिसळून गेलें. पुढील काळात संस्कृतचें पुनश्च प्राकृतीकरण (अपभ्रंश भाषा) झाले, आणि त्या स्थित्यंतरातून पुढे तो त्या रूपानें मराठीत आला, असा या कोकणातील ‘आगर’ (म्हणजे नारळी-पोफळींची बाग) या शब्दाचा प्रवास दिसतो.

आगरी समाजाच्या उगमाबद्दलचा कयास :

आगरी समाजाबद्दल महाराष्ट्र शब्दकोश सांगतो की, हे लोक जेजुरीच्या खंडोबाची भक्ती करतात. आपल्याला हें लोकगीतांमधूनही दिसून येतें. आतां प्रश्न असा की, कोकणातील जमात देशावरील (घाटावरील) देवाची भक्ती कशी करते ? हा प्रश्न प्रस्तुत करण्याचें कारण स्पष्ट करणें आवश्यक आहे. ‘देश’ भाग व कोकण हे सह्याद्रीमुळे विभागलेले आहेत. तत्कालीन घनदाट जंगलांमुळे प्रवासही सोपा नव्हता. व्यापारी तांडे किंवा तीर्थयात्रा सोडल्यास, लांबचा प्रवास करणें फारच कठीण होतें. त्यामुळे ‘देश’

व कोकण या दोन्ही विभागांमधील संस्कृतीतही कांहींसा फरक आहे. पुरातन काळापासून पठारावरील

लोक कोकणावर राज्य करीत असले (यादवपूर्वकालीन नृपती, यादव, बहामनी राजे, विजयनगरचे राजे, निजामशाही, आदिलशाही, शिवाजी इत्यादी); देशावरील मंडली कोकणात वास्तव्याला आली, (उदाहरणार्थ, कर्‍हाडे मंडळींनी एक हजार वर्षांपूर्वी कर्नाटक भागातून, आणि ‘देश’ भागातून कोकणात स्थलांतर केलेलें आहे); असें असलें तरी, कोकणातील लोकांनी मात्र पेशवेकाळापूर्वी ‘देशा’वर स्थलांतर केल्याचें दिसत नाहीं. खेळे-दशावतार कोकणात दिसतात, देशावर ते ठाऊक नाहींत. देशावरील लेझीम वगैरे खेळ कोकणात विशेष दिसत नाहीत. खाण्याचे प्रकार पाहिले तर, मासे तर दोन्ही विभागांमधे वेगळे आहेतच; पण कोकणातील आंबोळी, आयतें, पातोळे, कुळथाचें पिठलें वगैरे पदार्थ देशावर दिसत नाहींत. देवांचेही असेंच आहे. राम-कृष्ण-शंकर वगैरे सार्वत्रिक लोकप्रिय देव सोडले तर, ‘देश’ विभागातील व कोकणातील देवही जरा भिन्नच आहेत. विठोबा व वारकरी पंथ देशावर खूपच लोकप्रिय आहे, पण कोकणात तेवढा नाहीं. दत्त हें दैवतही मूलत: देशावरलें. दत्ताची कांहीं देवस्थानें मध्य प्रदेश व गुजरातमधेही आहेत, पण कोकणात दत्त फारसा दिसत नाहीं. रवळनाथ हें देवनाम कोकणात दिसतें, देशावर नाहीं. शांतादुर्गा, विजयादुर्गा या महाराष्ट्रातील कोकण भागापासून ते गोवा-मंगळूरपर्यंतच्या किनारपट्टीतील लोकांच्या कुलदेवता असतात, पण ‘देशा’वर त्यांचे नांव ऐकू येत नाहीं ; ‘देशा’वरील देवींची नावें भिन्न आहेत. परशुरामाचें मंदिर कोकणात आहे ; ‘देशा’वर परशुरामी असें आडनाव आढळतें, पण परशुरामाचें मंदिर नाहीं. गणपति ‘देशा’वर लोकप्रिय झाला तो प्रथम पेशव्यांमुळे व नंतर लोकमान्य टिळकांमुळे. म्हणूनच, हा प्रश्न महत्वाचा वाटतो की, कोकणातील आगरी हे ‘देशा’वरील खंडोबाचे भक्त कसे ?

याचें उत्तर मिळण्यापूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊं. जमातींची नावें, त्यांच्या चालीरीती, आख्यायिका वगैरेंवरून त्यांचें मूळ सापडू शकतें. तसेंच हेंही लक्षात ठेवायला हवें की, वेगवेगळ्या जनसमूहांनी विविध कारणांनी एका भागातून दुसर्‍या भौगोलिक भागात कायमचें स्थलांतर केलेलें आहे. कांहीं उदाहरणें पाहूं या. शुक्ल-यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण महाराष्ट्राच्या ‘देश’ भागात (घाटावर) आहेत. (थोडेसे कांहीं काळापूर्वीच उत्तर कोकण, म्हणजे ठाणें जिल्हा भागात आलेले आहेत). पण, इतिहासाचार्य राजवाडे यांच्यानुसार ते जन , बौद्धकालीन ‘मध्यदेश’ इथून (मगधाच्या पश्चिमेकडील भागातून) उत्तर-बौद्धकाळात दक्षिणेत आलेले आहेत. सारस्वत काश्मीर-पंजाब भागातून आले असें राजवाडे सांगतात. कर्‍हाडे ब्राह्मणांचा उल्लेख आधी केलेलाच आहे. कर्‍हाड गाव देशावर आहे, मग कर्‍हाडे ब्राह्मण मूलत: कोकणातच कसे ? तर, ते १००० वर्षांपूर्वी कर्नाटक भागातून प्रथम कर्‍हाडला आले, व नंतर तेथून ते कोकणात उतरले.

( मध्य युगापर्यंत दक्षिण महाराष्ट्राचा भाग कर्नाटकाच्या अंतर्गत येत होता, हें सेतुमाधवराव पगडी यांनी दाखविलेलें आहे ). लाड ब्राह्मण गुजरातमधून विदर्भात आले. चित्पावन उत्तरेकडून आले, याचा मागेंच उल्लेख केलेला आहे. ते कुठून आले ? ते मूळचे ग्रीक वंशाचे असावेत असें मला वाटतें, हा उल्लेख मी आधी केलेलाच आहे. इ.स.च्या सुरुवातीच्या काळात, शक-कुशाण-हूण यांच्या एकामागोमाग आलेल्या रेट्यांमुळे ते उत्तर भारतातून खाली दक्षिणेकडे सरकले, असा माझा कयास आहे. शेवटी ते गुजरातच्या किनार्‍यावरून समुद्रमार्गानें कोकणात पोचले).  लोणावळ्याजवळील ‘ठाकर’ जमात ही हिंदीभाषी प्रदेशातून आलेली आहे. गुजर हे उत्तरेकडून खाली ज्या प्रदेशात आले, त्याला हल्ली गुजरात राज्यप्रदेश म्हणतात. (आजही पंजाबमधे गुजरात नावाचें गाव आहे. उत्तरेकडील गुजरी महाल प्रसिद्ध आहे). गुजरातेतील पटेल

हे हरियाणामधून आलेले आहेत. अहिराणी भाषा खानदेशात बोलली जाते, पण अहीर हे महाभारतकाळात उत्तर भारत व गुजरात-सौराष्ट्र भागात होते. ( भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की, अहिराणी ही हिंदीची बोली आहे). शिकंदरकालीन मालव गण उत्तर-पश्चिम भारतात होता, तो नंतर ज्या भागात उतरला त्याला माळवा असें नाव पडलें. तमिळनाडुमधील मध्ययुगीन पल्लव वंश उत्तरेकडून आलेला होता. अय्यर-अय्यंगार स्वत:ला श्रेष्ठ तमिळ समजतात. त्यांच्यापैकी एकानें मला सांगितलें की, १००० वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांना उत्तरेकडून मुद्दाम आमंत्रित करून आणवलें गेलेलें आहे.

माझें मत असें आहे की, जसें हे इतर समूह स्थलांतर करून आले, त्याचप्रमाणे ‘आगरी’ समाज हा

महाराष्ट्राच्या ‘देश’ भागावरून (घाटावरून) हजार-दोन हजार वर्षांपूर्वी उत्तर कोकणात उतरलेला आहे. म्हणूनच, त्याचें दैवत खंडोबा आहे, कारण येतांना तो समाज आपलें दैवत बरोबर घेऊन आला. अर्थात् आतां हा समाज पूर्णपणें कोकणी म्हणावा लागेल, कारण त्याच्या त्या स्थलांतरानंतर ५० ते १०० पिढ्या,

(होय, ५० ते १०० पिढ्या), लोटल्या आहेत.

समारोप :

मी भाषाशास्त्रज्ञ अथवा समाजशास्त्रज्ञ नाहीं., फक्त एक अभ्यासक आहे. माझ्या अभ्यासामधून माझ्या मतीला जें गवसलें, तें इथें मांडलेलें आहे. ज्ञानवंत जन त्यावर नक्कीच आणखी प्रकाश टाकूं शकतील. आगरी समाजाची भाषा, चालीरीती, इतर दैवतें, वगैरेंमधूनसुद्धा बरीच माहिती मिळू शकेल. प्रस्तुतचा लेख हा एक छोटासा प्रयत्न आहे. तो पुढच्या अभ्यासाला चालना देईल, अशी आशा आहे.

संदर्भ :

 

 • राजवाडे लेखसंग्रह. सं. – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
 • आदर्श मराठी शब्दकोश. संपादक – प्र. न. जोशी
 • मराठी व्युत्पत्ति कोश. सं. – कृ. पां. कुलकर्णी ; पुरवणी संपादक – श्रीपाद जोशी
 • Saurus शब्द-कौमुदी अमरकोश – (मराठी). सं. – मो.वि.भाटवडेकर.
 • महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश. सं. – य. रा. दाते , चिं. ग. कर्वे
 • महाराष्ट्र शब्दकोश. सं. – य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चंदोरकर, चिं. शं. दातार
 • मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश. सं. – वि. शं. ठकार
 • समांतर कोश हिंदी थिसारस. सं. – अरविंद कुमार, कुसुम कुमार.
 • बृहत् प्रामाणिक हिंदी कोश. सं. – आचार्य रामचन्द्र वर्मा ; संशोधन-परिवर्धन – डॉ. बदरीनाथ वर्मा
 • भाषा शब्द कोश – (हिंदी). सं .- रामशंकर शुक्ल ‘रसाल’
 • सुलभ हिंदी मराठी कोश. सं. – य. रा. दाते
 • अभिनव शब्दकोश – ( हिंदी-मराठी, मराठी-हिंदी). सं. – श्रीपाद जोशी
 • भार्गव बाल हिंदी कोश. सं. – आर्. सी. पाठक
 • उर्दू-हिंदी शब्दकोश. सं. – मुहम्मद मुस्तफ़ा खाँ ‘मद्दाह’
 • उर्दू-मराठी शब्दकोश. संकलक-संपादक – श्रीपाद जोशी ; समीक्षक-संपादक – एन्. एस्. गोरेकर
 • Sanskrit-English Dictionary. Editor – V. S. Apte
 • A Dictionary of Old Marathi. Editor – S.G. Tulpule, Anne Fellhaus
 • The New Standard Marathi-English-Marathi Dictionary. Editor – M. S. Sirmokadam
 • English-Hindi-Marathi शब्दानंद कोश. Editor – सत्वशीला सामंत
 • Gala’s Pocket Dictionary ( English-Gujarati). Compiler : B. L. Shah
 • Longman Advanced American Dictionary
 • Longman Family Dictionary
 • Hobson-Jobson
 • Webster’s Encyclopedic Unabridged Dictionary.

— सुभाष स. नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*